सैरभैर बिबट्या - Marathi News 24taas.com

सैरभैर बिबट्या

Tag:  
www.24taas.com, मुंबई
मे 2012
 ठिकाण : आरे कॉलनी,  मुंबई
         पाच वर्षाचा मुलगा ठरला बिबट्याचं भक्ष्य
-----------------------------------------------
    मे 2012
ठिकाण : भेंडा खुर्द, नेवासा
      बिबट्या विहिरीत पडला
--------------------------------
4 एप्रिल 2012
ठिकाण : निफाड, नाशिक
एक वर्षाच्या मुलावर बिबट्याचा घाला
 
-----------
7 एप्रिल 2012
ठिकाण : मुलुंड, मुंबई
 बिबट्याची  शाळेत हजेरी 
-----------------------------
12 एप्रिल 2012
ठिकाण : दिंडोरी, नाशिक
बिबट्याच्या हल्ल्यात दोघे जखमी
------------------
19 एप्रिल 2012
ठिकाण : वणी, नाशिक
 बिबट्याच्या हल्ल्यात चौघे जखमी
-----------------
28 एप्रिल 2012
ठिकाण : निफाड, नाशिक
बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षाचा मुलगा ठार
-----------
मार्च 2012
ठिकाण :रामवाडी,नाशिक
बिबट्याच्या हल्ल्यात चारजण जखमी
--------------------
गेल्या पाच महिन्यात  बिबट्याशी माणसाचा  वारंवार सामना झाल्याचं या घटनांवरुन सहज लक्षात येईल...पण  या प्राण्याचा, माणसांच्या वस्तीतील वावर का  वाढलाय ?  माणसांवरचे बिबट्याचे हल्ले का वाढलेत  ? बिबट्याचे हल्ले रोखणं शक्य आहे का? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले असून बिबट्याचा वावर असलेल्या भागात त्याच्या दहशतीमुळे  जनतेची झोप उडालीय..
 
मुंबई शहर हे आता काँक्रीटचं जंगल झालं आहे..आणि तीच अवस्था आता उपनगरांची ही झालीय...पण संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामुळे  मुंबईच्या मध्यभागी जंगल अद्यापही श्वास घेतयं.. या जंगलातील बिबटे आता नागरी वस्तीतही दिसू लागले आहेत...बिबट्याच्या वारंवार होणा-या दर्शनामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये मोठी दहशत निर्माण झालीय..
 
जेमतेम 30-35 घरं असलेला आरे कॉलनीतील हा मथाईपाडा बिबट्याच्या वावराने चांगलाच दहशतीखाली आलाय....खरंतर गेल्या अनेक वर्षांपासून  मथाईपाडा आणि आजूबाजूच्या परिसरात बिबट्याचा वावर आहे.. मात्र  त्याचा कधी त्रास झाला नसल्याचं इथले रहिवासी सांगतात ...पण अलिकडच्या काळात या परिसरात बिबट्याची दहशत वाढली... या परिसरातील अनेक कुत्री, कोंबड्यांना बिबट्याने आपलं भक्ष्य बनवलं आहे.  गेल्या आठवड्यात इथं  जे काही घडलंय त्यामुळे इथले रहिवासी रात्रीच्यावेळी घराबाहेर पडायला धजावत नाही.... मथाई पाड्याजवळ असलेल्या चरणदेवी पाड्यातील  पाच वर्ष वयाच्या सुन्नी सोनी नावाच्या मुलाला बिबट्य़ाने ठार केलं....संध्याकाळी सुन्नी सोनी शेजारच्या पाड्यावर एका कार्यक्रमासाठी गेले होता...मात्र तो परत आलाच नाही..त्याचा छिन्नविछन्न अवस्थेत मृतदेह नागरिकांना आढळून आला...
 
या घटनेमुळे  पाड्यावरील लोक दहशतीच्या छायेखाली आहेत.एकीककडं लोकांमध्ये बिबट्याची दहशत आहे तर दुसरीकडं या परिसरात  बिबट्याचा वावर वाढलाय..  संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यांचं दर्शन आता आजू-बाजूच्या वस्तीतही होऊ लागलं आहे..त्याच्या खुणा परिसरातील झाडांवर पहायला मिळतात..
 
