www.24taas.com, झी मीडिया, सांगली सांगली लोकसभा मतदारसंघात नाट्यपंढरी आणि सहकारपंढरी म्हणून प्रसिद्ध आहे. तब्बल चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भुषवणा-या वसंतदादा पाटीलांनी, या लोकसभा मतदारसंघाचं आमदारपद भूषवलं आहे.
महाराष्ट्रातील सांस्कृतिक, राजकीय आणि प्रबोधनाचा वारसा लाभलेला मतदारसंघ म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघ. विष्णुदास भावे यांनी पहिले मराठी नाटक सीतास्वयंवर सादर केले ते याच सांगलीमध्ये. या भूमीचे सुपुत्र असणा-या बालगंधर्व यांनी संगीत रंगभूमीवर अजरामर कामगिरी केली.
प्रतिसरकारचे प्रणेते क्रांतिसिंह नाना पाटील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि पठ्ठे बापुराव यांच्या सारख्या अनेक दिग्गजांनी जन्मभूमी आणि कर्मभूमी म्हणूनही सांगली प्रसिद्ध आहे. साहित्यिक ग. दि. माडगुळकरांपासून म.द. हातकणगंलेकरसारख्या अनेक साहित्यिकांची मांदियाळी इथलीच. रोजगार हमी योजनेचे शिल्पकार वि.स.पागे हे ही सांगलीचेच.
उत्तम दर्जाच्या तंतुवाद्यांची निर्मिती होते ती सांगलीतल्या मिरजे मध्येच. कृष्णेच्या पाण्यावर तयार झालेला भाजीपाला, गुणकारी हळद आणि हळदीची पेवे सुद्धा इथलीच. उस, गुळ आणि साखरेची गोडी सांगलीच्याच साखरेला असं म्हटलं जातं.
साता-समुद्रापार निर्यात होणारे रसरशीत द्राक्षे आणि डाळींब देखील सांगली जिल्ह्यातीलच. सहकारी साखर कारखानदारी आणि दुधसंस्था यामुळे सांगलीच राजकारण मुरलेल, आणि त्यामुळेच राज्याच्या राजकारणात सांगली ही महत्त्वाच्या स्थानी कायम आहे.
सांगली मतदारसंघ हा कॉँग्रेसचा पांरपरिक बालेकिल्ला मानला गेला आहे. 1980 - 84 मध्ये कॉँग्रेसच्या शालनी व्ही. पाटील या खासदार होत्या तर कॉँग्रेस पक्षांकडून निवडणूक लढवत 1984, 1989, 1991 आणि 1996 मध्ये असं सलग चार वेळा प्रकाशबापु वसंतराव पाटील हे खासदार होते. त्यानंतर मात्र 1996 आणि 1998 मध्ये खांदेपालट झाली आणि मदन पाटील हे काँग्रेसच्या तिकीटावर दोनदा लोकसभेत गेले.
मग मात्र प्रकाशबापूंनी दिल्ली दरबारी वजन दाखवत पुन्हा उमेदवारी मिळवली आणि 1999 आणि 2004 मध्ये खासदार झाले मात्र त्यांच्या निधनानंतर 2006 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत कॉग्रेस पक्षांच्या तिकीटावर प्रकाशबापूंचे पुत्र प्रतिक पाटील लोकसभेत पोहचले. केलेल्या कामाच्या जोरावर प्रतिक पाटील पुन्हा 2009 मध्ये सलग दोनदा सांगलीचं प्रतिनिधीत्व करतायतं.
सांगली लोकसभा मतदारसंघ हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. इथल्या मतदारांनी नेहमीच कॉग्रेसच्या हाताला साथ दिली आहे.तब्बल चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या घराण्याचे या सांगली लोकसभा मतदार संघावर वर्चस्व कायम राहिले आहे. पण विकासाच्या मुद्दावर आणि बदलत्या राजकीय समिकरणामुळे सांगलीकर कुणाला साथ देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
खासदार प्रतिक पाटलांची ओळखनाव - खा.प्रतिक प्रकाशबापू पाटील
जन्म - 8 सप्टेंबर 1973
वय - 40 वर्षे
शिक्षण - ऑटोमोबाईल इंजिनियर
खा. प्रतिक पाटील हे माजी मुख्यमंत्री स्वर्गिय वसंतदादा पाटील यांचे नातू, तर माजी खासदार स्वर्गिय प्रकाशबापू पाटील यांचे पुत्र आहेत. आजोबा आणि वडिलांचा राजकीय वारसाचं प्रतिक पाटील पुढे समर्थपणे चालवतायतं. प्रतिक पाटील हे सलग दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी यापूर्वी वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पदही भूषवलं आहे.
