ऑडिट मतदारसंघाचं : औरंगाबाद

ऑडिट मतदारसंघाचं :  औरंगाबाद
www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले म्हणजे काँग्रेसचे बुजूर्ग नेते... 1999 साली ते लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरले... त्यांच्यासमोर शिवसेनेचा उमेदवार पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवत होता. अंतुलेंसारख्या तगड्या उमेदवारापुढे पराभव झाला तर राजकीय कारकीर्दच धोक्यात येणार होती... पण या निवडणुकीत चक्क अंतुले पराभूत झाले आणि शिवसेनेचा हा नवोदित खासदार `जायंट किलर` म्हणून ओळखला जाऊ लागला... हा मतदार संघ आहे औरंगाबाद....

औरंगाबाद... मराठवाड्याच्या राजधानीचं शहर.. आशियातील सर्वात वेगानं वाढणारं शहर असा या शहराचा लौकीक आहे... महाराष्ट्राची पर्यटन राजधानी... इतिहासाचे अनेक जिवंत साक्षीदार या शहरात आणि परिसरात आहेत.... शहरातील बिबीका मकबरा या ऐतिहासिक स्थानापासून ते थेट जगप्रसिद्ध अजिंठा,  ऐलोरा लेण्यांपर्यंत... पुरातन काळातील भारताची राजधानी असलेला देवगिरीचा किल्ला ही औरंगाबाद मतदारसंघातच आहे...
 
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात  मध्य औरंगाबाद, पूर्व औरंगाबाद आणि पश्चिम औरंगाबादचा समावेश होतो तर ग्रामीण भागातील गंगापूर, वैजापूर आणि कन्नड तालुक्यांचा समावेश होतो..... औरंगाबादचा हा मतदारसंघ सध्या शिवसेनेचा गड मानला जातो..

पण यापूर्वी इथून काँग्रेस आणि जनता पार्टीचे दिग्गज उमेदवारही खासदार म्हणून निवडून आलेत. 1951 साली काँग्रेसचे सुरेश चंद्र, 1957 साली मराठवाड्यातले ज्येष्ठ नेते स्वामी रामानंद तीर्थ, 1962 आणि 1967 साली काँग्रेसचे बी. डी. देशमुख, 1971 साली माणिकराव पालोदकर, 1980 मध्ये काझी सलीम, 1984 मध्ये एस काँग्रेसचे साहेबराव डोणगावकर हे निवडून आलेत. 1977 साली जनता पार्टीच्या लाटेत ज्येष्ठ नेते बापू काळदातेही औरंगाबादमधून लोकसभेवर विजयी झाले होते. 1998 साली काँग्रेसचे रामकृष्णबाबा पाटील यांचा अपवाद वगळला तर, 1989 नंतर मात्र शिवसेनेचाच खासदार इथून निवडून येतोय. 1989 व 1991 मध्ये मोरेश्वर सावे आणि 1996 मध्ये प्रदीप जयस्वाल शिवसेनेचे खासदार झाले. गेल्या तीन टर्मपासून शिवसेनेचे चंद्रकांत खैरे इथले खासदार आहेत.

इथं शिवसेनेचा जोर वाढण्याची काही कारणंही आहेत... औरंगाबाद हा निजामांच्या राजवटीतील भाग होता. त्यामुळे मतदारांची हिंदू आणि मुस्लिम अशी थेट विभागणी झालीय.. दलितांची संख्याही लक्षणीय आहे. पण दलित संघटना नेहमीच दोलायमान स्थितीत राहिल्या आहेत. रिपब्लिकन आठवले गट सध्या शिवसेनेसोबत आहे.. 

औरंगाबाद शहराची लोकसंख्या 24 लाख असली तरी मतदारांची संख्या मात्र फक्त 15 लाख 20 हजार आहे. त्यात 7 लाख 10 हजार महिला तर 8 लाख 10 हजार पुरूष मतदार आहेत..
एकूण मतदारांपैकी 70 टक्के मतदार हे शहरी भागातून आहेत, तर 30 टक्के मतदार ग्रामीण भागातील असल्याने दोन्ही मतदारांची मर्जी नेतेमंडळीला राखावी लागते.. शिवसेना नेहमीच हिंदू कार्डचा वापर करत निवडणूका जिंकण्याचा प्रयत्न करते. मतदारांचा विचार केला तर हिंदू आणि दलित मतदारांची संख्या टक्केवारीत 75 टक्क्यांच्या आसपास आहे तर मुस्लिम मतदार 25 टक्क्यांमध्ये मोडतात. मुस्लिम मतदार हा नेहमीच काँग्रेससोबत राहिला आहे.

