www.24taas.com, झी मीडिया, अमरावती अमरावती शहराचा उल्लेख महाभारत काळातही आढळतो. श्रीकृष्णाने रूक्मिणीचे कौंडिण्यपूर येथून हरण करताना अमरावतीच्या एकवीरा देवीच्या तळाखालून ते कौडिण्यपूरपर्यंत भुयार खणले होते असे सांगतात. अमरावती जिल्हा हा महाराष्ट्रातील उत्तरेकडील जिल्हा म्हणून ओळखला जातो. विदर्भातील महत्वाचा, शैक्षणिकदृष्ट्या प्रगतिशील जिल्हा म्हणून अमरावती जिल्ह्याची ओळख आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये या जिल्ह्याचे नाव खूपच अग्रेसर आहे. संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गुलाबराव महाराज, डॉ. शिवाजीराव पटवर्धन, डॉ. पंजाबराव देशमुख हे अमरावतीचे सुपुत्र...
1897 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन अमरावती येथे भरले होते. अमरावती जिल्ह्याला अकोला, यवतमाळ, वर्धा आणि वाशीम जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. जिल्ह्यातील वरूड आणि मोर्शी हे तालुके संत्र्यांसाठी प्रसिद्ध आहेत. अमरावती जिल्ह्यात कापसाची सर्वात मोठी बाजारपेठही आहे.
भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांनी अमरावतीत स्थापन केलेली शिवाजी शिक्षण संस्था विदर्भातील मोठी संस्था आहे. स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभागी होणारे दादासाहेब खापर्डे , वीर वामनराव जोशी याच जिल्ह्यातील. अमरावती जिल्ह्यातील शेंदूरजना बाजार हे गाव गुरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे. याच गावी हिंद सेवक संघाची शाखा होती. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हे सातपुड्याच्या कुशीत वसलेलं प्रमुख पर्यटनस्थळ आहे.
सुरूवातीपासून काँग्रेस आणि कम्युनिस्टांची सत्ता राहिलेल्या अमरावती मतदारसंघात काँग्रेसचा अखेरचा खासदार निवडून आला तो 1991मध्ये, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या रूपाने. त्यानंतर 1996 साली शिवसेनेचे अनंतराव गुढे खासदार म्हणून निवडून आले. तर 1998च्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रा. सू. गवई खासदार झाले. 1999 आणि 2004मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या अनंतराव गुढे यांनी बाजी मारली. तर 2009 मध्ये हा मतदारसंघ SC साठी राखीव झाल्यानंतरही आनंदराव अडसूळ यांनी शिवसेनेची सत्ता कायम राखली.
2009च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात एकूण 14 लाख 23 हजार 855 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. त्यापैकी पुरूष मतदारांची संख्या ही 7 लाख 46 हजार 464 होती, तर महिला मतदारांची संख्या 6 लाख 77 हजार 391 एवढी होती.
अमरावती अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यानंतर या मतदारसंघातील समीकरणे बदलली, पण शिवसेनेने आपला गढ कायम राखण्यात यश मिळवलं. तर दुसरीकडे दीड दशकांपासून अमरावती मतदारसंघात काँग्रेसचे पंजा उमटलेला नाही. ही बाब काँग्रेसच्या विद्यमान पिढीसाठी अस्वस्थतेचा विषय बनलीय.
अमरावती लोकसभेतील शिवसेनेचे शिलेदार अर्थात विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांची ओळख
आनंदराव विठोबा अडसूळजन्म - 1 जून 1947
वय - 66 वर्ष
शिक्षण - वाणिज्य शाखेतून पदवीधर
शिवसेनेचे आनंदराव अडसूळ तीनवेळा बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. तर चौथ्यांदा 2009 मध्ये अमरावती मतदारसंघातून निवडून आले. आनंदराव अडसूळ शिवसेनेचे वजनदार नेते म्हणून ओळखले जातात. NDA च्या अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये वित्त राज्यमंत्री म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला होता. बुलढाणा लोकसभेतून ते 1996, 1999 आणि 2004 मध्ये निवडून आले होते. अमरावतीतून खासदार म्हणून त्यांची ही पहिलीच टर्म आहे. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर शिवसेना प्रणित ज्या शेकडो कामगार संघटना आहेत त्याचे अध्यक्षपद अडसूळांकडेच आहे.
कामगार चळवळीतून शिवसेनेशी जुळत गेलेल्या अडसूळांचा कामातला प्रामाणिकपणा आणि धडाडी पाहून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अडसूळ यांच्यावर सेनेच्या विविध कामगार संघटनांची जबाबदारी सोपवली.
