ऑडिट मतदारसंघाचं : बुलढाणा

ऑडिट मतदारसंघाचं : बुलढाणा
www.24taas.com, झी मीडिया, बुलढाणा

विदर्भाचं पंढरपूर असलेलं शेगाव, जगप्रसिद्ध खा-या पाण्याचे लोणार सरोवर, तसंच महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊसाहेबांचं जन्मस्थान असलेल्या मतदारसंघाची आपण आज ओळख करून घेणार आहोत. चला तर मग जाऊया या मतदारसंघात...

बुलढाणा म्हणजे विदर्भाचे प्रवेशद्वार. बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची ओळख पटवायची झाली, तर 52 हजार वर्षांपूर्वी उल्कापातामुळे तयार झालेलं इथलं लोणार सरोवर वर्ल्ड फेमस आहे. खा-या पाण्याचं हे सरोवर पाहण्यासाठी देश विदेशातून अनेक अभ्यासक तसेच लाखो पर्यटक याठिकाणी येतात.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राष्ट्रमाता जिजाबाई यांची जन्मभूमी असलेले मातृतीर्थ सिंदखेडराजाही याच मतदारसंघाचा भाग आहे. विदर्भाची पंढरी म्हणून ख्याती असलेल्या श्रीसंत गजानन महाराजांची संतनगरी शेगावसुद्धा याच मतदारसंघात आहे. सर्वधर्म समभावाचे प्रतिक असलेले सैलानीबाबा यांचा सैलानी दर्गा सुद्धा याच मतदारसंघात आहे.
 
थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या बुलढाण्यात कापूस, ज्वारी, सोयाबीन आणि सुर्यफूलाचं पीक प्रामुख्यानं घेतलं जातं. खामगाव-मलकापूर ही महत्त्वाची औद्योगिक शहरेही याच मतदारसंघात आहेत. मराठी साहित्यातील थोर नाटककार, विनोदी लेखक आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोल्हटकरांचा जन्मही बुलढाण्यातलाच. 1984 पर्यंत या मतदारसंघावर काँग्रेसची सत्ता होती. मात्र त्यानंतर काँग्रेसला हा गड राखणं जमलेलं नाही.
 
1984मध्ये काँग्रेसचे मुकुल वासनिक खासदार म्हणून निवडून आले. 1989 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या सुखदेव नंदाजी काळे यांनी बाजी मारली. 1991मध्ये मुकुल वासनिकांच्या रूपात काँग्रेसने कमबॅक केलं खरं. मात्र 1996मध्ये आनंदराव अडसूळांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने या जागेवर आपलं स्थान बळकट केलं.

1998मध्ये झालेल्या निवडणुकीत पुन्हा मुकुल वासनिक खासदार म्हणून निवडून आले. तर 1999 आणि 2004मधील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या आनंदराव अडसूळांची खासदार म्हणून वर्णी लागली. 2009 च्या निवडणुकीत शिवसेनेचे प्रतापराव जाधव खासदार म्हणून लोकसभेवर विजयी झाले.
 
बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाणा, चिखली, सिंदखेडराजा, मेहकर, खामगाव, जळगाव जामोद आणि मलकापूर असे एकूण सात विधानसभा मतदार संघ येतात. त्यातील मलकापूर विधानसभा मतदारसंघ वगळता इतर सहा विधानसभा मतदारसंघांचा मिळून बुलढाणा लोकसभा मतदारसंघ तयार झाला आहे. 1977 ते 2009 पर्यंत हा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव होता. 2009 मध्ये हा मतदारसंघ सर्वसाधारण झाला.
 
2009 मध्ये बुलढाणा मतदारसंघातली मतदार संख्या 13 लाख 82 हजार 736 एवढी होती. यामध्ये 7 लाख 21 हजार 215 पुरूष, तर 6 लाख 61 हजार 521 महिला मतदारांचा समावेश होता.
 
हा मतदारसंघ भौगोलिक दृष्ट्या फार मोठा आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आणि मध्यप्रदेशाच्या सीमेला लागून असलेल्या संग्रामपूर तालुक्यापासून सुरू होऊन, मराठवाडा सीमेला लागून असलेल्या लोणार तालुक्यापर्यंत हा मतदारसंघ आहे. इथली आघाडी आता शिवसेना टिकवून ठेवणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
 
विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांची ओळख

नाव - खा. प्रतापराव गणपतराव जाधव
जन्म - 25 नोव्हेंबर 1960
वय -  54 वर्ष
शिक्षण -  द्वितीय वर्ष (बी.ए)
 
सुमारे चार दशकं राखीव असलेला बुलढाणा मतदारसंघ पुनर्रचनेनंतर 2009 मध्ये खुला झाला. आणि शिवसेनेचे प्रतापराव जाधव खासदार म्हणून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. त्याआधी 1995 ते 2009 या कालावधीत मेहकर मतदारसंघातून प्रतापराव आमदार म्हणून निवडून आले होते.

