www.24taas.com, झी मीडिया, ठाणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या सर्वात आवडता मतदारसंघात ठाणे.... पुनर्रचनेपूर्वी लोकसंख्येनुसार भारतातील दुसरा सर्वात मोठा असा हा मतदारसंघ... साधा नगरसवेकही नसलेल्या सामान्य शिवसैनिकाला चार वेळा संसदेत पाठवणारा हा मतदारसंघ......
तलावांचं शहर अशी ओळख असलेलं ठाणे हे अतिशय जुनं शहर आहे... मध्ययुगीन काळातील शिलालेखात आणि ताम्रपटात ठाणे शहराचे उल्लेख आहेत. इटालियन प्रवासी मार्को पोलोने 1290 मध्ये ठाण्याला भेट दिल्याचा उल्लेख इतिहासात आहे. पोर्तुगीजांनी या शहरावर सुमारे 200 वर्षे राज्य केले. 1784 पासून हे शहर इंग्रजांकडे गेलं... ब्रिटिशांच्या दूरदृष्टीनेच 1853 मध्ये मुंबई-ठाणे दरम्यान पहिली रेल्वे धावली होती. या शहराला मोठा सांस्कृतिक वारसा लाभलाय... गडकरी रंगायतन ही या शहराची शान आहे. नुकत्याच पार पडलेल्या दहीहंडीच्या उत्सवाला ग्लोबल स्वरूप देण्याचं श्रेयही ठाणेकरांनाच आहे. कुंजविहार आणि राजमाताचा वडापाव, मामलेदार मिसळ आणि टिप-टॉपच्या मिठाईची चव ज्याने चाखली नाही, असा माणूस शोधून सापडणार नाही.
मुंबईसारखंच ठाणे हे देखील महत्त्वाचं बंदर होतं. इथं झपाट्यानं औद्योगिक वसाहती वाढल्यानं या शहराचं चित्रच पालटून गेलं. मुंबईची धाकटी बहिण म्हणून सुनियोजित नवी मुंबई शहराचा आराखडा सिडकोने आखला... पण आता हा डोलारा कोसळू लागलाय... जी गत मुंबईची झालीय, तीच ठाणे आणि नवी मुंबईचीही... उंचच्या उंच बिल्डिंग, भपकेबाज मॉल्स, नेहमी गजबजलेले रस्ते... चालायलाही जागा नाही असं रेल्वे स्टेशन... खच्चून भरलेल्या माणसांना घेऊन जाणा-या बसेस ही ठाण्याची नवी ओळख....
ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर या तीन शहरांचा मिळून हा ठाणे लोकसभा मतदारसंघ बनलाय...
ठाणे लोकसभा मतदारसंघात 2009 मध्ये 18 लाख 6 हजार 803 मतदार होते. यांपैकी 8 लाख 8 हजार 11 महिला, तर 9 लाख 98 हजार 792 पुरुष मतदार आहे....
पुनर्रचनेआधी हा मतदारसंघ शिवसेनेचा गढ होता. ठाण्याची शिवसेना आणि शिवसेनेचं ठाणं, अशी शिवसेनेची घोषणाच होती. परंतु सध्या या गडावर राष्ट्रवादी काँग्रेसचं नाईक घराणं राज्य करतंय. अगदी सुरुवातीला प्रजा समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट पार्टी आणि काँग्रेसचे खासदारही इथून निवडून आले होते.