२००९ साली दुस-यांदा खासदार म्हणून निवडून आल्यावर प्रतिक पाटील यांना केंद्रीय अवजड उद्योग राज्यमंत्री बनवण्यात आले,तर नंतर क्रीडा राज्यमंत्री पद त्याना मिळाले. राहूल गांधीच्या किचन कॅबिनेटचे ते सदस्य मानले जातात.
खा. प्रतिक पाटील यांनी 2009 च्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उभे असलेले अजित घोरपडे यांचा पराभव करत सलग दोनदा लोकसभेत प्रतिनिधीत्व केलयं. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत माजी मंत्री अजितराव घोरपडे हे कॉंग्रेसचे बंडखोर उमेदवार होते, पण त्याना राष्ट्रवादीनं पाठबळ दिलं होतं.
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी असताना,सुद्धा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या सर्व स्थानिक नेत्यांनी अजितराव घोरपडे यांचा उघड प्रचार केला होता. त्यामुळे ही निवडणुक चुरशीची झाली होती.
2009 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर उभे असणारे प्रतिक पाटील यांना 3 लाख 78 हजार 620 मते मिळाली, तर अपक्ष म्हणून उभे असलेले अजितराव घोरपडे यांना 3 लाख 38 हजार 837 मते पडली. तब्बल 39 हजार 787 मतांनी घोरपडेंचा पराभव करत प्रतिक पाटील यांनी लोकसभा गाठली.
खासदार प्रतिक पाटील यांना वेगवेगळ्या कार चालविण्याची आवड आहे. तसेच चित्रपट पाहणे आणि प्रवासाची आवड आहे. फुटबॉल हा त्यांचा आवडता खेळ आहे.
सध्या युपीए 2 मध्ये त्याच्यांकडे कोळसा राज्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे ते दिल्लीत व्यस्त असतात. मात्र मतदारसंघातील समस्या सोडविण्यात आपल्याला यश आल्याचं ते सांगतायत. सलग दोनदा खासदार असताना केलेल्या कामाच्या जोरावर आपल्याला तिस-यांदा विजय सोपा होईल असा आत्मविश्वास त्यांना वाटतोयं.
एकूणचं काय तर पाटील कुटुंबियाचं सांगली लोकसभा मतदारसंघावर असलेलं वर्चस्व आणि दिल्ली दरबारी असलेलं वजन त्यामुळे आगामी लोकसभेत कॉंग्रेसचे तेच उमेदवार असणार यात काही शंका नाही.
मात्र महागाई, भ्रष्टाचार, मोदी फॅक्टर आणि विकासाच्या मुद्दांवर विरोधकांची रणनिती काय असणार यावर आगामी निवडणुकीचा निकाल अवलंबून असणार आहे. त्यामुळे सांगली मतदारसंघाचा मतदारराजा कॉग्रेसच्या हाताला साथ देत प्रतिक पाटील यांना सलग तिस-यांदा लोकसभेत पाठवतो की आश्चर्यकारक निकाल देतो हे पाहणं औत्युक्याचं ठरणार आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघातील समस्यासहकाराची पंढरी असलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात अनेक समस्यांचा विळखा पडलाय. अनेक सहकारी संस्था एकामागून एक बंद पडतायत. तर मतदारसंघात एकही नवा उद्योग आणला नाही. बेरोजगारांना रोजगारांची संधी उपलब्ध करून देण्यात खासदारांना अपयश आल्याचं दिसून येतयं. रेल्वे सुविधांच्या विस्तारीकरणाचं जाळं तयार करता आलं नाही.
मिरज - पुणे दुहेरी रेल्वे मार्गी लागल्याचं सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्षात कामाला मात्र गती मिळत नसल्याचं चित्र आहे. . विमानतळ आहे, मात्र विमानतळ ही संकल्पना केवळ चर्चे पुरती वाटते. शेतीमाल देशात-परदेशात पोहचविण्यासाठी कार्गो विमानतळाची गरज असताना त्याच्यासाठी गांभीर्यानं विशेष प्रयत्न करत असल्याचं मात्र दिसत नाहीयं.
या मतदारसंघाला काही दिवसांपूर्वी दुष्काळाचा आणि पाणी टंचाईचाही सामना करावा लागला होता. मात्र आमदार असो की खासदार त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात त्यांना अपयश आल्याचं दिसून येतयं. पाणी वाटपाचा आणि जलसिंचनाचा मुद्दाही कळीचा बनलायं.टेंभू जलसिंचन योजनेला अद्याप मंजुरी मिळवता आली नाही, मंजुरी नसल्याने केंद्राचा निधी मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आणि पर्यायाने टेंभू योजनेची कामे रखडली आहेत. मतदारसंघात रेल्वेची समस्या वाढत चाललीयं तर मतदारसंघातून जाणा-या राष्ट्रीय महामार्गांची, रस्त्यांची दुरावस्था झालीयं.
