www.24taas.com, झी मीडिया, नांदेड सध्या अस्तित्वात असलेल्या नांदेड शहराच्या नावाचा उगम नंदी-तट या शब्दांमधून झाल्याची आख्यायिका आहे. भगवान शंकराचं वाहन असलेल्या नंदीने, पवित्र गोदावरी नदीच्या तटावर अर्थात काठी बसून तपस्या केली होती अशी दंतकथा प्रचलित आहे. आज नांदेड जिल्हा हुजूर साहेब नांदेड या नावानेही ओळखला जातो.
शीख धर्मगुरू श्री गुरू गोविंद सिंगजी महाराज यांचं सन 1705 मध्ये याच ठिकाणी देहावसान झालं होतं. रेणुकामातेचं मंदिर आणि गुरू गोविंद सिंगजींच्या समाधीस्थानामुळे नांदेड जिल्ह्याला धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्व प्राप्त झालं आहे. या जिल्ह्यात ज्वारी आणि कापूस ही प्रमुख पिकं असून, केळीचं देखील पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं.
नांदेडमध्ये भरणारी माळेगावची यात्रा देशात प्रसिद्ध असून, उत्तम प्रतीचं पशूधन आणि घोड्यांच्या बाजारासाठीही नांदेड प्रसिद्ध आहे. याच नांदेडमध्ये शेतक-यांसाठी उपयुक्त असं कापूस संशोधन केंद्रही आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघ हिंगोली आणि लातूर या दोन लोकसभा मतदारसंघांना लागून आहे. या मतदारसंघात याच जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.
नांदेड जिल्ह्यात एकुण 9 विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील सहा नांदेड लोकसभा मतदारसंघात तर उर्वरीत तीन हिंगोली आणि लातूर या दोन लोकसभा मतदारसंघात विभागले गेले आहेत. यापूर्वी नांदेड लोकसभा मतदारसंघात नांदेडमधील पाच आणि लातूर जिल्ह्यातील अहमदपूर या एका विधानसभा मतदारसंघाचा समावेश होता. भौगोलिकदृष्ट्या जसा नांदेड लोकसभा मतदारसंघ बदलला, तसा राजकीयदृष्ट्याही मोठा बदल पाहायला मिळाला.
नांदेड लोकसभा मतदारसंघावर सुरूवातीपासून काँग्रेसचीच सत्ता राहिली. 1989मध्ये जनता दलचे व्यंकटेश काबदे निवडून आले होते. त्यानंतर 1991मध्ये सूर्यकांता पाटील यांच्या रूपाने पुन्हा काँग्रेसची सत्ता स्थापन झाली. 1996 मध्ये गंगाधर कुंटुरकर काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले. त्यानंतर 1998 आणि 99मध्ये काँग्रेसचे भास्करराव पाटील खतगावकर सलग निवडून आले.
तर 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या दिगंबर पाटील यांनी अवघ्या 25 हजार मतांनी विजय मिळवत काँग्रेसच्या वर्चस्वाला शह दिला. 2009मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा काँग्रेसकडून तिकीट मिळवलेल्या भास्करराव खतगावकरांनी तिस-यांदा खासदार म्हणून लोकसभा गाठली.
याआधी 2009 च्या लोकसभा निवडणुकीत एकूण 14 लाख 39 हजार 015 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. त्यापैकी पुरूष मतदारांची संख्या ही 7 लाख 38 हजार 996 इतकी होती, तर 7 लाख 19 एवढी महिला मतदारांची संख्या राहिली.
नांदेड लोकसभा मतदारसंघ हा तसा पूर्वीपासूनच हेवीवेट मानला जाणारा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात आतापर्यंत तीन निवडणुकींचा अपवाद वगळता, सातत्याने काँग्रेसचेच खासदार निवडून आलेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधकांना सत्ता काबीज करण्यासाठी बराच घाम गाळावा लागेल, कारण काँग्रेसने थेट माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
भास्करराव खतगावकर पाटील यांची ओळखनाव - खा. भास्करराव पाटील खतगावकर
जन्म - 22 जुलै 1944
वय - 69 वर्ष
शिक्षण - बी. ई. (मेकँनिकल)
नांदेडचे विद्यमान खासदार भास्करराव पाटील खतगावकर हे जिल्ह्यातील मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखले जातात. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असणारे खतगावकर नांदेड जिल्ह्याच्या देगलूर-बिलोली तालुक्यातील खतगावचे मूळ रहिवासी. राजकारणातील दांडगा अनुभव गाठीशी असणारे खतगावकर हे राज्याचे माजी मुख्यमंत्री असलेले अशोक चव्हाण यांचे मेहुणे.
