www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी दिलेल्या उमेदवारालाच इथल्या मतदारांनी चीतपट केलं... नेहमीच संघर्षाचं, प्रस्थापितांच्या विरोधाचं आणि त्याचवेळी नवनव्या प्रवाहांना स्वीकारणारं राजकारण करणा-या पश्चिम महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या कोल्हापूर मतदारसंघाचं ऑडिट आपण करणार आहोत.
दक्षिण काशी... करवीर निवासिनी महालक्ष्मीच्या वास्तव्यानं पावन झालेली भूमी म्हणजे कोल्हापूर नगरी... जुलमी मुघल राजवटीची धुळदाण उडवुन स्वराज्य अन् सुराज्य प्रस्थापित करणा-या छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यभुमी... शिवरायांनी स्थापिलेल्या सार्वभौम स्वराज्याच्या रक्षणाची आन घेवुन लढलेल्या रणरागिणी छत्रपती ताराराणीही याच भुमीतील.. प्रजेचं कल्याण व्हावं प्रजा सुखी संतुष्ट रहावी, जाती पातीच्या भिंती मोडुन निधर्मी राज्यात सर्व जातीधर्माचे लोक गुण्या गोविदांने रहावेत, वाड्या वस्त्यावर दीन दुबळे दलित यांच्या झोपडीपर्यत शिक्षणाची गंगा पोहोचावी यासाठी क्रांतिकारी निर्णय घेणा-या रजतेचा राजा राजर्षी छत्रपती शाहु महाराजांची ही भुमी.. ऐतीहासीक,सांस्कृतीक वारसा लाभलेल्या या कोल्हापूर नगरीला मराठी चित्रपटाचं माहेरघर म्हणुनही ओळखलं जातं.. कुस्तीची पंढरी म्हणुनही या करवीर नगरीची ओळख....कोल्हापूरी चप्पल, कोल्हापूरचा तांबडा पाढरा रस्सा, कोल्हापूरी साज ठुशी, कोल्हापूरी गुळ अशा अनेक कारणांने कोल्हापूर जिल्ह्याचं नावं देशाच्या नकाशात ठळक अक्षरांत कोरलेलं पहायला मिळतं.
कोल्हापूरच्या सभोवती असणा-या उपनगरांबरोबर छोटीमोठी गावं आणि शहरही झपाट्यानं विस्तारतायत. कोल्हापूर जिल्ह्यात दोन लोकसभा मतदारसंघाचा समावेश होतो.
2009 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघात एकुण 15 लाख 75 हजार 932 मतदारांचा समावेश होता. त्यामध्ये पुरुष मतदार 7 लाख 96 हजार869 इतके होते, तर स्री मतदार 7 लाख 79 हजार63 इतके होते.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा तसा काँग्रेसचा गड...सुरवातीच्या काळात या लोकसभा मतदारसंघावर स्वतंत्र काँग्रेसचा, त्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचा आणि पुन्हा काँग्रेस पक्षाचा प्रभाव होता. काँग्रेसचा हा गड राष्ट्रवादी पक्षानं 1999 च्या निवडणुकीत सर केला. पण दहा वर्षानंतर 2009 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला आपला बालेकिल्ला गमवावा लागला. त्या ठिकाणी अपक्ष म्हणून राष्ट्रवादीचे तत्कालिन बंडखोर उमेदवार सदाशिवराव मंडलिक खासदारपदी निवडून आले.
