www.24taas.com, झी मीडिया, भंडारा-गोंदिया भंडारा मतदारसंघात जो तांदळासाठी प्रसिद्ध आहे. प्राचीन काळात भवभूती हा कालिदासाच्या तोडीचा नाटककार याच जिल्ह्यात होऊन गेल्याची नोंद इतिहासात आढळते. चला तर मग जाऊया या मतदारसंघात.
भंडारा गोंदिया मतदारसंघ... तलावांचा जिल्हा म्हणून पूर्व विदर्भात भंडारा जिल्ह्याची एक वेगळी ओळख आहे. तर व्यापाराची मोठी बाजारपेठ अशी गोंदिया जिल्ह्याची ओळख. असे दोन वेगवेगळी ओळख असलेले हे दोन जिल्हे एकाच लोकसभा मतदारसंघाचा भाग आहेत.
2009 च्या लोकसभा निवडणुकांआधी झालेल्या पुनर्रचनेत हा मतदारसंघ तयार झाला. तांदळाच्या शेतीचे मोठे कोठार अशी देखील या मतदारसंघाची ओळख आहे. तांदळाचं विक्रमी पीक घेणा-या या भागात अनेक मिल्स आहेत. पितळी भांड्यांचा व्यापार येथे मोठ्या प्रमाणात होतो आणि म्हणून या जिल्ह्याचे नाव भंडारा पडल्याचे देखील बोलले जाते.
भंडारा जिल्हा हा मालगुजारी तलावांसाठी प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यात मत्स्योद्योग मोठ्या प्रमाणात चालतो. गोंदिया आधी भंडारा जिल्ह्यातील एक तालुका होता. 1999 मध्ये भंडा-याचे विभाजन झाल्यावर गोंदिया स्वतंत्र जिल्हा झाला.
एकीकडे या भागात तांदळाची शेती मोठ्या प्रमाणात होत असतानाच गेल्या काही काळात ऊसाची लागवड देखील होते आहे. या मतदारसंघात साखरेचे कारखाने वाढल्याने ऊसाची मागणी गेल्या काही काळापासून सतत वाढली आहे. या मतदारसंघात कुणबी आणि पोवार समाजाचे प्राबल्य आहे. याचप्रमाणे विशेषतः गोंदियामध्ये हिंदी-भाषिक मोठ्या प्रमाणात आहे.
बाजारपेठ असल्याने गोंदियामध्ये मारवाडी आणि गुजराती समाज देखील मोठ्या प्रमाणात आहे. संपूर्ण विदर्भासाठी जीवनदायी समजला जाणारा गोसीखुर्द प्रकल्पाचा मोठा भाग या मतदारसंघात आहे. गेल्या काही महिन्यात येथे उद्योग उभारणीला सुरवात झाली असून भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या केंद्र सरकारच्या मोठ्या कम्पनीतर्फे येथे उद्योग उभारला जात आहे.
2009च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात एकूण 14 लाख 50 हजार 477 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. त्यापैकी पुरूष मतदारांची संख्या ही 7 लाख 34 हजार 698 होती, तर महिला मतदारांची संख्या 7 लाख 15 हजार 779 एवढी होती.
या लोकसभा मतदार संघात विधानसभेचे एकूण 6 मतदारसंघ समाविष्ट आहेत. यात भंडारा जिल्ह्यातील भंडारा, साकोली आणि तुमसर हे 3 तर गोंदिया जिल्ह्यात गोंदिया, तिरोडा, अर्जुनी- मोरगाव हे विधानसभेचे 3 मतदारसंघ आहेत. संपूर्ण विदर्भाप्रमाणे भंडारा जिल्हा देखील एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पण हळू-हळू आधी भाजपने आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसने या जिल्ह्यात आपले पाय रोवायला सुरवात केली.
राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी असली, तरीही भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रवादीची वाढ काँग्रेसच्या मुळावर आलीय. काँग्रेसचे प्रभाव क्षेत्र कमी झाल्याने पक्षाचे राजकीय नुकसानच जास्त झाले.
