www.24taas.com, झी मीडिया, चंद्रपूरलाल शामशाह लाल भगवानशाह हे माजी खासदार 1962 मध्ये एका वर्षाच्या काळात संसदेची पायरीही चढले नाहीत. मोठ्या नामुष्कीने त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. मात्र याच मतदारसंघातील सध्याच्या खासदारांना सर्वाधिक उपस्थितीसाठी पुरस्कार दिला गेलाय. खासदाराची संसदेतील हजेरी वाढली असली तरी विकासाचे वारे या मतदारसंघात वाहिलेत का हा खरा प्रश्न आहे.
चंद्रपूर.... City of Black Gold म्हणजे कोळसाखाणींचं शहर. देशाच्या वाढत्या ऊर्जेची गरज भागवण्यासाठी कोळसा पुरवणा-या सुमारे ५० खाणी चंद्रपूरमध्ये आहेत. चंद्रपूर म्हणजे प्राचीन गोंड साम्राज्य काळातील राजधानीचं शहर. हे शहर सध्या आपल्या स्थापनेची पंचशताब्दी साजरी करत आहे. दक्षिण भारताला उत्तरेशी जोडणारा एक सांस्कृतिक दुवा. २२ किमी लांब देशातील एकमेव भुईकोट किल्ला व राणी हिराईने राजे विरशाहच्या- आपल्या पतीच्या स्मरणार्थ बांधलेले भव्य समाधीस्थळ हे चंद्रपूरचं भावनिक मर्मस्थान. झाडीपट्टी रंगभूमीचा झगमगाट अन डाळीपासून तयार होणारी खास चंद्रपुरी वड्याची लज्जत म्हणजे क्या बात... क्या बात...
राज्याचा वनाच्छादित, आदिवासी, वन्यप्राणी बहुल असा हा भूभाग. मात्र लाल मातीचे चंद्रपूर व ताडोबाच्या रस्त्या-रस्त्यावर फिरणारे वाघ ही निसर्गदत्त ओळख मागे पडून आपल्या कोळसा या खनिज भांडाराच्या जीवावर चंद्रपूरने अमाप संपत्ती पाहिली. परंतु धंदा कोळशाचा असल्याने स्थानिक मराठी माणूस मागे पडला. या कामात परप्रांतीयांचा चंचुप्रवेश झाला. चंद्रपूर विकासापासून कोस मैल दूर....धुळीने भरलेले रस्ते अन श्वसनाचे- कातडीचे रोग इथल्या वातावरणात पाचवीलाच पुजलेत... चंद्रपूर-बल्लारपूर-वणी ही शहरे सोडली तर बाकीचा लोकसभा मतदारसंघ ग्रामीण तोंडवळ्याचा आहे.
चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात 2009 मध्ये 15 लाख 36 हजार 352 मतदार होते. यापैकी 7 लाख 96 हजार 156 पुरुष तर 7लाख 40 हजार 196 महिला मतदार आहेत.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. मारोतराव कन्नमवार यांचे गृहक्षेत्र असलेल्या चंद्रपूर मतदारसंघाने काँग्रेसला भरभरून दिले. काँग्रेसच्या तिकिटावर कुणालाही उभे केले तरी तो निवडून येणार ही काँग्रेसजनांची खात्री. भाजपने काँग्रेसच्या अंतर्गत कलहाचा फायदा घेत इथं पक्के पाय रोवले. आणि आता चंद्रपूर लोकसभा भाजपचा बालेकिल्ला बनलाय...
