www.24taas.com, झी मीडिया, धुळे धुळे लोकसभा मतदारसंघ आदिवासींसाठी राखीव असलेला हा मतदारसंघ 2009मध्ये सर्वसाधारण म्हणून घोषित झाला. आणि काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणा-या मतदारसंघात भाजपचं कमळ फूललं. चला तर पाहूयात कोणता आहे हा मतदारसंघ?
आपण आता आहोत खानदेशातील धुळे जिल्ह्यात.. एक दोन नव्हे तर तब्बल तीन महामार्गांवर वसलेलं हे शहर. एकेकाळी नंदुरबार जिल्ह्याचा प्रशासकीय कारभार याच जिल्ह्यातून चालत असे, भास्कर वाघ यांचा घोटाळा आणि रॉकेलच्या काळाबाजारामुळे राज्यात प्रकाशझोतात आलेले हे शहर.
अहिराणीचा गोडवा आणि शासकीय अधिका-यांचे देखणे बंगले यासाठी प्रसिद्ध असलेले धुळे शहर पांझरा नदीच्या काठावर वसलंय. स्वातंत्र्यापूर्वीच सुनियोजित वाहतूक आणि शहरवास्तू नियोजन असलेलं हे छोटेखानी शहर. एकविरा आणि बिजासनी देवी या भागातील प्रमुख कुलदैवत.. नाशिक विभागातील एकमेव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय कृषी महाविद्यालय सध्या याच शहरात आहे.
इतिहासातल्या अनेक पाउलखुणा जोपासणारे राजवाडे, वस्तूसंग्रहालय आणि समर्थ वाग्देवता मंदिर ही धुळ्याची ओळख, नुकतंच उद्घाटन झालेल्या देशातील सर्वात मोठ्या सोलार वीज निर्मिती प्रकल्पाच्या रुपाने धुळ्याला आधुनिक ओळख मिळालीये.. या मतदारसंघात औद्योगिक वसाहत आहे, पण ती नसल्यासारखीच, कुठलाही मोठा उद्योग नसल्यानं रोजगारासाठी पदवीधर तरुण नाशिक, मुंबईचा रस्ता धरतात.
धुळे शहराची अर्थव्यवस्था चाकरमाने आणि व्यापारावर आधारीत आहे. इथं मोठे उद्योग अगदी बोटावर मोजण्याइतकेच आहेत. जिल्ह्यात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब अडवला गेला आहे.मात्र नियोजनाच्या अभावामुळे धुळे जिल्ह्यात मोठया प्रमाणावर कोरडवाहू शेती केली जाते. बागायती शेतीचे प्रमाण फक्त 1813 हेक्टरपुरतं मर्यादित आहे.
2009मध्ये 15 लाख 75 हजार 225 मतदार धुळ्यात होते. त्यात 8 लाख 8 हजार 302 पुरुष मतदार तर 7 लाख 66 हजार 923 महिला मतदार होते.
1991 पर्यंत या मतदारसंघात काँग्रेसचं वर्चस्व राहिलं. त्यानंतर कधी काँग्रेस, कधी भाजप असा लपंडाव सुरू आहे. 1996मध्ये साहेबराव बागूल यांच्या रुपानं पहिल्यांदा धुळे लोकसभा मतदारसंघातून भाजपाचा खासदार लोकसभेत गेला.
तर 1998मध्ये डी एस अहिरे यांनी पुन्हा काँग्रेसला ही जागा मिळवून दिली. त्यानंतर 1999 ला भाजपचे रामदास गावीत तर 2004मध्ये काँग्रेसचे बापू चौरे खासदार राहिले. तर 2009मध्ये प्रतापदादा सोनवणे भाजपच्या तिकिटावर निवडून आले.
मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या या शहरातील राजकीय वातावरण तापू लागलंय. लोकसभा निवडणुकीत युतीला साथ देण्याची मानसिकता आणि कोंग्रेसमधील गटबाजीची परंपरा यंदा खंडित होणार का, हा सध्या इथला चर्चेचा विषय आहे.
