www.24taas.com, झी मीडिया, नागपूर नागपूर मतदारसंघात सर्वात आधी एक महिला खासदार निवडून आली होती. ज्यावेळी महिला आरक्षणाची चर्चाही नव्हती, त्या काळी 1951 मध्ये इथल्या जनतेनं एका महिलेला खासदार म्हणून लोकसभेवर पाठवलं होतं...
महाराष्ट्राची उपराजधानी आणि विदर्भाची अघोषित राजधानी नागपूरमध्ये.... संत्रानगरी अशीही या शहराची ओळख आहे. एकेकाळी सेंट्रल प्रोविंसचा भाग असलेले नागपूर शहर हे सध्याच्या मध्य प्रदेश राज्याची राजधानी होती. फक्त विदर्भच नाही, तर मध्य भारतातील मोठे आणि महत्वाचे शहर म्हणून नागपूरकडे पाहिलं जातं.
एकेकाळी हिंदी भाषिक राज्याची राजधानी असल्याने असल्याने नागपुरात हिंदी भाषिक मोठ्या प्रमाणात राहतात.स्थानिक रहिवाश्यांवर आणि संस्कृतीवर हिंदीचा पगडा आहे.
2009मध्ये 17 लाख 38 हजार 920 मतदार होते....पुरुष मतदार 9 लाख 3हजार 688 तर महिला मतदार 8 लाख 35 हजार 232 होते....
नागपूरला ६६ टक्के मतदार हिंदू आहेत. त्या पाठोपाठ २० टक्के बुद्ध धर्मीय, ११ टक्के मुस्लिम, ख्रिश्चन आणि जैन धर्मीय मिळून २.५ टक्के आणि इतर ०.५ टक्के मतदार आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय इथं आहे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दीक्षाभूमीही इथं आहे. महाराष्ट्राची उपराजधानी असल्यानं इथं वर्षातून एकदा हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने राजकारणाचा फड रंगतो. पण एवढं होऊनही विदर्भाचा विकासाचा अनुशेष बाकी असल्यानं नागपूरकर मंडळी नाराज आहेत. विदर्भाचं स्वतंत्र राज्य निर्माण व्हावं, अशी मागणी कित्येक वर्षांपासून आहे. तेलंगणाच्या निर्मितीमुळे ही जखम पुन्हा चिघळली गेलीय.
नागपूरची अर्थव्यवस्था चाकरमाने आणि व्यापारावर आधारीत आहे. इथं मोठे उद्योग अगदी बोटावर मोजण्याइतकेच आहेत. पण राष्ट्रीय पातळीवर झालेल्या अनेक सर्वेक्षणात नागपूरची गणना वेगाने वाढणा-या शहरांमध्ये झाली आहे. मिहानसारखे प्रकल्प येऊ घातल्याने जमिनींना सोन्याचा भाव आलाय...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कर्मभूमी असलेल्या नागपूर लोकसभा मतदारसंघात वर्चस्व मात्र काँग्रेसचंच राहिलंय.. दलित आणि मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात असल्याने नागपूर हा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो.
अनुसयाबाई काळे, माधव श्रीहरी अणे, एन. आर. देवघरे, जांबुवंतराव धोटे, गेव अवारी, दत्ता मेघे असे अनेक दिग्गज इथून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. 1996 साली बनवारीलाल पुरोहित यांच्या रूपाने अपवादाने भाजपचा खासदार निवडून आला. पण पुरोहित हे देखील कधीकाळी काँग्रेसमध्ये होते. विदर्भवादी काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार सध्या नागपूरचे खासदार असून, ते लागोपाठ चारवेळा इथून विजयी झालेत.
नागपूर मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर पूर्वी या मतदारसंघाचा भाग असलेला कामठीचा भाग आता रामटेक मतदारसंघात गेलाय. त्यामुळे आता नागपूरमधील सर्व विधानसभा मतदारसंघ शहरी तोंडवळ्याचे आहेत.
नागपूर उत्तर (राखीव) मधून रोहयोमंत्री नितीन राऊत आणि नागपूर दक्षिणमधून दिनानाथ पडोळे हे दोघेच काँग्रेसचे आमदार आहेत. नागपूर दक्षिण पश्चिममधून भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, नागपूर पश्चिममधून सुधाकरराव देशमुख, नागपूर मध्यमधून विकास कुंभारे आणि नागपूर पूर्वमधून कृष्णा खोपडे हे आमदार निवडून आलेत.
देशातील सर्वात हिरवंगार शहर असलेल्या नागपुरातील राजकीय वातावरण तापू लागलंय.. लोकसभा निवडणुकीत कायम काँग्रेसला साथ देण्याची नागपूरकरांची परंपरा यंदा खंडीत होणार का, हा सध्या इथला चर्चेचा विषय आहे.
