www.24taas.com, झी मीडिया, उत्तर मुंबईनेता विरूद्ध अभिनेता अशी काँटे की लढत 2004 साली या मतदारसंघात झाली... काँग्रेसचा उमेदवार असलेल्या बॉलिवूडच्या अभिनेत्याने पाचवेळा खासदार असलेल्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्याला पराभवाची धूळ चारली... पण लोकांची ही निवड साफ चुकली... कारण खासदार झालेला हा अभिनेता पाच वर्षांत मतदारसंघात फिरकलाच नाही. खासदार दाखवा आणि बक्षिस मिळवा... असा प्रचार मग रंगला होता... हा मतदारसंघ आहे उत्तर मुंबई
उत्तर मुंबई मतदारसंघ म्हणजे मुंबईचं उत्तरेकडील प्रवेशद्वार... दहिसर इथून या मतदारसंघाला सुरुवात होते. मध्यमवर्गीय आणि झोपडपट्टीवासियांचे वास्तव्य असलेल्या या मतदारसंघात आपल्याला आदिवासी बांधवांचे अस्तित्वही पहायला मिळते. मुंबईतील प्रमुख पर्यटनस्थळ असलेलं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अर्थात नॅशनल पार्क याच मतदारसंघात आहे. याच नॅशनल पार्कमध्ये मुंबईपासून हाकेच्या अंतरावर पण सुविधांपासून कोसो दूर असलेले आदिवासी पाडे पहायला मिळतात. मूलभूत सुविधांपासून दूर असलेला हा आदिवासी अशिक्षित असल्याने आपल्या हक्कासाठी आवाज उठवतानाही दिसत नाही.गेल्या काही वर्षात उत्तर मुंबईचा चेहरामोहरा बदललाय. मोकळ्या जागेवर उंचचउंच इमारती उभ्या राहिल्यात. चारकोप-गोराई या म्हाडाच्या वसाहतींबरोबरच आता नव्याने म्हाडाच्या इमारती उभ्या राहत आहेत.
उत्तर मुंबई मतदारसंघातील सुमारे 16 लाख 8 हजार 924 मतदारांपैकी पुरुष मतदार 8 लाख 78 हजार 801 तर महिला मतदार 7 लाख 30 हजार 123 आहेत.
उत्तर मुंबईतून यापूर्वी व्ही. के. कृष्णन मेनन, पाणीवाल्याबाई मृणाल गोरे यांच्यासारखे दिग्गज खासदार लोकसभेवर निवडून गेलेत.
1951 मध्ये विठ्ठल बाळकृष्ण गांधी काँग्रेसच्या तिकिटावर प्रथम या मतदारसंघातून निवडून आलेत... 1957 आणि 1962 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघातले भारताचे माजी राजदूत व्ही के कृष्णन मेनन यांच्यासारख्या मातब्बर काँग्रेस नेत्याने इथे प्रतिनिधीत्व केले... 1977 मृणाल गोरे भारतीय लोकदलाच्या तिकीटावर निवडून आल्या. 1980 मध्ये जनता पार्टीचे रविंद्र वर्मा विजयी झाले तर 1984 मध्ये काँग्रेसचे अनुपचंद शाह उत्तर मुंबईतून निवडून आले.
त्यानंतर मात्र 1989, 1991, 1996, 1998, 1999 असे सलग पाच वेळा उत्तर मुंबईतून भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री राम नाईक विजयी झाले होते. 2004 साली काँग्रेसने सिने अभिनेता गोविंदा याला उमेदवारी देऊन भाजपाच्या या `रामा`ला वनवासात पाठवलं. पण सिनेमातल्या गोविंदाचा राजकारणात फारसा जीव रमला नाही. 2009 मध्ये काँग्रेसने गोविंदाऐवजी उत्तर मुंबईतील रहिवाशी नसलेल्या संजय निरुपम यांना तिकीट दिलं. त्यांनीही राम नाईक यांना पराभवाची धूळ चारत लोकसभेत प्रवेश केला..
उत्तर मुंबईतील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी
बोरीवली आणि चारकोप हे दोन मतदारसंघ भाजपाकडे,
कांदिवली आणि मालाड हे मतदारसंघ काँग्रेसकडे तर शिवसेनेकडे दहिसर आणि मनसेकडे मागाठाणे असे एक-एक मतदारसंघ आहेत.
बोरीवली – गोपाळ शेट्टी, भाजप
चारकोप – योगेश सागर, भाजप
कांदिवली (पूर्व) – रमेशसिंग ठाकूर, काँग्रेस
मालाड – अस्लम शेख, काँग्रेस
दहिसर – विनोद घोसाळकर, शिवसेना
मागाठाणे – प्रविण दरेकर, मनसे)
2004 आणि 2009 नंतर आता 2014 मध्ये विजय मिळवून काँग्रेस उत्तर मुंबईमधून हॅट्रीक करणार का याबाबत उत्सुकता आहे. मराठी मतांची विभागणी हा फॅक्टर मागील निवडणुकीत निर्णायक ठरला होता. या निवडणुकीत पुन्हा तेच चित्र पहायला मिळतं की भाजपा आपली पराभवाची मालिका खंडित करतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय...
