www.24taas.com, झी मीडिया, शिरूरहिंदवी स्वराज्याचं तोरण उभारणा-या छत्रपती शिवरायांची जन्मभूमी असलेला शिरूर हा मतदारसंघ... केवळ ऐतिहासिकच नव्हे तर विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक वैशिष्ट्यांची पार्श्वभूमी या मतदार संघाला लाभलेली आहे. म्हणूनच इथलं राजकारणही काहीसं निराळं आहे. करून घेऊया ओळख शिरूर मतदारसंघाची…
छत्रपती शिवरायांच्या जन्मापेक्षा मोठी ऐतिहासिक घटना महाराष्ट्राच्या इतिहासात असूच शकत नाही. जुन्नरच्या शिवेवर असलेल्या याच शिवनेरी किल्ल्यावर महाराजांचा जन्म झाला. त्यापुढचा इतिहास सर्वांनाच ठाऊक आहे… केवळ शिवनेरी नव्हे, तर जीवधन, चावंड, हडसर यांसह एकूण ८ किल्ले या परिसरात आहेत, जे मराठ्यांच्या शौर्यशाली इतिहासाची साक्ष देतात. याच परिसरात नाणेघाट आहे… देशावरच्या दळणवळणाचा आणि व्यापार उदिमाचा हा तत्कालीन मार्ग… पेशव्यांच्या इतिहासाचीदेखील किनार या मतदारसंघाला आहे. चासचे चासकर हे पेशव्यांचे सासर, तर शिरूर जवळील आलेगाव पागा म्हणजे पेशव्यांच्या घोड्यांची पागा… स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाबद्दल बोलायचं झालं तर सशस्त्र क्रांतीच्या माध्यमातून बलिदान पत्करलेले शिवराम हरी राजगुरु याच मतदारसंघातील खेडचे. इतिहासाच असा समृद्ध वारसा या मतदारसंघाला लाभलाय.
शिरूर मतदार संघाला धार्मिक तसेच पर्यटनदृष्ट्या मोठं महत्व आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असेलेलं भीमाशंकर, तसेच अष्टविनायकातील लेण्याद्री, ओझर आणि रांजणगाव ही तीर्थक्षेत्र शिरूरमधेच येतात. ज्ञानोबांची आळंदी आणि तुकोबांचं देहू याच मतदारसंघात आहेत. या सगळ्याच्या जोडीला निसर्गाचं भरभरून वरदान लाभलंय. माणिकडोहचं बिबट्या निवारा केंद्र, मळगंगेतील रांजनखळगी. इतकच नाही तर तमाशा पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेलं नारायणगाव हे देखील शिरूरचंच अंग आहे.
ग्रामीण आणि शहरी जीवन संस्कृतीचा मेळ शिरूर मतदार संघात पाहायला मिळतो. मतदार संघाचा ६० % हिस्सा ग्रामीण मध्ये मोडतो, तर ४० टक्के लोकसंख्या शहरी आहे. मतदारसंघाची रचनाच तशी आहे.
पुणे शहरातील हडपसर, पिंपरी चिंचवडमधील भोसरी या मतदारसंघात आहेत.
गेल्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी या मतदारसंघाची पुनर्रचना झाली. पूर्वीचा खेड आता शिरूर मतदारसंघ बनलाय.
या नव्याने तयार झालेल्या मतदारसंघात पूर्वीच्या खेड मधील मुळशी, भोर आणि मावळ वगळण्यात आले आहेत. त्याऐवजी पूर्वी बारामतीमध्ये असलेल्या शिरूर, हडपसर, भोसरीचा त्यात समावेश करण्यात आलाय.राजकीय दृष्ट्या विचार केल्यास प्रदीर्घकाळ कॉंग्रेसच्या पाठीशी राहिलेला हा मतदार संघ मागील २ निवडणुकांपासून शिवसेनेच्या ताब्यात आहे. आश्चर्य म्हणजे पूर्वी शरद पवारांच्या मतदारसंघात असलेले मतदार त्यांचा मतदारसंघ बदलल्यानंतर शिवसेनेला सलग साथ देताहेत.
आताचा शिरूर म्हणजेच पूर्वीचा खेड मतदारसंघ. आणीबाणी नंतरच्या काळाचा विचार केल्यास १९७७ पासून १९९९ पर्यंत, केवळ ८९ चा अपवाद वगळता या मतदारसंघावर कॉंग्रेसचे अधिपत्य होतं.
