ऑडिट मतदारसंघाचं : रत्नागिरी

ऑडिट मतदारसंघाचं : रत्नागिरी
www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी 

रत्नागिरी मतदारसंघाला विद्वान संसदपटूंचा वारसा आहे.... आपल्या अभ्यासपूर्ण कारकिर्दीनं संसद गाजवणा-या नाथ पै आणि मधू दंडवतेंचं नाव घेतलं तरी आजही इथल्या मतदारांचा ऊर भरून येतो..... काळाबरोबर हा मतदारसंघही बदलला....  सुसंस्कृत राजकारणाची जागा राडा संस्कृतीनं घेतली.... पाहुयात या मतदारसंघाचा झालेला कायापालट...

परशुरामाची भूमी म्हणून ओळखला जाणारा कोकणचा हा परिसर... रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ... हापूस आंबा, काजू, कोकम, नारळी पोफळीच्या बागा आणि लांबच लांब समुद्रकिनारा असं निसर्गाचं भरभरून वरदान लाभलेला हा भाग... कोकणची माणसं साधीभोळी, असं इथल्या लोकांचं वर्णन केलं गेलं... पण गेल्या काही दशकांपासून राजकीय राड्यांमुळे पुरता बदनाम झालाय... दैव देतं आणि कर्म नेतं अशी काहीशी अवस्था या रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची झालीय....
 
मतदारसंघाची पुनर्रचना होण्यापूर्वी राजापूर नावानं ओळखला जाणारा हा  मतदारसंघ... बहुतेक वेळा निवडणुकीचा पहिला निकाल लागायचा तो राजापूरचाच... नेहमीच सत्ताधा-यांच्या विरोधात हा मतदारसंघ उभा राहिलाय.. तब्बल तीन दशकांहून अधिक काळ समाजवाद्यांचा बालेकिल्ला म्हणून नावारूपाला आलेला हा मतदारसंघ म्हणजे नाथ पै, मधु दंडवते यांच्यासारख्या बुद्धिवान संसदपटूंची कर्मभूमी.... पण 1990 च्या दशकात ही ओळख बदलली आणि समाजवादी विचारांची जागा शिवसेनेच्या भगव्यानं घेतली.... 2005 मध्ये नारायण राणे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेल्यानंतर पुनर्रचनेनंतर विस्तारलेला हा मतदारसंघही काँग्रेसकडे गेला.... कधी काळी हा मतदारसंघ
नाथ पै आणि मधु दंडवते यांच्यासारख्या उत्तुंग संसदपटूंचा सार्थ अभिमान बाळगायचा. पण हा झाला इतिहास.... नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातल्या राजकीय धुमशानामुळे या मतदारसंघात नवी राडा संस्कृती रूजली...
 
1952 च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत इथून काँग्रेसचे मोरेश्वर जोशी विजयी झाले होते. त्यानंतर 1957, 1962 आणि 1967 अशा सलग तीन निवडणुकांत बॅरिस्टर नाथ पै निवडून आले. नाथ पै यांच्या अकाली निधनानंतर प्राध्यापक मधू दंडवते त्यांचे वारसदार ठरले आणि 1971, 1977, 1980, 1984 आणि 1989 अशा सलग पाच निवडणुकांत समाजवादी मधू दंडवते यांनी प्रजा सोशलिस्ट पार्टी, भारतीय लोकदल आणि  जनता पार्टीच्या तिकिटावर विजय मिळवले.... त्यानंतर मात्र या मतदारसंघात शिवसेनेचा जोर वाढला आणि 1991 मध्ये जनता दल, काँग्रेस आणि शिवसेना अशा तिरंगी लढतीत काँग्रेसचे सुधीर सावंत या मतदारसंघातून निवडून आले.. मधू दंडवते यांच्या पराभवाबरोबर समाजवादी पक्षांचं इथलं अस्तित्वही संपलं. तीन दशकांनंतर काँग्रेसकडे गेलेला हा मतदारसंघ पुढे शिवसेनेनं बळकावला आणि 1996, 1998, 1999 आणि 2004 असं सलग चारवेळा शिवसेनेच्या सुरेश प्रभूंनी या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं. पुढे राणे शिवसेनेतून बाहेर पडले आणि मतदारसंघाच्या पुनर्रचनेबरोबर इथली राजकीय समीकरणंही बदलली. 2009 मध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग या नावानं विस्तारलेल्या या मतदारसंघात राणे आणि शिवसेनेत घमासान संघर्ष झाला. नारायण राणेंचे पुत्र डॉक्टर निलेश राणेंच्या रुपानं पुन्हा काँग्रेसनं या मतदारसंघावर नाव कोरलं....
 
