ऑडिट मतदारसंघाचं : कल्याण

ऑडिट मतदारसंघाचं : कल्याण

www.24taas.com, झी मीडिया, कल्याण

गेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबई आणि ठाण्यात शिवसेनेला केवळ एकाच मतदारसंघानं साथ दिली होती. शिवेसेनेला साथ देणा-या या मतदारसंघातील खासदाराने नंतर शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. महाराष्ट्राचं सांस्कृतिक उपकेंद्र असलेल्या या लोकसभा मतदारसंघाचा आज आपण आढावा घेणार आहोत.

ज्या गावात प्रत्येकाचा एक तरी नातेवाईक असतो, ते गाव म्हणजे डोंबिवली, अशा शब्दांत साहित्यिक शं. ना. नवरे यांनी डोंबिवलीची ओळख करून दिली होती. राज्याचं सांस्कृतिक उपकेंद्र म्हणूनही या शहराची ओळख आहे. मराठी माणसाचं दाटीवाटीनं वसलेलं उपनगर म्हणजे डोंबिवली-कल्याण. याच कल्याण लोकसभा मतदारसंघात अंबरनाथचा भाग जोडला गेलाय.

अंबरनाथ म्हटलं की आठवण येते ती तिथल्या पुरातन शिवमंदिराची.. शिलाहार राजांनी अकराव्या शतकात बांधलेले हे हेमाडपंथीय शैलीचं मंदिर म्हणजे वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे, आणि याच मतदारसंघात भारतीय बाजारपेठेत प्रसिद्ध असलेल्या वस्तू मिळण्याच ठिकाण मेड इन यूएसए अर्थात उल्हासनगरसुद्धा आहे.

कळवा-मुंब्रा-दिवा असा ठाणे महानगरपालिकेचा भाग, कल्याण -डोंबिवली महानगरपालिका, अंबरनाथ नगरपरषिद तसंच कल्याण ग्रामीण हा ठाणे जिल्हा परिषदेच्या हद्दीत येणारा भाग अशी मिसळ सरमिसळ होऊन कल्याण लोकसभा मतदारसंघ बनलाय. शहरी, ग्रामिण तर काही भागांत झोपडपट्टी असं इथलं संमिश्र चित्र आहे.

बहुसंख्य मध्यमवर्गीय, पांढरपेशा समाज हे या भागाचं वैशिष्ट्य. शिवसेनेचा गड असलेल्या कल्याण-डोंबिवलीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मानणारा मतदारही मोठ्या प्रमाणात आहे.
 
कल्याण लोकसभा मतदार संघात 2009 नुसार 15 लाख 88 हजार 507 मतदार होते. यापैकी  8 लाख 57हजार 32 पुरुष मतदार आहेत. तर  7 लाख 31 हजार 475 महिला मतदार आहेत.

पुनर्रचनेआधी ठाणे लोकसभा मतदार संघाचा भाग असलेल्या या कल्याण लोकसभा मतदारसंघात १९७७ पासून सेना-भाजपाचे वर्चस्व कायम राहिलंय. आधी जनसंघ नंतर भाजपाकडे असलेल्या या मतदारसंघातून १९७७ आणि १९८० ला रामभाऊ म्हाळगी, १९८१ च्या पोटनिवडणुकीत जगन्नाथ पाटील  आणि १९८९ आणि १९९१ ला राम कापसे यांनी भाजपचा झेंडा फडकावला.

१९८४ ला काँग्रेसचे शांताराम घोलप यांचा अपवाद वगळता या भागातील मतदारांनी हिंदूत्ववादी पक्षांवर विश्वास टाकला. त्यानंतर मात्र हा मतदारसंघ शिवसेनेने आपल्याकडे खेचून आणला आणि १९९६, १९९८, १९९९, २००४ असा सलग चार वेळा शिवसेनेचे प्रकाश परांजपे विजयी झाले.

२००९ च्या मतदार पुर्नरचनेत हा भाग ठाणे लोकसभा मतदार संघातून वगळण्यात आला आणि कल्याण लोकसभा मतदारसंघ या नावाने नवा मतदारसंघ बनला. २००९ ला प्रकाश परांजपे यांचे पुत्र आनंद परांजपे कल्याणमधून शिवसेनेच्या तिकिटावर विजयी झाले. मात्र सध्या तांत्रिदृष्ट्या  शिवसेनेत असलेले सध्या आनंद परांजपे मनाने राष्ट्रवादीबरोबर आहेत.
 