1957 मध्ये भाउसाहेब महागावकर शेतकरी कामगार पक्षाकडून निवडून आले. 1962च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या व्ही. टी. पाटील यांनी विजय मिळवला. त्यानंतर काँग्रेसच्याच शंकरराव माने यांनी 1967 च्या निवडणुकीमध्ये विजय संपादन करुन काँग्रेस पक्षाचा दबदबा कायम ठेवला. 1971 काँग्रेसच्या तिकिटावर राजाराम निंबाळकर विजयी झाले. पण त्यानंतरची 1977 च्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या दाजीबा देसाई यांनी काँग्रेसच्या ताब्यातुन हा मतदारसंघ काढुन घेतला. त्यानंतर 1980 ते 1996 दरम्यान सलग पाच वेळा झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उदयसिंगराव गायकवाड यांनी आपला दबदबा ठेवुन या मतदारसंघाचं नेतृत्व केलं...1998 च्या निवडणुकीत काँग्रेसकडुन खासदार सदाशिवराव मंडलीक पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले. 1999 ला त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासोबत काँग्रेसशी काडीमोड घेतला आणि राष्ट्रवादीच्या चिन्हावर 1999 आणि 2004 मध्ये ते निवडुन आले. त्यानंतरच ख-या अर्थाने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणुन ओळखला जाऊ लागला..... पण शरद पवार यांच्याशीही त्यांचे फाटले. 2009 ची निवडणुक त्यांनी अपक्ष म्हणून नुसती लढवली नाही, तर ती जिंकून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला सर केला.
कोल्हापूर मतदारसंघातील विधानसभा क्षेत्राचं संख्याबळ पाहिल्यास राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे.
कागलमधुन कामगारमंत्री हसन मुश्रीफ, राधानगरीमधुन के. पी. पाटील आणि चंदगडमधुन संध्यादेवी कुपेकर हे राष्ट्रवादीचे तीन आमदार निवडुन आलेत. कोल्हापूर उत्तरमधुन राजेश क्षीरसागर, करवीर विधानसभा मतदारसंघातुन चंद्रदिप नरके हे शिवसेनेचे दोन आमदार आहेत तर कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातुन सतेज पाटील हे काँग्रेसचे एकमेव आमदार आहेत.
विधानसभेचं संख्याबळ पाहिल्यास कोल्हापुरात राष्ट्रवादीची ताकद आहे. पण स्थानिक स्वराज्य संस्थेत काँग्रेसचं पारडं जड असल्याचं पाहायला मिळतं. अपक्ष खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानं काँग्रेसची ताकद आणखी वाढलंय, एवढं नक्की....
खासदारांची ओळखराष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार पंतप्रधान होणार अशी हवा असतानाच आपल्या जुन्या सहका-याला पवारांनी हिणवल मात्र जनता त्याच्या पाठीशी उभी राहिली आणि राष्ट्रवादीला झटका देत त्यांनी अपक्ष उमेदवाराला निवडून दिल कोण आहे हा खासदार त्यांची ओळख करून घेवूयात....
खासदार सदाशिवराव दादोबा मंडलिक
जन्म – 20 मे 1934
वय – 79
शिक्षण – बी.ए
खासदार सदाशिवराव मंडलीक हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच प्रतिनीधित्व करतायत. ते सलग चार वेळा लोकसभेवर निवडून आलेत. ते देखील वेगवेगळ्या पक्षांच्या तिकिटावर...
1998 मध्ये पहिल्यांदा त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर शिवसेनेचे उमेदवार विक्रमसिंह जयसिंगराव घाटगे यांचा पराभव करत लोकसभेत प्रवेश केला. त्यानंतर 1999 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या उदयसिंहराव गायकवाड यांना 1 लाख 8 हजार 910 मतांनी हरवलं, त्यावेळी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. 2004 च्या अटीतटीच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार धनंयज महाडीक यांना 14 हजार 775 मतांनी हरवुन त्यांनी निसटता विजय मिळवला. शरद पवारांशी बिनसल्यानंतर 2009 ची निवडणूक त्यांनी अपक्ष म्हणून लढवली. राष्ट्रवादीचे उमेदवार छत्रपती संभाजीराजे यांना पाणी पाजत 44 हजार 220 मतांनी विजय मिळवून मंडलिकांनी शरद पवारांना शह दिला.
काँग्रेसच्या मुशीत घडलेले खासदार सदाशिवराव मंडलीक हे 1967 पासून सक्रिय राजकारणात आहेत.1967 ला त्यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेवर अध्यक्ष म्हणुन काम पाहीलं. 1972 ते 1998 या काळात कागल मतदारसंघातुन चार वेळा ते आमदार म्हणून निवडून आले. 1993 मध्ये त्यांना राज्यात मंत्रीपद साभाळण्याची संधीही मिळाली. 1998 पासुन ते लागोपाठ चारवेळा कोल्हापूर लोकसभेवर निवडून आलेत. त्याचे चिरंजीव संजय मडंलीक हे सध्या कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत.