या लोकसभा मतदारसंघातल्या सहा विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर आघाडी आणि युती यांच्याकडे प्रत्येकी तीन-तीन आमदार आहेत.  चिपळूणमध्ये सदानंद चव्हाण आणि राजापूरमध्ये राजन साळवी हे शिवसेनेचे आमदार आहेत. राणेंचा बालेकिल्ला असलेल्या कणकवली-देवगड मतदारसंघात गेल्यावेळी भाजपच्या प्रमोद जठारांनी कमळ फुलवलं.... तर रत्नागिरीध्ये राज्यमंत्री उदय सामंत आणि सावंतवाडी मतदारसंघात दीपक केसरकर  हे राष्ट्रवादीचे शिलेदार आहेत. उद्योगमंत्री नारायण राणे ज्याचं प्रतिनिधीत्व करतात तो मालवण-कुडाळ हा एकमेव मतदारसंघ काँग्रेसकडे आहे.

बॅरिस्टर नाथ पै ते डॉक्टर निलेश राणे असा प्रवास करणारा हा मतदारसंघ कधी लाटेविरोधात उभा राहिला, कधी लाटांवर स्वार झाला... या मतदारसंघानं अनेक संघर्षही पाहिले... सध्या या निसर्गरम्य भूमीवर सामाजिक, आर्थिक प्रश्नांबरोबर राजकीय संघर्षही जोरात सुरू आहे....
 
विकास गावकर आणि संदेश सावंतसह दिनेश दुखंडे, रत्नागिरी सिंधुदुर्ग
 
विद्वान आणि अभ्यासू लोकप्रतिनिधींचा हा मतदारसंघ.... पूर्वी नाथ पै किंवा मधू दंडवते उभे राहिले की त्यांचा विजय हा केवळ औपचारिकता असायची.... 1996पासून सुरेश प्रभू असोत की नीलेश राणे, त्यांच्या विजयाचे शिल्पकार ठरलेत अर्थातच नारायण राणेच.... मतदारसंघातल्या राणे फॅक्टरवर एक नजर....

 हे आहेत रत्नागिरी सिधुदुर्ग  लोकसभा मतदारसंघाचे खासदार...

 डॉक्टर निलेश नारायण राणे.... 32 वर्षीय डॉक्टर निलेश यांचा जन्म 17 मार्च 1981 चा

काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या पुण्याईवर निलेश राणे रत्नागिरी-सिंधुदुर्गात इतक्या कमी वयात खासदारकी मिळाली. इतिहास पाहिला तर या मतदारसंघानं दोन अपवाद सोडले विरोधी पक्षालाच कौल दिला होता..... निलेश  राणे यांच्या रुपानं तब्बल दोन दशकांनंतर पुन्हा काँग्रेसला विजय मिळवून दिला..

निलेश राणे यांनी  3 लाख 53 हजार 915 मते घेत 3 लाख 07 हजार 165 मते घेणारे सेनेचे माजी मंत्री नेते सुरेश प्रभू यांचा 46 हजार 750 मतांनी पराभव केला...

आक्रमक राजकरण करत राणेंनी अजूनपर्यंत तरी  या मतदारसंघात आपलं वर्चस्व कायम राखलंय.... या मतदारसंघात आपल्याऐवढी कामं कोणीच केली नसल्याचा दावा राणे करताय..

अर्थात राणेंना कार्यसम्राट मानायला विरोधक तयार नाहीत... उलट त्यांची आश्वासनं कशी पोकळ आहेत याची जंत्री ते देतात....


राजकीय बलाबल पाहिलं तर नारायण राणेंची बहुतांश सिधुदुर्ग जिल्ह्यावर मजबूत पकड आहे... तर रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेचं वर्चस्व आहे.... त्या अर्थाने दोन्ही बाजूला राजकीय ताकद समसमान आहे. पण साम, दाम, दंड, भेद या राणे स्टाईलनं इथली निवडणूक होते आणि त्यात आजवर राणेंनीच बाजी मारलीय.... आता राणेंसमोर उमेदवार कोण असेल यावर इथल्या निवडणुकीची चूरस ठरेल....  अर्थात कोकणच्या लाल मातीतला राजकीय संघर्ष येत्या निवडणुकीतही लक्षवेधी ठरेल एवढं नक्की.... 


खा. निलेश राणेचं रिपोर्ट कार्ड

आता पाहुयात खासदार निलेश राणे यांचं रिपोर्ट कार्ड...त्यांनी दिलेली कोणती आश्वासन पूर्ण केली..अर्थात निलेश राणे कुठे पास झाले आणि कुठे फेल ...पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून...