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात बिबट्याचा वावर वाढल्यामुळं  माणसाशी त्याचा संघर्ष अटळ असून  अलिकडच्या काळात हा  संघर्ष वाढलाय...बिबट्याची दहशत केवळ आरे कॉलनी पर्यंतच मर्यादीत नसून ती राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेल्या ठाण्यातील येऊर, भांडूप, मुलुंड, घोडबंदर, दहिसर,बोरिवली,मालाड, कांदीवली,मालाड या परिसरात बघायला मिळतं आहे... एरव्ही केवळ संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दिसणार बिबट्या आता मानव वस्तीत येऊ लागल्यामुळं नागरिकांची चिंता वाढलीय...

शहराच्या मध्यभागी राष्ट्रीय उद्यान असलेलं मुंबई हे  एकमेव शहर आहे...  मात्र वाढती नगरीवस्ती या जंगलाचं आस्तित्व पुसुन टाकण्याच्या मार्गावर आहे... बांधकामांचा जणून अजगरी विळखाच या  उद्यानाला पडला आहे... त्यामुळेच माणुस आणि बिबट्या असा संघर्ष सुरु झाला आहे. 104 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेलं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबई उपनगराच्या मधोमध वसलेलं आहे. उपनगराचे दोन भाग या उद्यानाने केलेत एवढे ते मोठे आहे. 1970 च्या सुमारास हे राष्ट्रीय उद्यानाची घोषणा करण्यात आली. तेव्हाही उद्यानाला लागून वस्ती होती. मात्र गेल्या 40 वर्षात वस्तींमधील लोकसंख्येचा आकडा हा काही लाखांच्या घरात गेला आहे. एवढंच नाही तर माणसाची घुसखोरी एवढी झाली आहे की आता उद्यानाची दक्षिण, पूर्व-पश्चिम बाजू आणि वस्ती यांच्यामधील सीमारेषाच पुसली गेली आहे. उद्यानाच्या हद्दीत घुसखोरी झालेली लोकसंख्या ही लाखांच्या घरात आहे. मात्र हा सर्व वाद न्यायालयात अडकल्याने तसंच राजकीय पक्षांचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात असल्याने यावर तोडगा निघणे केवळ अशक्य आहे..माणसानं बिबट्याच्या प्रदेशावर अतिक्रमण केलं असून बिबट्याचा मानवी वस्तीत वावर वाढल्याची  उलटी तक्रार केली जात आहे.....
 
माणसांनी बिबट्याच्या भूभागावर अतिक्रमण केल्याचं निसर्गप्रेमींचं म्हणनं  आहे. उद्यानाच्या चारही बाजूंनी  घुसखोरी  जोरात सुरु आहे.  मानवी वस्तीत बिबट्याचा वावर वाढला नसून  माणसानेच बिबट्याच्या जंगलात शिरकाव केलाय.. या घुसखोरीमध्ये आता  ठाण्यातल्या घोडबंदर रोडची भर पडली आहे. काही वर्षांपूर्वी बिबट्यासह इतरही प्राणी  घोडबंदर रोड ओलांडून  उल्हास नदीच्या परिसरातील  जंगलात सहज जात असंत. त्यावेळी  या भागात  मनुष्यवस्तीही नव्हती आणि वाहनांची वदर्ळही नव्हती. मात्र सध्या घोडबंदर रोडच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात निवासीकरण झालं आहे...मोठमोठी रहिवासी संकुलं उभी राहात असून भविष्यात बांधकामांची संख्या वाढतच जाणार आहे... त्याचबरोबर घोडबंदर रोडवर वाहनांची संख्या एवढी वाढली आहे की या रस्त्यांवर असलेले असे बोर्डही आता केळ नावा पुरतेच  उरले आहेत.  घोडबंदर रोडमुळे उल्हास नदीच्या परिसरातील  जंगलाकडं जाण्याचा प्राणांचा मार्ग बंद झाला आहे... . त्यामुळे या परिसरातील रहिवाशांना आता बिबट्याचं दर्शन होऊ लागलंय..लोक रहिवासी परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याची तक्रार करत असले तरी  राष्ट्रीय उद्यानाला चारही दिशांनी बांधकामाचा अजगरी विळखा पडलाय असून हे सत्य कोणाच नाकारु शकणार नाही..