खासदार सदाशिवराव मंडलीक आता 79 वर्षाचे आहेत. त्यामुळं यापुढं कोणतीच निवडणूक न लढविण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय.
कोल्हापुरातील रुईकर कॉलनीत राहणारे खासदार सदाशिवराव मंडलीक आपला मुलगा आणि सुनेसोबत राहतात. कागल तालुका सहकारी साखर कारखान्याचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांना वाचनाची आणि ते कुस्तीचेही चाहते आहेत.
खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी चार वर्षातील खासदार निधीपैकी 20 कोटी रुपयांचा निधी विविध विकासकामावर खर्च केलाय.
खासदार सदाशिवराव मंडलीक यांनी यापुढं निवडणुक लढविणार नाही असं जाहीर करुन टाकलंय. त्यामुळं ते 2014 च्या लोकसभा निवडणुक रिंगणात नसणार हे नक्की.. पण कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसलाच मिळायला पाहीजे हा त्यांचा हट्ट पूर्ण होणार का, याकडे आता कोल्हापूरकरांचे लक्ष लागलंय....
कोल्हापूर मतदारसंघातील समस्याराजर्षी शाहूंच्या पुरोगामी दूरदृष्टीतून उभ राहिलेलं कोल्हापूर ...साखर सम्राटांच कोल्हापूर ...एकेकाळी मराठी सिनेमाची नगरी कुस्तीची पंढरी अशी ओळख असलेल गुळाची देशात प्रसिध्द असलेली बाजारपेठ कोल्हापूर, मात्र महालक्ष्मीची या करवीर नगरीला अनेक समस्यांनी विळखा घातलाय पाहूयात... ...
सलग चार वेळा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी खासदार सदाशिवराव मंडलीक यांना मिळाली असली तरी कोल्हापूरमधील समस्यांची सोडवणूक करण्यात ते पुरते अपयशी ठरलेत. त्यामुळं खासदार मंडलीकांबाबत मतदारांमध्ये असंतोष आहे. मंडलीकाचं राजकीय वजन असतानाही त्यांनी ते का वापरलं नाही असा सवालही मतदार विचारतायत.
कोल्हापूरला कोकण रेल्वेला जोडण्याची मागणी असो वा पाणी प्रश्न. कोल्हापूरची जनता आपल्या खासदारांवर कमालीची नाराज आहे...
कोल्हापूर जिल्ह्यात लोकसंख्येच्या मानाने बेरोजगारांना रोजगार देणारा एकही केंद्राचा मोठा उद्योग नाही. त्यामुळं मतदारसंघातील अनेक तरुणांच्या हाताला काम नाही.. कोल्हापूरला मराठी चित्रपटाचं माहेरघर म्हणुन ओळखलं जातं,पण या माहेरघरातच चित्रपट सृष्टी संपुष्टात आलीय..
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असणा-या विधानसभा मतदारसंघापैकी करवीर, चंदगड, राधानगरी हे तीन विधानसभा मतदारसंघ ग्रामीण आहेत. या भागातील वाड्यावस्त्यावरील अनेक भागात रस्तेचं नाहीत. एवढंच नव्हे तर साधं पिण्याचं पाणीही अनेक ठिकाणी मिळत नाही, हे वास्तव आहे.
दक्षिण काशी म्हणुन ओळखलं जाणारं महालक्ष्मी मंदिरही याच मतदारसंघात येत. पण मंदिराच्या विकासासाठी म्हणावा तसा निधी खासदार मंडलिकांना केंद्राकडुन आणता आलेला नाही.
खासदार मंडलिकांचा बराच वेळ हा जिल्ह्यातील राजकारणातच खर्च झाला. त्यामुळे नागरिकांच्या दृष्टीने महत्वाचे प्रश्न सुटलेले नाहीत.