1977साली या मतदारसंघातील जनतेने काँग्रेसला पहिला धक्का दिला. त्याआधी काँग्रेस एके काँग्रेस चालणा-या जनतेने आणीबाणीविरोधी कौल देत आदिवासींचे राजे विश्वेश्वरराव महाराज यांना संसदेत पाठविले. हा अपवाद वगळता नंतरच्या काळात 1980, 19884,1989,1991अशा चार टर्म राज्यातील काँग्रेसचे हेवीवेट नेते शांताराम पोटदुखे यांनी सुखेनैव खासदारकी उपभोगली. 1996साली भाजपने राममंदिर मुद्यावर आघाडी घेत हंसराज अहिर यांच्या रुपाने विजयाचे पहिले पाऊल टाकले. मात्र लगेच 2 वर्षांनी पारडे फिरले. काँग्रेसचे कामगार नेते नरेश पुगलिया यांनी भाजपला हरवून पुन्हा काँग्रेसला विजय मिळवून दिला. 1999सालीही हाच विजय कायम राहिला. 2004साली भाजप उमेदवार हंसराज अहिर यांनी पुन्हा बाजी मारली. 2009 मध्येही तेच पुन्हा विजयी झाले. 2009साली गडचिरोलीचा मोठा आदिवासी मतदार चंद्रपूर लोकसभेतून वेगळा झाला. यवतमाळ जिल्ह्यातील २ विधानसभा मतदारसंघ चंद्रपूरला जोडले गेले, त्यानंतरही भाजपने मिळविलेले यश उल्लेखनीय ठरले. सध्या भाजपचे हंसराज अहिर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत
विधानसभा मतदारसंघातील संख्याबळावर नजर टाकल्यास हे क्षेत्र काँग्रेसचं पारडं जड
चंद्रपूर जिल्ह्यातच भाजपचे २ आमदार आहेत. पैकी बल्लारपूर मधून भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार व चंद्रपूरमधून गडकरींचे विश्वासू नाना शामकुळे यांचा समावेश आहे. याच जिल्ह्यातील वरोरा विधानसभा क्षेत्रातून जिल्ह्याचे पालकमंत्री काँग्रेसचे संजय देवतळे तर राजुरा क्षेत्रातून सुभाष धोटे हे अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय काँग्रेस आमदार आहेत. तर यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभेतून शिवसेनेला धक्का देत वामनराव कासावार हे काँग्रेस आमदार व आर्णी मधून राज्याचे सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे काँग्रेसचे आमदार आहेत.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून जनतेने काँग्रेसला झुगारून भाजपला पसंती दिल्याला आता एक दशक उलटलंय. मात्र इथल्या मुलभूत समस्यांची सोडवणूक करण्याची सुरुवात देखील झालेली नाही. काँग्रेसच्या `हा नको, तो नको`च्या वादात भाजपला जनतेने पसंती दिली. मात्र मिळालेल्या संधीचा विकासाच्या दृष्टीने वापर करण्यात भाजपचं घोडं अडलेलंच आहे.
चंद्रपूर लोकसभेत जो खासदार निवडून येतो त्याच्या पक्षाची केंद्रात सत्ता येत नाही, असा अलिकडचा इतिहासच आहे. १९९६ पासून काँग्रेसचा खासदार निवडून आला तेव्हा तेव्हा केंद्रात भाजपचे सरकार आले. अन भाजपने जागा जिंकली तेव्हा काँग्रेसने केंद्रात सत्तापद काबिज केले. आता नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपला बहुमत मिळवायचं. मग आता भाजपने पुन्हा चंद्रपूर जिंकले, तर केंद्रात सत्ता कुणाची अशी गंमतीशीर चर्चा सध्या इथं रंगतेय. तूर्तास चंद्रपूरचे खासदार असलेल्या हंसराज अहिर यांची ओळख करून घेऊया...
खासदार -- हंसराज गंगाराम अहिर
जन्म ------ ११ नोव्हे. १९५४
शिक्षण ----- दहावी
खासदार हंसराज अहिर म्हणजे भाजपचा OBC चेहरा. सलग 2 टर्म अहिर लोकसभेवर निवडून गेले आहेत. देशात गाजलेल्या हजारो कोटी रुपयांच्या कोळसा खाणी वितरण घोटाळ्याचा पर्दाफाश हंसराज अहिर यांनी केल्याने ते अचानक प्रकाशझोतात आलेत.
