www.24taas.com, झी मीडिया, बीड मागासलेल्या मराठवाड्यातील अतिमागास म्हणून ओळखला जाणारा बीड जिल्हा राज्यात परिचित आहे तो ऊस तोडणी कामगारांचा जिल्हा म्हणून. परराज्यासह राज्यातील अनेक साखर कारखान्यांना तब्बल 5 ते साडे पाच लाख ऊस तोड मजूर पुरवणारा हा जिल्हा... बारा ज्योतिर्लिंगापैकी एक परळीचे वैजनाथ, कोकणवासीयांची कुलदैवत असणारी अंबाजोगाईची योगेश्वरी देवी, स्व. शंकरराव चव्हाणांची आठवण करून देणारे माजलगावचे धरण आणि महाराष्ट्राला वीज पुरवठा करणारे परळीचे औष्णिक वीज केंद्र याच बीड लोकसभा मतदारसंघात आहेत.
मराठी आद्यकवी मुकुंदराज यांनी मराठी सरस्वतीची पद्यमय रचना इथंच केली. त्यांचे समाधी स्थान अंबाजोगाईपासून 3 किमी अंतरावर आहे. गणितातील शून्य या संकल्पनेचे जनक भास्कराचार्य यांचा 12व्या शतकात बीड जिल्ह्यात जन्म झाल्याची नोंदही इतिहासात आढळते. जिल्ह्यात खरीप आणि रब्बी अशी दोन्ही पिकं घेतली जातात. बीड लोकसभा मतदारसंघातील बीड, आष्टी, गेवराई आणि माजलगाव या विधानसभा मतदारसंघात मराठा समाजाचे प्राबल्य आहे. तर परळी विधानसभा मतदारसंघात वंजारी मतदारांचं प्राबल्य पाहायला मिळतं. केज मतदारसंघ हा राखीव म्हणून घोषित करण्यात आला आहे.
बीड लोकसभा मतदारसंघ हा 1996 पर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. 1991मध्ये काँग्रेसच्या केसरबाई सोनाजीराव क्षीरसागर या खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. मात्र त्यानंतर 1996साली गोपीनाथ मुंडे यांनी काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला खिंडार पाडलं.
भाजपच्या पहिल्या खासदार म्हणून रजनी पाटील यांची 1996मध्ये निवड झाली. त्यानंतर 1998 आणि 1999मध्ये जयसिंगराव गायकवाड पाटील हे भाजपचे खासदार म्हणून निवडून आले. मात्र 2004मध्ये जयसिंगरावांनी भाजपला रामराम ठोकून, राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकीट मिळवत पुन्हा खासदारकी मिळवली. 2009मध्ये भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे बीडचे नवे खासदार म्हणून निवडून आले.
2009च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात एकूण 16 लाख 30 हजार 933 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. त्यापैकी पुरूष मतदारांची संख्या ही 8 लाख 49 हजार 750 होती, तर महिला मतदारांची संख्या 7 लाख 81 हजार 183 एवढी होती.
1996 नंतर जिल्ह्यातून ओहोटीला लागलेल्या काँग्रेसला पुन्हा कधीच भरती आली नाही. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघावर 40 वर्षे काँग्रेसची सत्ता राहिली. या मतदारसंघाने कम्युनिस्ट पक्षालाही दोन वेळा खासदारकीची संधी दिली आहे.
मतदारसंघातील 6 पैकी 5 आमदार राष्ट्रवादीचे असतानाही भाजपचं कमळ फुलवण्याची किमया गोपीनाथ मुंडे यांनी 2009 मध्ये साधली. त्याच यशाची पुनरावृत्ती मुंडे करणार की राष्ट्रवादीचं घड्याळ वेगात फिरणार याचीच उत्सुकता सध्या बीडमध्ये आहे.
