www.24taas.com, झी मीडिया, दक्षिण मुंबई ज्यांच्या एका इशा-यावर अख्खी मुंबई बंद व्हायची, ते झुंजार कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांना निवडून देणारा हा मतदारसंघ आहे.
दक्षिण मुंबई... गेट वे ऑफ इंडिया अर्थात भारताचं पश्चिमेकडील प्रवेशद्वार.. ब्रिटीश राजवटीच्या खाणाखूणा पावलोपावली अंगावर बाळगणारा हा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचा भाग. मुंबईचं नाव ज्यावरुन पडलं, ती मुंबादेवी याच भागांत आहे.
भारताचं आर्थिक केंद्र असलेल्या या मतदारसंघात जगातील आणि देशातील नामवंत कंपन्यांची, बँकांची कार्यालये आहेत.
एवढंच नाही 200 वर्षांपेक्षा जास्त जुनी नौदल गोदी, मुंबई पोर्ट ट्रस्ट, मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेची मुख्यालये दक्षिण मुंबईची शान आहेत.
मुंबईची जुनी पण आता पुसत चाललेली ओळख असलेल्या जुन्या चाळी आणि बंद पडलेल्या गिरण्या ही देखील दक्षिण मुंबई मतदारसंघाची खास वैशिष्ट्यं आहेत.
आर्थिक केंद्र असल्यानं 26/11 च्या हल्ल्यासाठी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी टार्गेट केलं ते दक्षिण मुंबईलाच.
राज्याचा गाडा चालवणारं मंत्रालय, परदेशी नागरिक, उच्चभ्रुंची वस्ती, भारतातील अतिश्रीमंत वर्ग मोठ्या संख्येनं असलेल्या या मतदारसंघात मच्छिमारा-यांच्या वस्त्यांबरोबरच जुन्या चाळी तसेच गरीब आणि मध्यवर्गींय मतदारांची संख्याही मोठी आहे.
२००९ च्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर मलबार हिल, कुलाबा, भायखळा, वरळी, शिवडी, मुंबादेवी मिळून दक्षिण मुंबई मतदारसंघ बनला आहे.
एकेकाळचे काँग्रेसचे मातब्बर, पॉवरफुल नेते सदाशिवराव पाटील ऊर्फ स. का. पाटील आणि झुंजार कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांनी प्रतिनिधित्व केलेल्या या मतदारसंघाचे सध्याचे खासदार आहेत काँग्रेसचे मिलिंद देवरा.
दक्षिण मुंबई मतदारसंघात एकूण 15 लाख 89 हजार 811 मतदार आहेत. यापैकी पुरुष मतदार 9 लाख 4 हजार 733 आहेत तर महिला मतदारांची संख्या 6 लाख 85 हजार 78 एवढी आहे.
या मतदारसंघाने कुठल्याच एका पक्षावर कायम विश्वास टाकलेला नाही. १९७७ ला रतनसिंह राजदा भारतीय लोक दल आणि त्यानंतर १९८० ला भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडून आले. त्यानंतर काँग्रेस आणि भाजपची या मतदारसंघात कायम रस्सीखेच सुरू राहिली.
१९८४ , १९८९ , १९९१ ला काँग्रेसचे मुरली देवरा, १९९६ ला भाजपच्या जयवंतीबेन मेहता, १९९८ पुन्हा मुरली देवरा, १९९९ ला जयवंतीबेन मेहता आणि त्यानंतर २००४ मध्ये काँग्रेसचे मिलिंद देवरा ह्यांनी या मतदारसंघात काँग्रेसला विजय मिळवून दिला. 2009 मध्ये शिवसेना आणि मनसेच्या मतांची विभागणी मिलिंद देवरांच्या पथ्यावर पडली.
उच्चभ्रु, मध्यवर्गीय आणि झोपडीवासीय अशा सर्व स्तरांतील मतदार इथं राहतात. या मतदारसंघावर कुणा एका पक्षाचं वर्चस्व नाही. त्यामुळं आगामी निवडणुकीत काँग्रेसचे मिलिंद देवरा हॅटट्रिक करणार का, शिवसेना-मनसेतल्या साठमारीचा फायदा कुणाच्या पथ्यावर पडणार, यावर इथली पुढची गणितं अवलंबून आहेत.
काँग्रेस नेते मुरली देवरांचे पुत्र अशी पूर्वी ओळख असणा-या खासदार मिलिंद देवरांनी आता स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केलीय. माहिती व तंत्रज्ञान आणि नौकायन खात्याचे राज्यमंत्री असलेले मिलिंद देवरा राहुल ब्रिगेडच्या किचन कॅबिनेटमधील खास सदस्य आहेत.