१९७७ मध्ये कॉंग्रेसच्या अण्णासाहेब मगर काँग्रेसच्या तिकीटावर निवडणून आले तर 1980 मध्ये प्राध्यापक रामकृष्ण मोरेंनी बाजी मारली. १९८४ मध्ये प्राध्यापक रामकृष्ण मोरे पुन्हा निवडून आले होते. १९८९ मध्ये मात्र रामकृष्ण मोरेंची हॅटट्रिक हुकली. जनता दलाच्या किसनराव बाणखेलेंनी त्यांचा पराभव केला. १९९१ मध्ये कॉंग्रेसच्या विदुरा नवलेनी दलाच्या किसान बाणखेलेंचा पराभव करून मतदारसंघ परत मिळवला. १९९६ मध्ये जनता दल सोडून शिवसेनेत गेलेल्या किसन बाणखेलेचा कॉंग्रेसच्या निवृत्ती शेरकरानी पराभव करत पक्षाच्या विजयाची परंपरा कायम ठेवली. १९९८ मध्ये कॉंग्रेसच्या अशोक मोहोळ यांनी शिवसेनेच्या नाना बलकवडे यांचा पराभव केला. १९९९ मध्ये अशोक मोहोळ राष्ट्र्वादीवासी झाले. त्यांनी शिवसेनेच्या किसन बाणखेलेंना हरवले. २००४ मध्ये मात्र या मतदार संघात परिवर्तन घडलं. राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या शिवाजीराव आढळरावांनी राष्टवादीच्या अशोक मोहोळ यांच्यावर निसटता विजय मिळवला. तर २००९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विलास लांडे यांचा पराभव करत शिवाजीराव आढळराव यांनी विजयाची पुनरावृत्ती घडवली. नव्याने निर्माण झालेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात त्यांनी लांडेंना धूळ चारून स्वत:चं स्थान आणखीनच बळकट केलं.
शिरूर, हडपसर,भोसरी, खेड - आळंदी, आंबेगाव, जुन्नर या सहा विधानसभा मतदार संघांचा मिळून शिरूर लोकसभा मतदारसंघ बनतो. आजघडीला या ६ पैकी हडपसर वगळता सर्व ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आहेत.
जिल्ह्याची जिल्हा परिषद, बहुतांश पंचायत समित्या तसेच नगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. राष्ट्रवादीचे जनक आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांचा मतदारसंघात चांगलाच प्रभाव आहे. असं असलं तरी हा लोकसभा मतदारसंघ शिवाजीराव आढळराव पाटलांकडे म्हणजेच पर्यायाने शिवसेनेकडे आहे. याहा राजकीय विरोधाभासच मतदारसंघाच्या प्रगतीमध्ये अडथळा ठरतोय..
गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून स्वत: शरद पवार शिरूर मतदारसंघातून लढणार, अशी चर्चा होती. त्यावेळी माझ्यासमोर ओबामा जरी उभा राहिला तरी मी त्याचं पानिपत करणार अशी डरकाळी खासदार आढळराव पाटलांनी फोडली. दरम्यान पवारांनी आपला मनसुबा बदलला.. आणि आढळरावांनी ती निवडणूक एकतर्फी जिंकली. ओबामांना टक्कर देण्याची हिंमत ठेवणा-या या खासदारांची ओळख करुन घेउयात.....
नाव - शिवाजीराव आढळराव पाटील
जन्म - 8 मे 1956
वय - 57
शिक्षण - पदवीधर
समाजसेवक अण्णा हजारेंचे मानसपुत्र म्हणून आढळरावांची ओळख...शेतकरी कुटूंबात जन्मलेले शिवाजीराव यांचा दांडगा जनसंपर्क ही जमेची बाजू आहे. वाड्या-वस्त्यांवर फिरणारा तसेच प्रत्येकांची आपुलकींने विचारपूस करणारा खासदार अशी त्यांची ख्याती म्हणून की काय राष्ट्रावादीचा किल्ल्यात सलग दोनदा निवडून येण्याची किमया त्यांनी साधलीय.
शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवणा-या आढळराव पाटील यांना 2009मध्ये 4 लाख 82 हजार 563 मते पडली तर राष्ट्रवादीचे विलास लांडे यांना 3 लाख 3 हजार 952 एवढी मते पडली.... आढळरावांनी विलास लांडेचा तब्बल पावणे दोन लाख मतांनी पराभव केला........
उद्योजकतेकडून राजकारणाकडे वळणारे आढळराव पाटील यांनी राजकारण आणि उद्योग यांचा समतोल साधलाय...
खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना वाचनाची तसेच लिखाणाची आवड आहे...शास्त्रीय संगीत ऐकण्याची आवड आहे... क्रिकेट पाहण्याची तसेच प्रवासाचीही आवड त्यांना आहे..
आढळराव आता हॅट्ट्रिक करण्यासाठी सज्ज झालेत... मात्र राजकारणात चित्र कधीही बदलू शकते..त्यामुळे आढळरावांना पुन्हा राष्ट्रवादीचा किल्ला सर करताना नवी रणनीती आखावी लागणार हे मात्र नक्की....