खासदार प्रफुल्ल पटेल यांची ओळखनाव - खा. प्रफुल्ल मनोहरभाई पटेल
जन्म - 17 फेब्रुवारी 1957
वय - 56 वर्ष
शिक्षण - पदवीधर (वाणिज्य)
राजकारणातील एक हाय-प्रोफाईल व्यक्तिमत्त्व आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वजनदार नेते ही खासदार प्रफुल्ल पटेल यांची ओळख. गेल्या अनेक वर्षापासून सक्रिय राजकारणात असलेले आणि आपल्या वडिलांकडूनच राजकारणाचे बाळकडू मिळालेले विदर्भातील एक दिग्गज नेते. चारवेळा लोकसभा आणि दोनवेळा राज्यसभेचे खासदार म्हणून प्रफुल पटेल निवडून आले.
सध्या केंद्र सरकारमध्ये अवजड उद्योगाचा कार्यभार सांभाळणारे प्रफुल्ल पटेल हे विदर्भातून राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव खासदार आहेत. व्यवसायाने बिडी व्यापारी असलेले वडिल मनोहरभाई पटेल, 1951मध्ये अविभाजित भंडारा लोकसभा मतदारसंघाचे पहिले खासदार म्हणून निवडून आले. 1971 मध्ये वडिलांच्या निधनानंतर काही वर्षांनी प्रफुल्ल पटेल यांची राजकारणात एन्ट्री झाली.
वडिलांकडून राजकारणाचा वारसा मिळालेले प्रफुल पटेल यांनी स्थानिक पातळीवर राजकारणाला सुरूवात केली. 1985 मध्ये गोंदिया नगर पालिकेचे अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल निवडून आले. त्याच काळात त्यांनी तेव्हा अस्तित्वात असलेल्या गोरेगाव विधानसभा मतदारसंघातून आपले नशीब आजमावले होते. पण भाजपच्या खुशाल बोपचे यांनी त्यांचा पराभव केला.
1989च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला. पण आपल्या राजकीय शक्तीचा वापर करत त्यांनी पुढे मजल मारली आणि 1991मध्ये दहाव्या लोकसभेत ते पहिल्यांदा भंडारा लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले. 2004 मध्ये युपीए एकचे सरकार स्थापन झाले तेव्हा त्यांना नागरी हवाई वाहतूक खात्याचे राज्यमंत्रीपद मिळाले.
2009 मध्ये युपीए दोनचं सरकार स्थापन झाल्यापासून 18 जानेवारी 2011 पर्यंत त्यांच्याकडे हवाई वाहतूक खात्याचा आणि त्यानंतर आजवर त्यांच्याकडे अवजड आणि सार्वजनिक उद्योग मंत्रालयाचा पदभार आहे.
2009च्या लोकसभा निवडणुकीत प्रफुल्ल पटेल यांना 4 लाख 89 हजार 814 मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले अपक्ष नानाभाऊ पटोले यांना 2 लाख 37 हजार 899 मते पडली.
खासदार पटेल यांची एकूण मालमत्ता ही 125 कोटी 46 लाख 98 हजार 312 रूपयांची असून, यांपैकी 72 कोटी 13 लाख 24 हजार 7 रूपयांची स्थावर मालमत्ता आहे. तर 53 कोटी 33 लाख 74 हजार 305 रूपयांची जंगम मालमत्ता पटेलांच्या नावे आहे.
त्यांनी मनोहरभाई पटेल यांच्या नावावर गोंदिया जिल्ह्यात अनेक शिक्षण संस्था सुरू केल्या आहेत. हवाई वाहतूक मंत्री असताना त्यांनी देशातील 60 विमानतळांचा लूक बदलला होता. सोबतच देशातील विमानतळाच्या एकूण गुंतवणूकीत परकीय गुंतवणुकीची मर्यादा 40टक्क्यांवरून 49 टक्क्यांपर्यंत नेली होती.