खासदार संजय निरूपम यांची ओळखराम नाईक या मतदारसंघाचे खासदार असताना जनसंपर्कासाठी ते रेल्वेतून प्रवास करायचे... विविध रेल्वे स्थानकांवर बुटपॉलिश करणारे आपली एका दिवसाची कमाई राम नाईकांना निवडणुकीसाठी मदत म्हणून द्यायचे... आता त्याच उत्तर मुंबईचे खासदार आहेत संजय निरूपम... त्यांची ओळख करून घेऊया....
नाव – संजय निरुपम
जन्म – 6 फेब्रुवारी 1965
वय – 48
शिक्षण – बीए
काँग्रेसचे संजय निरुपम हे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतायत. मूळचे पत्रकार असलेले संजय निरुपम हे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या हिंदी सामनाचे संपादक होते. शिवसेनेनं त्यांना राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवले आणि निरुपम यांचा ख-या अर्थाने राजकारणात प्रवेश झाला. निरुपम यांनी उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघातून शिवसेनेच्या वतीने लोकसभेची निवडणूकही लढवली होती. मात्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, बुजूर्ग सिने अभिनेते सुनील दत्त यांच्यापुढे त्यांचा टिकाव लागला नव्हता. उत्तर भारतीयांविरोधात वाढत जाणा-या द्वेषाचे कारण देत, निरुपम यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि ते काँग्रेसमध्ये डेरेदाखल झाले. हिंदी भाषेवर प्रभुत्व आणि वादविवादात मुद्दा प्रभावीपणे मांडण्याची खासियत असलेल्या निरुपम यांनी दिल्लीत आपले वजन आधीच तयार केले होते. त्यामुळं काँग्रेसमध्ये आल्यानंतर दिल्लीत जम बसवायला त्यांना फारशी अडचण झाली नाही.
2009 च्या निवडणुकीत उत्तर मुंबईतून काँग्रेसने निरूपम यांना उमेदवारी दिली, तर भाजपाने पुन्हा राम नाईकांना रिंगणात उतरवलं. त्यावेळी मनसेनं उत्तर मुंबईतून शिरीष पारकर यांना उमेदवारी दिली. मनसेमुळे इथल्या मराठी मतांची विभागणी झाली. त्याचा फायदा काँग्रेसला आणि फटका शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार राम नाईक यांना बसला. पुन्हा एकदा नाईक 5 हजार 779 मतांनी पराभूत झाले. प्रथमच लोकसभा लढवणा-या मनसेच्या पारकरांनी लाखाच्या वर मतं खाली आणि हेच या मतदारसंघाच्या निकालावर परिणाम करणारे ठरले. निरुपम लोकसभेत पोहचले. त्यांच्याकडे पक्षाने सध्या प्रवक्तेपदाचीही जबाबदारी दिलीय.
संजय निरुपम उत्तर मुंबईतून निवडून आले असले तरी ते मूळचे या मतदारसंघातील रहिवाशी नाहीत. त्यांचे घर उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघात अंधेरी इथे आहे. निरुपम मूळचे उत्तर भारतीय असले तरी त्यांची पत्नी मात्र मराठी भाषिक आहे.
खासदार निरुपम मूळचे पत्रकार असल्याने त्यांना पुस्तके आणि मासिके वाचनाची आवड आहे... कविता करणे तसेच लेखन करणे... फुटबॉल पाहणे, चित्रपट पाहणे... तसेच
प्रवासाची त्यांना आवड आहे..
संजय निरुपम यांची मालमत्ता 2 कोटी 24 लाख 17 हजार801रुपये आहे. यापैकी स्थावर मालमत्ता 1 कोटी 63 लाख 58 हजार रुपये तर जंगम मालमत्ता 60 लाख 59 हजार 801 रुपये आहे.
निरुपम यांनी गेल्या चार वर्षात 12 कोटी 89 लाख
खासदार निधीपैकी 9 कोटी 22 लाख रुपये मतदारसंघातील विकासकामांवर खर्च केले आहेत. तर 2 कोटी 58 लाखांचा निधी शिल्लक आहे.
उत्तर मुंबईतील काँग्रेसची हॅट्रीक रोखण्यासाठी भाजपाने जोरदार प्रयत्न सुरू केलेत. काँग्रेसतर्फे पुन्हा संजय निरुपम यांनाच उमेदवारी मिळेल अशी दाट शक्यता आहे. निरुपम यांचा पराभव करायचा झाला तर मराठी मतांची विभागणी टाळणं हेच भाजपासमोरील सर्वात मोठं आव्हान ठरणार आहे.