१९९६ साली पहिल्यांदा तत्कालीन नरसिंहराव मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री असलेल्या शांताराम पोटदुखे यांच्यासारख्या दिग्गज काँग्रेस नेत्याचा पराभव करून हंसराज अहिर यांनी दिल्ली गाठली. १९९८ व १९९९ अशा लागोपाठच्या दोन निवडणुकांमध्ये अहिर यांना पराभव स्वीकारावा लागला. मात्र हा अनुभव त्यांनी संघटनात्मक बांधणीसाठी वापरून २००४ साली काँग्रेसचे नरेश पुगलिया यांना धूळ चारली. २००९ साली त्यांनी याच विजयाची पुनरावृत्ती केली. २००४ मध्ये बंडखोर काँग्रेस उमेदवार राजेंद्र वैद्य यांनी त्यांचा विजय सुकर केला. शेतकरी संघटनेचे नेते, माजी आमदार वामनराव चटप यांनी लाखावर मते घेऊन 2009 मध्ये त्यांचा विजय सोपा करून दिला.
१९७७ च्या आणीबाणीविरोधी लाटेतून अहिर प्रथम समाजकारण व नंतर राजकारणात आले. गेली ४० वर्षे ते राजकारणात सक्रिय आहेत.
अहिर यांना.... चित्रपट पाहणे, गाणे ऐकणे तसेच कुस्ती, फुटबॉल पाहणे.... आवडतं तसेच क्रीडा क्षेत्राची विशेष आवड असलेल्या अहिर यांनी आपल्या उमेदीच्या काळात चंद्रपूरची कबड्डी मैदाने गाजविली आहेत.
हंसराज अहिर यांची hat trick रोखण्यासाठी काँग्रेस यंदा २ वेळा पराभूत होणा-या नरेश पुगलियांचा पत्ता कापून चंद्रपूरचे पालकमंत्री संजय देवतळे यांना पुढे करणार असल्याची चर्चा आहे. शिवाय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हे देखील उमेदवार असू शकतात. त्यामुळे अहिर यांच्या समोर तगडं आव्हान असणार..त्यांमुळे अहिर हॅट्ट्रिक करणार की त्यांची दिल्लीवारी काँग्रेस रोखणार की शेतकरी नेते वामनराव चटप, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
खासदाराची कामगिरीवीज पुरवून अख्ख्या महाराष्ट्रात उजेड पाडणा-या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात तिथल्या खासदारांनी काय दिवे लावलेत, ते पाहुयात....
देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत पहिल्या ३ मध्ये चंद्रपूरचा समावेश आहे. प्रदूषण रोखणे, शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी सिंचन सोयी उपलब्ध करणे यासह नागरी सुविधांची बोंब चंद्रपूरात आहे. जिल्ह्यात सर्वात मोठी संख्या कामगारांची असताना कामगारांसाठी इस्पितळ नसणे हे कोणत्याही खासदाराच्या लौकिकाला शोभणारी बाब नाही. महाराष्ट्राच्या राजधानीपर्यंत एकही थेट गाडी गेल्या ६५ वर्षात इथल्या खासदार महोदयांना सुरु करता आलेली नाही अशी जनतेची तक्रार आहे . या मतदारसंघातील वर्धा या एकाच नदीवर किमान २० उर्जा प्रकल्प प्रस्तावित आहेत. शिवाय २ डझन उद्योग आहेत. ही नदी सिंचन कमी अन उद्योगांच्या तुंबड्या जास्त भरते अशी स्थिती झाली आहे.
उद्योगांसाठी जमिनी दिल्यावर प्रकल्पग्रस्तांना मिळणारी नुकसानभरपाई तुटपुंजी आहे.
चंद्रपूरच्या प्रदूषणाची देशभर बोंब झाल्यावर केंद्रीय पर्यावरण विभागाने जिल्ह्यात उद्योग स्थापनेवर सरसकट बंदी घातली आहे. त्यामुळे रोजगार निर्मिती ठप्प आहे. त्यामुळे इथल्या बेरोजगार युवकांची स्थिती आई जेवू घालीना, अन बाप भिक मागू देईना अशी हतबल झाली आहे.
