ऑडिट मतदारसंघाचं : हातकणंगले

ऑडिट मतदारसंघाचं : हातकणंगले

www.24taas.com, झी मीडिया, हातकणंगले

महाराष्ट्रातल्या राजकारणावर नेहमीच पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांची पकड राहिलेली आहे. या पश्चिम महाराष्ट्रातील राजकारण नेहमी बंडखोरीचं, संघर्षाचे आणि प्रस्थापितांच्या विरोधातील तर कधी नवनव्या प्रवाहांना स्वीकारणारे पाहिला मिळालय. अनेकवेळा तर महाराष्ट्राच्या राजकारणालाही टांग मारणारं राजकारणही इथं पाहायला मिळतं.

2009 च्या लोकसभा निवडणुकीमध्येसुद्धा हेच पहायला मिळालं. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी प्रतिष्ठेची केलेल्या हातकणंगले लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये स्वाभीमानी संघटनेचे नेते खासदार राजु शेट्टी यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धुळ चारत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला सर केला. आपण याच हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचं ऑडीट आज करणार आहोत.


जुलमी मुघल राजवटीची धुळदाण उडवुन स्वराज्य अन् सुराज्य प्रस्तापीत करणा-या छत्रपती शिवाजी महाराजांची पुन्य भुमी म्हणजे कोल्हापूर जिल्हा...शिवरायांनी स्थापिलेल्या सार्वभौम स्वराज्याच्या जनतेच्या रक्षणाची आन घेवुन लढलेल्या रणरागिणी छत्रपती ताराराणीही याच भूमीतील.

प्रजेचं कल्याण व्हावं प्रजा सुखी संतुष्ठ रहावी..जाती पातीच्या भिंती मोडून निधर्मी राज्यात सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविदांने रहावेत..वाड्या वस्त्यावर दीन दुबळे दलीत यांच्या झोपडीपर्यत शिक्षणाची गंगा पोहोचावी यासाठी क्रांतिकारी निर्णय घेणा-या रजतेचा राजा राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांची ही भूमी.

कोल्हापूरी चप्पल, कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा, कोल्हापूरी साज ठुशी, कोल्हापूरी गुळ अशा अनेक कारणांने कोल्हापूर जिल्ह्याचं नावं देशाच्या नकाशात ढळक अक्षरांनी कोरलेलं पहायला मिळंत.अशा या कोल्हापूर जिल्हयात कोल्हापूर आणि हातकणंगले अशा दोन लोकसभा मतदार संघाचा समावेश होतो. यापैकी हातकणंगले लोकसभा मतदारसंघ डोंगर कापा-यात आणि दुर्गम भागात विस्तारलेला आहे.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात असणारी इचलकरंजी, पेठवडगांव, शिरोळ, शाहुवाडी, पन्हाळा, सांगली जिल्ह्यातील इस्लामपुर, शिराळा या छोट्या शहरांचा विकास होवुन ती विस्तारतायत. हा मतदार संघ कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले, इचलकरंजी, शाहुवाडी तर सांगली जिल्ह्यातील शिराळा आणि इस्लामपुर विधानसभा मतदारसंघानी मिळून बनलाय.

2009 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघात एकुण 14 लाख 70 हजार 680 मतदारांचा समावेश होता. त्यामध्ये पुरुष मतदार 7 लाख 48 हजार 492 इतके होते, तर स्री मतदार 7 लाख 22 हजार 188 इतके होते.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात जातीय समिकरण पाहिल्यास..जैन, लिंगायत आणि मराठा समाजाची समाजाची संख्या पहायला मिळते.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा तसा कॉग्रेसचा गड...सुरवातीपासुन या लोकसभा मतदार संघावर कॉग्रेसची पकड होती. या मतदारसंघात सर्वाधिक वेळा निवडुन येण्याची संधी कॉग्रेसच्या खासदाराला मिळाली. त्यानंतर हा कॉग्रेसचा हा गड राष्ट्रवादी पक्षानं 1999 आणि 2004 च्या निवडणुकीत सर केला.