सहा विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर औरंगाबाद मध्य हा शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल यांच्याकडे आहे. औरंगाबाद पश्चिममध्ये शिवसेनेचेच संजय शिरसाठ आमदार आहेत.. औरंगाबाद पूर्व मात्र शिवसेनेला नेहमीच कठीण गेलाय. गेल्या तीन टर्मपासून काँग्रेसचे शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा या भागाचं प्रतिनिधीत्व करतायत.. वैजापूरला गेल्या तीन टर्मपासून शिवसेनेचेच आर. एम. वाणी आमदार आहेत. तर गंगापूरला राष्ट्रवादी समर्थक अपक्ष आमदार प्रशांत बंब यांचा दबदबा आहे.. कन्नड विधानसभा मतदारसंघात मनसेला रामराम ठोकणारे हर्षवर्धन जाधव आमदार आहेत.. एकेकाळी या सर्वच विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व होते. मात्र गेल्यावेळेस शिवसेनेला हादरा बसला आहे..

यावेळेस एमआयएम या हैदराबादच्या पक्षानेही औरंगाबादेत आपला प्रभाव पाडण्यास सुरुवात केलीय. एरव्ही काँग्रेससोबत असणारे मुस्लिम मतदार एमआयएमकडे झुकल्यास त्याचा फायदा शिवसेनेलाच होऊ शकतो...


औरंगाबादच्या समस्या...

महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबादला विविध समस्यांनी ग्रासलंय... शिवसेनेचा खासदार असताना आणि औरंगाबाद महापालिकेत खैरेंच्याच पक्षाची सत्ता असताना इथल्या नागरिकांना कुणी वाली नाही, असं चित्र आहे... त्यामुळं इथल्या मतदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे...


गेल्या तीस वर्षांपासून चंद्रकांत खैरै औरंगाबादच्या राजकारणात विविध पदं भूषवत आहेत.. पहिली 5 वर्ष नगरसेवक, दोन टर्म आमदार तर खासदारकीची ही त्यांची तिसरी टर्म आहे.. मात्र खैरैंनी अजूनही विकासकामांबाबत पकड घेतली, असं म्हणता येणार नाही. शहराचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत..

खैरे जरी खासदार असले तरी औरंगाबाद महापालिकेच्या कामकाजात ढवळाढवळ करायला त्यांना आवडतं, असा आरोप मतदार आणि विरोधक करतायत..
 
औरंगाबादची मुख्य बाजारपेठ असलेल्या गुलमंडीची अवस्था फारच खराबच आहे. खैरेंनी त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात गुलमंडीमधूनच केली.. खैरै या भागाला बालेकिल्ला म्हणतात, मात्र विकासाकडे दुर्लक्षच.

औरंगाबादमधील पायाभूत सुविधा या 1990च्या दशकातीलच आहेत.. शहराचा विकास आराखडा अजूनही तयार नाही. त्यामुळे रस्तांवर ट्राफीक जाम, अरूंद रस्ते, त्यातून होणारे अपघात, भांडण ही नागरिकांसाठी नेहमीचीच बाब झालीय.. खैरैंनी पायाभूत सुविधांच्या सुधारणांसाठी पुढाकार घ्यायला हवा. पण ते सातत्याने दुर्लक्षच असल्याचं नागरिकांचा आरोप आहे...

औरंगाबाद शहरात मुस्लिम मतदान हे 25 टक्के आहे.. मात्र मुस्लिम वस्त्यांमध्ये विकासाने अजून शिरकावच केलेला नाही असे चित्र आहे..

मुस्लिम वस्त्यांप्रमाणे दलित वस्त्यांतही खैरेंच्या विरोधात रोष आहे... मुलभूत सुविधांपासून इथले नागरिक वंचित आहेत..
 