खासदार मिलिंद मुरली देवरा
जन्म - ४ डिसेंबर १९७६
वय - ३७
शिक्षण - बीएसस्सी इन बिझिनेस अँडमिनिस्ट्रेशन
काँग्रेसचे मिलिंद देवरा हे कॉस्मोपोलिटन दक्षिण मुंबई मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतायत. काँग्रेसचे युवा नेते म्हणून गणले जाणारे मिलिंद देवरांनी २००४ मध्ये पहिली निवडणूक लढवली ती थेट लोकसभेचीच... पहिल्याच दमात त्यांनी दक्षिण मुंबई आपल्या नावावर केली.
नवख्या मिलिंद देवरांनी भाजपाच्या जयवंतीबेन मेहता यांचा अवघ्या १० हजार मतांनी पराभव करत सगळ्यांनाच धक्का दिला होता. २००९ च्या लोकसभा निवडणुकीतही ते विजयी झाले. मनसे विरूद्ध शिवसेना भांडणात मिलिंद देवरांचा लाभ झाला.
2009 च्या लोकसभा निवडणुकीत मिलिंद देवरा यांना 2 लाख 72 हजार 411 मते मिळाली, तर बाळा नांदगावकर यांना 1 लाख 59 हजार 729 मते मिळाली. मनसेच्या बाळा नांदगांवकर यांचा सव्वा लाख मतांनी पराभव करत या मतदारसंघावर काँग्रेसचा झेंडा त्यांनी कायम ठेवला.
काँग्रेसच्या वरच्या वर्तुळातील नेते आणि गांधी घराण्याच्या जवळचे अशी मुरली देवरांची ओळख आहे. त्यांचा वारसा मिलिंद देवरा यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सक्षमपणे चावला आहे.
दक्षिण मुंबई हीच कर्मभुमी असलेले मिलिंद देवरा हे राज्यमंत्री असून मुंबईत चर्चगेटजवळ रहातात. दिल्लीत त्यांचे वास्तव्य हुमायून रोडवरील निवासस्थानी असते.
मिलिंद देवरा यांना संगीत ऐकण्याची आवड आहे. त्यामध्ये शास्त्रीय संगीत त्यांना जास्त आवडतं. प्रवासाची आवड असलेल्या मिलिंद देवरा यांना स्क्वॅश आणि पोहण्याची आवड आहे. शिवाय गिटार वाजवण्यातही त्यांचा हात कुणी धरणारं नाही.
स्पर्श या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून एक लाखापेक्षा जास्त गरीब विद्यार्थ्यांना संगणकीय प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम सध्या ते राबवत आहेत.
खा. मिलिंद देवरा यांची स्थावर मालमत्ता ३५ लाख ७४ हजार ५६७ रुपयांची आहे तर जंगम मालमत्ता १७ कोटी १७ लाख ९८ हजार ५७५ रुपये एवढी आहे.
येत्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा खासदार मिलिंद देवरा ह्यांनाच तिकीट मिळणार आहे यात शंका नाही. मिलिंद देवरा ह्यांची हॅट्रीक ऱोखण्यासाठी सेना-भाजपाने कंबर कसलीय.
मतदारसंघातली सध्याची राजकीय परिस्थितीकाँग्रेसच्या ताब्यात असलेला दक्षिण मुंबईचा गड पुन्हा जिंकण्यासाठी शिवसेना-भाजपसह मनसेनेही जोरदार फिल्डिंग लावलीय.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व असलं तरी ते स्थान डळमळीत करण्यासाठी शिवसेना, भाजपसह मनसेनेही फिल्डिंग लावलीय.. गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मागे टाकत, मनसेने दुस-या क्रमांकावर झेप घेतली होती. विधानसभा मतदारसंघातील संख्याबळ पाहिलं तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे वर्चस्व स्पष्ट होतं. या मतदारसंघात शिवसेनेचा एकही आमदार निवडून आलेला नाही.
कुलाबा विधानसभा मतदारसंघामध्ये अँनी शेखर, मुंबादेवी मतदारसंघामध्ये अमिन पटेल आणि भायखळा मतदारसंघात मधुकर चव्हाण असे तिघे काँग्रेसचे आमदार आहेत. वरळी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे सचिन अहिर निवडून आलेत. मलबार हिल मतदारसंघामध्ये भाजपाचे मंगलप्रभात लोढा तर शिवडीमध्ये मनसेचे बाळा नांदगांवकर आमदार आहेत.
दक्षिण लोकसभा मतदारसंघात खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या तीन आमदारांच्या सहाय्याने मुस्लिमबहुल आणि हिंदी भाषिक पट्ट्यात चांगला संपर्क ठेवलाय. असं असलं तरी शिवडी, लालबाग, परळ, भायखळा भागातील मराठी मतदार आणि मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबामधील बहुसंख्य गुजराती भाषिक महायुतीच्या बाजुने उभे राहतात की, गेल्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे मनसेला साथ देतात यावर आगामी लोकसभा निवडणुकीचे चित्र अवलंबून असणार आहे.