पास

सी- वर्ल्ड प्रकल्पाला मंजुरी

मुंबई-गोवा चौपदरीकरणाला मंजुरी

विमानतळाचा प्रश्न मार्गी

दोडामार्ग-आडाळी MIDC प्रकल्प

ओरोस येथे हॉस्पिटलसाठी प्रयत्न


नापास

गौण खनिज प्रश्न प्रलंबित

मच्छिमारी-पर्सिसनेटचा मुद्दा

कोकणासाठी रेल्वे-गाड्यांची गरज

फळ प्रक्रिया उद्योग नाहीत

धरण, सिंचनासाठी निधीची गरज


रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाच्या समस्या

माजी मुख्यमंत्री नारायण राणेंची कर्मभूमी असलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाच्या समस्या काय आहेत, ते पाहुयात...

निसर्गाचं वरदान लाभलेला रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ राजकारणामुळे पार मागे फेकला गेलाय... सुंदर समुद्र किनारे, सागरी किल्ले...मुबलक निसर्गसंपत्ती हे सर्व असूनही हा मतदारसंघ विकासापासून वंचित आहे.

रस्त्यांचं चौपदरीकरण असो वा  कोकणासाठी नवीन रेल्वेगाडी, याबाबतीत खासदार डॉ. निलेश राणे यांनी आपलं आश्वासन पाळलं नसल्यानं मतदार कमालीचे नाराज आहेत....

कोकणातल्या जमिनींना सोन्याचा भाव आलाय.... मायनिंगविरोधात लोकांमध्ये संताप आहे. जैतापूर अणूऊर्जा प्रकल्प आणि सी वर्ल्ड प्रकल्पांवरून रणकंदन सुरु आहे.. फळ प्रक्रिया उद्योगांबाबत नेते उदास आहेत. जिल्ह्यात साखर कारखान्यासाठी उद्योग मंत्री नारायण राणे आणि आमदार विजय सावंत या काँग्रेसच्याच दोन नेत्यांत संघर्ष सुरू आहे.  मच्छिमारांसाठी पर्ससीनेटचे मोठे संकट उभे राहिलेय... पर्ससीनेटमुळे छोटे मच्छिमार भरडले जातायत... त्यांच्या
गा-हाण्यांकडे वारंवार लक्ष वेधूनही खासदार राणेंचं त्यांच्याकडे दुर्लक्षच झालंय...

पूर्वी निवडणुका आल्या की, कोकणचा कॅलिफोर्निया करण्याचं आश्वासन हमखास दिलं जायचं.... पण आता कॅलिफोर्निया नको, कोकणचा कोकणच राहू द्या अशी स्थानिक लोकांची भावना होऊ लागलीय......

 
राणे-शिवसेना संघर्ष आणि टोकाचं राजकारण यामुळे कोकणचा विकास रखडलाय... या वादांमुळे इथं प्रस्तावित असलेल्या प्रत्येक मोठा प्रकल्प आणि योजनेलाही फटका बसतोय... परिणामी कोकणचा विकास खुंटला आहे....

केंद्रात आणि राज्यातही काँग्रेस सरकार, शिवाय रत्नागिरी-सिंधुदुर्गातही राणेंचं वर्चस्व असताना हा मतदारसंघ विकासापासून दूर का ? या प्रश्नाचं उत्तर राणेंना आगामी निवडणुकांमध्ये द्यावंच लागणार आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाची सद्यस्थिती 
आगामी लोकसभा निवडणुकीत नारायण राणेंची प्रतिष्ठा पुन्हा एकदा पणाला लागणार आहे... डॉ. निलेश राणे यांचा पाडाव करण्यासाठी विरोधकांनी मोर्चेबांधणी सुरू केलीय... पाहुयात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची सद्यस्थिती कशी आहे.

पुन्हा एकदा रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात राणे विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे... सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणेंचं वर्चस्व आहे शिवाय बहुसंख्य सत्तास्थानांवर राणेंचा कब्जा आहे... मात्र रत्नागिरी शिवसेनेचे बळ आणि संघटना मजबूत आहे... म्हणूनच डॉ निलेश राणेंना ही निवडणूक सहज सोपी नाही.... शिवसेनेने विनायक परब यांना उमेदवारी दिली असून आप कडून कर्नल गडकरी यांना रिंगणात उतरविले आहे.

मतदार संघातले कोणतेही निर्णय घेताना सहमतीपेक्षा आक्रमकपणे निर्णय घेतल्यानं ते लादण्यात आल्याची भावना होते. त्यामुळे त्याचा फटकाही राणेंना बसू शकतो....

पाहा व्हिडिओ


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, April 4, 2014, 11:21
First Published: Friday, April 4, 2014, 13:59
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?