जनसंघाच्या मुशीत घडलेल्या रामभाऊ म्हाळगींनी 1977 साली भारतीय लोकदलाच्या आणि 1980 मध्ये जनता पार्टीच्या तिकिटावर लोकसभा गाठली. त्यांच्या निधनांतर 1981 ला झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे जगन्नाथ पाटील विजयी झाले. 1984 साली काँग्रेसच्या शांताराम घोलपांनी बाजी मारली... 1989 आणि 1991 मध्ये भाजपच्या राम कापसेंनी इथून लोकसभा जिंकली. त्यानंतर या मतदारसंघावर शिवसेनेने कब्जा केला. 1996 पासून 2004 पर्यंत प्रकाश परांजपेनी लागोपाठ चारवेळा शिवसेनेचा भगवा फडकवला. त्यांच्या निधनानंतर 2008 मध्ये पोटनिवडणुकीत त्यांचे पुत्र आनंद परांजपेही खासदार झाले. 2009 च्या निवडणुकीत परांजपे कल्याणला शिफ्ट झाले आणि भगवा खाली उतरला. राष्ट्रवादी काँग्रेसचे संजीव नाईक हे ठाण्याचे विद्यमान खासदार आहेत.
विधानसभा मतदारसंघातील संख्याबळ पाहिलं तर शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसने मुसंडी मारल्याचं जाणवतं.
ठाण्यातून राजन विचारे, कोपरी-पाचपाखडीमधून एकनाथ शिंदे आणि ओवळा-माजीवड्यातून प्रताप सरनाईंक हे शिवसेनेचे तीन आमदार निवडून आलेत. तर मीरा-भाईंदरमधून राष्ट्रवादीचे गिल्बर्ट मेंडोन्सा, ऐरोलीतून संदीप नाईक आणि बेलापूरमधून उत्पादन शुल्कमंत्री गणेश नाईक हे तिघे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत.
मुलगा खासदार, दुसरा मुलगा आमदार तर वडिल मंत्री आणि आमदार अशी नाईकांची घराणेशाही सध्या इथं राज्य करतंय...
कोणत्याही एका पक्षाची पूर्ण सत्ता नसल्याने ना घर ना घाट का, अशी ठाणे मतदारसंघाची अवस्था झालीय... सुसंस्कृत म्हणून ओळखलं जाणा-या ठाणेकरांच्या नाड्या निर्ढावलेल्या राजकारण्यांच्या हातात आहेत... राजकीय नेतृत्व आहे, पण त्यांच्याकडे विकासाची दूरदृष्टीच नसल्याने ठाण्याला ओंगळवाणं रूप आलंय...
ठाणे लोकसभा मतदारसंघात कोणाचं किती मतदान आहे त्यावर एक नजर टाकूया...ठाणे मतदारसंघात हिंदू धर्मिय मतदारांची प्रमाण 70 टक्के आहे. आग्री-कोळी समाजाचा त्यात प्रामुख्याने समावेश होतो. मुस्लिम 14 टक्के, दलित 10 टक्के, ख्रिश्चन 4 टक्के, जैन 4 टक्के अशी मतदारांची वर्गवारी आहे. परप्रांतियांची संख्याही ठाण्यात लक्षणीय म्हणजे 30 टक्क्यांपर्यंत आहे.
मुस्लिम - 14
दलित -10
ख्रिश्चन -4
जैन -4
परप्रांतीय -30
निवडून आले की, खासदार गायब होतात... त्यांचे दर्शन पुन्हा होते ते निवडणुकांच्या तोंडावरच... पण पूर्वीच्या काळी पत्र्याची बॅग घेवून ठाणे रेल्वे स्टेशनवर, जनतेची निवदनं स्वीकारणारे, रामभाऊ म्हाळगींसारखे खासदार याच मतदारसंघाने दिलेत... आता ठाण्याचे सध्याचे खासदार कसे आहेत, ते पाहुयात...
जन्म - 15 एप्रिल 1972
वय - 41
शिक्षण - पदव्युत्तर
शिवसेनेत असल्यापासून ते अगदी आजतागायत गणेश नाईकांनी सॅटेलाइट सिटी अर्थात नवी मुंबई कायम आपल्या रेंजमध्ये ठेवली... त्यांच्याच नेटवर्कचा फायदा पुत्र संजीव नाईक यांना 2009 च्या लोकसभा निवडणुकीत झाला. ठाण्याचे पालकमंत्री गणेश नाईकांनी आपले पुत्र डॉ. संजीव नाईक यांना खासदार बनवले. शिवसेनेच्या ताब्यातील ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसने काबीज केले. वयाच्या 23 व्या वर्षी नवी मुंबईचे सर्वात तरूण महापौर झालेले संजीव नाईक वडिलांच्या मुशीत घडलेत...
