www.24taas.com, झी मीडिया, अहमदनगर सर्वाधिक साखर कारखान्यांचा जिल्हा असलेल्या मतदारसंघात आज आपण जाणार आहोत. राजकीय दृष्ट्या मातब्बर अशा नेत्यांच्या या जिल्ह्यात सर्वाधिक राजकीय घडामोडी घडत असतात.
अहमदनगर म्हटलं की नजरेसमोर येतो तो मोघलांचा काळ आणि निजामशाहीतील राज्य कारभाराचे प्रमुख केंद्र. 15 व्या शतकात बहामनी राज्याची शकले होऊन मलिक अहमदशहा बहिरी नगर जिल्ह्यातील सीना नदीच्या काठी विसावला... त्याच्याच नावावरून अहमदनगर हे नाव पडलं अशी आख्यायिका आहे.
रामायणकाळात अगस्ती ऋषी आणि रामाची भेट झाली ती याच परिसरात. `चले जाव` आंदोलनादरम्यान पंडित जवाहरलाल नेहरूंनी नगरमध्ये असलेल्या भुईकोट किल्ल्यातील तुरूंगात `डिस्कवरी ऑफ इंडिया` तर बाबासाहेब आंबेडकरांनी `थॉटस ऑन पाकिस्तान` लिहिलं. या जिल्ह्यातील प्रमुख पीक ज्वारी असून ते दोन्ही हंगामात घेतलं जातं. ऊस हेदेखील महत्त्वाचं पीक असून जिल्ह्यातील सर्वाधिक साखर कारखाने नगरमध्येच आहेत.
राज्यातील पहिला सहकारी साखर कारखाना आणि सहकारी पतसंस्था याच जिल्ह्यात स्थापन झाली. सहकार महर्षी विठ्ठलराव विखे-पाटील यांनी धनंजयराव गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखील त्याची मुहूर्तमेढ रोवली. राजकीय महत्वाकांक्षा असलेल्यांचा जिल्हा म्हणून अहमदनगरची ख्याती आहे. परराज्याची सीमा नसलेला हा पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा आहे.
दुसरे गांधी अशी ओळख असलेले अण्णा हजारेंचं राळेगणसिद्धी गावही याच मतदारसंघात मोडतं. राळेगणसिद्धी आणि हिवरेबाजार या दोन गावांनी राज्यात ग्राम व्यवस्थापनाचा आदर्श निर्माण केला. लष्करी सामर्थ्याचे आधुनिक आणि महत्वपूर्ण मोठे तळ नगरमध्ये आहेत.
तोफखाना दलाचे मोठे युनिट येथे असून सध्या भुईकोट किल्लाही त्यांच्या ताब्यात आहे. चारचाकी वाहन असो की दुचाकी कुठल्याही वाहनाचे उत्पादन करावयाचे असेल तर अहमदनगरच्या व्हेईकल रिसर्च डेव्हलपमेंट एस्टॅब्लीशमेंट केंद्रातून परवानगी मिळवावी लागते.
सुरूवातीपासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या या मतदारसंघात 1996साली काँग्रेसचे मारूती शेळके खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 1998 साली झालेल्या निवडणुकांमध्ये शिवसेनेत गेलेल्या बाळासाहेब विखे पाटील यांनी बाजी मारली. 1999 साली भाजपचे दिलीपकुमार मनसुखलाल गांधी यांना खासदारकीची गादी मिळाली. 2004मध्ये राष्ट्रवादीचे तुकाराम गडाख विजयी झाले होते. तर 2009 लोकसभा निवडणुकांमध्ये पुन्हा भाजपच्या दिलीपकुमार गांधी यांनी बाजी मारली.
2014 लोकसभा निवडणुकीसाठी इथल्या मतदारांच्या संख्येत जवळपास दीड लाखांनी वाढ झाली आहे.
याआधी 2009 च्या लोकसभा निवडणुकीत एकूण 15 लाख 17 हजार 951 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. त्यापैकी पुरूष मतदारांची संख्या ही 7 लाख 89 हजार 897 होती, तर महिला मतदारांची संख्या 7 लाख 28 हजार 054 एवढी होती.
पूर्वाश्रमीचा कम्युनिस्टांचा बालेकिल्ला राहिलेल्या या मतदारसंघातील अनेक कम्युनिस्ट कालांतराने काँग्रेसवासी झाले. मात्र भारतीय जनता पक्षाने तेथे आपलं आव्हान कायम राखलंय. या मतदारसंघात दुरंगी लढत झाल्यास काँग्रेस आघाडीला यश मिळते आणि तिरंगी लढत झाल्यास भाजपचा उमेदवार निवडून येतो, असा गेल्या तीन निवडणुकांमधील अनुभव आहे.