लोकसभेत कॉग्रेसचा खासदार, विधानसभेत काँग्रेस आघाडीचे तीन आमदार आहेत. सांगली जिल्ह्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद जरी जास्त असली तरी तीन विधानसभा मतदारसंघातून तीन आमदार भाजपचे आहेत. महानगरपालिका आणि जिल्हापरिषदेवर दोन्ही कॉँग्रेसची सत्ता असली तरी नागरी सुविधा देण्यात सत्ताधारी अपयशी ठरले आहेत हे मात्र समस्या पाहिल्यावर लक्षात येतं.
कोणत्याही राजकीय पक्षाचा आमदार असो की खासदार रस्ते, पाणी आणि रोजगारासारख्या पायाभूत सुविधा पुरविण्यात अपयशी ठरलेत. विकास करण्याची इच्छाशक्ती कुणाचीही दिसत नाही. सत्ताधारी आणि विरोधकांच्या आरोप- प्रत्यारोपात मतदार मात्र भरडला जातोय.
महागाई, भ्रष्टाचार, स्थानिक विविध प्रश्न आणि विकासाच्या मुद्यांवर आगामी लोकसभा निवडणूकीत मतदार कोणाला साथ देतात आणि कुणाला सत्तेतून पायउतार करायला लावतात हे सर्वस्वी सुजाण मतदारराजाचं ठरवणार.
काँग्रेसचंच वर्चस्व राहिलेल्या या मतदारसंघात तीन टर्म काँग्रेसचे प्रतिक पाटील खासदार म्हणून निवडून आलेत. 2009मध्ये अवघ्या काही हजार मतांनी निवडून आलेले प्रतिक पाटील याहीवेळी निवडून येणार की भाजप बाजी मारणार.
सांगली लोकसभा मतदारसंघ हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघात काँग्रेस अपराजित राहिलेला आहे. या मतदार संघावर माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या घराण्याचं वर्चस्व राहिलंयं. लोकसभेत जरी काँग्रेसचा खासदार राहिला असला तरी विधानसभेत मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीचे तीन आणि भाजपचे तीन आमदार आहेत.
सांगली लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी सांगली विधानसभा मतदारसंघात भाजपचे संभाजी पवार हे आमदार आहेत. मीरज विधानसभा मतदारसंघात भाजपचे सुरेश खाडे तर जत विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्रकाश शेंडगे आमदार आहेत.
तासगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आर.आर. पाटील आमदार आहेत. विटा-खानापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे सदाशिव पाटील हे आमदार आहेत तर पलुस-कडेगाव मध्ये काँग्रेसचे पतंगराव कदम हे आमदार आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादीची सत्ता आहे. राज्यात आणि केंद्रात आघाडीने सरकारमध्ये सत्तेत आहेत. परंतू, स्थानिक मुद्दांवर जिल्हापरिषद आणि नगरपालिका, महानगरपालिकेत मात्र एकमेकांच्या विरोधात उभे राहिल्याचं चित्र पाहायला मिळतं.
केंद्रात आणि राज्यात आघाडीत एकत्र असणा-या काँग्रेस पक्षाला स्वकीय मानल्या गेलेल्या राष्ट्रवादीशी लढावं लागलं होतं. त्यामुळे आगामी निवडणुकीत काय समझौता असणार हे पाहावं लागणार आहे. सत्ताधारी आणि विरोधकांच्या सत्तासंघर्षात सर्वसामान्य जनता मात्र दुबळी झालीयं. विकासाच्या मुद्दांवर निवडणुका लढविल्या गेल्या मात्र सत्ता आल्यावर मात्र विसर पडतो.
सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे खासदार प्रतिक पाटील हे केंद्रात कोळसामंत्री आहे. राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील हे तासगावचे आमदार आहेत तर पलुसचे आमदार पतंगराव कदम हे वनमंत्री आहेत. केंद्रात मंत्रीपद आणि राज्यात दोन कॅबिनेट मंत्री असूनही विकासाच्या बाबतीत हा मतदारसंघ मागेच आहे.
2009 लोकसभा विधानसभेत मदन पाटील, पतंगराव पाटील यांच्या मदतीने लोकसभा गाठणा-या मदन पाटील यांना आगामी लोकसभा सोपी असणार नाही. राष्ट्रवादीचं वाढतं प्राबल्य प्रतिक पाटील यांची डोकेदुखी वाढवणारी ठरणार आहे. अजितराव घोरपडे पुन्हा विरोधकांची मोट बांधून कामाला लागले आहेत. यांगली लोकसभेची 2014 च्या लोकसभेची लढत रंगतदार होणार हे मात्र नक्की.
सांगली मतदार संघातील उमेदवारकाँग्रेस / राष्ट्रवादी – प्रतिक प्रकाशभाऊ पाटील (काँग्रेस)
महायुती – संजयकाका पाटील (भाजप)
आप – समीना खान
बसपा – नाना बांगर
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. •
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, April 4, 2014, 17:02