त्यांच्या या निर्णयाला विरोधी पक्षांनी कडाडून विरोध केला. त्यामुळे एकीकडे हवाई वाहतूक मंत्री असताना या क्षेत्रात प्रगती केल्याचे श्रेय प्रफुल पटेल यांना मिळत असतानाच, दुसरीकडे याच काळात अनेक वादांना पटेल यांना तोंड द्यावं लागलं.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील समस्याभंडारा गोंदिया मतदारसंघ गेल्या कित्येक वर्षापासून समस्यांनी ग्रासलेला आहे. या मतदारसंघातील प्रमुख समस्या म्हणजे तब्बल 14 हजार कोटी खर्च करून वैनगंगा नदीवर बांधलेलं गोसेखुर्द धरण. 25 वर्षांनंतरही हा प्रकल्प पूर्ण झालेला नसून, प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहे.
6 महिन्यांपूर्वी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी गोसे-खुर्द प्रकल्पाला भेट देऊन बाराशे कोटींचं विशेष पॅकेज प्रकल्पग्रस्तांसाठी जाहीर केलं होतं. मात्र अजुनही दिलेल्या अटींची नीट तरतूद न झाल्यानं प्रकल्पग्रस्त सरकारी कामकाजावर नाराजी व्यक्त करीत आहेत. तसंच काही प्रकल्पग्रस्त गावकरी गाव सोडण्यास तयार नसल्याचं चित्र जिल्ह्यात दिसतंय.
भंडारा जिल्हा हा राष्ट्रीय महामार्ग सहाशी जोडला गेला आहे. तसंच मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ या दोन राज्यांची सीमाही या जिल्ह्याला लागलेली आहे. त्यामुळे राज्यात जाण्या येण्यासाठी सोयीस्कर असलेल्या या महामार्गावर वाहतुकीची चांगलीच वर्दळ असते. मात्र या दिवस-रात्रीच्या वर्दळीमुळे महामार्गासह भंडारा-गोंदियातील अनेक रस्ते खड्डेमय झाले आहेत. खड्ड्यात रस्ते आहेत की रस्त्यात खड्डे हेच स्थानिकांना कळेनासं झालं आहे.
भंडारा-गोंदियात प्रफुल्ल पटेल यांनी औद्योगिक क्रांती घडवून आणली असे जाणकारांचे मानणे आहे. भंडारा येथे भेलचा कारखाना, भिलवाडा येथे व्हिडीओकॉनचा कारखाना आणण्यास त्यांना यश आलं. तसेच गोंदिया जिल्ह्यात छोट्या विमानासाठी विमानतळ आणि तिरोडा तालुक्यात अदानी हा प्रकल्प स्थापन करण्याचे श्रेय त्यांना जाते. मात्र स्थानिक पातळीवर ही ओळख काहीशी कमी पडत असल्याचे चित्र गेल्या काही काळापासून दिसत आहे.
कारण गेल्या लोकसभेच्या वेळी व्हिडीओकॉनचा कारखाना भिलवाडा या ठिकाणी उभा राहिलं, तसंच स्थानिकांना प्राधान्य दिलं जाहील अशी ग्वाही दिली होती. मात्र प्रत्यक्षात तसं काहीच झालं नाही. उलट मतदारसंघात आणखी बेरोजगारी वाढली. तसंच काहीसं अदानी आणि बिरसी भागातील विमानतळाविषयी सुद्धा घडलंय.
राजनैतिक वर्चस्वाचा वापर करून अत्यल्प दराने अदानी या प्रकल्पाला जमीन पुरविण्यात आली. आणि 4 वर्षांत प्रकल्प पूर्ण केल्यानंतर स्थानिकांना डावलण्यात आलं. याबाबत विरोधकही आक्रमक झाले आहेत. मात्र खासदार प्रफुल्ल पटेलांनी झालेले सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचं सांगत, मतदारसंघात सुधारणा केल्याचा दावा केलाय.
भंडारा आणि गोंदिया नगरपरिषदमध्ये गेल्या 10 वर्षापासून एनसीपीची सत्ता आहे. परंतू शहरी भागात राहणा-या लोकांचे प्रश्न सुटलेले नाहीत. भंडारा हे शहर वैनगंगा नदीचा तीरावर वसलेले असून देखीलसुद्धा या शहराला भरपूर पाणी अजूनपर्यंत मिळालेले नाही. एकंदरीतच जिल्ह्यात केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेलांनी औद्योगिक क्रांती घडवली खरी, परंतु स्थानिकांना काहीच फायदा झाला नसल्याची चर्चा सर्वत्र आहे.