निवडणुकीचा इतिहास नागपूरच्या इतिहासात जांबुवंतराव धोटे आणि बनवारीलाल पुरोहित असे दोन माजी खासदार आहेत, जे दोनवेळा वेगवेगळ्या पक्षांच्या तिकिटावर इथून निवडून आलेत. 1971 मध्ये फॉरवर्ड ब्लॉकच्या तिकिटावर विजयी झालेल्या धोटेंनी 1980 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक जिंकली. तर 1984 आणि 1989 मध्ये काँग्रेसच्या निवडणूक चिन्हावर जिंकणारे पुरोहित 1996 मध्ये भाजपच्या कमळ चिन्हावर नागपूरमधून विजयी झाले होते.
विलास मुत्तेमवार यांची ओळखदेशाच्या संसदीय लोकशाहीच्या इतिहासात, ७ वेळा लोकसभेवर निवडून जाणं काही सोपं नाही... पण नागपूरचे विद्यमान खासदार विलास मुत्तेमवार यांनी ही किमया साधलीय. तीनवेळा चिमूरमधून आणि लागोपाठ चारवेळा नागपुरातून ते लोकसभेवर विजयी झालेत... त्यांच्या राजकीय वाटचालीवर एक नजर टाकूया...
नाव - विलास मुत्तेमवार
जन्म - 22 मार्च 1949
वय - 64
शिक्षण - बी. कॉम.
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथे जन्मलेले विलास मुत्तेमवार मुळात आंध्र प्रदेशातल्या पेक्रीवार समाजाचे... या समाजाचे लोक अनेक वर्षांपूर्वी आंध्रातून महाराष्ट्राच्या चंद्रपूर - गडचिरोली जिल्ह्यात स्थलांतर करून आले. मुत्तेमवारांनी आपल्या राजकीय जीवनाच्या सुरवातीला फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे देखील काम केले. चंद्रपूरला जरी त्यांचा जन्म झाला असला तरीही त्यांचे पुढील शिक्षण आणि आयुष्य नागपुरातच गेले. सुरवातीला ते युवक कॉंग्रेसमध्ये सामील झाले. कालांतराने दिल्लीच्या नेत्यांशी जवळीक वाढली
आणि १९८० मध्ये पहिल्यांदा चिमूर लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळाली. १९८०, १९८४ आणि १९९१ मध्ये चिमूरमधून लोकसभेवर निवडून गेले. १९९८ मध्ये ते चिमूर सोडून नागपूरला आले आणि १९९८, १९९९, २००४ आणि २००९ अशा सलग चार निवडणुकांमध्ये त्यांनी नागपूरमधून लोकसभेत झेप घेतली.
दरम्यानच्या काळात त्यांचे दिल्लीतलं वजन वाढलं.. अपारंपरिक उर्जा खात्याचे राज्यमंत्री म्हणून केंद्र सरकारमध्ये त्यांची वर्णी लागली.
2009 च्या निवडणुकीत मुत्तेमवारांनी भाजपचे बनवारीलाल पुरोहित यांचा सुमारे 24 हजार मतांनी पराभव केला. बसपाचे उमेदवार इंजिनियर माणिकराव वैद्य यांनी 1लाखाहून अधिक मते मिळवली होती. 2009 ची निवडणूक मुत्तेमवार जिंकले, पण त्यांना मंत्रीपद गमवावे लागले. त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी काँग्रेसने त्यांना अखिल भारतीय काँग्रेस समितीचे महासचिव केले. पण तिथंही त्यांचा फारकाळ टिकाव लागला नाही. काही महिन्यातच त्यांना महासचिव पदावरून बाजूला करत निवडणूक प्रचारासंबंधी समितीवर नेमले. मुत्तेमवारांची ही खासदारकीची सातवी टर्म आहे. त्यांची ज्येष्ठता लक्षात घेता त्यांना अपेक्षित मंत्रिपद किंवा योग्य मान दिल्लीदरबारी मिळात नाहीय, हे तितकेच खऱे...
बीकॉमची डिग्री घेतलेल्या विलास मुत्तेमवारांवर कोणताही गुन्हा दाखल नाहीय. त्यांना मिळालेल्या 9 कोटी 79 लाख रूपयांच्या खासदार निधीपैकी 8 कोटी 29 लाख रूपये त्यांनी मतदारसंघातील कामांसाठी खर्च केलेत. त्यांची स्थावर मालमत्ता 1 कोटी 9 लाख रूपये असून, जंगम मालमत्ता 43 लाख 77 हजार रूपयांची आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी अवघे काही महिने शिल्लक असताना विलास मुत्तेमवार यांनी आता स्वतंत्र विदर्भाची चळवळ पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न सुरू केलाय...
वेगळ्या विदर्भाच्या चळवळीमागे मुत्तेवारांना खरंच इतकी कळकळ आहे की, यानिमित्ताने आपले घटलेले वजन पुन्हा वाढवण्याचा प्रयत्न मुत्तेमवार करतायत, हे येणारा काळच ठरवेल....
नागपूरच्या समस्या देशातील सर्वात स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून एकेकाळी नागपूरला पुरस्कार मिळाला होता. पण नागपूरची ही ओळख आता पुसली गेलीय... सार्वजनिक वाहतूक सेवेचा तर बट्ट्याबोळच झालाय.... नवे उद्योग कधी येतील, यापेक्षा कोणत्या पिढीला त्याचा फायदा होईल याची चर्चा आता करणेच योग्य होईल.. नेमक्या कोणत्या समस्या आहेत नागपूरवासीयांच्या ते पाहुया....