2008 मध्ये प्रकाश परांजपे यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे पुत्र आनंद परांजपे यांनी संजीव नाईक यांना पराभूत केले होते. परंतु मतदारसंघ पुनर्रचनेनंतर खासदार आनंद परांजपे कल्याणवासी झाले आणि 2009 मध्ये संजीव नाईकांनी शिवसेनेचा गड भेदण्यात यश मिळवले.
2009 मध्ये संजीव नाईकांनी शिवसेनेच्या विजय चौगुलेंचा पराभव केला. त्यांना 3 लाख 1 हजार मते पडली, तर चौगुलेंना 2 लाख 51 हजार 980 मते मिळाली. मनसेच्या राजन राजे यांनी तेव्हा 1 लाख 34 हजार 840 मते घेतली होती. मनसेमुळे राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर ठाण्यात झाला.
खासदार डॉ. संजीव नाईक यांना राजकारणाचे बाळकडू वडिलांकडून मिळालेय. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत, ते काम करतायत. गेल्या चार वर्षांत खासदार म्हणून आपण लोकांसाठी खूप काही केलंय, असा खा. नाईक यांचा दावा आहे.
संजीवजी, आपण काहीही म्हणालात तरी ये पब्लिक सब जानती है... वडिलांच्या पुण्याईवर पहिल्यांदा ते निवडून आले. पण मतदारसंघावर पक्की मांड ठोकायची असेल तर संजीव नाईकांना आणखी बरीच मेहनत घ्यावी लागेल...
ठाणे मतदार संघातील समस्याएक ना अनेक समस्यांच्या विळख्यात ठाणे सापडलंय... शिवसेनेच्या काळातही समस्या सुटल्या नव्हत्या आणि आता राष्ट्रवादीचा खासदार असतानाही मतदारांची गा-हाणी कायम आहेत...
मुंबईजवळचं शहर म्हणून लोक ठाण्यात स्थायिक झाले. पण या शहराची सध्या पुरती वाट लागलीय... दररोज धडकणारे माणसांचे लोंढे... वाहतुकीची कोंडी, रेल्वेसेवेचा वाजलेला बो-या, झोपड्यांची बजबजपुरी अशा एक ना अनेक समस्यांनी विळख्यात ठाणे मतदारसंघाला विळखा घातलाय...
रस्ते आणि फूटपाथवर फेरीवाल्यांनी केलेला कब्जा, रस्ते अडवून होणारे वाहनांचे पार्किंग, अरूंद रस्त्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी, ध्वनी आणि वायू प्रदूषण, रिक्षावाल्यांची अरेरावी, प्रवासी वाहतुकीचा खेळखंडोबा यामुळे जीव अक्षरश: घुसमटतोय.
ठाणे, कळवा मतदारसंघातून लाखो प्रवासी रोज प्रवास करतात... रेल्वेला सर्वाधिक उत्पन्न देणा-या ठाण्याला रेल्वे प्रशासनाकडून मात्र सावत्र वागणूक मिळतेय..
ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर अशा तीन महापालिका या मतदारसंघाच्या अखत्यारीत येतात. पण महापालिकांच्या कासवछाप कारभारामुळे ठाण्यातील जनता मेटाकुटीला आलीय..
20-25 वर्षांपूर्वी उभ्या राहिलेल्या असंख्य इमारती आता मोडकळीस आल्या आहेत. पण त्यापैकी अनेक इमारती अनधिकृत असल्याने त्यांच्या पुनर्बांधणीत अनंत अडचणी निर्माण झाल्यात. त्यामुळं सुमारे 20 ते 25 हजार कुटुंबे अक्षरश: जीव मुठीत धरून जगत आहेत.