गोपीनाथ मुंडे यांची ओळखनाव - खा. गोपीनाथ पांडुरंगराव मुंडे
जन्म - 12 डिसेंबर 1949
वय - 64 वर्षे
शिक्षण - पदवीधर
गोपीनाथ मुंडे म्हणजे मराठवाड्यातील ज्येष्ठ नेते... त्यांच्या घरामध्ये कुठलाही राजकारणाचा वारसा नव्हता... संघर्ष करत करत ते पुढे आले, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले, लोकसभा खासदार बनले... तथाकथित उच्चवर्गीयांपुरतं मर्यादित असलेल्या भाजपला तळागाळातील लोकांपर्यंत नेण्याचं काम मुंडे यांनी केलं.
12 डिसेंबर 2010 रोजी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या समारंभात भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी त्यांचा गौरव लोकनेता असा केला होता. गोपीनाथ पांडुरंग मुंडे हे 2009 पासून लोकसभेत बीड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. भारतीय जनता पक्षाचे ते लोकसभेतील उपनेते आहेत.
14 मार्च 1995 ते 1999 या काळात त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपदही भुषवले. महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणून त्यांची कारकीर्दही गाजली. ओबीसी नेतृत्व, सभेला गर्दी खेचणारे वक्ते व भक्कम जनाधार असलेले नेते ही महाराष्ट्राच्या राजकारणात मुंडेंची ओळख.
2009 च्या निवडणुकीत बीडमध्ये तत्कालिन भाजप आमदार गोपीनाथ मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रमेश अडासकर यांचा पराभव केला. बीड लोकसभेच्या अटीतटीच्या निवडणुकीत आपल्या वडिलांच्या प्रचारासाठी कन्या पंकजा पालवे यांनीही हिरीरीने भाग घेतला.
2009च्या लोकसभा निवडणुकीत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना 5 लाख 53 हजार 994 मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी म्हणून उभे असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या रमेश अडासकर यांच्या पारड्यात 4 लाख 13 हजार 42 मते पडली. तब्बल 1 लाख 40 हजार 952 मतांनी मुंडे यांनी कोकाटेंचा पराभव करत लोकसभा गाठली.
खासदार मुंडे यांची एकूण मालमत्ता ही 6 कोटी 22 लाख 50 हजार 603 रूपयांची असून, यांपैकी 3 कोटी 75 लाख 22 हजार 48 रूपयांची स्थावर मालमत्ता आहे. तर 2 कोटी 47 लाख 28 हजार 555 रूपयांची जंगम मालमत्ता मुंडेंच्या नावे आहे. तसंच 4 कोटी 50 लाख 90 हजार 238 रूपयांचं कर्जही गोपीनाथ मुंडेंवर आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव पाडतील असे हाताच्या बोटावर मोजण्याइतके नेते असतील. त्यात गोपीनाथ मुंडे ठळकपणे उठून दिसतात. आपल्या 35-40 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत अनेक चढउतार अनुभवलेल्या या नेत्याने राजकारणात आपले स्वतःचे असे विशेष स्थान निर्माण केले आहे. भारतीय युवा मोर्चातून त्यांनी राजकीय कारकीर्दीला प्रारंभ केला.
प्रमोद महाजनांचं बोट धरून ते मोठे झाले. आता देशाच्या संसदेतील विरोधी पक्षाचा उपनेता म्हणून यशस्वीपणे काम करून मुंडे आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहे. बारामती म्हणजे शरद पवार, सिंधुदुर्ग म्हणजे नारायण राणे तसेच बीड म्हटल्यावर गोपीनाथ मुंडे हे जणू काही समीकरणच तयार झालंय.
बीडमधील साखर कामगारांसाठी गोपीनाथ मुंडे यांनी मोठं योगदान दिलंय. गोपीनाथ मुंडे आणि महाराष्ट्रातील साखर कारखाना कामगार हे नातं घट्ट होऊन बसलंय. महाराष्ट्रात साखर कारखाना कामगारांची संघटना सर्वप्रथम गोपीनाथ मुंडे यांनीच बांधली आणि गेली पन्नास वर्षे त्यांनी या कामगारांचे नेतृत्व केले.
