www.24taas.com, झी मीडिया, अकोला अमरावती मतदार संघात एकेकाळी काँग्रेसचे विदर्भातील मातब्बर नेते आणि इंदिरा गांधींचे निकटवर्तीय मानले जाणारे वसंत साठेंनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंयं..माजी खासदार वसंत साठेंचा एकेकाळी दिल्ली दरबारी दबदबा असायचा, काँग्रेसचा हा पारंपरिक बालेकिल्ला होता..पाहूयात कोणता हा मतदारसंघ?
विविध धर्मांचा गर्भ म्हणजे विदर्भ असं म्हटलं जातं.. याच विदर्भातला हा अकोला लोकसभा मतदारसंघ म्हणजे विदर्भाची राजकीय समीकरणं बदलणारा मतदारसंघ. शेती हा इथला मुख्य उद्योग... इथला डाळ उद्योग देशात दुस-या क्रमांकाचा मानला जातो. याशिवाय कापूस आणि सोयाबीनवर प्रक्रिया करणारे काही उद्योगही जिल्ह्यात आहेत. नागपूरनंतर विदर्भातील दुस-या क्रमांकाचं औद्योगिक शहर अशी अकोल्याची ओळख.
विदर्भातील अमरावती विभागात असलेला अकोला लोकसभा मतदारसंघ. पुनर्रचनेनंतर संपूर्ण अकोला जिल्हा आणि वाशीम जिल्ह्यातील विधानसभेचा रिसोड मतदारसंघ मिळून हा लोकसभा मतदारसंघ बनलाय. या मतदारसंघानं नेहमीच विरोधी पक्षाचा खासदार निवडून दिलाय.
अकोला लोकसभा मतदारसंघ अकोला (पश्चिम), अकोला (पूर्व), अकोट, बाळापुर, मुर्तीजापूर (राखीव - एस.सी.) या विधानसभा मतदारसंघाचा मिळून बनला आहे.
2009 मध्ये अकोला लोकसभा मतदारसंघात एकूण मतदार 14 लाख 80 हजार 606 आहेत त्यापैकी
पुरूष मतदार 7 लाख 68 हजार 569 तर महिला मतदार
7 लाख12 हजार 37 इतकी आहे.
कुणाचं किती टक्के मतदान?
मराठा - 25 टक्के,
कुणबी - 12 टक्के,
दलित - 20 टक्के,
आदिवासी - 08 टक्के,
इतर(अल्पसंख्याक) - 35 टक्के इतकी आहे.
अकोला लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला होता. काँग्रेसचे विदर्भातील मातब्बर नेते आणि इंदिरा गांधींचे निकटवर्तीय मानले जाणारे वसंत साठे यांनी अकोला लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलंय. नव्वदीच्या राजकीय ध्रुवीकरणानंतर मात्र काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला खिंडार पडलंयं.
या मतदारसंघातून 1977 मध्ये वसंत साठे काँग्रेसचे खासदार होते. तर 1980 आणि 1984 मध्ये मधुसूदन वैराळे हे काँग्रेसचे खासदार होते.
त्यानंतर मात्र या मतदारसंघाला खिंडार पडलं. भाजपचे पांडुरंग फुंडकर हे 1989,1991,1996 मध्ये तीनदा खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे 1998 आणि 1999 मध्ये दोनदा लोकसभेत खासदार म्हणून निवडून आले. मग 2004 आणि 2009मध्ये भाजपचं कमळ पुन्हा फुललं.. संजय धोत्रे हे सलग दोनदा लोकसभेत अकोल्याचं प्रतिनिधीत्व करतायत.
हा मतदारसंघ कायमच `खास` लढतींसाठी नावाजलेला आहे. काँग्रेस, भारिप-बहुजन महासंघ आणि भाजप अशी तिरंगी लढत येथे नेहमीच पाहायला मिळते. आता पुढच्या वेळी अकोल्याचे मतदार नेहमीप्रमाणे धक्कादायक निकाल देतात की भाजपचं कमळ तिस-यांदा फुलवतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
वडिल काँग्रेसचे दोन वेळा आमदार होते तर काका राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री आणि विदर्भाचे मातब्बर नेते...विदर्भातील सहकार आणि राजकीय क्षेत्रातील नावाजलेलं कुटुंब....अकोला लोकसभा मतदारसंघाच्या या कुटुंबातील विद्यमान खासदारांची ओळख
खासदार संजय श्यामराव धोत्रेनाव - खा. संजय श्यामराव धोत्रे
जन्म - 26 फेब्रुवारी 1959
वय - 54 वर्षे
शिक्षण - बी.ई (मेकॅनिकल)
अकोला जिल्ह्यातील सहकार आणि राजकीय क्षेत्रातील धोत्रे कुटुंबीय.विद्यमान खासदार संजय श्यामराव धोत्रे हे दुस-या पिढीचे नेते आहेत. संजय धोत्रे यांचे वडील शामराव धोत्रे हे मुर्तीजापूर मतदारसंघातून दोनदा काँग्रेसचे आमदार होते. तर त्यांचे काका आणि राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री वसंत धोत्रे हे देखील सहकार आणि राजकीय क्षेत्रातलं अतिशय मोठे नाव आहे.
