www.24taas.com, झी मीडिया, लातूर काँग्रेसचा महाराष्ट्रातील अभेद्य गड असणारा हा मतदारसंघ. एखाद दुसरा अवपाद वगळता या मतदारसंघाने कधीही काँग्रेसचा हात सोडला नाही. या मतदारसंघाने महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री दिले, इथल्या खासदारांनी केंद्रात वर्षानुवर्षे मंत्रीपदं उपभोगली.. काँग्रेसच्या एका नेत्याच्या करिष्म्याने या मतदारसंघाचे नाव देशात गाजले.. अगदी या नेत्याच्या नावानंच मतदारसंघाला ओळखही मिळाली.. पाहूयात कुठला आहे हा मतदारसंघ..
निवडणूक कोणतीही असो, रंगात आलेल्या भाषणात दोन शव्दांच्या मध्ये मोठ्ठा पॉझ ठेवून सगळं राजकारण नजरेतून सांगणारा अवलिया राजकारणी अशी विलासरावांची ओळख... आणि हेच लातूरचं वैशिष्ट्य.. केवळ विलासरावच नव्हे, तर शिवाजीराव पाटील निलंगेकरांच्या रूपाने लातूरने महाराष्ट्राला आणखी एक मुख्यमंत्री दिला..तर देशांचे माजी गृहमंत्री आणि लोकसभेतही या मतदारसंघानं दिलेत....राजकिय क्षेत्र सोडलं तर लातूर म्हटलं की आठवतो तो शिक्षण क्षेत्रातला लातूर पॅटर्न... गोलाई आणि सिद्धेश्वराचे मंदिर... भूकंपानंतर सावरलेलं गाव.... आणि लातूरची डाळ.
लातूर मतदारसंघावर नेहमीच मामुली म्हणजे मारवाडी, मुस्लिम आणि लिंगायत समाजाचा प्रभाव राहिला आहे.. त्यामुळे या समाजाची नाळ ओळखल्याशिवाय या मतदारसंघात कुणीही जिंकू शकत नाही... निवडणूकीच्या काळात लातूरमध्ये लिंगायत समाजात एक संदेश फिरतो, त्याला तम तम मंदी असं म्हणतात. म्हणजे आपआपली माणसं जपा. कानडीतून दिला जाणारा हा संदेश इतरांना कळत नाही.
लातूर लोकसभा मतदारसंघात एकूण 15 लाख 9 हजार 987 मतदार आहेत. त्यापैकी पुरूष मतदारांची संख्या 7 लाख 92 हजार 711 तर महिला मतदारांची संख्या 7 लाख 17 हजार 276 इतकी आहे. त्यापैकी 60 टक्के मतदार शहरी भागातील, तर 40 टक्के मतदार ग्रामीण भागातील आहेत.
गेल्या कित्येक वर्षांपासून लातूर मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्लाच समजला जातो. 1977 मध्ये शेकापचे उद्धवराव पाटील निवडून आले होते. त्यानंतर 1980, 84, 89,91,96,98,99 अशी सलग सात टर्म शिवराज पाटील चाकूरकर यांनी काँग्रेसचा हा गड समर्थपणे जोपासला. मात्र 2004मध्ये काँग्रेसच्या या गडाला भाजपने हादरा दिला. त्यामध्ये विलासरावांचेही राजकारण असल्याची भावना लोकांमध्ये होती.
राज्याचे माजी मुंख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांची सून रुपाताई पाटील निलंगेकर यांनी भाजपकडून लढताना शिवराज पाटील चाकूरकर यांचा पराभव केला. २००९ मध्ये लातूर मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आणि विलासरावांनी थेट कोल्हापूरहून जयवंतराव आवळे यांच्या रूपाने उमेदवार आयात केला. विलासरावांच्या कृपेने आवळेंच्या गळ्यात लातूरच्या खासदारकीची माळ पडली.
लातूर जिल्ह्यातील नेत्यांना केंद्रात मंत्रीपदं मिळाली. पण त्याचा उपयोग लातूरकरांना फारसा होऊ शकला नाही.. मी देश पातळीवरचा नेता आहे असं सांगणारे शिवराज पाटील चाकूरकर तसे लातूरकरांना कधी जवळचे वाटले नाहीत. प्रश्न रस्त्याचा, खड्ड्यांचा किंवा विकासाचा असो.