आता पाहूयात खासदार शिवाजीराव आढळराव पाटील कुठे पास झालेत आणि कुठे नापास झालेत....खा.आढळरावांचं रिपोर्ट कार्ड
पास
बैलगाडी शर्यत बंदी उठवण्यात यश
रांजणगाव-आंबेगाव पूल उभारणी
सांस्कृतिक भवनाची उभारणी
बंदिस्त गटार योजना
पुणे-नाशिक लोहमार्गाला मंजुरी
नापास
चाकण विमानतळ प्रकल्प रेंगाळला
पर्यटनासाठी अपुरा पाठपुरावा
दुर्गम भागात सोयीसुविधा नाहीत
वाड्या-वस्त्यांत रस्ते नाहीत
मोठ्या प्रकल्पांची वानवा
शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या समस्याही वेगळ्या आहेत. एका बाजूला दुर्गम आदिवासी भागात पायाभूत सुविधांचा अभाव तर दुस-या बाजूला वाढत्या नागरीकरणाचा ताण, अशी परिस्थिती मतदारसंघात आहे. याशिवाय शेती आणि शेतक-यांचे प्रश्नही आहेत. टाकूया शिरूरकरांच्या समस्यांवर एक नजर....
शिरूरमध्ये एका बाजूला नागरीकरणाचा रेटा आहे, तर दुस-या बाजूला पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य. कुठे वाहतूक कोंडी होते तर कुठे गावापर्यंत पोचण्यासाठी रस्तेच नाहीयेत. भामा-भीमा, इंद्रायणी, घोडनदी या नद्यांसह नाशिक, नगर आणि सोलापूर हायवे या मतदारसंघातून जातात. शेती आणि उद्योग व्यवसायावर याठिकाणचं अर्थकारण चालते. असं असलं तरी सर्वसमावेशक तसेच कायमस्वरूपी विकास साधण्याच्या दृष्टीकोनातून हा मतदार संघ खरोखरच एक आव्हान आहे.
मतदारसंघातील आंबेगाव, खेड आणि जुन्नर तालुक्यातील बहुतांश भाग दुर्गम स्वरूपाचा आहे. या परिसरातील डोंगर द-यांमधे आदिवासींच्या वाड्या वस्त्या आहेत. नेमाने भरपूर पाऊस पडत असला तरी उन्हाळ्यात या ठिकाणी भीषण पाणी टंचाई जाणवते. खाली धरणात पाणी दिसते मात्र हंड्यापर्यंत पोचत नाही अशी इथली स्थिती आहे.
या भागातील रस्त्यांचीही दुर्दशा आहे. कित्येक गावांना पक्के रस्तेच नाहीत, तर कित्येक ठिकाणचे रस्ते म्हणजे अडथळ्यांची शर्यत ठरते. इथल्या लोकांना जीवनावश्यक गोष्टींसह शिक्षण आणि आरोग्याचीही वानवा आहे. सरकारी निधी आणि योजना या लोकांपर्यंत पोचवणं हेच मोठं आव्हान आहे. कांदा, बटाटा तसेच तरकारीचे उत्पादन या परिसरात मोठ्या प्रमाणावर होतं. या पिकांना भाव मिळण्यबरोबरच पीक टिकवण्यासाठी कोल्ड स्टोरेज सारख्या सुविधा उपलब्ध होणं गरजेचं आहे.
मतदारसंघातील उद्योग व्यवसायाची भरभराट ही जमेची बाजू असली तरी ती अनेक बाबतीत स्थानिकांच्या मुळावर उठण्याची शक्यता आहे. औद्योगिक प्रकल्प तसेच विमानतळासारख्या प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर जमिनी संपादित करण्यात येत आहेत. या गोष्टी विकासाच्या दृष्टीकोनातून आवश्यक असल्या तरी त्यात शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये अशी शेतक-यांची अपेक्षा आहे. मतदार संघात ८ मोठे धरण प्रकल्प आहेत. त्याच्या पाण्याचं योग्य वाटप आणि नियोजन गरजेचं आहे.
मतदारसंघात बेरोजगारीचाही प्रश्न मोठा आहे. उद्योग व्यवसाय असो व शेती यासाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हायला हवं . त्यासाठी शिक्षण आणि रोजगाराची योग्य सांगड घालणं गरजेचं आहे. मतदार संघातून जाणाऱ्या महामार्गांवरील वाहतूक हा देखील गंभीर प्रश्न आहे. महामार्गांचं रुंदीकरण सुरु आहे. त्याजोडीने पुणे - नाशिक तसेच पुणे-नगर-जालना लोहमार्गाच्या कामाला गती येणं अतिशय आवश्यक आहे. आरोग्यविषयक सुविधांचीही गरज मोठी आहे.