1997 ते 1999 या काळात युती सरकारमध्ये जाधवांनी क्रीडा पाटबंधारे राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिलं होतं. अन्न सुरक्षा योजना लागू करण्यासाठी खासदारांची जी समिती तयार करण्यात आली होती त्यातही समिती सदस्य म्हणून खासदार जाधवांचा समावेश होता.

खासदार प्रतापराव जाधवांचं इंग्रजी आणि हिंदीवर प्रभुत्व नसलं, तरी मतदारसंघातील त्यांची पकड मजबूत आहे. खासदार जाधवांनी मतदारसंघात तीन ते साडे तीन वर्षांत अगदी मोजकाच खासदार निधी खर्च केला होता. परंतु आता लोकसभा निवडणुकांची चाहुल लागताच खासदार निधीतून जाधवांनी मतदारसंघात विविध विकासकामांचा धडाकाच लावलाय.

2009च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे प्रतापराव गणपतराव जाधव यांना 3 लाख 53 हजार 671 मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले राष्ट्रवादीचे उमेदवार माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांना 3 लाख 25 हजार 593 मते पडली. प्रतापराव जाधवांनी शिंगणेंचा  28 हजार 78मतांनी पराभव केला.

खासदार जाधव यांची एकूण मालमत्ता ही 1 कोटी 20 लाख 52 हजार 820 रूपयांची असून, यांपैकी 78 लाख 50 हजार रूपयांची स्थावर मालमत्ता आहे. तर 42 लाख 2 हजार 820 रूपयांची जंगम मालमत्ता प्रतापराव जाधवांच्या नावे आहे. तसंच 45 लाख 51 हजार 550 रूपयांचं कर्जही जाधवांच्या अंगावर आहे.

बुलढाणा जिल्ह्यामध्ये मराठा समाजाचं प्राबल्य सर्वाधिक आहे. त्यामुळे या ठिकाणी निवडून येण्यासाठी जातीचं समीकरण महत्त्वाचं ठरणार आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार हे जातीने मराठाच असल्याने, त्यांच्याविरूद्ध विजय मिळवण्यासाठी प्रतिस्पर्धी पक्षांनाही मराठाच उमेदवार रिंगणात उतरवावा लागणार एवढं निश्चित.
 
बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील समस्या

बुलढाणा मतदारसंघातील सर्वात महत्वाचा आणि दरवेळचा निवडणुकीचा मुद्दा म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला खामगाव-जालना रेल्वे मार्ग. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी पूर्वीपासून पांढ-या सोन्याची म्हणजेच कापसाची मोठ्या प्रमाणावर लागवड करत आला आहे. एकेकाळी कापूस उत्पादक जिल्हा म्हणून बुलढाण्याची ख्याती होती.

येथील कापूस नेण्यासाठी इंग्रजांनी मुंबईपासून खामगावपर्यंत विशेष रेल्वेसेवाही सुरू केली होती. त्यानंतर 1910 मध्ये खामगाव ते चिखली आणि नंतर जालना असं रेल्वे लाइनचे सर्वेक्षण करण्यात आलं. 1922 मध्ये या मार्गाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवातही झाली. मात्र त्यानंतर इंग्रज गेले आणि हे काम रखडले ते आज पावेतो.

हा रेल्वे मार्ग व्हावा ही जिल्ह्यातील जनतेची अनेक वर्षांची मागणी आहे. पाच वेळा या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण झाले परंतु सर्वेक्षणाच्या पुढे काही हा मार्ग गेलाच नाही.
 
येथील बुलढाणा, चिखली, देऊळगावराजा, मेहकर, खामगाव याठिकाणी औद्योगिक वसाहतींची स्थापना करण्यात आलेली आहे. परंतु खामगाव औद्योगिक वसाहत वगळली तर इतर कुठल्याही औद्योगिक वसाहतीत उद्योग धंदे नाहीत. येथील लोकप्रतिनिधी मोठे औद्योगिक प्रकल्प आणण्यात कमी पडत असल्याने सुशिक्षित बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलीय.

अनेक तरूण रोजगाराच्या शोधात औरंगाबाद, मुंबईचे मार्ग चोखंदळतायत. या मतदारसंघातील मोठी समस्या म्हणजे जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील खारपाण पट्टा. क्षारयुक्त पाण्यामुळे दरवर्षी या दोन तालुक्यातील अनेक लोक मृत्युमुखी पडत असतात. त्यासाठी राष्ट्रीय पेय जल योजनेतून मोठ्याप्रमाणावर निधी आणल्याचा दावा खासदार करतायत. पण स्थानिक नागरिक त्याच्याशी अजिबात सहमत नाहीत.