शहरात पाण्याचा प्रश्न मोठा आहे.महापालिकेच्या महत्वाकांक्षी समांतर जलवाहिनी योजनेचाही खैरेंनी बट्ट्याबोळ केल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातोय...

खैरेच्या मतदारसंघात शहरी असो वा ग्रामीण भाग, समस्या कायम आहेत.. महत्वाचे म्हणजे औंरंगाबाद शहर महाराष्ट्राची पर्यटन राजधानी घोषित करण्यात आलीय. पण त्यादृष्टीनेही समस्या कायम आहेत..
 
शहराच्या जवळून जाणारे सर्वच हायवे सिंगल लेन आहेत. शहरातील रस्तेही अरूंद आहेत. त्यामुळे अपघातही होतात मात्र या रस्त्यांबाबत अजूनही काहीच झालेलं नाहीय...

फक्त निवडणूका आल्या की खासदार साहेब वोट मागण्यासाठी येतात, असा आरोप नागरिक करतायत.. कित्येक मतदारांनी तर अजून आपल्या खासदाराला पाहिलेलं देखील नाही...
 
खैरेंच्या कामावर औरंगाबादची जनता कमालीची नाराज आहे. लागोपाठ तीनवेळा निवडून येऊनही मतदारसंघाची अवस्था बिकट झालीय. त्यामुळेच शाब्दीक बाण चालवत आपल्या भावना व्यक्त करताना मतदरांनी खैरेंना दिलेला हा सूचक इशारा आहे.



चंद्रकांत खैरे मंत्री असताना एकदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोन आला.... चंद्रकांत, आता बाहेर पडा... खैरेंना काहीच कळेना, अचानक साहेबांचं काय झालं..? ते का नाराज झाले..? दुस-या दिवशी धावतपळत त्यांनी `मातोश्री` गाठली... दिवसभर बाळासाहेबांच्या भेटीसाठी ताटकळत राहिले. शेवटी एकदाचे बाळासाहेब आले... त्यांनी पाठीवर थाप मारली आणि म्हणाले... तुला लोकसभेचं तिकीट देतोय. आता लोकसभा लढवायची आणि जिंकायचं... बाळासाहेबांचा आदेश घेऊन चंद्रकांत खैरे मातोश्रीबाहेर पडले, ते लागोपाठ तीनवेळा खासदार म्हणून निवडून आले...


नाव - चंद्रकांत भाऊराव खैरे
जन्म - 1 जानेवारी 1952
वय - 62 वर्ष
शिक्षण - बीएससी प्रथम वर्ष
 
चंद्रकांत खैरे म्हणजे कट्टर शिवसैनिक.. 1966 ला शिवसेना स्थापन झाली, आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने प्रेरित झालेले चंद्रकांत खैरे त्या दिवसापासूनच शिवसैनिक झाले.. बुरूड म्हणजे वीरशैव लिंगायत समाजातील खैरेंचे वडिल भाऊराव हे स्वातंत्र्यसैनिक आणि  काँग्रेस कार्यकर्ते होते.. तरीसुद्धा खैरे शिवसेनेत सामील झाले. 8 जून 1985 ला खैरेंना शिवसेनेत पहिले पद मिळाले ते म्हणजे उपशहरप्रमुख.. तेव्हापासून खैरे औरंगाबादच्या राजकारणात चांगलेच एक्टीव झाले.. 1988 साली औरंगाबाद महापालिका निवडणुकीत ते गुलमंडी वार्डातून नगरसेवक झाले. पाच वर्षे त्यांनी नगरसेवक म्हणून काम केलं.. 1990मध्ये त्यांना पक्षाने आमदारकीचे तिकीट दिले. आमदारकीच्या पहिल्याच निवडणूकीत त्यांनी काँग्रेसचे मातब्बर नेते जावेद हसन यांचा 30 हजार मतांनी पराभव करीत शिवसेनेचा झेंडा रोवला... 1995 च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे राजेंद्र दर्डा यांचा तब्बल 55 हजार मतांनी पराभव केला. त्यावेळेस त्यांच्या कामगिरीवर खुश होत शिवसेनेनं त्यांना मंत्रीपदही बहाल केलं.. गृहनिर्माण, परिवहन, वन व पुनर्वसन अशी खाती त्यांनी सांभाळली. औरंगाबाद शहरात त्यांनी स्वतःचा दबदबा निर्माण केला. `मातोश्री`वरही त्यांचे वजन चांगलेच वाढले.
 