खतगावकरांनी, राजकीय जीवनाच्या वाटचालीत आतापर्यंत तीन वेळा खासदारकी आणि दोन वेळा आमदारपदही भुषवलं आहे. तसंच राज्य मंत्रिमंडळात राज्यमंत्री पदही त्यांनी सांभाळलं आहे. सध्या ते काँग्रेस प्रदेश उपाध्यक्षपदी आहेत.
1998च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने खतगावकर यांना सर्वप्रथम लोकसभेची उमेदवारी दिली होती. सलग दोन लोकसभा विजयानंतर 2004मधील लोकसभा निवडणुकीत भास्करराव पाटील खतगावकरांना पराभवाची चव चाखायला लागली. मात्र या पराभवानंतर खतगावकरांनी खचून न जाता बिलोली-दिगलूर या पारंपारिक विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक जिंकली आणि विधानसभेत प्रवेश मिळवला.
2009च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे भास्करराव पाटील खतगावकर पाटील पुन्हा विजयी झाले. त्यांना 3 लाख 46 हजार 400 मते पडली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले भाजपचे उमेदवार संभाजी पवार यांना 2 लाख 71 हजार 786 मते मिळाली. तब्बल 74 हजार 614 मतांनी खतगावकर विजयी झाले.
खासदार खतगावकर यांची एकूण मालमत्ता ही 6 कोटी 24 लाख 16 हजार रूपयांची असून, यांपैकी 2 कोटी 97 लाख 1 हजार रूपयांची स्थावर मालमत्ता आहे. तर 3 कोटी 27 लाख 15 हजार रूपयांची जंगम मालमत्ता खतगावकरांच्या नावे आहे.
2009 मध्ये खतगावकरांनी पराभवाचे उट्टे काढत पुन्हा लोकसभा काबीज केली. मात्र या विजयाचं श्रेय जातं ते राज्याचे तत्कालिन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना. खतगावकरांना निवडून देताना मतदारांनी अशोकरावांकडे पाहूनच मतदान केल्याचं काँग्रेस कार्यकत्यांसह अनेकजण मानतात.
नांदेड लोकसभा मतदारसंघातील समस्यानांदेड शहर आणि एकुणच जिल्ह्यातील नेत्यांचे राज्य आणि केंद्र सरकारच्या पातळीवर वेगळे राजकीय वजन आहे. नांदेड शहरात पूर्वी गुरूतागद्दीसाठी आणि नंतर जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी विकास योजनेअंतर्गत, विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला.
मात्र जिल्ह्यातील इतर विकासकामांसाठी कोणताही खास निधी उपलब्ध करून देण्यात खासदार खतगावकर अपयशी ठरले. त्यामुळे सिंचन प्रकल्प असो, उद्योग असो अथवा केंद्र सरकारच्या विविध योजना किंवा अंतर्गत रस्त्यांची कामे, अशी एक ना अनेक कामे अनेक वर्षांपासून रखडली आहेत. केंद्र सरकारची कोणतीही मोठी योजना गेल्या पाच वर्षांच्या काळात येथे राबविली गेली नाही.
बाभळी बंधा-याचे काम पूर्ण झाले. पण त्यामागे प्रांतवादाचा मुद्दा आल्याने बंधा-याचे काम राज्य सरकारने वेगात पूर्ण केलं. मात्र देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघात येणा-या लेंडी सिंचन प्रकल्पासारखे काही प्रकल्प निधीअभावी रखडले आहेत. केंद्राच्या अखत्यारितील बाबींचा विचार केला तर रेल्वेचा प्रश्न आजही अनुत्तरीतच आहे.
नांदेडमार्गे दिल्ली, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद आणि नागपूर अशा शहरांसाठी दैनंदिन रेल्वेसेवा आहे. पण पुण्यासाठी दैनंदिन रेल्वे सेवा सुरू व्हावी अशी मागणी करणा-या नांदेडकरांच्या तोंडाला कायम पानंच पुसण्याचं काम करण्यात आलं आहे. मतदारसंघातील नागरिकांच्या या मागणीचा पाठपुरावा करण्यात खासदार अपयशी ठरल्याचं दिसून येत आहे.
नांदेड लोकसभा मतदारसंघातील विविध गावांमधील अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. नांदेडचा औद्योगिक विकास तसा खुंटलेला आहे. एकही मोठा उद्योग याठिकाणी सुरू नाही. बेरोजगारांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी आणि एकूणच औद्योगिक प्रगती साधण्यासाठी उद्योगधंदे आणले जावेत यासाठी फारसे प्रयत्न झाल्याचं दिसून आलं नाही.