सिव्हिल इंजिनियरींग केल्यानंतर, नाशिकच्या शिक्षक मतदारसंघातून 1998 ते 2009पर्यंत आमदारकी मिळवली. त्यानंतर पक्षाने खासदारकीसाठी दाखवलेला विश्वास त्यांनी पहिल्याच प्रयत्नात सार्थ केला. चला तर धुळे लोकसभा मतदारसंघाच्या या कुटूंबातील खासदाराची ओळख करून घेऊयात.
प्रतापदादा सोनवणे यांची ओळख नाव -- प्रतापदादा सोनावणे
जन्म -- 22 डिसेंबर 1948
वय –- 64 वर्षे
शिक्षण -- बी.ई सिव्हील
नाशिक जिल्ह्यातील मानूर या गावात जन्मलेले प्रतापदादा सोनावणे नाशिक शहरातील गजबजलेल्या व्यापारी वस्तीत म्हणजेच कॉलेज रोड परिसरात राहतात. विशेष म्हणजे नाशिकमध्ये राहूनच ते धुळ्याचा कारभार हाकतात. कारण आज ते धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत.
मराठा समाजाचे सोनवणे 1998 ते 2009 पर्यंत नाशिक शिक्षक मतदारसंघातून आमदार झाले. प्रत्येक शाळेत संगणक देत त्यांनी या काळात सर्व शाळांना संगणक साक्षर केले. आमदार निधीतून पुस्तके देण्याची तरतूद या काळात नव्हती. त्यासाठी त्यांनी रेटा लावला. लायब्ररी देण्याचा सपाटा त्यांनी लावला. केलेल्या कामाच्या बळावर धुळ्यातून आपले नशीब आजमावीत पंधराव्या लोकसभेत ते खासदारही झाले.
राजकारण आले की हितशत्रू निर्माण होतात.. मात्र प्रताप सोनवणे हे अजातशत्रू आहेत. सर्वच पक्षात त्यांचे मित्र आहेत. परंतू लोकसभेतील कामगिरी फारशी उल्लेखनीय राहिलेली नाही.
साठीच्या वयात गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी वीस हजाराचे मताधिक्य मिळवत धुळ्यातून विजय मिळविला. शिरपूरचे कॉंग्रेसचे धनाढ्य आणि मातब्बर उमेदवार अमरीशभाई पटेल यांना त्यांनी धूळ चारली.
गेल्या वीस वर्षापासून राजकारणात असूनही सोनावणे यांच्यावर कोणताही गुन्हा आजपर्यंत नाही.
खा.सोनवणेंची एकूण मालमत्ता 14 कोटी 21 लाख 57 हजार रुपयांची आहे. यांपैकी 6 कोटी 42 लाख 53 हजार रूपये स्थावर मालमत्ता आहे. 7 कोटी 79 लाख रूपयांची जंगम मालमत्ता आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी अवघे काही महिने शिल्लक असताना सोनवणे यांनी आजारपणावर मात करत पुन्हा जोमाने काम करण्यास सुरुवात केलीय.. मात्र गेलेली चार वर्षे कशी भरून निघतील आणि मतदारांना किती आपलेसे करू शकतील हे येणारा काळच ठरवेल.
धुळे मतदारसंघातील समस्याराष्ट्रीय महामार्गावर असलेली धुळेनगरी सध्या नागरी समस्यांच्या विळख्यात सापडलीय. कचरा उचलण्यापासून ते रस्त्यावरील खड्ड्यांपर्यंत. पिण्याच्या पाण्यापासून ते अनधिकृत लेआऊटपर्यंत. अनेक समस्या धुळ्याच्या मतदारांना भेडसावतात. एकेकाळी धुळे सुनियोजित शहर म्हणून प्रसिद्ध होतं. गल्ल्यागल्यांच्या शहराची मात्र आता पार दुरावस्था तर वाहतुकीची कोंडी झालीये.
धुळे शहरातील महापालिकेचे तीन तेरा वाजले आहेत, कुठलाही विकास नाही. केंद्र सरकारच्या माध्यमातून कुठलाही मोठा उपक्रम नाही. ग्रामीण भागात शिरपूर शहराने पटेलांच्या बळावर चांगला विकास साधला आहे. विमानतळ, शिक्षण संस्था, गोल्ड रिफायनरी तसच एव्हिएशन कोलेजही इथं आहे. मात्र हा विकास शिरपूरपुरताच मर्यादीत असून उर्वरित धुळे मतदारसंघ विकासापासून खूप लांब आहे.