1999 ला चंद्रकांत खैरे यांनी लोकसभेची उमेदवारी मिळवली आणि काँग्रेसचे मातब्बर नेते, माजी मुख्यमंत्री बॅरीस्टर ए. आर. अंतुले यांचा पराभव करत लोकसभा सर केली... 2004 मध्ये त्यांनी काँग्रेसचे मराठवाड्यातील ज्येष्ठ नेते रामकृष्णबाबा पाटील यांचा पराभव केला. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या उत्तमसिंग पवार यांचा पाडाव केला. खैरेंना 2 लाख 55 हजार 538 मते, तर प्रतिस्पर्धी पवारांना 2 लाख 22 हजार 847 मते पडली. त्यावेळी अपक्ष म्हणून लढलेले शांतिगीरी महाराज यांना 1 लाख 48 हजार मतं मिळाली.. खैरेंच्या विरोधात विरोधी पक्षांनी वेरूळच्या मठातील शांतिगीरी महाराज यांना उभे केले होते. तरीही कशीबशी खैरेंनी निवडणूक जिंकली..
 
गेल्या पंधरा वर्षांच्या काळात खैरेंनी लोकसभेत 1000 प्रश्न विचारल्याचा दावा केला आहे, त्यात 900 प्रश्न लेखी स्वरूपाचे होते. चंद्रकांत खैरै यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता ही 1 कोटींच्या घरात आहे, तर मुलांच्या नावावर एक कंपनी आणि एक घर तर बायकोच्या नावावर 2 गाड्या आहेत...

आतापर्यंत प्रत्येक वर्षी 5 कोटी प्रमाणे खैरेंना 25 कोटींचा खासदार निधी मंजूर झालाय, त्यापैकी 21 कोटी रूपये खर्च केला असल्याचं खैरै सांगताय.. ग्रामीण भागातील ड्रेनेज लाईन, रस्त्यांची कामं, सभा मंडप, सांस्कृतिक हॉल, शाळा कॉलेजेसमध्ये कॉम्प्युटर वाटप आणि दुष्काळग्रस्त नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी निधी वापरल्य़ाचा ते सांगतायत..
 
राजकारणी खैरे धार्मिक वृत्तीचेही आहेत.. मतदारसंघात कुठल्या ना कुठल्या धार्मिक कार्यात त्यांची उपस्थिती दिसतेच.. साधु, महंत मंडळींशी त्यांचे अत्यंत निकटचे संबंध आहेत.. साधु महंतांना, धार्मिक संस्थांना खैरे सढळ हाताने मदत करतात. आवडीबद्दल सांगायचे झाल्यास खैरे राजेश खन्नांचे डायहार्ड फॅन आहेत. त्यांचा एकेक सिनेमा खैरेंनी कितीतरी वेळा पाहिलाय.. राजेश खन्नांचे निधन झाल्यावर तीन दिवस सतत टीव्हीसमोर बसून त्यांची अंत्ययात्रा पाहिल्याचं ते सांगतात.. जुनी गाणी ऐकणं आणि समाजसेवा करणं ही त्यांची आवड आहे...

निवडणुकीचा विचार केला तर कधीही न हरणारा उमेदवार अशी ओळख खैरेंनी निर्माण केलीय.. मात्र सतत पद मिळाल्याने त्यांच्या विरोधात शिवसेनेतच इनकम्बन्सी फॅक्टर वाढत चालला आहे, त्याचा फटका खैरेंना बसू शकतो..  मात्र मातोश्रीचे लाडके असल्याने आणि मराठवाड्यातील शिवसेनेचे मोठे नेते असल्याने विशेष फरक पडणार नाही असेही काही शिवसैनिक सांगतात. काहीही असलं तरी येणारी निवडणूक पक्षातील आव्हानं आणि मतदारांची नाराजी असल्याने कठीण जाणार यात शंका नाही..
 