पण त्यानंतर मात्र 2009 च्या निवडणुकीत स्वाभीमानी संघटनेचे नेते खासदार राजु शेट्टी यांनी तब्बल 96 हजारांहुन अधिक मतांनी विजय मिळवत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला काबीज केला.

1962 कृष्णाजी लक्ष्मण मोरे यांनी कॉग्रेस पक्षाकडुन निवडणुक लढवुन विजयी झाले. 1967 च्या निवडणुकीमध्ये कॉग्रेसच्या उमेदवाराला हरवत कोल्हापूरच्या महाराणी विजयमाला छत्रपती यांनी विजय मिळवीला. त्यानंतर कॉग्रेसच्या दत्तात्रय कदम यांनी 1971 च्या निवडणुकीमध्ये विजय संपादान करुन कॉग्रेस पक्षाचा दबदबा ठेवला.

त्यानंतर 1977 ते 1991 सलग पाच वेळा निवडणुक जिंकत कॉग्रेसचे खासदार बाळासाहेब माने यांनी हॉट्रीक केली. त्यानंतर 1996 ला कॉग्रेस पक्षानं खासदार कलाप्पाआण्णा आवाडे यांना तिकीट दिलं. त्यानंतर कल्लापाण्णा आवाडे यांनी 1996 आणि 1998 ची लोकसभा निवडणुक जिंकली.

1999 मध्ये राष्ट्रवादी पक्षानं आपला सवता सुभा मांडल्यानंतर या मतदासंघात राष्ट्रवादीच्या निवेदिता माने यांनी विजय मिळवीला. त्यानंतर 2004 ची लोकसभा निवडणुकही निवेदीता माने यांनीच जिंकली.

पण त्यानंतर 2009 ची निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवार निवेदीता माने यांच्या समोर स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजु शेट्टी यांनी कडवं आव्हाण निर्माण करत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला सर करुन राष्ट्रवादीचा झेंडा खाली उतरवला.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघाचं बलाबल पहाता.. कॉग्रेसचा एक, भाजपचा एक, सेनेचा एक, जनसुराज्य पक्षाचा एक, राष्ट्रवादी पक्षाचा एक आणि राष्ट्रावीद पक्ष पुरस्कृत आमदार एक अशी समिश्र परिस्थीती पहायला मिळते. या सगळ्या मतदारसंघात कॉग्रेसच्या जागा पुर्वीच्या तुलनेनं कमी झालेल्या पहायला मिळतात.

शिरोळमधून कॉग्रेसचे आमदार सा.रे.पाटील, इचलकरंजीमुधुन भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर, हातकणंगलेमधुन सेनेचे आमदार सुजित मिनचेकर, शाहुवाडी मधुन जनसुराज्य पक्षाचे नेते आमदार विनय कोरे, इस्लामपुरमधुन राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील आणि शिराळामधुन आपक्ष आणि राष्ट्रवादी पक्ष पुरस्कृत मानसिंग नाईक हे आमदार आहेत.

सध्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये कॉग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीची ताकद चांगली असल्याचं दिसतय. एवढच नव्हे तर स्थानीक स्वराज्य संस्थेतही कॉग्रेस आणि राष्ट्रवादीचं पारडं जड असल्याचं पाहायला मिळतय.

राजू शेट्टींची ओळख

खासदार राजु उर्फ देवाप्पा आण्णा शेट्टी
जन्म – 1 जुन 1968
वय – 46
शिक्षण – डिप्लोमा इन मेकॉनिकल इंजिनेअरिग

खासदार राजु शेट्टी हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच प्रतिनीधित्व करतायत. पहिल्यादाच लोकसभेवर निवडणु गेलेत.

17 फेब्रुवारी 2002 मध्ये पहिल्यांदा त्यांनी कोल्हापूर जिल्हापरिषद निवडणुकीसाठी उदगांव मधुन त्यांनी शेतकरी संघटनेच्यावतीनं निवडणुक लढविली. त्यामध्ये ते प्रचंड मतांनी विजयी झाले. त्यानंतर शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेनं भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यामुळं त्यांनी स्वाभीमानी शेतकरी संघटनेची स्थापना केली. त्यानंतर लगेच 2004 मध्ये त्यांनी लोकवर्गणीतून शिरोळ विधानसभा मतदारसंघातुन निवडणूक लढवून 19 हजार 500 मतांनी विजय मिळविला.

विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांनी 2009 मध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या निवेदीता माने यांचा दारुण पराभव करत 95 हजार 60 मतांनी विजय मिळवीला.

शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेच्या मुशीत घडलेले खासदार राजु शेट्टी हे 1992 पासुन शेतकरी संघटनेत आणि समाजकारणात सक्रिय आहेत. 1993 ला शिरोळ शेतकरी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड.. त्यानंतर 2002 मध्ये कोल्हापूर जिल्हा परिषद सदस्य म्हणुन काम पाहिलं. 2002 उसाला पहिला ऑडव्हान्स 800 रुपये मिळावा म्हणून आंदोलन सुरु केलं. त्यावेळी साखर कारखान्यांच्या गुंडानी त्यांच्यावर हल्ला केल्यानंतर ते गंभीर जखमी झाले. त्यावेळी 48 तास मृत्युशी झुंज द्यावी लागली. त्यानंतर 750 रुपयांवर पिहला अडव्हान्स मान्य करुन आंदोलनाची सांगता केली. एक नोट एक व्होट हा फार्मुला वापरत त्यांनी लोकवर्गनीतुन 2004 ची विधानसभा आणि 2009 ची लोकसभा निवडणुक जिंकली.

खासदार राजु शेट्टी यांनी 1988 पासुन समाजकारणात रस घेवु काम केलं. लोकांशी नाळ जोडत त्यांनी जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि खासदारकीची निवडणुक लढवुन यश संपादन केलं. यापुढही शेतक-यांचे आणि जनतेचे प्रश्न सोडवीण्यासाठी ते लोकसभेची निवडणुक लढविणार असल्याचं जाहीर केलंय.

शिरोळ मधील शेट्टी मळा इथं जुन्याच घरात खासदार राजु शेट्टी हे आपली आई, पत्नी आणि मुलांबरोबर राहातात. शेतीची आवड असल्यानं आजही ते शेतीची छोटी मोठी काम करताना दिसतात. त्याना वाचन, लेखन, राजकारण, सामाजकारणाची आवड आहे. लेखनाच्या छंदातुनच त्यांनी आपला राजकीय प्रवास उलगडणारा शिवार ते संसद हे पुस्तक लिहीले आहे.

खासदार राजु शेट्टी यांनी पाच वर्षातील खासदार निधीपैकी 20 कोटी 27 लाख कोटी रुपयांचा विवीध विकासकामावर खर्च केलाय.

खासदार राजु शेट्टी यांनी हातकणंगले लोकलभा मतदासंघातून स्वाभिमानी पक्षाकडून निवडणुक लढविणार असल्याचं आधीच जाहीर केलंय. त्यांनी मुद्याच्या आधारावर महायुती प्रवेश केल्यानं त्यांना त्याचा चांगला फायदा होईल असं वाटतय. शेतकरी, कष्टकरी,गोरगरीब जनता आणि सामान्य नागरीकांसाठी केलेल्या कामाचा नक्कीच फायदा 2014 च्या लोकसभा निवडणूक होईल असा त्यांना विश्वास आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजु शेट्टी यांना हातकणंले लोकसभा मतदारसंघाच नेतृत्व करण्याची संधी मिळाली. पण त्या संधीचं सोनं करण्यात त्यांना यश आलं नाही, असं विरोधकांबरोबर अनेकांना वाटतय. उस उत्पादक शेतक-याचे प्रश्न सोडविण्यात त्यांना यश आलं असलं तरी मतदारसंघात म्हणावी तशी विकासकामे केली नाहीत असं मतदारांना वाटतय. त्यामुळं खासदार राजु शेट्टी यांच्याबद्दल मतदारसंघात समिश्र प्रतिक्रिया पहायला मिळतात.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील विवीध प्रश्नांचा ढांढोळा घेतला तर अनेक प्रश्न प्रलंबीत असल्याचं दिसुन येतात. गेल्या अनेक वर्षापासुन कोल्हापूर रेल्वे कोकण रेल्वेला जोडावं अशी मागणी केली जाते..पण ही मागणी आता हवेत विरण्याची वेळ आली आहे. हातकणंगले लोकसभा मतदार संघात मिनी मॅचेस्टर म्हणुन ओळख असणा-या इचलकरंजी शहरात यंत्रमागासंदर्भात अनेक प्रश्न प्रलंबीत आहेत.पण त्याकडं गेल्या पाच वर्षात खासदार राजु शेट्टी यांनी म्हणावं तसं लक्ष दिलं नाही असं मतदारांना वाटतय. कोल्हापूर जिल्ह्यात लोकसंख्येच्या मानाने बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देणारा एकही केंद्राचा मोठा उद्योग नाही. त्यामुळं हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील अनेक बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधीही उपलब्ध नाही.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघील शिराळा आणि शाहुवाडी हे विधानसभा मतदारसंघ डोंगराळ भागात विस्तारलेला आहे. तिथेही विकासकामे झाली नाहीत अशी मतदारांची ओरड आहे.