शिवसेनेच्या वतीने अरविंद सावंत ह्यांनी या मतदारसंघात निवडणुकीची तयारी सुरुवात केलीय.. तर आपलं तिकीट कापलं गेल्याची खात्री झाल्यानं शिवसेना नेतृत्वावर आगपाखड करत शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांनी बंडाचं निशाण फडकवंलय.
परंतु त्यांच्या या बंडामुळे दक्षिण मुंबईतील शिवसेनेच्या ताकदीत चिमूटभरही फरक पडणार नाहीय. मात्र ही जागा भाजपच्या पारड्यात जावी, यासाठीही खटाटोप सुरू आहेत. भाजपतर्फे अभिनंदन लोढा यांच्या नावाची चर्चा सुरूय.. त्यामुळे सेना-भाजपामध्येच मतदारसंघात जुंपण्याची शक्यता आहे.
मनसेने आपले पत्ते अजून उघड केलेले नाहीत... शिवसेनेतून हकालपट्टी झालेले मोहन रावले हे मनसेत प्रवेश करणार, अशी चर्चा आहे. गेल्यावेळी लोकसभा निवडणूक लढवणारे बाळा नांदगावकर यंदा लोकसभेसाठी इच्छूक नसल्याचं समजतं... मात्र कुणीही उमेदवार असला तरी पुन्हा एकदा याठिकाणी तिरंगी लढतच रंगणार आहे.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघातील समस्यादक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघातील जुन्या इमारतींचा प्रश्न गेले कित्येक वर्ष कायम आहे. तर गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न आणि बीडीडी चाळींच्या पुनर्विकासानं मुंबईतील राजकारण ढवळून निघालंय. या आणि अशा अनेक समस्या या मतदारसंघात आहेत.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात १६,००० पेक्षा जास्त जुन्या उपकरप्राप्त इमारती आहेत. यापैकी निम्म्यापेक्षा जास्त इमारती ५० वर्षांपेक्षा जास्त जुन्या आहेत. त्यातच जुन्या आणि धोकादायक इमारती कोसळण्याच्या घटना मुंबई आणि परिसरात वारंवार घडत आहेत. गगनचुंबी इमारतींमुळं दक्षिण मुंबईची वेगळी ओळख निर्माण होत असतांना जुन्या इमारतींच्या प्रश्नावर अजुनही तोडगा निघू शकलेला नाही.
ब्रिटीशांनी कैद्यांना ठेवण्यासाठी बीडीडी चाळी बांधल्या.. आज या इमारतींमध्ये लाखो रहिवाशी रहात आहेत. ९० वर्षांपेक्षा जास्त जुन्या जालेल्या बीडीडी चाळींच्या पुनर्वसनाचा प्रश्न गेले काही दिवस पद्धतशीरपणे राजकारण्यांनी चघळत ठेवला आहे. मात्र या समस्येचं उत्तर दुस-यांदा निवडून आलेले इथले खासदार अजुनही देऊ शकलेले नाहीत.
या लोकसभा मतदारसंघातील लालबाग-परळ हा भाग एकेकाळी मुंबईची शान गिरणगांव म्हणून ओळखला जायचा. मात्र गिरणी संपानंतर अस्तित्वासाठी धडपडण्याची वेळ गिरणी कामगारांवर आली. आता हक्काची घरं मिळवण्यासाठी गेली अनेक वर्षे गिरणी कामगार संघर्ष करत आहेत.
रस्ते वाहतुकीची समस्या या भागातील प्रमुख समस्या आहे. अशा अनेक समस्या कायम असतांना खासदार मिलिंद देवरा मात्र बरीच कामे केल्याचा दावा करतायत.
मुंबईतील सर्वात जास्त घनतेची लोकवस्ती असलेला हा मतदारसंघ सर्वात जास्त आणि न सुटलेल्या समस्यांनी बेजार झाला आहे. ज्या मतदारसंघात महाराष्ट्राचं मंत्रालय आहे, जिथून अख्ख्या महाराष्ट्राचा गाडा हाकला जातो, मुंबई महापालिकेचं मुख्यालय जिथं आहे, तिथल्या सामान्य नागरिकांच्या समस्या मात्र वर्षानुवर्षे तशाच कायम आहेत.
दक्षिण मुंबई मतदारसंघातील उमेदवार1)काँग्रेस / राष्ट्रवादी – मिलिंद देवरा (काँग्रेस)
2)महायुती – अरविंद सावंत (शिवसेना)
3)मनसे – बाळा नांदगावकर
4)आप – मीरा सन्याल
व्हिडिओ – •
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. •
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, April 4, 2014, 17:38