ऑडिट मतदारसंघाचं : रामटेक

ऑडिट मतदारसंघाचं : रामटेक

www.24taas.com, झी मीडिया, रामटेक

रामटेक मतदार संघ तसा देशाला परिचित झाला आहे, कारण भारताचे माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांनी रामटेक मतदार संघातून निवडणूक जिंकली होती. महाराष्ट्राने देशाला अजून एकही पंतप्रधान दिला नाही. मात्र एका माजी पंतप्रधानांना विजयी करून सलग दोनदा लोकसभेत पाठवले.

१४ वर्षाच्या वनवासात प्रभू रामचंद्र या रामटेकला आश्रयाला असल्याची आख्यायिका आहे. त्यामुळेच प्रभू रामचंद्रांमुळे या मतदारसंघाला रामटेक नाव मिळालं. `मेघदुतम`सारख्या विश्व-विख्यात अजरामर काव्याची रचना कवी श्रेष्ठ कालिदासांनी याच रामटेकला रचली. नागपूर जिल्ह्यातील रामटेक हा दुसरा लोकसभा मतदारसंघ.

बहुतांश भाग ग्रामीण असलेला हा मतदारसंघ क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील दुसरा मोठा मतदारसंघ आहे. 
 
रामटेक मतदारसंघाच्या उत्तरेला मध्य प्रदेश राज्याची सीमा आहे. पेंच व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य तसेच महत्वाची मंदिरे असल्याने निसर्ग किंवा तीर्थक्षेत्र पर्यटन तसेच शेती ही या भागातील उपजीविकेची प्रमुख साधने आहेत.

रामटेक गावाच्या टेकडीवरील प्रसिद्ध रामाचे गडमंदिर आणि  कालिदास स्मारक, कोराडीचे दुर्गा मंदिर, विदर्भाच्या अष्टविनायक मंदिरात गणना होत असलेले आदासा येथील गणपतीचे मंदिर आणि विदर्भाचे पंढरपूर समजले जाणारे धापेवाडा येथील विठ्ठलाचे मंदिर ही या मतदारसंघातील प्रमुख वैशिष्ट्य. 

कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ इथंच आहे. मिहान सारखा अतिशय महात्वाकांशी प्रकल्प आणि आशियातील सर्वात मोठी पंचतारांकित बुटीबोरी औद्योगिक वसाहत याच रामेटकचा भाग. इतर पिकांसोबत धानाची शेती आणि संत्राच्या बागायती इथे मोठ्या प्रमाणात आहेत. 

मोठ्या प्रमाणात असलेल्या खाणींमुळे येथे परप्रांतीयांची संख्या देखील जास्त आहे.  मोठ्या संख्येने दलित आणि मुस्लिम मतदार असल्याने हा पारंपारिकरित्या कॉंग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो.

1980 मध्ये काँग्रेसचे जतीराम बर्वे इथून विजयी झाले. 1984 आणि 1989 मध्ये भारताचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी रामटेकचे प्रतिनिधीत्व केले.

1991 मध्ये काँग्रेसचे तेजसिंगराव भोसले, 1996 मध्ये दत्ता मेघे, 1998 मध्ये राणी चित्रलेखा भोसले इथून खासदार झाले. रामटेकने 1999 आणि 2004 मध्ये शिवसेनेला साथ दिली होती. 1999 आणि 2004 च्या निवडणुकीत सेनेचे सुबोध मोहिते विजयी झाले होते.

NDA सरकार असताना ते अवजड उद्योगमंत्री देखील झाले होते. खासदार असतानाच त्यांनी 2007 मध्ये सेना सोडली आणि कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. पण मोहितेंची ही आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरली.
 
राजीनाम्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत मोहिते पराभूत झाले आणि शिवसेनेचे प्रकाश जाधव जिंकून आले.2009 च्या निवडणुकीत कॉंग्रेसने ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांना उमेवारी दिली आणि ते खासदार झाले.

देशाचे माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंहराव, नागपूरचे राजे तेंजसिंगराव भोसले यांना निवडून देणा-या याच मतदारसंघात काँग्रेसच्या तिकिटावर लढणा-या श्रीकांत जिचकार यांना मात्र पराभव स्वीकारावा लागला होता. आता पुन्हा एकदा काँग्रेसला रामटेक काबीज करण्यासाठी प्रचंड कष्ट करावे लागणार आहेत. कायम दिल्ली मुक्कामी असणा-या मुकुल वासनिकांना ही निवडणूक चांगलीच जड जाणार.