कामगारांचे नेते अशीही त्यांची ओळख राहिली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत हे साखरेचं नातं पुन्हा एकदा मुंडेंसाठी गोडवा आणणार का, ते पाहायचं.
बीड लोकसभा मतदारसंघातील समस्यामागील 15 वर्षांपासून भाजपचा विशेषतः गोपीनाथ मुंडे यांचा बालेकिल्ला असणा-या या बीड लोकसभा मतदारसंघात समस्यांचा डोंगर आजही कायम आहे. ऊस तोड करणा-या कामगारांचे प्रश्न, वाढते नागरिकीकरण, त्यामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी, पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य, दर पाच-दहा वर्षांनी येणारा दुष्काळ, महामार्ग आणि गावाला जोडणारे पक्के रस्ते या समस्यांमध्ये आजही काहीच बदल झालेला नाही. या समस्या सोडवण्यात खासदार गोपीनाथ मुंडे अपयशी ठरल्याचं नागरिकांचं आणि विरोधकांचं म्हणणं आहे.
कापूस आणि ऊसाचे उत्पादन या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. बीड जिल्ह्यात एकूण 10 साखर कारखाने आहेत, तर अडीचशेच्या आसपास कापसाच्या जीनिंग आहेत. मात्र नगर-बीड-परळी रेल्वेचा 40 वर्षांपासून रखडलेला प्रश्न, विमानतळाचा अभाव, चार पदरी महामार्गांची कमतरता यामुळे दळणवळणाच्या पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने, आजंही मुबलक मनुष्यबळ उपलब्ध असताना हाताला काम नसल्याची परिस्थिती पाहायला मिळते.
परळीचे ज्योतिर्लिंग, अम्बाजोगाईची योगेश्वरी, बीडचे कांकालेश्वर मंदिर अशी पर्यटन स्थळे विकासापासून कोसो दूर आहेत. आष्टी तालुक्यात दुधाचा लाखो लिटरचा व्यवसाय आज पायाभूत सुविधा नसल्यानं कोलमडून पडलाय. इंजिनिअरींग, मेडिकलचं शिक्षण देणा-या संस्था नसल्यानं विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पुणे, लातूर, मुंबई, औरंगाबादचा पर्याय शोधावा लागतो.
खासदारकीच्या काळात मुंडे यांनी बीडला एकही मोठा उद्योग आणला नाही. 5 लाख ऊसतोडणी कामगारांसाठी फार काही केलं नाही. परळीपलीकडे त्यांचा खासदार फंड कुठे खर्च झाला याचा हिशोब द्यावा, अशी मागणी आता विरोधक करतायत.
कोणत्याही राजकीय पक्षाचा आमदार असो की खासदार, रस्ते, पाणी आणि रोजगारासारख्या पायाभूत सुविधा पुरविण्यात लोकप्रतिनिधी अपयशी ठरलेत. गोपीनाथ मुंडेही त्याला अपवाद नाहीत.
बीड मतदारसंघातील राजकीय सद्यस्थितीचा आढावाबीड लोकसभा मतदारसंघावर सुरूवातीला काँग्रेसचं वर्चस्व होतं. कालांतराने मतदारांनी भाजपला आपलंसं केलं. सध्या या मतदारसंघात राष्ट्रवादीची घडी मजबूत बसलीय. बीड मतदारसंघातील राजकीय सद्यस्थितीचा आढावा घेणारा हा रिपोर्ट.
क्रांतिसिंह नाना पाटील ते गोपीनाथ मुंडे यांच्यापर्यंत विविध राजकीय पक्षांच्या खासदारांना बीड लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. 1952 साली बाबासाहेब परांजपे यांच्या सुरू झालेली काँग्रेसची परंपरा 1996 पर्यंत बीडमध्ये टिकली. तीन वेळा स्व. केशरबाई क्षीरसागर तर तीन वेळा जयसिंग गायकवाड यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे.