चाकूरकर म्हणायचे आमचे काम फक्त कायदे करणे, हे आहे. खड्ड्यांचा प्रश्न नगरपालिकेला सांगा. रस्त्याचा प्रश्न आमदारांना सांगा. विकासाचा प्रश्न विलासरावांना सांगा किंवा आणखी कुणाला... माझा आणि त्याचा संबंध नाही अशी त्यांची नेहमीचीच भूमिका.
काँग्रेसचा पारंपरिक गड असणा-या लातूर जिल्ह्याच्या राजकारणाचा आवाका अजून विलासरावांचे पुत्र अमित देशमुख यांनाही आलेला नाही. त्यामुळेच त्यांना राजकारणात त्यांच्या बंधूचीही मदत घ्यावी लागते. धीरज आणि अमित आता मतदारसंघाची मशागत करत आहेत खरे. मात्र आमदार अमित देशमुखांनाही एन्टी इन्कंबन्सी फँक्टर लागू पडतो.. या सगळ्या राजकारणाच्या गुंतागुंतीत काँग्रेस आपला गड कसा राखणार, हाच महत्वाचा प्रश्न आहे.
जयवंत आवळे यांची राजकीय ओळख2009 मध्ये लोकसभा निवडणुकीचा फॉर्म भरण्यासाठी शेवटचा दिवस बाकी असताना विलासराव देशमुखांनी जयवंत आवळेंना बोलावून घेतलं... आणि तुम्हाला लातूरमधून निवडणूक लढवायची आहे, असं सांगितलं. आवळेंना मराठवाड्याचा काहीही गंध नव्हता. फक्त विलासरावांनी निवडलेला आणि प्रतिष्ठेपोटी निवडून आणलेला खासदार म्हणजे जयवंत आवळे
नाव --जयवंत गंगाराम आवळे
जन्म 6 जुलै 1940
शिक्षण -- बारावी
कोल्हापुरातील वडगाव मतदारसंघातून तब्बल पाच वेळा विधानसभेवर निवडून आलेले जयवंत आवळे हे विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते.
1980, 85, 90, 95,99 असे पाच वेळेस आवळे वडगाव मतदारसंघातून आमदार होते... 1999 ते 2004 या काळात त्यांनी राज्याचे सामाजिक न्याय, महिला व बालकल्याण मंत्री अशी पदेही भूषवली. मात्र 2004 मध्ये जनसुराज्य पक्षाच्या राजू आवळे यांनी जयवंत आवळेंचा 5 हजार मतांनी पराभव केला आणि आवळे अज्ञातवासात गेले..
त्यानंतर आवळेंकडे तसे फारसे कुणाचेही लक्ष नव्हतं. मात्र अचानक आवळेंना लॉटरी लागली. लातूर लोकसभा मतदारसंघ राखीव होऊ नये, यासाठी विलासरावांनी जंग जंग पछाडले.... मतदार पुर्नरचना आयोगाचे सदस्य असलेले तत्कालिन राज्य निवडणुक आयुक्त नंदलाल यांना शिंगावरही घेतले.. मात्र तरीही लातूर लोकसभा मतदारसंघ आरक्षित झालाच.. त्याठिकाणचं आपलं राजकीय वर्चस्व अबाधित राहावं यासाठी विलासरावांनी आवळेंच्या रूपानं आपलं प्यादं लातूरमध्ये आणलं.
लोकसभेला जयवंत आवळेंना 3 लाख 72 हजार 890 मते पडली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार सुनील गायकवाड यांना 3 लाख 64 हजार 915 मतांवर समाधान मानावं लागलं. 7 हजार 975 च्या मताधिक्याने आणि विलासरावांच्या कृपेने आवळेंना लातूरच्या खासदारकीचा टिळा लागला.
कोल्हापूरचा रांगडा गडी असलेल्या या लातूरकर खासदाराला कुस्ती आणि मैदानी खेळांची आवड आहे. नाटके आणि चित्रपट पाहणं त्यांना आवडतं. याशिवाय ते अमिताभ बच्चनचे चाहते आहे.
होम पीच सोडून लातूरमध्ये येऊन विलासरावांच्या साथीनं जयवंत आवळेंनी गेल्या लोकसभेत बाजी मारली... मात्र विलासरावांचे निधन झाल्यानं आता आवळेंना कुणी गॉडफादरच उरलेला नाही.