काँग्रेस हायकमांडची मर्जी राखण्याची किमया भल्याभल्यांना साधता येत नाही. पण गेली अनेक वर्ष मुकुल वासनिक यांनी ती करामत करून दाखवलीय. कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या किचन कॅबिनेटचे ते महत्त्वाचे सदस्य समजले जातात. असा एक हाय प्रोफ़ाइल व अविवाहित कॉंग्रेस नेता रामटेकचा कॉंग्रेस खासदार आहे.

वासनिक यांची राजकीय ओळख

नाव --  मुकुल बाळकुष्ण वासनिक
जन्म - 27 सप्टेंबर 1959
वय -      53
शिक्षण  - एमए, एमबीए

खासदार मुकुल वासनिक यांना घरूनच राजकारणाचं बाळकडू मिळालं. त्यांचे वडील बाळकृष्ण वासनिक हे कॉंग्रेसतर्फे तीनवेळा लोकसभा खासदार म्हणून निवडून आले. 1984 मध्ये  वयाच्या  अवघ्या 25 वर्षी मुकुल वासनिक पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले.

1984 मध्ये  ते बुलडाणा येथून पहिल्यांदा लोकसभेत गेले.... 1985-88   दरम्यान ते NSUI चे राष्ट्रीय अध्यक्ष होते. 1988-89 या काळान ते युथ कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. 1984 नंतर 1991 आणि 1998 मध्ये बुलढाणा येथून ते खासदार म्हणून निवडून आले. 2009 मध्ये ते रामटेक मधून विजयी झाले.

2009 मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे कृपाल तुमने यांच्यावर 16,701 मतांनी विजय मिळवला. त्या निवडणुकीत मुकुल वासनिक यांना 3 लाख 11 हजार 614 तर कृपाल तुमाने यांना 2 लाख 94 हजार 913 मते मिळाली होती.

मुकुल वासनिक यांना राजकारणाशिवाय पुस्तके आणि मासिके वाचण्याची आवड आहे...क्रिकेट आणि ऍथेलेटिक्स त्यांचे आवडते खेळ आहेत.

वासनिकांना आतापर्यंत लोकसभा निवडणुकीमध्ये कधीही पराभव स्वीकारावा लागलेला नाही. शिवाय दिल्ली दरबारी त्याचं चांगलंच वजन आहे. या जमेच्या बाजू असल्या तरी रामटेक लोकसभा मतदारसंघ यंदा त्यांना फार कठीण जाणार यात कोणतीही शंका नाही.
 
लोकसभेचे माजी सभापती सोमनाथ चटर्जी यांनी प्रतिनिधित्व केलेला बोलपूर देशातील सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. भौगोलिक दृष्ट्या भारतातील दुस-या क्रमांकाचा मोठा लोकसभा मतदारसंघ असलेल्या रामटेकमधील समस्या देखील तितक्याच वैविध्यपूर्ण आहेत.

विकासाचे तर सोडाच पण आपला खासदार आपल्याला दिसतच नाही, ही तक्रार आहे रामटेकच्या मतदारांची, नागपूरसारख्या वाढत्या आणि अपकमिंग मेट्रोला जरी रामटेक लोकसभा मतदारसंघाने विळखा घातला असला तरीही हा प्रामुख्याने मागासलेला आणि विकासाच्या दृष्टीने दुरावलेला मतदारसंघ आहे.

मतदारसंघातील रस्त्यांची तर पार दुरावस्था झालीय.. खरं तर पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या मदतीने या रस्त्यांचा किवा रामटेकमधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांचा विकास खासदार मुकुल वासनिक करू शकले असते. आणि दिल्ली दरबारी त्यांचे  वजन बघता त्यांना ते कठीण नव्हते. पण दुर्दैवाने ते होऊ शकले नाही.

शेती हे इथल्या मतदारांचं उपजीविकेचं साधन असल्यानं या भागातील सिंचन प्रकल्पांकडे लक्ष देणे गरजेचे होते. पण रामटेक किवा नागपुरच नाही, तर विदर्भाकरता महत्वाचा असलेला गोसीखुर्द सारखा प्रकल्प ३० वर्ष झाले तरी अजूनही पूर्ण  झालेला नाही.

रामटेक हा संत्रा-उत्पादक भाग. पण तसे असले तरीही या भागात एकही संत्रा-प्रक्रिया उद्योग नाही. मतदारांच्या या समस्यांवर आजवर खासदारांतर्फे कुठलेच प्रभावी पाउल उचलले गेले नाही.. सरकारच्या उदासिन धोरणामुळे मतदारसंघातील अनेक शेतक-यांनी आत्महत्या केल्यात. पण त्याचे कुणालाही काही वाटत नाही.