मतदारसंघावरही अडसूळांची चांगलीच पकड आहे. 2009 मध्ये अमरावतीतून निवडून आल्यानंतर त्यांनी दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून आपले पुत्र अभिजीत अडसूळ यांनाही निवडून आणले. आणि अल्पावधीतच जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत केली.
2009च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांना 3 लाख 14 हजार 286 मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले आरपीआय गवई गटाचे उमेदवार राजेंद्र गवई यांच्या पारड्यात 2 लाख 52 हजार 570 मते पडली. अडसूळ यांनी गवईंचा तब्बल 61 हजार 716 मतांनी पराभव केला.
खासदार अडसूळ यांची एकूण मालमत्ता ही 1 कोटी 77 लाख 8 हजार 418 रूपयांची असून, यांपैकी 1 कोटी 32 लाख 64 हजार 295 रूपयांची स्थावर मालमत्ता आहे. तर 44 लाख 44 हजार 123 रूपयांची जंगम मालमत्ता अडसूळांच्या नावे आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत आनंदराव अडसूळ हेच पुन्हा शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत. आनंदराव अडसूळ यांचा संसदीय कामकाजाचा चांगला अनुभव आहे. प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती झाल्यानंतर तत्कालीन रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव यांनी अमरावतीसाठी रेल्वेची घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेचा पाठपुरावा करून खा. अडसूळ यांनी अमरावती रेल्वे स्टेशन सुरू करून घेतले. गेल्या 30-40 वर्षांपासूनची मागणी असलेल्या अमरावती-नरखेड रेल्वे लाईनचा प्रश्न मार्गी लावला. अमरावती-नरखेड रेल्वेलाईन त्यांनी सुरू करून घेतली.
अमरावतीसाठी अडसूळांनी अनेक रेल्वेगाड्याही सुरू केल्या. त्यामुळे अमरावती-नागपूर हे 3 तासांचं अंतर अवघ्या दीड तासातच पार करता येऊ लागलं. केवळ इतकंच नाही तर बडनेरा रेल्वेस्थानकाजवळ रेल्वे वॅगन दुरुस्तीचा कारखाना मंजूर झालेला आहे. त्याचा पाठपुरावा करून प्रकल्प मार्गी लागला असून जमीनही संपादित झाली आहे. त्यामुळे अडसूळ यांच्या प्रयत्नाने पुढील 1-2 वर्षांत हा कारखाना सुरू होऊन अमरावतीच्या विकासाला आणखी हातभार लागणार आहे.
अमरावती लोकसभा मतदारसंघातील समस्याअमरावती लोकसभा मतदारसंघातील प्रमुख समस्या आहे ती बेरोजगारी. जिल्ह्यात उच्च शिक्षणाच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध असतानाही, सुशिक्षित तरूणांना रोजगारासाठी पुणे, मुंबई आणि देशाच्या इतर मोठ्या शहरांमध्ये जावं लागतं. या जिल्ह्यात शेती आणि शेतमजुरीच रोजगार मिळविण्याचे साधन आहे.
बेरोजगारांना काम मिळेल असे कुठलेच मोठे कारखाने अमरावतीत नाही. बेरोजगारीची समस्या गंभीर बनलेली आहे आणि ही समस्या सोडवण्यात खासदार आनंदराव अडसूळ अपयशी ठरले आहेत. अचलपूर, अंजनगाव, वरुड, मोर्शी, या भागात मोठ्या प्रमाणात संत्रा बागा आहेत. मात्र संत्र्यांवर प्रक्रिया करणारे उद्योग नसल्यामुळे संत्रा उत्पादकांना बाहेरील राज्यातील बाजारपेठांवर आणि व्यापा-यांवर अवलंबून राहावे लागते.
बेरोजगारांना काम मिळेल म्हणून इंडिया बुल्सच्या विद्युत निर्मिती प्रकल्पाला आपण समर्थन दिले होते, असे खासदार अडसूळ सांगतात. मात्र या प्रकल्पातील हजारो मजूर आणि कर्मचारी परराज्यातील आहेत. स्थानिकांना डावललं जात असल्याचा आरोप अनेक विरोधकही करत आहेत.
उलट इंडिया बुल्सच्या वीज निर्मिती प्रकल्पाला शेती सिंचनाचे पाणी दिल्यानं सिंचनावर परिणाम होणार आहे. या प्रकरणात काही सामजिक संघटनांनी न्यायालयात दाद मागितलीय. मेळघाट आदिवासी भागातील समस्या स्थानिकांच्या पाचवीलाच पुजलेल्या आहेत. मेळघाटातील आदिवासींना कोरडवाहू शेतीशिवाय रोजगाराचा कुठलाच पर्याय उपलब्ध नाही.