सुनियोजित शहर म्हणून ओळखण्यात येणारं नवी मुंबईही लोकसंख्येचा ताण सहन करू शकत नाहीय.. तिथंही अनधिकृत चाळी आणि इमारती उभ्या राहिल्यात...
ठाण्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेत... गुन्हेगारीने डोके वर काढलेय... अनेक छोट्या-मोठ्या गुंडांची या भागात दहशत आहे. दहशतीच्या जोरावर झोपडपट्ट्या उभारणे, अनधिकृत चाळी, इमारती उभ्या करणे असे अनेक गैरप्रकार या भागात वाढलेत.
ठाणे मतदारसंघातील समस्यांचा पाढा इथंच संपत नाही..... पायाभूत सुविधांचा अभाव, बेरोजगारी ही देखील डोकेदुखी ठरतेय...
ठाणेकरांच्या या समस्यांची जाणीव एव्हाना खासदार संजीव नाईकांना झाली असेल. त्यांची खासदारकीची ही पहिलीच टर्म आहे. शिवसेनेकडून ही जागा राष्ट्रवादीकडे आल्यानं आता संजीव नाईकांची जबाबदारी आणखी वाढलीय. पुन्हा लोकसभेवर जायचं असेल तर आधी मतदारांची ही गा-हाणी त्यांना सोडवावी लागतील...
ठाणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार दुस-यांदा कधीच निवडून येत नाही. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे संजीव नाईक हे याला अपवाद ठरणार का... ठाण्यातील राजकीय सद्यस्थितीचा घेतलेला हा वेध...
शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणा-या ठाणे मतदारसंघात राष्ट्रवादीनं चांगलंच बस्तान बसवलंय..... 2009 मध्ये शिवसेनेचं ठाणं काबीज केल्यानंतर आता 2014 च्या निवडणुकीत आपला वरचष्मा कायम राखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं कंबर कसलीय...
ठाण्याचे पालकमंत्री गणेश नाईक, विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष जीतेंद्र आव्हाड यांनी ठाण्याचा गड अबाधित राखण्यासाठी मोर्चेबांधणी केलीय... तर मागच्या पराभवाचा वचपा काढून पुन्हा एकदा गड जिंकण्यासाठी शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे, आ. प्रताप सरनाईक आणि विजय चौगुले यांनीही शर्थीचे प्रयत्न सुरू केलेत.
तीन बड्या महापालिकांचा समावेश या मतदारसंघात होतो. यापैकी नवी मुंबईत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे. मिरा भाईंदरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं वर्चस्व आहे... ठाणे महापालिका सेनेकडे असली तरी तिथं शिवसेनेला अगदी काठावरच बहुमत आहे. त्यामुळे गमावलेलं ठाणं पुन्हा मिळवण्यासाठी शिवसैनिकांना चांगलाच घाम गाळावा लागणार आहे...
ठाणे ही शिवसेनेची दुखरी जखम आहे. गमावलेलं ठाणं मिळवण्यासाठी शिवसेनेची धडपड आहे, तर राष्ट्रवादीची टिकटिक सुरू राहावी, यासाठी सगळे घड्याळजी लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणूक कमालीची चुरशीची होणार आहे.
ठाणे ही शिवसेनेची दुखरी जखम आहे. गमावलेलं ठाणं मिळवण्यासाठी शिवसेनेची धडपड आहे, तर राष्ट्रवादीची टिकटिक सुरू राहावी, यासाठी सगळे घड्याळजी लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणूक कमालीची चुरशीची होणार आहे.
गेल्या निवडणुकीत लढत ठाणे मतदारसंघाची असली तरी ती रंगली दोन नवी मुंबईकर उमेदवारांमध्ये... नवी मुंबईकर खासदार नाईकांना शह देण्यासाठी सेनेला यावेळेस तोडीस तोड उमेदवार द्यावा लागेल.. तरच वाघाला ठाण्य़ात डरकाळी फोडता येईल...
व्हिडिओ –•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. •
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, April 4, 2014, 11:45