राजकीयदृष्ट्या अतिशय महत्वाच्या भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाने अनेक राजकीय चढ-उतार अनुभवले. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात भाजप आपला जम बसवण्याचा प्रयत्न करत असताना राष्ट्रवादीनेही आपले भक्कम पाय रोवलेत.
काँग्रेस-राष्ट्रवादी-भाजप हे तीन पक्ष या मतदारसंघात प्रबळ आहेत. आणि याच पक्षांच्या माध्यमाने येथील राजकारण रंगतं. या मतदारसंघात गेल्या काही महिन्यात उद्योगांची मांदियाळी झाली हे खरं असलं, तरी हे प्रकल्प यायला इतकी वर्ष का लागली हा प्रश्न मतदारांना पडलाय. गेल्या अनेक वर्षापासून या भागाचे खासदार आणि हाय-प्रोफाईल मंत्री प्रफुल पटेल यांच्याकडून स्थानिक मतदारांना अनेक अपेक्षा होत्या.
मात्र त्या अद्यापही पूर्ण झालेल्या नाहीत. या मतदारसंघात जातीची समीकरणं अतिशय प्रबळ आहेत. कुणबी, पोवार आणि तेली समाजाचे मतदान या भागात निर्णायक ठरते. गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग आणि हिंदी-भाषिक किंवा अमराठी मतदार आहेत. हा वर्ग पटेल यांचा पारंपारिक मतदार आहे.
एकीकडे आपल्या अनेक उद्योगांच्या, शैक्षणिक संस्थांच्या जोरावर, तर दुसरीकडे आपल्या भक्कम आर्थिक पाठबळाच्या मदतीने प्रफुल्ल पटेल यांनी आपली व्होट बँक शाबूत ठेवली आहे. भाजपचे लोकसभा निवडणुकीचे संभाव्य उमेदवार आणि साकोली विधानसभेचे आमदार नाना पटोले हे कुणबी समाजाचे असल्याने निवडणुकीत त्यांना या समाजाचा पाठिंबा मिळण्याची चिन्हं आहेत. माजी खासदार आणि 2009 लोकसभा निवडणुकीत पक्षाचे पराभूत उमेदवार शिशुपाल पटले, पोवार समाजाचे आहेत. हा समाजही या वेळी भाजपच्या बाजूने दिसतोय. या लोकसभा मतदारसंघात अनुसूचित जातीचे मतदारही मोठ्या संख्येने आहेत.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील तुमसर विधानसभेवर काँग्रेसचे अनिल बावणकर निवडून आले आहेत. तर SCसाठी राखीव असलेल्या भंडारा विधानसभेचं नेतृत्व शिवसेनेच्या नरेंद्र भोंडेकर यांच्याकडे आहे. साकोली विधानसभा भाजपच्या नानाभाऊ पटोलेंच्या ताब्यात आहे. तर SCसाठी राखीव असलेल्या अर्जुनी-मोरगाव मतदारसंघावर राजकुमार बडोळेंच्या रूपाने भाजपचा झेंडा फडकतोय. तिरोडा मतदारसंघावरही खुशाल बोपचेंच्या रूपाने भाजपचीच सत्ता आहे. तर गोंदिया मतदारसंघ काँग्रेसच्या गोपालदास अग्रवाल यांच्या ताब्यात आहे.
एकूण काय तर 6 मतदार संघांपैकी एकाही मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार नाही. संपूर्ण देशात भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची लाट असल्याचा दावा पक्षातर्फे केला जातो. मोदींच्या या लाटेचा फायदा भाजपला झाला, तर मात्र पाटोले यांचे पारडे नक्कीच जड होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत विकासाचा दावा मतदारांना भुरळ घालतो की जातीचे समीकरण मतदारांवर वरचढ ठरतं यावरच भंडारा-गोंदियातील उमेदवाराचे भवितव्य ठरणार आहे.
भंडारा-गोंदिया मतदारसंघातील उमेदवार1) राष्ट्रवादी - प्रफुल्ल पटेल
2) भाजप - नाना पटोले
व्हिडिओ –•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. •
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, April 4, 2014, 13:26