आयआरडीपीच्या माध्यमातून अमरावती शहर विकासाची आणि सौंदर्यीकरणाची कामे झालीत. शहर दिसायला सुंदर आणि नीटनेटके झालं. मात्र या सर्व सुधारणांचा बोजा विविध कर आणि टोलच्या माध्यमातून अमरावतीकर जनतेवर पडणार आहे.
अडसूळ यांनी मतदारसंघातील कामे करण्यासाठी पुढाकार घेतला हे मान्य केलं, तरी मतदारसंघाचा अपेक्षित विकास झालेला दिसत नाही. मूळचे अमरावतीकर नसल्यानं खासदारांचा मतदारसंघात तितकासा संवाद नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. आणि थोड्याफार प्रमाणात ती खरीही आहे.
जिंकणार कोण? अमरावती लोकसभा मतदारसंघावर सुरूवातीला काँग्रेस आणि कम्युनिस्टचं वर्चस्व होतं. कालांतराने मतदारांनी शिवसेनेला आपलंसं केलं. सध्या या मतदारसंघात सेनेची घडी नीट बसलेली दिसत असली.
खासदार आनंदराव अडसूळ यांचा राजकीय प्रवास आणि कामगिरीवर प्रकाश टाकल्यास त्यांची राजकीय मुत्सद्दी लक्षात येते. आनंदराव 2009च्या निवडणुकांपूर्वी मतदारसंघात आले. त्यांनी जिल्ह्यातील शिवसेनेच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी जुन्या कार्यकर्त्यांना बाजूला करून, आपल्या मर्जीतील कार्यकर्त्यांना पदं देऊ केली आणि त्याचा फायदाही त्यांना झाला.
अडसूळ यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शिवसैनिक एकत्रित झाल्याचे भासवत असले, तरी त्यांच्या राजकारणाने दुखावलेल्या कार्यकर्त्यांचे वेगवेगळे गट तयार झालेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत अमरावतीमधून कोणत्याही राजकीय पक्षाचे उमेदवार निश्चित नाहीत. मात्र शिवसेनेकडून आनंदराव अडसूळ यांची उमेदवारी निश्चित मानली जातेय.
अमरावती मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलाय. मागील निवडणुकीत रा.सु.गवई यांचे सुपुत्र आणि आरपीआयचे उमेदवार राजेंद्र गवई दुस-या क्रमांकावर राहिले. या निवडणुकीत पुन्हा त्यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. यावेळीही राष्ट्रवादीचे समर्थन गवई यांनी गृहित धरलंय. बडने-याचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत कौर देखील निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागा वाटपावरून फेरबदल झाल्यास, अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या वतीनं नवनीत कौर राणा यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तस झाल्यास सेना विरूद्ध काँग्रेस अशी सरळ लढत पाहायला मिळेल.
अमरावतीमधील बडनेरा विधानसभा अपक्ष आमदार रवी राणा यांच्याकडे आहे. अमरावती विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसच्या आमदार रावसाहेब राणांची पकड आहे. तेवसा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर यशोमती ठाकूर आमदार म्हणून निवडून आल्यात. तर SCसाठी राखीव असलेल्या मतदारसंघात शिवसेना खासदार अडसूळ यांचे सुपूत्र अभिजीत अडसूळ आमदार आहेत. STसाठी राखीव असलेल्या मेळघाटात केवलराम काळे काँग्रेसचे आमदार निवडून आलेत. अचलापूर मतदारसंघात अपक्ष बच्चू कडू आमदार म्हणून विजयी झालेत.
अचलपूर नगरपरिषदचे अध्यक्ष अरूण वानखेडे हे देखील काँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छूक आहेत. मात्र ती शक्यता कमीच आहे. कदाचित ते बसपाच्या तिकीटावर निवडणूक लढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात अपक्ष आमदार बच्चु कडू यांचा चांगला प्रभाव आहे. त्यांच्या प्रहार संघटनेतर्फे कोणताही उमेदवार निश्चित नाही. मात्र एखाद्या चांगल्या उमेदवाराला संधी मिळाल्यास अथवा आम आदमी पार्टीच्या उमेदवाराला प्रहारने समर्थन दिल्यास विद्यमान खासदार अडसूळ यांच्या समोरील अडचणीत भर पडू शकते.
अमरावती मतदारसंघातील उमेदवार1) शिवसेना - आनंदराव अडसूळ
2) राष्ट्रवादी - नवनीत कौर-राणा
व्हिडिओ –•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. •
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, April 4, 2014, 13:01