वेगानं वाढत असलेली संत्रानगरी नागरी समस्यांच्या विळख्यात सापडलीय...कचरा उचलण्यापासून ते रस्त्यावरील खड्ड्यांपर्यंत.... पिण्याच्या पाण्यापासून ते अनधिकृत लेआऊटपर्यंत.. अनेक समस्या नागपूरच्या मतदारांना भेडसावतात. एकेकाळी नागपूर चांगल्या रस्त्यांसाठी फेमस होतं. मात्र आता रस्त्यांची पार दुरावस्था झालीय.
नागपूरच्या स्वच्छता अभियानाचे तीन तेरा वाजले आहेतच, शिवाय स्टार बससेवेमुळे नागरिक त्रस्त झालेय.. अनेक नागरी सेवांसाठी केंद्र सरकार-पुरस्कृत जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरूत्थान अभियाना अंतर्गत निधी दिला जातो. पण त्याच्या वापरावर खासदारांचे फारसे लक्ष नाही.
पूर्व आणि पश्चिम नागपूरला जोडणा-या राम झुल्याचे काम 2006 मध्ये सुरु झाले. पण ७ वर्ष झाल्यावर देखील या पुलाचे बांधकाम अजूनही अधांतरीच आहे.
नागपूर रेल्वे स्टेशनमधून रोज सुमारे 200 गाड्या सुटतात. या रेल्वे स्थानकाला जागतिक दर्जाचे स्थानक करण्याची घोषणा केंद्र सरकारतर्फे करण्यात आली होती. पण आजवर त्या दृष्टीने कुठलीच कारवाई झाली नाही.
नागूपरात मिहान प्रकल्प कधी सुरु होणार हे एक गूढच आहे... त्यामुळे नवे उद्याग येणं अजून तरी कठीणच दिसतं...
नागपूरच्या विकासासाठी आता वेगळ्या विदर्भाची मागणी होत आहे... पण नागपूरमध्ये इतके हेवीवेट नेते असताना शहराची दुरावस्था का झाली, याचे उत्तर या दिग्गजांना येत्या निवडणुकीत मतदारांना द्यावं लागेल..
काँग्रेसचा पारंपरिक गड असलेल्या नागपूरमधून खासदारकीची विजयपंचमी साजरी करण्यासाठी विलास मुत्तेमवार उत्सूक आहेत. तर त्यांच्याविरोधात यावेळी भाजपने तगडा उमेदवार उतरवण्याची तयारी केलीय. महाल भागातून आपल्या
राजकीय परिस्थिती राजकीय कारकिर्दीला सुरूवात करणा-या मुत्तेमवारांचा विजयरथ रोखण्यासाठी महालमधलाच एक हेवीवेट उमेदवार मैदानात उतरणार असल्याचं समजतंय... पाहूया नागपूरमधील राजकीय चित्र..
गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर एकीकडे खासदार विलास मुत्तेमवार यांचे राजकीय वजन कमी झालेय, तर दुसरीकडे नागपूरमध्ये भाजपचा प्रभाव वाढतो. नागपूर महापालिका निवडणुकीतही सलग दुस-यांदा भाजपची सत्ता आलीय. त्यात देवेंद्र फडणवीस हे प्रदेशाध्यक्ष झाल्याने भाजपला आणखी बळ आलंय.
त्यातच मुत्तेमवारांना काँग्रेस पक्षांतर्गत विरोधकांशी दोन हात करावे लागतायत....
नागपूरचे माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्याशी त्यांचे वैर आहे. मुत्तेमवार कँपचे अनिस अहमद आता विरोधात काम करतायत.... नितीन राऊतांची त्यांना किती साथ मिळेल याबाबतही शंका व्यक्त करण्यात येतय...फक्त आमदार दिनानाथ पडोळे आणि माजी महापौर विकास ठाकरे हेच मुत्तेमवारांच्या गटात आहेत...
उत्तर नागपूर आणि दक्षिण नागपूरमध्ये बहुजन समाज पार्टीचा चांगला प्रभाव आहे. गेल्या निवडणुकीत बसपाच्या उमेदवाराने लाखाहून अधिक मते घेतली होती, ही बाब डोळेझाक करता येणार नाही.
नितीन गडकरी यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार ते यंदा नागपूरमधून आपलं नशीफ आजमाविणार आहे. तसेच आप अंजली दमानिया यांना रिंगणात उतरवले आहे.
तसे झाल्यास काँग्रेसचे मुत्तेमवार विरूद्ध भाजपचे हेवीवेट नितीन गडकरी अशी तुल्यबळ लढत याठिकाणी पाहायला मिळेल. गडकरी मैदानात उतरले तर मुत्तेमवारांची विजय`पंचमी` अवघड होईल....
व्हिडिओ •
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. •
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, April 4, 2014, 11:10