बुलढाणा मतदारसंघात जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेले लोणार सरोवर आहे. मात्र या पर्यटनस्थळाच्या विकासासाठी केंद्राकडून विशेष निधी आणण्यामध्ये खासदार प्रतापराव जाधव अपयशी ठरलेत. लोणार प्रमाणेच सिंदखेडराजा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई यांचे जन्मस्थळ आहे. 

ते राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे अशी जिल्हावासीयांची मागणी आहे. तसेच खामगाव-जालना या राज्य महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम 2008 पासून सुरू करण्यात आलं. गेल्या पाच वर्षापासून बीओटी तत्वावर सुरू करण्यात आलेले हे काम अद्याप पूर्ण झालेलं नाही. अर्धवट कामामुळे या मार्गावर अनेक अपघात होऊन प्रवाशांना आपल्या प्राणास मुकावं लागतंय. या मार्गाचे काम तत्काळ पूर्ण व्हावं अशी मागणी येथील जनतेची आहे.

बुलढाणा लोकसभा मतदार संघाचा इतिहास

बुलढाणा लोकसभा मतदार संघाचा इतिहास जर बघितला तर 1952 ते 1977 पर्यंत हा मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. 2009च्या निवडणुकीत सेनेचे प्रताप जाधवांनी  डॉक्टर राजेंद्र शिंगणेंचा पराभव करून सलग तीन वेळा या मतदार संघावर सेनेचे वर्चस्व सिद्ध केले. त्यामुळे यंदा सत्ता काबीज करण्याकरता एनसीपीला बराच घाम गाळावा लागण्याची शक्यता आहे.

2009 मध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघ सर्वसाधारण वर्गासाठी खुला झाला. शिवसेनेने मेहकर मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिलेले प्रतापराव जाधव यांना त्यावेळी उमेदवारी दिली. मेहकर विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्याने त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी ही उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनी जास्तीत जास्त गावांना भेटी देवून प्रत्यक्ष मतदारांसोबत संपर्क केला. त्याचाच फायदा त्यांना निवडणुकीत झाला व ते खासदार म्हणून विजयी झाले. 2014 लोकसभा निवडणुकीसाठीही जाधवांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जातेय.

खासदार झाल्यानंतर जाधवांनी बुलढाणा जिल्ह्यातील आनंदराव अडसूळ समर्थक कार्यकर्त्यांची उचलबांगडी करत, संघटनेत मोठे बदल केले. त्यामुळे ते कितपत सहकार्य करतील याबाबत साशंकता आहे. त्याचप्रमाणे अंतर्गत धुसफुशीचाही जाधवांना फटका बसण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे गेल्यावेळचे पराभूत उमेदवार माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांना पुन्हा उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत पक्षाकडून मिळत आहेत.

परंतु आता भाजपला रामराम ठोकणा-या रेखाताई खेडेकर यांच्या राष्ट्रवादीतील एन्ट्रीने जिल्ह्यात सध्या शक्यतांचा बाजार गरम झाला आहे. राष्ट्रवादीच्या वतीने डॉ. शिंगणेंचा पर्याय म्हणून जळगाव जामोद भागातील माळी समाजाचे नेते आणि तीन वेळा आमदार राहिलेले कृष्णराव इंगळे यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरू आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद ही काँग्रेसच्या ताब्यात असून, मलकापूर, चिखली, बुलढाणा, मेहकर, शेगाव नगर पालिकेवर काँग्रेसची सत्ता आहे. तर सिंदखेडराजा, देऊळगाव राजा, खामगाव, जळगाव-जामोद नगरपरिषद राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. लोणार ही एकमेव जागा सेनेच्या ताब्यात असून, खामगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप-सेनेसह युती करून सत्ता मिळवली आहे.

या लोकसभा मतदारसंघातील बुलढाणा विधानसभेत शिवसेनेचे विजयराज हरिभाऊ शिंदे आमदार म्हणून निवडून आले आहेत. तर चिखली मतदरासंघाचं आमदारपद आहे ते काँग्रेसच्या राहुल बोंद्रेंकडे. सिंदखेडराजा मतदारसंघात राष्ट्रवादीचेच डॉ. राजेंद्र शिंगणे आमदार म्हणून काम पाहत आहेत.

मेहकर मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व शिवसेनेचे आमदार संजय रायमुलकर करत आहेत. खामगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे दिलीपकुमार सानंद आमदार म्हणून निवडून आले आहेत. तर भाजपचे डॉ. संजय कुटे जळगाव जामोद मतदारसंघातून आमदार आहेत.

बुलढाणा लोकसभा मतदारसंघात आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून संभाव्य उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे. शिवसेना-भाजप युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशीच थेट  लढत या मतदारसंघात पाहायला मिळणार आहे.

बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार

शिवसेना - प्रतापराव जाधव
राष्ट्रवादी - कृष्णराव इंगळे
सपा- वसंतराव डांगे

 व्हिडिओ –




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, April 4, 2014, 13:41
First Published: Friday, April 4, 2014, 14:01
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?