केंद्राच्या इतरही कोणत्या योजना या भागात आलेल्या नाहीत. त्यामुळेच काँग्रेसने केवळ राजकारणावर भर देत विकासाकडे दुर्लक्ष केल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे.
नांदेड शहरासह कृष्णूर, देगलूर आदी ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. पण या वसाहतींमध्ये उद्योग सुरू होण्याऐवजी जागा बळकावण्याचेच उद्योग झाल्याचं नजरेस पडत आहे. मतदारसंघातील अर्धापूर-मुदखेड भागात केळीचे तर कंधार मुखेड भागात सिताफळांचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. पण अशा फळांवर प्रक्रिया करण्यासाठी उद्योग उभारले जाणं आवश्यक असतानाही, राजकीय अनास्थेमुळे असे प्रकल्प उभे राहू शकले नाहीत. नांदेडला मोठे विमानतळ आहे.
या विमानतळाहून मुंबईला दररोज तर दिल्लीला आठवड्यातून तीन दिवस विमानसेवा होती. पण आता हे विमानतळ निव्वळ शोभेची वास्तू बनलेलं आहे. खासदार खतगावकर हे गेल्या काही काळापासून फारसे सक्रिय नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळेच की काय खतगावकरांची उमेदवारी बदलली जाण्याची चर्चा मतदारसंघात ऐकायला मिळत आहे.
खासदार खतगावकरांची दिल्ली-मुंबईतील नेत्यांशी अगदी जवळीक असल्याचं बोललं जातं. पण मतदारसंघातील लोकांशी मात्र त्यांचा म्हणावा तितका संपर्क राहिला नसल्याचा तक्रारीचा सूर सर्वत्र ऐकायला मिळत आहे.
1991पासून नांदेड लोकसभा मतदार संघावर 2004 चा अपवाद वगळता काँग्रेसचीच एकहाती सत्ता राहिलेली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे नांदेडमधील काँग्रेसचा चेहरा म्हणून नावारूपाला आले आहेत. आदर्श घोटाळ्यामुळे अडचणीत सापडलेल्या अशोक चव्हाणांच पुनर्वसन करण्याकरता काँग्रेस हायकमांडने त्यांना यावेळी तिकीट दिलं आहे.
2009 लोकसभा निवडणुकीच्यावेळी अशोकराव चव्हाण हे राज्याचे मुख्यमंत्री असल्याने, नांदेडची लोकसभा निवडणूक पूर्णपणे त्यांच्याच नावावर लढली गेली. मुख्यमंत्र्यांच्याच जिल्ह्यातच त्यांच्या मेहुण्यांची जागा पडली तर राज्यभर नाचक्की होईल या धास्तीने खुद्द अशोकरावांसह सर्वचजण कामाला लागले होते. त्याआधी 2004 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत, नांदेड लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघांपैकी काँग्रेसकडे केवळ 2 तर मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीकडे केवळ एक असे तीन विधानसभा मतदारसंघच होते.
मात्र काँग्रेस नेते अशोकराव चव्हाणांनी या लोकसभा मतदारसंघावर किंबहुना नांदेड जिल्ह्यावरच आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करत, 2009 विधानसभा निवडणूकीत जिल्ह्यातील एकही विधानसभा मतदारसंघ शिवसेना-भाजप किंवा इतर कोणत्याही विरोधी पक्षाकडे जाऊ दिला नाही.
भोकर विधानसभेचे आमदार म्हणून माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोकराव चव्हाण यांची वर्णी लागली आहे. तर नांदेड उत्तर जागेवर काँग्रेसचेच डी.पी. सावंत आमदार म्हणून निवडून आले आहेत. नांदेड दक्षिण मतदारसंघात काँग्रेसचेच ओमप्रकाश पोकर्णा आमदार आहेत. तर नायगावमधून एकमेव अपक्ष आमदार वसंतराव चव्हाण आहेत. SCसाठी राखीव असलेल्या देगलुर मतदारसंघाचं नेतृत्व अंतापूरकर देविदास करत आहेत. तर मुखेडचे आमदार आहेत काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेले हनुमंतराव पाटील.
नांदेड मतदार संघातील उमेदवार1) अशोक चव्हाण - काँग्रेस
2) डी.बी.पाटील - भाजप
व्हिडिओ – •
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. •
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, April 4, 2014, 16:34