संजय निरुपम याचं रिपोर्ट कार्डपास
झोपडपट्ट्यांमध्ये पाणी पुरवठा
अक्सा बीच उद्यानाची उभारणी
बोरिवलीहून कोकणसाठी रेल्वे
शौचालयांची उभारणी
सोसायट्यांमध्ये सौंदर्यीकरण
नापास
रेल्वे प्रवाशांचे होतात हाल
रखडलेले डीम कन्व्हेयन्स
वनजमीन रहिवाशी पुनर्वसन नाही
आरोग्य व्यवस्था नाही
कचरा, सांडपाण्याची दुरावस्था
मतदारसंघाचा आढावा मुंबईचं उत्तरेकडील प्रवेशद्वार असलेल्या उत्तर मुंबईला अनेक समस्यांनी वेढलं आहे. मध्यमवर्गीयांचं वास्तव्य असलेल्या म्हाडाच्या आणि खासगी वसाहतींबरोबरच या मतदारसंघात असलेल्या झोपडपट्ट्यांचे प्रश्नही मागील अनेक वर्षांपासून सुटलेले नाहीत.. मतदारसंघातील समस्यांचा हा आढावा....
उत्तर मुंबईतील सर्वच रेल्वे स्थानकांच्या परिसरात वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे प्रवासी मेटाकुटीला आलेत. अरुंद रस्ते, फेरीवाल्यांचे अतिक्रमण या मागील अनेक वर्षांच्या मुलभूत समस्या कुठल्याही खासदाराला सोडवता आल्या नाहीत.
उत्तर मुंबई मतदारसंघात प्रामुख्याने नोकरदार वर्ग आणि लहान व्यापारी मोठ्या संख्येने राहतात. नोकरीनिमित्त लोकलने प्रवास करणा-या या मतदारांचा प्रवास म्हणजे रोजचं नरकयातना भोगण्यासारखा आहे. मागील अनेक वर्षांपासून वांरवार मागणी करूनही प्रवाशांचा त्रास कमी झालेला नाही. रेल्वे स्थानकांवरील समस्यांचा पाढा वाचला तरी संपणार नाही एवढ्या समस्या पहायला मिळतात.
उत्तर मुंबईतील आणखी एक प्रमुख समस्या म्हणजे इथल्या गृहनिर्माण सोसायट्यांना मिळत नसलेले डिम्ड कन्व्हेन्स... राज्य सरकारने डिम्ड कन्व्हेन्ससाठी विशेष मोहीम राबवली, पण लाल फितीच्या कारभारात ती यशस्वी झाली नाही. विद्यमान खासदार संजय निरुपम यांनीही यासाठी विशेष प्रयत्न केले, मात्र त्यांच्या प्रयत्नांनाही यश आलेलं नाही.
या मतदारसंघात असलेल्या झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. एकीकडे मतदारसंघात या सगळ्या समस्या भेडसावत असताना इथले खासदार मात्र आपण अनेक समस्या सोडवल्याचा दावा करतायत.
नोकरीनिमित्त रोज 4 ते 5 तास प्रवास करणा-या उत्तर मुंबई मतदारसंघातील लोकांच्या मूलभूत समस्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. रेल्वे राज्यमंत्री असलेले राम नाईकही या समस्या सोडवू शकले नाहीत. तर काँग्रेसचं दिल्लीत सरकार असूनही सध्याचे खासदारही त्यासाठी कमी पडताना दिसतायत.
मतदारसंघाची सद्यस्थिती गेल्यावेळी मनसे उमेदवार शिरीष पारकर हे काँग्रेस खासदार संजय निरूपम यांच्यासाठी इष्टापत्तीच ठरले... त्यांच्यामुळेच निरूपम यांचा लोकसभेत जाण्याचा मार्ग सुकर झाला. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या सद्यस्थितीवर आता एक नजर टाकूया...
उत्तर मुंबई मतदारसंघात मध्यमवर्गीय मराठी आणि गुजराती मतदारांची संख्या जास्त आहे. त्याचप्रमाणे शिवसेना-भाजपा नगरसेवकांची संख्याही या मतदारसंघात जास्त आहे. असे असूनही मागील दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसने उत्तर मुंबईत बाजी मारली आहे. 2014 ची निवडणूक जिंकण्यासाठी सध्याचे काँग्रेसचे खासदार संजय निरुपम यांनीही पुन्हा एकदा कंबर कसलीय.
2009 च्या निवडणुकीप्रमाणे आगामी लोकसभा निवडणुकीतही इथे तिरंगी लढत पहायला मिळणार आहे. शिवसेना-भाजपा युतीचा उमेदवार आणि मनसेचा उमेदवार यांच्यात मराठी आणि गुजराती मतांची विभागणी झाल्याचा थेट फायदा 2009 मध्ये काँग्रेसला झाला होता.
मागील दोन निवडणुकांमध्ये सलग पराभव झालेल्या राम नाईक यांच्याऐवजी आता नवा उमेदवार भाजपने दिला आहे. बोरीवलीचे विद्यमान आमदार गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी मिळाली आहे. तरीही मनसे या मतदार संघातून उमेदवारच दिला नाही. या वेळी आपकडून सतीश जैन याना उमेदवारी दिली आहे.
पाहा व्हिडिओ•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. •
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, April 4, 2014, 11:17