नागपूर ते चंद्रपूर असा १५० किमीचा मार्ग चौपदरी करण्याचा प्रकल्प आकाराला येत आहे. मात्र हा प्रकल्प चंद्रपूरकरांसाठी नव्हे तर कच्चा माल काढून नेणा-या उद्योजकांसाठी तयार होत असल्याचे स्पष्ट झालंय. हा मार्ग पूर्ण झाल्यास चंद्रपूरकरांना तब्बल साडेतीनशे रुपये टोल द्यावा लागणार आहे. हा भुर्दंड इथल्या नागरिकांनी परवडणारा आहे का ? असा सवाल आता उपस्थित होतोय...
एकीकडे लोकसभा क्षेत्रात समस्यांचा डोंगर उभा ठाकला असताना खासदार अहिर मात्र आपली कामगिरी लख्ख असल्याचे ठासून सांगत आहेत. मग मतदारसंघाची प्रगती का झाली नाही असा प्रश्न चंद्रपूरकरांना पडला आहे.
मतदारसंघात ताडोबा सारखा जगविख्यात टायगर प्रोजेक्ट आहे. मात्र पर्यटकांसाठी सुविधांच्या नावावर बोंब आहे. जिल्ह्यातील जंगलात उभा ठाकलेला वन्यजीव-मानव संघर्ष टोकाला पोचलाय. जंगलाशेजारी राहणा-या ग्रामस्थांना जंगलावर अवलंबून रहावे लागू नये यासाठी पर्यायी रोजगाराची कुठलीही योजना अतित्वात नाही. शेतकरी , बेरोजगार , मध्यमवर्गीय , उच्चभ्रू , आदिवासी विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. भाजपला सलग दोनदा संधी देऊनही चंद्रपूर प्रदुषित होत चालले असताना इथला सामान्य मतदार शुध्द ऑक्सिजनसाठी आसुसलेला आहे.
चंद्रपूरची स्थिती भाजपची पितृ संघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विद्यमान सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे चंद्रपूर हे होमटाऊन असल्याने यंदाची निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची असणार आहे... इथल्या राजकीय सद्यस्थितीचा आढावा घेऊया...
गेल्या निवडणुकीनंतर चंद्रपूरमधील राजकीय समीकरणे बदलली आहेत. अहिर यांना काँग्रेसच्या दुहीचा फायदा मिळतो आहे हे काँग्रेसच्या लक्षात आले आहे.
काँग्रेसने पालकमंत्री संजय देवतळे यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय शेतकरी नेते स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चटप आधीपासून रिंगणात आहेत. कुणबीबहुल चंद्रपूर मतदारसंघात वामनराव चटप राजकीय चमत्कार घडवू शकतात.
अहिर यांना २०१४ च्या निवडणुकीत सर्वाधिक त्रास संभवतो तो काँग्रेस अथवा राष्ट्रवादीकडून नव्हे, तर युतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेकडून. गेली २ निवडणुका भाजप-शिवसेनेत बेबनाव विकोपाला गेला आहे. भाजपने चंद्रपूर जिल्हा परिषदेत शिवसेनेला दूर सारले.चंद्रपूर मनपात शिवसेनेने भाजपला टाटा करत काँग्रेसशी घरोबा करून सत्ता मिळविली. सप्टेबरच्या सुरुवातीला झालेल्या भद्रावती नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपला पद्धतशीर बाजूला करत स्वबळावर चौथ्यांदा भगवा फडकाविला. आता शिवसेना भाजपच्या उमेदवाराला नाकी नऊ आणणार निश्चित.
अहिर यांची hat trick हुकविण्यासाठी भाजपमधील त्यांचे अंतर्गत विरोधक आतापासूनच कामाला लागलेत. सुधीर मूनगंटीवार व अहिर यांचे संबंध कमालीचे ताणलेले आहेत. शिवाय ४ टर्म आमदार असलेल्या व सध्या विधानपरिषदेवर आमदार असलेल्या शोभाताई फडणवीस यांच्याशीही त्यांचे पटत नाही. तरीही ते विजयी झाले तर तो चमत्कार ठरणार आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. •
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, April 4, 2014, 10:58