खासदार सदाशिवराव मंडलीक यांनी अनेक प्रश्नांसाठी पाठपुरावा केला. पण त्यातील अनेक कामं झालेलीच नाहीत. सलग चारवेळा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली..पण त्यातुन कोल्हापूरकरांच्या पदरात फार काही पडलेलं नाही.
कोल्हापूर रेल्वे कोकणाला जोडण्याचा प्रश्न, महालक्ष्मी मंदिराचा विकास, जिल्हयातील रस्त्यांची झालेली दुरावस्था, रेंगाळलेला विमानतळ विस्तारीकरणाचा मुद्दा, शुद्ध आणि मुबलक पाणी यासारखे अनेक प्रश्न आजही कायम आहेत.पण तरीही आपण आपल्या कारकिर्दीत मतदारसंघाचा चांगला विकास केला असं खासदार सदाशिवराव मंडलीक सांगतायत.
ऱाजकीय ताकद असताना खासदार मंडलिकांनी तिचा वापर केला नाही. त्यांनी आपली पुर्ण इच्छाशक्ती विकास करण्याच्या दृष्टीनं लावली असती तर या मतदारसंघाचा कायापालट झाला असता... असं मतदारांना वाटतंय.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सद्य राजकीय परिस्थिती का आहे त्यावर एक नजर टाकूया....पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. 2009 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाला पश्चिम महाराष्ट्रात म्हणावं तसं यश मिळालं नाही, हक्काचा कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघही त्यांना टिकवता आला नाही. त्यातच आता कोल्हापूरमधून अपक्ष म्हणून विजयी झालेल्या खासदार सदाशिवराव मंडलीकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. त्यामुळं जिल्ह्यात काँग्रेसची ताकद आपोआपच वाढलीय. आघाडीच्या जागा वाटपाच्या फॉर्मुल्यानुसार हा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जातो यावरच इथली राजकीय स्थिती अवलंबून असणार आहे. 2009 च्या निवडणुकीच्यावेळी उमेदवारी डावललेले धनंजय महाडीक हेच राष्ट्रवादीचे उमेदवार असतील असं हसन मुश्रीफ जाहीर करताय.. पण उद्योगपती धनंजय महाडीक यांनी पक्ष कोणताही असो, आपण लोकसभा निवडणुक लढविणारचं असं सांगून सर्वच पर्याय खुले ठेवलेत.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचे नेते कोल्हापूरची जागा आपल्यालाच सुटावी, अशी आग्रही मागणी करत आहेत. परंतु कुणाकडेही आजच्या घडीला निवडून येण्याची खात्री असणारा इच्छुक आणि सक्षम उमेदवार नाही हे तितकंच सत्य आहे.
राष्ट्रवादीचे गेल्या निवडणुकीतील उमेदवार छत्रपती संभाजीराजे यांनी निवडणुक लढविण्याबाबत तटस्थ भूमिका घेतलीय. आपण तिकीटासाठी कोणाच्या दारात जाणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतलाय. त्यामुळं लोकसभेची लढत कोण, कोणत्या पक्षामधून लढवणार हे आताच्या घडीला तरी सांगता येत नाही.
शिवसेनेने संजय मंडलिक यांना उमेदवारी देऊन चुरस निर्माण केली आहे. उद्योगपती धनंजय महाडीक यांनी पक्ष कोणताही असो निवडणुक लढविणारचं अशी भुमीका घेतलीय. त्याला कारणही तसचं आहे. आघाडीचा जागा वाटपाच्या फार्मुल्यानुसार हा मतदार संघ कोणाच्या वाट्याला जाईल आणि कोणाला उमेदवारी मिळेल हे आताच्या घडीला सांगता येत नाही. त्यामुळं ही त्याची भूमिका म्हणजे चीत भी मेरी आणि पट भी मेरा अशीच असल्याचं बोललं जातय...त्यामुळं आगामी 2014 ची कोल्हापूर लोकसभा निवडणूक रंगतदार होणार यात शंका नाही...
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. •
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, April 4, 2014, 11:04