व्यवसायाने अभियंते आणि शेतकरी असणारे संजय धोत्रे यांनी महाविद्यालयीन शिक्षण नागपूरमधून पूर्ण केलं.1999 ते 2004 या काळात मुर्तीजापूर विधानसभा मतदारसंघातून खा. धोत्रे भाजपचे आमदार म्हणून निवडून आले. 2004 च्या लोकसभा निवडणुकीत ते पहिल्यांदा खासदार झाले. सध्या अकोल्याचे खासदार म्हणून भाजपच्या तिकिटावर ते लागोपाठ दोनवेळा निवडून आलेत.
खा. संजय धोत्रेंना अध्यात्माची आणि योगासनांची आवड आहे. तसेच पुस्तके वाचनाची आणि प्रवासाची आवड आहे. क्रिकेट आणि टेनिस हे आवडते खेळ आहेत.
2009 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार असणा-या संजय धोत्रे यांना 2 लाख 87 हजार 526 मते मिळाली तर भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना 2 लाख 22 हजार 667 मते मिळाली. कॉंग्रेसचे उमेदवार बाबासाहेब धाबेकर यांना 1 लाख 82 हजार 776 मते मिळाली. तब्बल 64 हजार 884 मतांनी प्रकाश आंबेडकरांचा पराभव करत धोत्रे सलग दुस-यांदा लोकसभेत खासदार म्हणून गेले.
गेल्या साडे चार वर्षाच्या काळात आपण मतदारसंघातील सर्वच क्षेत्रांना न्याय देण्याचा प्रयत्न केलाय असा दावा धोत्रे करतायत. अकोला शहराचा बाय-पासचा प्रश्न, रस्त्यांचा प्रश्न तसेच रेल्वे रुळांच्या गेज परिवर्तनाचे काम अशी अनेक कामे मार्गी लावली, असं खा. संजय धोत्रे सांगतायत. महागाई आणि भ्रष्टाचारासारखे ज्वलंत विषय आणि मोदी फॅक्टरच्या आधारावर आपण २०१४ ची निवडणूक सहजच जिंकणार असल्याचा दावा संजय धोत्रे करतायत.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत हॅट्ट्रीक करणार असा विश्वास खा. धोत्रे यांना आहे. यंदा भारिप आणि काँग्रेस यांची आघाडी झाल्यास प्रकाश आंबेडकर यांचा विजय सुकर होऊ शकतो. रंगतदार लढत पाहायला मिळू शकते. त्यामुळे 2014 ची अकोला लोकसभा निवडणूक भाजपसाठी वाटते तेवढी सोपी नाही हे मात्र नक्की.
मतदारसंघातील समस्या कोणकोणत्या आहेतअकोला लोकसभा मतदारसंघात पारंपरिक शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. अकोला मतदारसंघातील शेतीचा खूप मोठा भूभाग खारपाणपट्ट्यात मोडत असल्यानं निसर्गाच्या पाण्यावरच या भागातील शेतक-यांना अवलंबून राहावं लागतं. सिंचनाचं प्रमाण 4 ते 5 टक्क्यांपर्यंत असल्यानं येथील शेतकरी जास्त पिके घेवू शकत नाही.
कापूस आणि सोयाबीनसारख्या महत्वाच्या पिकांवर प्रक्रिया करणारा एकही उद्योग गेल्या साडे चार वर्षात उभारला गेला नाही. खासदारांनी काहीच विकासकामे केली नसल्याचं स्थानिक नागरिक सांगतायत. तर खासदार संजय धोत्रे यांनी हे आरोप खोडून काढलेत.
अकोला शहर मोठी बाजारपेठ असूनही रस्ते, पाणी आणि वीज अशा पायाभूत सुविधांची इथं वाणवा आहे. आमदार असो की खासदार, मतदारसंघाचा विकास कुणीचं गांभीर्याने केल्याचं दिसत नाही. काटेपुर्णा प्रकल्पातील महान धरण 100 टक्के भरलेले असूनही पाणी मात्र आठवड्यातून एकदाच येतं. पाण्यासाठी इथल्य़ा नागरिकांना वणवण करावी लागतेयं.
अकोला मतदारसंघातील औद्योगिक विकास तर रखडलेला आहेचं पण औद्योगिक वसाहतींचीही दुरवस्था झालीय. रेल्वेची समस्या गंभीर बनत चाललीय. अकोला ते खांडवा लोहमार्गाचं काम गेली अनेक वर्ष संथगतीने सुरू आहे. मतदारसंघातील आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडालाय, तर एकाही नवीन अत्याधुनिक हॉस्पिटलची उभारणी केली गेली नाहीयं.
