www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीनव्या सरकार स्थापनेसाठी दिल्लीत घडामोडींना सुरुवात झालीय. त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतलीय. या दोघांमध्ये कॅबिनेट संदर्भात चर्चा होणार असल्याचं बोललं जातंय.
यानंतर मोदी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भेट घेऊन आशिर्वाद घेणार आहेत. तत्पूर्वी सकाळी मोदींनी एक बैठक घेतली. यावेळी मोदींचे सहकारी अमित शहा, भाजपचे सरचिटणीस जे. पी. नड्डा, येडियुरप्पा आणि बिहारचे भाजप प्रमुख धर्मेंद्र प्रधान उपस्थित होते.
या बैठकीत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या राजीनाम्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय परस्थितीवरही चर्चा झाल्याचं बोललं जातंय...सध्या तरी भाजपनं याबाबत वेट अँड वॉचची भूमिका घेतलीय.
दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज झालेल्या बैठकीनंतर लालकृष्ण अडवाणी हे लोकसभेचे अध्यक्ष तर राजनाथ सिंह हे मोदींच्या कॅबिनेटमध्ये संरक्षण मंत्री होऊ शकतात असं सांगण्यात येतंय. त्यामुळं जर राजनाथ सिंह कॅबिनेटमध्ये गेल्यास भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन गडकरींची वर्णी लागू शकते. त्यामुळं आता सर्वांचं लक्ष येणाऱ्या दोन दिवसांकडे लागलंय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, May 18, 2014, 14:47