मुंबई ते नाशिक चौपदरीकरणाचे काम मंजूर झाले तेव्हा हाच मार्ग थेट शिरपूरपर्यंत गेला. त्यामुळे वेगवान रस्ते आणि महामार्ग या शहराला मिळाले. मात्र या वेगवान रस्त्याने मुंबई नाशिकसारखा विकास झालेला नाही.शहरातील भकासपणा वर्षानुवर्षे जैसे थे आहे.
आजही धुळे रेल्वे स्टेशनमधून केवळ दोन गाड्या येतात. त्याही एका गाडीला धुळ्याची बोगी जोडून धुळेकरांची बोळवण केली जाते. धुळे मनमाड नरडाणा इंदूर मार्गासाठी दरवर्षी मुद्दे समोर येतात मात्र अद्याप कुठलेही काम सुरु नाही.
महामार्गावर असूनही धुळ्यात अद्याप मोठे उद्योग नाहीत. तापी पाटबंधारेचे मुख्य कार्यालय धुळ्यात आहे. मात्र त्याचा थेट फायदा धुळे शहराला मिळत नाही. शिंदखेड्याच्या डोळ्यासमोर पाणी आहे तरीही पाणी उपलब्ध होत नाही. विशेष म्हणजे उन्हाळ्यात शेवटी हे पाणी गुजरातला दिलं जातं, पण शिंदखेड्याचा शेतकरी तहानलेलाच राहतो. ही या भागाची शोकांतिका आहे.
धुळे व नाशिक जिल्ह्य़ांतील प्रत्येकी तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश असणा-या धुळे लोकसभा मतदारसंघात सध्या नरेंद्र मोदींचे वारे वाहू लागले आहेत.
पाहूयात इथली राजकीय सद्यस्थिती...
धुळे शहरामधून लोकसंग्राम पक्षाचे अनिल गोटे आमदार आहेत. तर धुळे ग्रामीणमध्ये सेनेचे प्राध्यापक शरद पाटील हे आमदार आहेत . शिंदखेड्यात भाजपाचे जयकुमार रावळ, मालेगाव मध्यमधून मालेगाव जन स्वराज्य पक्षाचे मौलाना मुफ्ती मोहम्मद तर मालेगाव बाह्य मधून सेनेचे दादा भुसे आणि बागलाण मधून भाजपाचे उमाजी बोरसे आमदार आहेत.
या मतदारसंघात धुळ्यातील काँग्रेसची सारी भिस्त ही मुस्लिम मतदारांवर आहे. गेल्या वेळी या मतदारसंघात जनता दलाचे निहाल अहमद यांनी 72 हजार मते घेऊन, भाजपच्या विजयाला हातभार लावला होता. मात्र आता नरेंद्र मोदी यांच्यामुळे मुस्लीम मतांचे ध्रुवीकरण झाल्यास मुस्लीम मतं काँग्रेसच्या पारड्यात पडणार आहेत.
भाजपमध्ये विद्यमान खासदार सोनावणे यांच्याबद्दल पक्षांतर्गत असंतोष आहे. याचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो. एकीकडे अनेक इच्छुकांमुळे कॉंग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष तर दुसरीकडे भाजपाकडे सक्षम उमेदवार दिसत नाही. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये कॉंग्रेस पक्षाने तर धुळे महापालिकेत राष्ट्रवादीने मुसंडी मारली.
भाजपाने योग्य आणि धडाडीचा उमेदवार दिल्यास मोदी लाटेत पुन्हा भाजपाची नाव किना-याला लागू शकते. शक्याशक्यतांच्या गर्तेत मतांचं धृवीकरण होऊन पुन्हा चमत्कार होऊ शकतो. एकंदरीत धुळे लोकसभेची जागा जिंकण्याची आघाडी आणि युतीला समसमान संधी आहे.
धुळे मतदारसंघातील उमेदवार1) भाजप - सुभाष भामरे
2) काँग्रेस - अमरिशभाई पटेल
3) जनता दल सेक्युलक - अन्सारी
व्हिडिओ –•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. •
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, April 4, 2014, 13:49