विधानसभेतील सध्याचं संख्याबळ लक्षात घेतलं तर मुंब्रा-कौसा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड, डोंबिवलीमधून भाजपाचे रविंद्र चव्हाण, कल्याण ग्रामीणमधून मनसेचे रमेश पाटील, कल्याण पूर्वमधून राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत गणपत गायकवाड, उल्हासनगरमध्ये भाजपचे कुमार आयलानी तर अंबरनाथमधून शिवसेनेचे डॉ. बालाजी किणीकर निवडून आले आहेत.

परांजपेंच्या निमित्तानं राष्ट्रवादीने शिवसेनेला दिलेला शॉक, मनसेचा प्रभाव आणि मनोहर जोशींचा कल्याणमध्ये पत्ता कट झाल्यानं आता शिवसेना नक्की कोणता चेहरा देणार यावरच शिवसेनेचा जय पराजय निश्चित होणार.
 
शिवसेनेचे सदस्य असुनही मनाने राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर असलेले कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार आनंद परांजपे ह्य़ांची ओळख

खासदार आनंद परांजपे यांची ओळख

खासदार - आनंद प्रकाश परांजपे
 जन्म - 16 मे 1973
 वय -  40
 शिक्षण - बी.ई ,एमबीए

वडिल प्रकाश परांजपे यांची पुण्याई हेच खासदार आनंद परांजपेंचं संचित. प्रकाश परांजपे सलग चार वेळा शिवसेना खासदार म्हणून निवडून आले. आनंद परांजपे त्यांचे पुत्र. प्रकाश परांजपेंच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात फारसे परिचित नसतानाही, केवळ प्रकाश परांजपेंचे पुत्र म्हणून शिवसेनेने आनंद परांजपेंना खासदारकीचं तिकीट दिलं.

आधी ठाण्यातून आणि नंतर कल्याणमधून ते खासदार म्हणून निवडून आले. अधुनमधून ते शिवसेनेच्या व्यासपीठावर दिसायचे.

पण पक्षात कुठलीही मोठी जबाबदारी त्यांच्याकडे नव्हती. आमदार एकनाथ शिंदे यांना दंडवत घालणे यां व्यतिरिक्त त्यांनी कोणते काम केले हा प्रश्नच आहे. त्यामुळं शिवसेनेशी त्यांची कधी नाळ जुळलीच नाही... तर शिवसेनेला जय महाराष्ट्र करून त्यांनी राष्ट्रवादीची वाट धरली. तांत्रिकदृष्ट्या ते शिवसेनेत असले तरी मनाने आणि देहाने ते कधीचेच राष्ट्रवादीचे झालेत.

कल्याणमध्ये 2009 च्या निवडणुकीत आनंद परांजपेंनी  २ लाख १२ हजार ४७६ मते घेऊन राष्ट्रवादीचे तगडे उमेदवार वसंत डावखरे यांचा पराभव केला होता.  मनेसेनं या मतदारसंघात लाखभर मतं घेतली होती.

खासदार आनंद परांजपेंना चित्रपट आणि नाटकं बघण्याची आवड आहे. मात्र खवय्ये म्हणून ते स्वतःची वेगळी ओळख आवर्जुन सांगतात. नवनवीन पदार्थांचा फडशा पाडणे त्यांना आवडते. क्रिकेट आणि फुटबॉल त्यांचे आवडते खेळ.

समर्थ संस्थेच्या माध्यमातून खासदार परांजपेंचं सामाजिक कार्य सुरु आहे. मात्र आता शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर राष्ट्रवादीचा हात धरून या मतदारसंघात पुन्हा निवडून येणे त्यांच्यासाठी मोठं आव्हान असणार आहे.

कल्याण लोकसभा मतदार संघातील प्रमुख

कल्याण लोकसभा मतदारसंघातील लाखो प्रवासी दररोज लोकलनं प्रवास करतात. रेल्वेला कोट्यवधींचं उत्पन्न देणा-या या मतदारसंघातील प्रवाशांना मात्र रेल्वे प्रशासनाकडून कायमच सापत्न वागणूक मिळतेय.

लाखो प्रवाशांचे दररोज हाल होत असताना खासदार आनंद परांजपे मात्र आपल्या कामांचा पाढा वाचतायत.