खासदार राजु शेट्टी यांचा बराच वेळ हा उस आंदोलनाच्या चऴवळीसाठी खर्च झाला. त्यामुळं त्यांना मतदारसंघातले अनेक प्रश्न सोडविता आले नाहीत.

खासदार राजु शेट्टी यांनी अनेक प्रश्नासाठी पाठपुरावा केला. पण त्यातील अनेक कामं न झालेली दिसुन येतात...पण ते निश्क्रिय खासदार आहेत असंही म्हणाता येणार नाही असं या मतदारसंघातील अनेकांना वाटतय. आपल्याला खासदार कसा आसतो हे कधिच पहायला मिळत नव्हते..पण राजु शेट्टी यांच्या दांडग्या जनसंपर्कामुळे ते शक्य झालं आहे. त्यांनी अनेक विकास कामे केलेली आहेत असं अनेक मतदारांना वाटतंय.

दरम्यान खासदार राजु शेट्टी यांनी आपण मतदारासंघाला न्याय देण्यात यशस्वी झालो असल्याचा दावा केलाय. आपण पाच वर्षाच्या काळात उस उत्पादक शेतक-यांबरोबर अन्य घटकांनाही न्याय देवुन मतदारसंघाचा विकास केलेला आहे असा दावा केलाय.

चळवळीची मोठी ताकद असतानाही त्या ताकदीचा पुरेपुर वापर केला नाही म्हणुन हातकणंगले लोकसभा मतदार संघातील अनेक कामं अपुर्ण राहिली आहेत..खासदारांनी आपली पुर्ण इच्छाशक्ती विकास करण्याच्या दृष्ठीनं लावली असती तर या मतदारसंघाचा कायापालट झाला असता असं मतदारसंघातील मतदारांना वाटतंय.

पास – नापास मुद्दे

पास

1) उस उत्पादक शेतक-यांना न्याय...
2) साखर कारखाना आणि सहकारी संस्थेतील भ्रष्टाचार बाहेर काढला.
3) शेतक-याचं राहाणीमान बदलण्यात राजु शेट्टी याचा मोठा हात
4) मतदारसंघातील किल्ले सवर्धनासाठी निधी दिला.
5) वाड्या वस्त्यांवर रस्ते आणि पाण्याच्या सोयी पोहचविण्याचा प्रयत्न..

नापास मद्दे

1) कोल्हापूर – कोकण रेल्वे प्रश्न प्रलंबीत
2) मतदारसंघात एकही केंद्राचा मोठा उद्योग आणता आला नाही
3) मिनी मॅचेंस्टर म्हणुन ओळखल्या जाणा-या इचलकरंजी शहर आणि परिसरात यंत्रमागधारक आणि कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबीत.
4) उस उत्पादक शेतकरी वगळता इतर वर्गाकडं दुर्लक्ष
5) पंचगंगा प्रदुषण रोखण्यात यश नाही...

मतदारसंघातील सध्याची राजकीय स्थिती

हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणुन ओळखला जायचा..पण 2009 निवडणुकीमध्ये खासदार राजु शेट्टी यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव करत या मतदारसंघातुन विजय मिळविला.