मतदारसंघात पर्यटन विकासाला मोठा वाव आहे. गड किल्ल्यांसह तीर्थक्षेत्रांच्या विकासावर भर आवश्यक आहे. या मतदार संघातील नारायणगाव परिसरात पूर्वी द्राक्ष शेती मोठ्या प्रमाणावर व्हायची, आता मात्र द्राक्ष बागा आणि त्यावर आधारित वायनरी उद्योग जवळपास संपुष्टात आलाय. हडपसर, भोसरी मधील रेड झोन चा प्रश्न महत्वाचा आहे. हे सगळे प्रश्न सोडव्ण्यासाठीचे यशस्वी प्रयत्न निरंतर सुरु असल्याचा दावा इथले खासदार करतात.
खासदार शिवाजीराव आढळराव पाटलाना जनहिताच्या कामांचा उरक आहे. त्यामुळे मतदारसंघातील बहुतांश प्रश्न मार्गी लागत आहेत. अर्थात सगळेच प्रश्न मिटलेत असं अजिबात नाही. अनेक बाबतीत मतदार संघातील किंबहुना पुणे जिल्ह्यातील राजकारण आड येतं. ते बाजूला ठेवून सर्वच लोकप्रतिनिधींनी व्यापक लोकहित जोपासण्याची नितांत आवश्यक
शिरूर लोकसभा मतदारसंघातील सद्य राजकीयस्थिती काय आहे त्यावर एक नजर टाकूया...
संपूर्ण पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीची सत्ता आहे. असं असलं तरी जिल्यातील ४ पैकी केवळ एकच खासदार राष्ट्रवादीचा आहे. येत्या निवडणुकीत तुल्यबळ उमेदवार देऊन शिरूर लोकसभा काबीज करण्याचा राष्ट्रवादीचा मनसुबा आहे तर सध्याचे शिवसेनेचे खासदार हॅटट्रिक साधण्याच्या तयारीत आहेत. शिरूरचं राजकारण बैलगाडा शर्यतीसारखंच चुरशीचं मात्र रंजक आहे. मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्था तसेच विधानसभा क्षेत्रांवर राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. येत्या निवडणुकीत खासदार आढळराव पाटलांचा वारू रोखायचा असेल तर त्यांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार देणं राष्ट्रवादीसाठी आवश्यक आहे. मात्र तुल्यबळ उमेदवार नसणं, हीच राष्ट्रवादीची मोठी अडचण आहे. अशा परिस्थितीत याच मतदारसंघातील एकेकाळचे आढळरावांचे जिवलग मित्र आणि विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांना मैदानात उतरवण्याची राष्ट्रवादीची तयारी सुरु होती. पण राष्ट्रवादीकडून देवदत्त निकम यांना उमेदवारी देण्यात आली. तर मनसेने शिवसेनने विरोधात दंड थोपटत अशोख खंडेबऱ्हाड यांना राज ठाकरे यांनी मैदानात उतरवलं आहे.
या मतदार संघाची एकूण मतदारसंख्या १६ लाख ३० हजार ४६६ आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात मराठा मतदारांची संख्या मोठी आहे. लोकसंख्येच्या दृष्टीकोनातून त्याखालोखाल माळी आणि धनगर समाज आहे. धर्माचा विचार केला तर सुमारे ७० टक्के हिंदू, उर्वरित 30 टक्के मुस्लिम, बौद्ध समाजाचे मत आहे...
राष्ट्रवादीसाठी ही लढाई केवळ बेरजेच्या राजकारणापुरती मर्यादित नाही. हा त्यांच्या अस्मितेचा प्रश्न आहे.
अशा परिस्थितीत आढळरावांनाच राष्ट्रवादीकडून लढवलं जाऊ शकतं, अशाही बातम्या अधूनमधून येत असतात.
शिवाजीराव आढळरावांनी हा आरोप सपशेल फेटाळून लावलाय...
मतदारसंघातील विकासकामे आणि तसेच जनसंपर्काच्या जोरावर शिरूरमध्ये खासदारकीची हॅटट्रिक साधणार असा आत्मविश्वास त्यांना आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघ आज जरी शिवाजीराव आढळरावांचा बालेकिल्ला बनलेला असला तरी जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते गजानन बाबर, नीलम गोऱ्हे यांच्यासोबत त्यांचं फारसं सख्य नाही..
शिवाय राष्ट्रवादीनंही या मतदारसंघ काबीज करण्यासाठी कंबर कसलीय...
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. •
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, April 4, 2014, 11:41