खासदारांचं रिपोर्ट कार्ड
सलग तीनवेळा औरंगाबादमध्ये खासदार असणा-या चंद्रकांत खैरैंनी आपल्या मतदारांना अनेक आश्वासनं दिली. त्यातली काही पूर्ण केली, तर काही हवेतच विरली... पाहूयात खैरे  कुठे पास झालेत आणि कुठे फेल....

नापास
शहराचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार म्हणून 800 कोटींची समांतर जलवाहिनी योजना पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते मात्र ते अजूनही भिजत घोंगडं आहे..
ग्रामिण भागातील पाण्याचा प्रश्न सोडवणार त्याचबरोबर ड्रेनेजचा प्रश्नाबाबतही आश्वासन दिले होते मात्र ते पूर्ण झाले नाही...
दुष्काळग्रस्तांना केंद्राकडून भरीव मदतीचे आश्वासन दिले होते मात्र ते ही पुर्ण न केल्याचा आरोप खैरै यांच्यावर होतोय..
औद्योगिक वसाहतींसाठी काही खास योजना आणून औद्योगिक वसाहतींचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते मात्र तिकडे लक्षच न दिल्याचा आरोप होतोय..
शहरातील गुंठेवारी प्रकरण राज्य सरकार आणि महापालिकेत समन्वय करून सोडवणार असे सांगितले होते मात्र तेही पूर्ण करू शकले नाही..
 
औऱंगाबाद रेल्वेस्टेशन तसे दुर्लक्षीत आहे याठिकाणी अधिक रेल्वे सुरु करण्याचे आश्वासन दिले मात्र 1 गाडी सोडता कुठलीही नवीन रेल्वे औरंगाबादला मिळाली नाही..
 
खाम नदीचे पात्र स्वच्छ करून नदीला जीवनदान देण्याचे आश्वासन दिले होते मात्र खाम नदी अजूनही नालाच आहे अद्याप सर्वेक्षणसुद्धा सुरु झाले नाही..
 
 शहराबाहेरील हायवे चारपदरी करून शहर आणि बाहेरील वाहतूक प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते मात्र अजूनही ते पूर्ण झाले नाही..

पास
ऑर्चिअलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने शहरातील काही भागाला पुरातन घोषित करून बांधकामांना स्थगिती दिली होती खैरैंनी ती बंदी उठवली..
8000 कोटींचा केंद्र सरकारचा डिएमआयसी प्रकल्प औरंगाबाद शहरात ओढण्यात महत्वाची भूमिका
नविन औरंगाबाद वसाहतीसाठी केंद्र राज्यसरकारकडे पाठपुरावा, त्यात यश सुद्धा मिळाले नव्या औरंगाबाद शहराची सरकारकडून घोषणा
समांतर पाणी योजना केंद्राच्या फंडमुळे अडकली होती त्यासाठी केंद्र सरकारकडून 350 कोटींचा फंड आणण्यात यश
ग्रामिण भागातील कित्येक कॉलेजेस आणि शाळांना कॉम्प्युटर वाटप करून त्यांना हायटेक करण्यात योगदान
ग्रामिण भागात 5 कोटींची रस्ते बांधणी केल्याचा खैरैंचा दावा
खत पुरवठ्यात मोठ्या अडचणी होत्या त्यात सुधारणा करून आता शेतक-यांना खत पुरवठा सुरळीत होण्यास मोठी मदत

राजकीय सद्यस्थिती,/b>

चंद्रकांत खैरेंवर नाराज होऊन प्रदिप जयस्वाल यांनी शिवसेना सोडली. पण शेवटी खैरेंनीच त्यांची समजूत काढली आणि पुन्हा शिवसेनेत आणण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंपुढे हजर केले. तेव्हा जयस्वालांचा मुलगाही सोबत होता. बाळासाहेब त्याच्याकडे पाहून म्हणाले, तुझ्या बापाला पळापळ करायची सवय आहे... आता पुन्हा घरी आलाय. बापाला बांधून ठेव... दुस-या घरी जायला देऊ नको...