2014 ची लोकसभा निवडणूक राजु शेट्टी हे लढविणार हे आधिच त्यांनी स्पष्ट केलय. पण विरोधी पक्षाकडून कोण निवडणुक लढविणार याबाबत गेल्या वर्षभरापासून खुप चर्चा झाली. अखेर राष्ट्रवादी पक्षानं हा बालेकिल्ला कॉग्रेला सोडण्याचं ठरवल. त्यामुळं काँग्रेसकडून जेष्ठ नेते माजी खासदार कल्लाप्पाआण्णा आवाडे हे निवडणूक रिंगणात उतरतील अशी शक्यता निर्माण झालीय, असं जर झालं तर स्वाभीमानी विरुद्ध कॉग्रेस पक्ष अशी थेट लढत इथे पहायला मिळणार.

पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. पण 2009 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाला पश्चीम महाराष्ट्रात म्हणावं तसं यश मिळालं नाही, हक्काचा कोल्हापूर आणि हाकणंगले मतदारसंघही त्यांना टिकवता आला नाही, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात खासदार राजु शेट्टी यांनी राष्ट्रवादी पक्षासमोर मोठं आव्हान निर्माण केल्यामुळं राष्ट्रवादी पक्षानं एक पाउल मागे घेत काँग्रेसला हा मतदारसंघ देण्याचं ठरवलंय.

तर दुसरकीडं एकूण राजकीय परिस्थिती पाहिल्यानंतर राजु शेट्टी यांनी महायुतीत दाखल होवून आपली मतदारसंघातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील ताकद आणखी मतबूत केलीय. निवडणुकीत उमेदवार कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला आपण कमी लेखणार नाही असं खासदार राजु शेट्टी यांनी म्हटलंय.

राष्ट्रवादीचे नेते ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातुन निवडणुक लढविण्यासाठी स्वता इच्छुक नसल्याच आधिच स्पष्ट केलय. त्यामुळं हा मतदारसंघ कॉग्रेसला सोडुन त्या ठिकाणी काँग्रेसचे जेष्ठ नेते कल्लाप्पाआण्णा आवाडे हे निवडणूक रिंगणात असतील असं स्वत: अनेक कार्यक्रमात सांगितलंय...पश्चिम महाराष्ट्रात जाती पातीचं राजकारण पाहायला मिळत नाही. पण हातकणंगले मतदारसंघ मात्र त्याला आपवाद आहे.

कॉग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागा वाटपात हातकणंगले मतदारसंघ हा कोणाला जाणार हे अजुन जाहीर केलेलं नाही. पण हा मतदारसंघ कॉग्रेसच्या वाट्यालाच येणार हे जवळ जवळ निश्चीत झालय.. त्यामुळं कॉग्रेसचे सभाव्य उमेदवार माजी खासदार कलाप्पाआण्णा आवाडे हे जोमानं कामाला लागले आहेत.

स्वाभीमानी संघटनेचे नेते खासदार राजु शेट्टी यांच्यासमोर कडवं आव्हान निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादी पक्षानं आपला बालेकिल्ला असणारा हातकणंगले मतदारसंघ कॉग्रेसला सोडण्याची तयारी दाखवली आहे. यावरुच राजु शेट्टी यांचा वचपा काढण्यासाठी आपण वाट्टेल, ती किमंत मोजायला तयार असल्याचं राष्ट्रवादी पक्षान दाखवून दिलंय.

सध्या या मतदार संघात राजु शेट्टी यांच्या विरोधात कोण हे चित्र स्पष्ट नसलं तरी कॉग्रेसचे जेष्ठ नेते माजी खासदार कलाप्पाआण्णा आवाडे हेच निवडणुक रिंगणात असतील अशी शक्यता आहे. असं जर झालं तर इथली निवडणुक आधिक रंगतदार होईल यात काही शंका नाही.

हातकणंगले मतदारसंघातील उमेदवार

आप - रघुनाथ पाटील
स्वाभिमानी शेतकरी संघटना - राजू शेट्टी
काँग्रेस - कल्लाप्पा आवडे




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, April 4, 2014, 16:02
First Published: Friday, April 4, 2014, 16:02
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?