44 वर्ष बीड जिल्ह्यावर एकहाती सत्ता गाजवणा-या काँग्रेसला मुंडे आणि क्षीरसागर यांच्या माध्यमातून भाजप आणि राष्ट्रवादीने खिंडार पाडण्याचं काम केलं. 2009 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांचा दीड लाखाच्या फरकाने विजय झाला असला, तरी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने परळी वगळता सहा पैकी पाच जागा जिंकत लोकसभेच्या पराभवाचा वचपा काढला. त्यानंतर झालेली नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुक, तसेच पंचायत समिती निवडणुकीतही राष्ट्रवादीने बाजी मारली.
जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच्या ताब्यात बीड, परळी, धारूर नगरपालिका राष्ट्रवादीकडे आहे, तर अंबाजोगाई नगरपरिषद काँग्रेसकडे आणि गेवराईत आघाडीची सत्ता आहे. माजलगावची एकमेव नगर पालिका भाजपच्या ताब्यात आहे. 8 पंचायत समितींमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे, तर तीन पंचायत समिती भाजपकडे आहेत.
बीड जिल्ह्यात पाच आमदार राष्ट्रवादीचे तर पंकजा पालवे यांच्या रूपाने एकमेव परळीची जागा भाजपकडे असतानाही गेल्या 10-15 वर्षात गोपीनाथ मुंडे यांनी या मतदारसंघावर चांगलीच पकड बसवलीय.
बीड लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या 6 जागा आहेत. गेवराई विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे बदामराव पंडित हे आमदार आहेत. तर मजलगाव विधानसभेची आमदारकी राष्ट्रवादीच्या प्रकाशदादा सोलंके यांच्याकडे आहे. बीडमधून एनसीपीचेच जयदत्त क्षीरसागर आमदार असून, महसूल राज्यमंत्री असलेले सुरेश धस आष्टीचे आमदार आहेत.
SCसाठी राखीव असलेल्या केज विधानसभा मतदारसंघातून विमलताई मुंदडा आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांच्या निधनानंतर घेण्यात आलेल्या पोटनिवडणूकीत एनसीपीने आपलं वर्चस्व कायम राखलं आणि पृथ्वीराज साठे आमदार म्हणून निवडून आलेत. तर भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे या परळी विधानसभा मतदारसंघाच्या आमदार म्हणून कारभार पाहतायत.
पाच आमदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर वर्चस्व असतानाही लोकसभा निवडणुकीत मुंडेंना रोखायचं कसं हा प्रश्न राष्ट्रवादीला सध्या सतावतोय... जिल्ह्याच्या राजकारणावर गोपीनाथरावांचा अद्यापही चांगला पगडा आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मुंडे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचा तगडा उमेदवार म्हणून पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर, राज्यमंत्री सुरेश धस, विधान परिषद आमदार अमरसिंह पंडित यांच्या नावाची चर्चा आहे. गेल्या वेळी राष्ट्रवादीने बीडची लढत प्रतिष्ठेची केली होती.
मात्र जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्याच काही नेत्यांनी मुंडेंना पडद्याआडून मदत केली. याचीच पुनरावृत्ती यंदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मराठा मतदारांचे 55 टक्के वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात वंजारी समाजाची मते 18 ते 20 टक्यांच्या घरात आहेत. त्याच बरोबर मुस्लिम, बौद्ध आणि इतर अल्पसंख्यक समाजाचे मोठे मतदान निवडणूकीत मोलाची भूमिका बजावत असते. अशा वेळी मुंडेना टक्कर द्यायची तर मराठा कार्ड राष्ट्रवादीला बाहेर काढावं लागेल हे निश्चित.
बीडमधील उमेदवारांची नावे1) भाजप - गोपीनाथ मुंडे
2) राष्ट्रवादी - सुरेश धस
व्हिडिओ –•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. •
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, April 4, 2014, 13:11