आवती भोवती वस्ती असली तरी बिबट्या वस्तीत शिरकाव करतो...कारण तो बदलत्या परिस्थितीशी जूळवून घेणारा प्राणी आहे...पण ही मानवी वस्ती अशाच वेगाने वाढत राहिली तर मग मात्र बिबट्या आणि माणूस यांच्यातला संघर्ष तीव्र होणार यात कोणालाच शंका नाही. आपल्या पिलाला छातीशी घेत मुक्तपणे फिरणारी माकडं, रस्त्यावर बिनधास्तपणे बागडणारी माकडं हे संजय गांधी राष्ट्रीय़ उद्यानातील नेहमीचे पण डोळ्यांना सुखावणारे दृश्य आहे. असे अनेक प्राणी या उद्यानात मुक्तपणे संचार करत असतात. या उद्यानामुळे विविध जातींच्या प्राणी पक्षींचं अस्तित्व टिकुन आहे, त्यांची संख्याही वाढत आहे. एवढचं नाही तर विविध प्रकारची झाडेही इथे बहरत आहेत. या उद्यानामुळेच तुळशी, विहार तलावांना पाणी उपलब्ध होतं,  मिठी आणि पोईसर नदीलाही पाणी याच उद्यानातूनच मिळते. मुंबई आणि ठाणे शहरांमधील हवेच्या प्रदुषणाची तीव्रता कमी करण्याचे काम हे उद्यान करते.ही उद्यानं म्हणजे या दोन शहरांची जणू फुफ्फुसं आहेत...
 
गेल्या काही वर्षात या उद्यानात माणसाचा हस्तक्षेप वाढत चालला आहे. उद्यानाला लागून लोकवस्ती वाढत चालली आहे. निवासी संकुलांचे बांधकाम वाढत चालले आहे. जगण्यासाठी माणसाचा आटापीटा सुरु आहे, मात्र हे करतांना होणारे परिणाम उद्यानातील वनसंपदेला सहन करावे लागत आहे. विशेषतः उद्यानातील बिबट्याच्या मुक्त संचारावर यामुळे गदा आलीये. त्यातच  कुत्रे, कोंबड्या यांसारखे भक्ष्य सहज उपलब्ध होत असल्यानं बिबट्या वस्तीमध्ये शिरल्याच्या घटना वारंवार पहायला मिळतात. तेव्हा अशा घटना भविष्यात टाळणे कठीण असल्याचं मत निसर्गप्रेमी व्यक्त करत आहेत.
 
उद्यानाच्या चारही बाजुने मानवी वस्तीचा, बांधकामांचा फास आवळला जात आहे. हे चित्र असंच राहिले तर काही वर्षांनी उद्यानाचे रुपांतर चारही बाजुने वेढलेल्या एका मोठ्या प्राणीसंग्रहालयात होईल. या प्राणीसंग्रहालयात प्राण्यांचा मुक्त संचार असेल, भोवतालचे जंगलही तसेच असेल मात्र उद्यानाची सीमारेषा प्राण्यांना काही ओलांडता येणार नाही. हे वन्यजीव 104 चौरस किलोमीटरच्या प्रदेशात कायमचे बांधले जातील...आणि त्यानंतर मात्र बिबट्या आणि माणूस यांच्यातला संघर्ष कितीतरी पटीने तीव्र झालेला असेल... कारण बिबट्या हा बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणारा प्राणी आहे..नैसर्गिक अन्न साखळीत बिबट्याचं पारडं जडं आहे ..तो अनेक प्राण्यांना खातो पण त्याला कोणी खात नाही...तो मानवी वस्तीजवळ राहूनही माणासापासून चार हात दूर राहण्याचा प्रयत्न करतो..कुत्रा हा बिबट्याची आवडती शिकार असल्यामुळं रात्रीच्यावेळी  वस्तीकडं त्याचे पाय आपोआप वळतात..संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातीही वस्ती वाढत चालल्यामुळे मानवी वस्तीत  बिबट्याचा वावरही वाढला आहे... भविष्यात  परिस्थिती आणखीच गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही..त्यामुळे  या विषयावर जनजागृती करणे हाच एकमेव रामबाण उपाय आहे.
 
 
 
 

First Published: Thursday, May 10, 2012, 07:26


comments powered by Disqus