काय आहेत लातूरकरांच्या समस्याखासदार दाखवा... बक्षीस मिळवा... अशीच काहीशी परिस्थिती लातूरमध्ये आहे... लातूरचा विकास सोडाच, इथल्या खासदारांना जनतेनं निवडून आल्यावर पाहिलेलं देखील नाही.... लातूरसाठी पूर्णपणे नवखे असलेल्या जयवंत आवळेंनी कधी विकासकामांची ग्रीप घेतलीच नाही, असा आरोप त्यांच्यावर होतोय..
खासदार आवळेंना मात्र त्यांच्यावरील हे आरोप मान्य नाहीत. मतदारसंघात आपला चांगला संपर्क असल्याचं ते सांगताय. पायाभूत समस्यांकडे लक्ष देण्यासाठीही खासदारांना वेळ नाही. त्यांचं लक्ष फक्त कोल्हापूरकडे असल्याचा आरोपही नागरिक करतायत.
लातूर शहराबाहेरचे सर्व राष्ट्रीय महामार्ग खराब झाले आहेत. विलासरावांच्या काळात ही अवस्था नव्हती. पण विलासराव गेले आणि इथली रयाच गेली.
लातूरमध्ये रेल्वेचा प्रश्न सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा आहे, विलासरावांनी अतिशय परिश्रमाने रेल्वे लातूरात आणली. मात्र त्यापुढची खासदाराची जबाबदारी आवळेंना पार पाडता आली नसल्याची टीका त्यांच्यावर होतेय.
विकास ना शहरी भागात, ना ग्रामीण भागात... यापुढे बाहेरचा खासदार नकोच अशीच मतदारांची भावना झालीय. त्यामुळे येणारी निवडणूक आवळेंसोबत काँग्रेसलाही जड़च जाणार आहे. कित्येक वर्षांपासूनचा हा गड़ काँग्रेसला राखायचा असल्यास आतापासूनच कामाला लागावे लागणार आहे..
लातूरमधली राजकीय सद्यस्थितीलातूरचे विद्यमान खासदार जयवंत आवळे यांच्यावर मतदार नाराज आहे. शिवाय या मतदारसंघावर वर्चस्व असलेले विलासराव देशमुखही आता नाहीत त्यामुळे काँग्रेसची सुरक्षित असलेली ही जागा आता असुरक्षित झालीय.. खासदार आवळेंना पुन्हा तिकीट मिळणार की नाही, शंकाच आहे.
लातूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष व्यंकट बेंद्रे आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय़ बन्सोडे हे देखील शर्यतीत आहे. त्याशिवाय अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव आदी दिग्गजांचाही या मतदारसंघावर डोळा आहे....महायुतीत सहभागी झालेले रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनीही भाजपकडे असलेल्या या मतदारसंघावर दावा सांगितलय.
लातूर मतदासंघातील विधानसभा आमदारांचे पक्षीय बलाबल पाहता आघाडीचंच वर्चस्व आहे. लातूर ग्रामीणमध्ये वैजनाथ शिंदे, लातूर शहरमध्ये अमित देशमुख आणि निलंगामध्ये शिवाजीराव निलंगेकर पाटील हे काँग्रेसचे आमदार आहेत. तर लोहामध्ये शंकर अण्णा धोंडगे आणि अहमदपूरमध्ये बाबासाहेब पाटील या राष्ट्रवादीच्या आमदारांचं वर्चस्व आहे. उदगीरमध्ये मात्र भाजपचे सुधाकर भालेराव आमदार आहेत...
लातूरच नव्हे, तर अख्ख्या मराठवाड्यात काँग्रेसचे विलासराव देशमुख आणि भाजपचे गोपीनाथ मुंडे यांची राजकीय मैत्री सर्वांनाच परिचीत होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देतानाच फिक्सींग झालेलं असायचं असं म्हटलं जातं. मग राष्ट्रीय पातळीवरचा फँक्टर फिल गुड असो की जय हो.. आता विलासराव नाहीत. त्यामुळं एकसंघ भाजप मैदानात उतरला तर लातूरमध्य़े 2004 ची पुनरावृत्ती होऊन भाजपचा खदार विजयी झाल्याचं चित्र दिसू शकेल.
लातूर मतदार संघातील उमेदवारदत्तात्रय बनसोडे - काँग्रेस
सुनील गायकवाड - भाजप
दीपक कांबळे - बीएसपी
दीपरत्न नीलगेकर - आप
बसवंत उबळे - बीव्हीए
व्हिडिओ – •
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. •
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, April 4, 2014, 16:16