मिहानच्या प्रतिक्षेत अखेर अनेक तरुणांनी बाहेरची वाट पकडली. मात्र मिहान प्रकल्प अजूनही पूर्ण झालेला नाही आणि कुठलाही मोठा उद्योग आला नसल्याने, या भागातील युवकांसाठी रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

व्याघ्र प्रकल्प आणि विदर्भातील अनेक तीर्थक्षेत्र असलेल्या या मतदारसंघाचा पर्यंटनक्षेत्र म्हणून विकास झालेला नाही.

मतदारांसाठी कायम नॉट रिचेबल असणारे खासदार वासनिक यांच्यावर रामटेकवासीय कमालीचे नाराज आहेत.. ही नाराजी दूर करून, रामटेक गड काबीज करण्यासाठी वासनिकांना मतदारसंघातील आपलं नेटवर्क पुन्हा प्रस्थापित करण्याचं आव्हान असणार. खा. मुकुल वासनिक यांना आगामी निवडणूक सोपी असणार नाहीय.

रामटेकमधील सध्याची राजकीय परिस्थिती

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अतिशय जवळचे समजले जाणारे खासदार मुकुल वासनिक येत्या निवडणुकीत आपली जागा कायम राखू शकतात की नाही हा सध्या रामटेकमध्ये चर्चेचा विषय बनलाय.

बुलढाणामधून तीनदा सहजच जिंकणाऱ्या वासनिकांना या निवडणुकीत जास्त घाम गाळावा लागेल यात कुठलीच शंका नाही. मागील निवडणुकीत पहिल्यांदाच निवडणुकीच्या राजकारणात उतरलेल्या आणि अगदी नवखे असलेल्या कृपाल तुमाने यांनी त्यांची चांगलीच दमछाक केली होती.

२००९ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मुकुल वासनिक यांना ३ लाख ११ हजार ६१४ मते मिळाली होती, तर तुमाने यांनी २ लाख ९४ हजार ९१३ मते मिळवली होती. या निवडणुकीत वासनिक जरी विजयी झाले असले तरीही, त्यांचे मताधिक्य फक्त १६ हजार ७०१ इतकेच होते.

एका नवख्या उमेदवाराने एका दिग्गज नेत्याच्या तोंडाला फेस आणण्याच्या या घटनेची पुनरावृत्ती होते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. वासनिक विजयी झाले तेव्हा दिल्लीच्या राजकारणात मुरलेला आणि पार्टी हायकमांडच्या मर्जीतील नेता आपले प्रतिनिधित्व करीत असल्याची मतदारांची भावना होती.

आता आपल्या भागाचा विकास होईल ही खात्री त्यांना होती. पण त्यांचा सपशेल हिरमोड झाला. २००९ मध्ये रामटेक मतदारसंघ अनुसूचित जातीच्या उमेदवारासाठी राखीव झाल्याने वासनिक या मतदारसंघाकडे वळले होते.

गांधी घराण्याशी त्याची जवळीक बघता त्यांना रामटेकमधून जरी पक्षांतर्गत विरोध झाला नाही तरी पक्षाचे कार्यकर्ते किती मनापासून त्यांच्या सोबत असतात हा देखील तितकाच महत्वाचा प्रश्न आहे. गेल्या साडे चार वर्षात रामटेकमध्ये एकही मोठा प्रकल्प तर आलाच नाही, अशी स्थानिकांची तक्रार आहे.

गेल्या काही दिवसापासून वासनिक सक्रिय झाले असले तरी निवडणूक जवळ आल्याने ही सक्रीयता असल्याचा मतदारांचा स्पष्ट आरोप आहे. मोठे प्रश्न तर सोडाच, पण अगदी स्थानिक समस्या देखील वासनिक आपले `राजकीय वजन` वापरून सोडवू शकले नाहीत.

एकूणच सध्याच्या राजकीय परिस्थितीला वासनिक कसे सामोरे जातात आणि त्यांच्या विरोधात कोण उमेदवार असणार, यावर पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे.

रामटेक मतदार संघातील उमेदवार

 1)काँग्रेस / राष्ट्रवादी – मुकुल वासनिक (काँग्रेस)
2)महायुती – कृपाल तुमाने (शिवसेना)
3)आप – प्रताप गोस्वामी

 व्हिडिओ –



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, April 4, 2014, 17:22
First Published: Friday, April 4, 2014, 17:22
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?