असं असलं तरी जयस्वाल आणि खैरेंचे संबंध अजूनही चांगले नाहीत. औरंगाबाद शिवसेनेमध्ये सर्व काही आलबेल नाहीय... त्यामुळं खैरेंची प्रतिष्ठा चौथ्यांदा पणाला लागलीय... एक नजर टाकूया औरंगाबादच्या राजकीय सद्यस्थितीवर...

गेली तीन टर्म  खासदार असलेल्या चंद्रकांत खैरेंना इनकम्बन्सी फँक्टरचा धोका आहे.. शिवसेनेचे औरंगाबादेतील सर्वच आमदार आणि काही मोठे पदाधिकारीही त्यांच्यावर नाराज आहेत. त्यात काँग्रेसकडून उत्तमसिंग पवार यांनी आखाड्यात उतरण्याची तयारी सुरु केली आहे.. खैरेंबद्दलच्या असंतोषाचा फायदा घेण्याचा त्यांचा प्रय़त्न राहिल..

खैरैंना पाडण्यासाठी आता शिवसेनेचाच एक गट काम करीत असल्याचं बोललं जातय.. खैरैंची सद्दी संपवून काही नवे नेते स्वतःचे बस्तान बसवण्याचा प्रयत्न करीत आहेत.. गेल्या काही दिवसांतील शिवसेनेच्या आंदोलनांतून त्याची प्रचितीही आलीय.. खैरैंना शिवसेनेच्या ब-याच कार्यक्रमांपासून जाणीवपूर्वक दूर ठेवण्याचा प्रकार सुरु आहे.. नुकतेच शिवसेनेत परतलेले आमदार प्रदीप जैस्वाल खैरेंमुळेच पक्ष सोडून गेले होते. खैरैंनी मनधऱणी करून त्यांना पक्षात आणले सुद्धा... मात्र अजूनही त्यांचे विशेष काही जमत नाही. आमदार संजय शिरसाठही  खैरेंबाबत नाराज असल्याचं बोललं जातं...
 
खैरेवर हिंदूत्ववादी असल्याचा आरोप होतो आणि खैरै देखील तो नाकारत नाहीत. त्यामुळे मुस्लिम आणि दलित मतं त्यांच्यापासून दुरावली आहेत.. रिपाई जरी शिवसेनेसोबत असली तरी औरंगाबादेत दलित संघटनांना पेव फुटलेय... त्यामुळे दलित नक्की कुणाच्या पाठी उभे आहेत, याचा अंदाज बांधणं कठीणच आहे.. त्यामुळे त्यांचे विरोधक आता दलित आणि मुस्लिमांना जवळ करण्याचा प्रयत्न करत आहेत..

खैरे ज्या हिंदू व्होट बँकेच्या जीवावर निवडून येतात तेही त्यांना आता साथ देण्याची शक्यता कमी असल्याचं तज्ज्ञ सांगतायत.. खैरेंच्या विरोधात काँग्रेसने प्रबळ उमेदवार दिला तर ही जागा शिवसेना गमावेल असे त्यांचे म्हणणे आहे. तर खैरेंची धार्मिक बाजू हा त्यांचा प्लस पॉईंट ठरतोय... त्यांनी मंदिरे आणि मठांना केलेली आर्थिक मदत, अडचणीत असलेल्यांना केलेली मदत ही देखील त्यांची जमेची बाजू आहे. त्यातच काँग्रेसचे राजेंद्र दर्डा सुद्धा खैरैंना मदत करत असल्याचही नेहमीच बोलल जातं...

शिवसेनेत खैरेंचे विरोधक वाढत असले तरी अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत ते जमवून घेतात.. त्यामुळे येत्या निवडणुकीत खैरेंचं पानिपत करण्यासाठी विरोधकांना एक प्रबळ उमेदवार द्यावा लागेल.. खैरेंनाही याची जाणीव आहे. त्यामुळे वर्षभऱ आधीपासूनच ते कामाला लागलेत... हिंदू व्होट बँकेची कशी फाटाफूट होते, यावर खैरेंचं भवितव्य अवलंबून असणार आहे...
 
व्हिडिओ



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, April 4, 2014, 10:49
First Published: Friday, April 4, 2014, 13:58
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?