अत्यंत वेगाने होणारे नागरीकरण, वेगाने वाढणारी लोकसंख्या आणि त्यामुळे होत असलेली अवैध बांधकामे ही कल्याणमधील डोकेदुखी बनलीय. विशेष करुन मुंब्रा, उल्हासनगर, डोंबिवली, दिवामध्ये ७० टक्क्यांपेक्षा जास्त बांधकामे बेकायदा असल्याचं धक्कादायक वास्तव आहे. यामुळे या मतदार संघातील सोयीसुविधांवर प्रचंड ताण पडत आहे.

वेगाने होत असलेल्या नागरीकरणामुळे वाहनांच्या संख्येत बेसुमार वाढ होत आहे. त्यामुळे प्रदुषणाची समस्या वाढलीय. प्रदुषणाच्या बाबतीत डोंबिवली एमआयडीसीचा भाग राज्यात दुस-या क्रमांकावर आहे. ही सर्वात चिंतेची बाब आहे.

कल्याण मतदारसंघ नागरी समस्यांच्या विळख्यात अडकलाय. रस्त्याने एकमेकांपासून दूर केलेल्या, पण रेल्वेने जोडलेल्या या मतदारसंघातल्या समस्या कधी सुटणार, हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो.

कोलमडलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, सुमार दर्जाची सार्वजनिक रुग्णालये, हवेत विरलेली मेट्रो-मोनो रेल्वेची आश्वासने अशा अनेक समस्या कल्याण-डोंबिवलीकरांच्या पाचवीलाच पुजल्यात. विकासाच्या मुद्यावरून राष्ट्रवादीचा आधार घेणा-या परांजपेंना निवडणुकीपूर्वी या प्रश्नांची उत्तरं मतदारांना द्यावीच लागणार आहेत.

एकमेकांना पाण्यात पहाणा-या शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील संघर्ष कल्याण लोकसभा मतदारसंघात टोकाला जाणार आहे. इथलं सध्याचं राजकीय बलाबल आणि भविष्यातली समीकरणं काय असतील, ते पाहूया.

शिवसेनेचे कल्याणचे खासदार आनंद परांजपे यांना चक्क हायजॅक करत राष्ट्रवादीने शिवसेनेला मुळापासून हादरवलं. शरद पवार यांच्या या खेळीने शिवसेनेतील भलेभले चाणक्यही चकीत झाले. आपल्या पॉवरफुल खेळीनं पवारांनी सेनेच्या या अभेद्य गडाला सुरुंग लावलाय

राष्ट्रवादीकडून खासदारकीचं तिकिट आनंद परांजपेंनाच मिळणार हे निश्चित मानलं जातंय.. मात्र त्यांच्यांकरता ही निवडणूक फारच कठीण असणार.... या मतदारसंघातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युतीचा दबदबा आहे. राष्ट्रवादीनं दिलेल्या धक्क्यानं डिवचली गेलेली शिवसेना आता कल्याणमध्ये टिच्चून प्रचार करणार, एवढं नक्की. शिवाय गेल्या निवडणुकीत लाखभर मतं घेणा-या मनसेचा प्रभावही चार वर्षात कमी झालाय.

कल्याणमध्ये उमेदवार कोण आहे, यापेक्षा कोणत्या पक्षाचा आहे, हे पाहून मतदान केलं जातं. राष्ट्रवादीचा उमेदवार ठरलाय, पण शिवसेनेचा उमेदवार कोण असेल ते अद्याप गुलदस्त्यातच आहे.

शिवसेनेकडे तगडा उमेदवार नाही ही वस्तूस्थिती आहे. मध्यंतरी मनोहर जोशी हे नाव होते मात्र ते आता मागे पडले आहे.

इथं मत पक्ष आणि उमेदवारच्या चांगल्या प्रतिमेला मिळतात....सध्या राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्याकडे त्याचीच तर कमतरता आहे. पण उमेदवार कुणीही असला तरी पक्षाची ध्येधोरणे आणि मुद्दे यावरच उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार

1) राष्ट्रवादी - आनंद प्रकाश परांजपे
2) शिवसेना - श्रीकांत एकनाथ शिंद
3) मनसे - राजू पाटील
4) आप - नरेश ठाकूर

 व्हिडिओ –




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, April 4, 2014, 16:10
First Published: Friday, April 4, 2014, 16:10
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?