अहमदनगर लोकसभेतील भाजपचे शिलेदार अर्थात विद्यमान खासदार दिलीपकुमार गांधी यांची ओळख
खासदार दिलीपकुमार गांधीनाव - खा. दिलीप मनसुखलाल गांधी
जन्म - 9 जानेवारी 1951
वय - 62 वर्ष
शिक्षण - एस. एस. सी.
भाजपच्या तालमीत घडलेले अहमदनगरचे खासदार दिलीप गांधी गेल्या तीन दशकांपासून पक्षात विविध पदांवर कार्यरत आहेत. भाजपचा चेहरा असलेले दिलीप गांधी दोनवेळा या लोकसभेवर निवडून आले आहेत.
महानगरपालिकेत नगरसेवक, नंतर याच पालिकेत भाजपचे नेते आणि नंतर 1985 मध्ये ते नगरपालिकेत उपनगराध्यक्ष झाले.
1999 साली खासदार म्हणून निवडून येताच जहाज बांधणी मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला. अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात नगर जिल्ह्याला बाळासाहेब विखेंनंतर केंद्रीय मंत्रीपद मिळाले ते दिलीप गांधीच्या रूपाने. केंद्रात 2009 सालपासून पेट्रोल आणि नैसर्गिक वायू, नागरी वाहतूक आणि घरे यांसारख्या समित्यांच्या सदस्यपदी ते विराजमान आहेत. अहमदनगर अर्बन बँकेचं संचालकपदही सध्या ते सांभाळत आहेत.
गांधींचा जन्म पुण्यातील असला तरी सध्या ते नगर शहरात वास्तव्यास आहेत. आपल्या घरातील कार्यालयातूनच ते आपला दैनंदिन कारभार चालवतात. पत्नी सरोज, दोन पुत्र आणि एक कन्या असा दिलीप गांधीचा परिवार आहे. गांधी घराण्यांप्रमाणे त्यांचा मुलगाही आता राजकारणात त्यांचे कामकाज बघतो.
2009च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे दिलीप मनसुखलाल गांधी यांना 3 लाख 12 हजार 47 मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांना 2 लाख 65 हजार 316 मते पडली. तर अपक्ष म्हणून उभे राहिलेल्या राजीव राजळे यांना 1 लाख 52 हजार 795 मतदारांनी आपला पाठिंबा दर्शवला होता.
खासदार गांधी यांची एकूण मालमत्ता ही 1 कोटी 30 लाख 53 हजार 391 रूपयांची असून, यांपैकी 23 लाख 43 हजार 140 रूपयांची स्थावर मालमत्ता आहे. तर 1 कोटी 7 लाख 10 हजार 521 रूपयांची जंगम मालमत्ता गांधींच्या नावे आहे.
पुस्तक वाचन, मराठी नाटकं पाहणे याची त्यांना आवड आहे. स्विमिंग, टेबल टेनिस आणि क्रिकेटचे ते चाहते आहेत.
दिलीप गांधींची हॅटट्रिक रोखण्यासाठी राष्ट्रवादीने यंदा फिल्डिंग लावलीय, तर भाजपातूनही गांधींचा पत्ता कापण्यासाठी प्रयत्न सुरू झालेत. भाजपाच्या या गांधीना पुन्हा संधी मिळते की अँटी इन्कम्बन्सी रोखण्यासाठी भाजप त्यांची विकेट काढते, याबाबतची चर्चा मतदारसंघात रंगलीय.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील समस्यासिंधू संस्कृतीतील पहिली मानवी वसाहत आणि मोगलशाहीत राजधानीचा दर्जा असलेले हे अहमदनगर शहर. मोठमोठे उद्योग आणि रोजगाराचं स्वप्न येथील मतदारांना निवडणुकीआधी दाखवलं गेलं. पण गेल्या पाच वर्षांत नगरचा हवा तसा विकास झालेला नाही. दिलीप गांधी नगरचे खासदार असले तरी त्यांनी या शहराकडे दुर्लक्षं केल्याचं मतदारांचं म्हणणं आहे.
कारण त्यांचा मतदार ग्रामीण भागात आहे. या शहरातील ब्रिटिशांच्या काळात सुरू झालेली रेल्वे अद्यापही जैसे थे स्थितीतच आहे. अगदी इमारतीही तशाच. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे रेल्वे सुरू झाल्या, मात्र त्याही केवळ शिर्डीपुरत्याच. या मतदारसंघातील एसटी बस स्थानकाजवळचा परिसर गजबजलेला असतो.