शैक्षणिक मागासलेपण तर पाचवीला पुजलेलं आहे. अकोला शहर आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी-विद्यार्थींनींना उच्च शिक्षणासाठी पुणे, मुंबईला स्थलांतरित व्हावं लागतं. मतदारसंघात शैक्षणिक संस्था, मेडिकल- इंजिनियरिंग कॉलेजेसची उभारणी करण्यात इथल्या आमदार-खासदारांना अपयश आलयं, असंच म्हणावं लागेल.
खासदारांनी केवळ शहरी भागातचं विकासकामे केल्याचा आरोप इथले नागरिक करतायत. तर पुनर्रचनेनंतर जोडला गेलेला मतदारसंघातील वाशीम जिल्ह्याचा रिसोडचा भाग मात्र दुर्लक्षितच राहिलायं. एकूणचं काय तर खासदार विकासनिधी खर्च केल्याचं सांगतायत पण मतदारसंघाच्या समस्या मात्र तशाच आहेत.
अकोला मतदारसंघातील राजकीय सद्यस्थितीअकोला लोकसभा मतदारसंघाच्या मतदारांनी नेहमीच दिल्लीत सत्तेत असणा-या पक्षांच्या विरोधात कौल दिलाय. दिल्लीत काँग्रेसची सत्ता असताना, गेल्या दोन टर्मपासून भाजपचे खासदार संजय धोत्रे इथून निवडून आलेत. मात्र विधानसभेत आमदार निवडताना कुणा एका पक्षाला मतदारांनी साथ दिल्याचं दिसत नाही.
दलित आणि कुणबी मतांचा मोठा प्रभाव या मतदारसंघावर आहे, शिवाय मुस्लिम मतंही निर्णायक ठरतात. मुस्लिम मते काँग्रेसच्या पारड्यात आपलं मत टाकणार की भारिपला पाठिंबा देणार यावर भाजप-सेना युतीचं भवितव्य अवलंबून आहे.
अकोला लोकसभा विधानसभा मतदारसंघातीलअकोला पूर्व मतदारसंघातून हरिदास भदे हे भारिप-बहूजन महासंघाचे आमदार आहेत. तर अकोला पश्चिम मतदारसंघातून गोवर्धन शर्मा आणि मुर्तीजापूर मतदारसंघातून हरिश पिंपळे हे दोन भाजपचे आमदार आहेत. अकोट विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे संजय गावंडे हे आमदार आहेत. रिसोड विधानसभा मतदारसंघातून सुभाष झनक हे काँग्रेसचे एकमेव आमदार निवडून आले होते. मात्र त्यांचे निधन झाल्यानं ही जागा सध्या रिक्त आहे. बाळापूर विधानसभा मतदारसंघातून बळीराम सिरसकर हे अपक्ष आमदार विजयी झाले.
अकोला लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी सलग दोनदा भाजपच्या कमळाला साथ दिली असली तरी विधानसभेत मात्र संमिश्र आमदार निवडून दिलेत. विकासाच्या प्रतिक्षेत असणा-या मतदारांच्या पदरी कायम निराशाच आलीय. आमदार असो की खासदार मतदारसंघाचा विकास करण्याची इच्छाशक्ती कुणातही दिसत नाही.
सध्या महानगरपालिका भाजप-शिवसेना युतीच्या ताब्यात आहे, तर जिल्हा परिषद भारिप आणि काँग्रेस आघाडीच्या ताब्यात गेलीय. भाजप-सेना युतीचे तीन आमदार, लोकसभेत खासदार असूनही मतदारसंघात ठळक अशी कामे सांगता येत नाहीत. राजकीय पक्षांच्या या रस्सीखेचीत सामान्य नागरिक मात्र त्रस्त आहे.
अकोला पॅटर्न हा याच मतदारसंघातला प्रयोग. मात्र त्याला अकोल्याशिवाय महाराष्ट्रात इतर ठिकाणी म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही. मागच्या वेळी दोन लाखांवर मतं मिळवणारे भारिपचे प्रकाश आंबेडकर हे काय भूमिका घेतात, यावर पुढील राजकीय समीकरणे बदलू शकतात. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी भारिपला आघाडीचं आमंत्रण दिलंयं.
प्रकाश आंबेडकरांनी मात्र अजून पत्ते उघड केलेले नाहीत. भारिप आणि काँग्रेसची युती झाली तरच भारिपचा उमेदवार निवडून येतो आणि युती झाली नाही तर भाजपचा विजय सुकर होतो, हा आजवरचा इतिहास आहे. यावेळी काँग्रेस आणि भारिप यांची युती जरी झाली तरी काँग्रेसमधील नाराज नेते भाजपला मदत करतील अशी शक्यता आहे. त्यामुळे आगामी 2014 लोकसभेची निवडणूक चुरशीची होणार हे मात्र नक्की.
अकोला लोकसभा मतदारसंघातील उमेदवार1) भाजप-संजय धोत्रे
2) काँग्रेस - हिदायत पटेल
व्हिडिओ –•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. •
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, April 4, 2014, 12:47