मात्र येथे स्वच्छता आणि सुसज्जतेचा नेहमीच अभाव आढळून येतो. सोयी-सुविधांची बोंब आहेच, अगदी इंग्रजांच्या काळात बांधण्यात आलेल्या ब्रीजची अवस्थाही अगदी वाईट आहे. सीना नदीचा नाला झाला असून पात्रातच अतिक्रमण करून वीट भट्टी उभारण्यात आली आहे. शहरातच ही अवस्था असेल तर मतदारसंघात काय असा प्रश्न या निमित्ताने विचारला जातोय.
मतदारसंघातील सर्व शेतकरी वीज मंडळाच्या त्रासाने वैतागलेले आहेत. खासदार तक्रारींची दखल घेतात, मात्र समस्या सुटत नसल्यानं शेतकरी हैराण झाले आहेत. अहमदनगरपासून पुणे जवळ असलं, तरी पुणे-नाशिकच्या तुलनेत इथं वेगवान विकास आणि नागरिकीकरण झालेलं दिसत नाही. उद्योगांना सबसिडीचा फायदा मिळत नसल्यानं अनेक उद्योजकही नाराज आहेत.
एकीकडे मतदार समस्यांचा पाढा वाचतायत, तर खासदार दिलीप गांधी मात्र आपण मतदारसंघाचा विकास केल्याचा दावा करतायत.
मोगलकाळात अहमदनगरचा, दुबईच्या कैरो राजधानीसारखा मरातब होता. पण सद्यस्थितीत मोगलकाळासारख्या सुखसोयी नाही तरी किमान मुलभूत सुविधा जरी मिळाल्या असत्या तरी दिलीप गांधींना मतदान केल्याचं चीज झालं असतं, अशी भावना मतदारसंघात सर्वत्र पाहायला मिळत आहे.
पुनर्रचनेआधी अहमदनगर मतदारसंघ काँग्रेसचा गढ होता. जागावाटपात हा मतदारसंघ आपल्याकडं खेचून राष्ट्रवादीनं विखे पाटील यांच्या या गढाला सुरूंग लावला. बाळासाहेब विखे पाटील आणि शरद पवार यांच्यातील राजकीय वैमनस्यामुळे सध्या या गडावर भाजप-सेना युतीचं वर्चस्व आहे. अगदी सुरुवातीपासून काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघावर आता पकड मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली आहे.
विधानसभा मतदारसंघातील संख्याबळ पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसने मुसंडी मारल्याचं जाणवतं. माळी, मुस्लीम, मराठा आणि इतर जातींचा समावेश असलेल्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघात माळी समाजाचा अधिक प्रभाव आहे.
या लोकसभा मतदारसंघातील शेवगाव विधानसभेवर राष्ट्रवादीच्या चंद्रशेखर घुलेंचं वर्चस्व आहे. तर शिवाजी कर्डिलेंकडे राहुरी विधानसभेचं आमदारपद आहे. शिवसेनेचे विजयराव औटी पारनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. तर अहमदनगर शहरावरही अनिल राठोड यांच्या रूपाने शिवसेनेचीच सत्ता आहे. श्रीगोंदा विधानसभा राष्ट्रवादीच्या बबनराव पाचपुतेंच्या ताब्यात आहे. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्राध्यापक राम शिंदे आमदार म्हणून काम करत आहेत.
कोणत्याही एका पक्षाची पूर्ण सत्ता नसल्याने ना घर ना घाट का, अशी नगर लोकसभा मतदारसंघाची अवस्था झालीय... सुसंस्कृत आणि सुनियोजित असलेल्या या शहराच्या नाड्या मतदारांनी विविध राजकीय पक्षांकडे दिल्यात. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत वेगवेगळ्या पक्षांच्या हाती सत्ता आहे. राजकीय नेतृत्व आहे, पण त्यांच्याकडे विकासाची दूरदृष्टीच नसल्याने या नगराला ओंगळवाणं रूप आलंय... निदान पुढच्या निवडणुकीनंतर तरी विकास साधणारा खासदार मिळेल, अशी अपेक्षा नगरकर करतायत.
अहमदनगर मतदारसंघातील उमेदवार* आघाडी – राजीव आप्पासाहेब राजळे (राष्ट्रवादी)
* महायुती – दिलीप गांधी (भाजप)
* आप – दिपाली सय्यद
* बसपा - किसन काकडे
व्हिडिओ –•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. •
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, April 4, 2014, 12:31