www.24taas.com, झी मीडिया, वर्धाराष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांचा वारसा घेऊन चालणारा जिल्हा म्हणजे वर्धा... महात्मा गांधींनी वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमातून स्वातंत्र्य चळवळीच्या अनेक आंदोलनांना सुरुवात केली. १९३६पासून बराच काळ बापूंचे वास्तव्य सेवाग्राम आश्रमात होते. त्यामुळं वर्ध्यात अजूनही पूर्ण दारूबंदी आहे.
आचार्य विनोबा भावेंनी त्यांच्या पवनार आश्रमातूनच सुप्रसिद्ध भूदान चळवळीचा प्रारंभ केला. असा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वर्धा मतदारसंघाचे देशाच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात देखील तितकेच महत्वाचे योगदान आहे. मात्र महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या आश्रमांमुळे पावन झालेल्या या जिल्ह्याचे राजकारण मात्र उलट्या दिशेने सुरु आहे. राजकारणामुळेच हा मतदारसंघ विकासापासून कोसो मैल दूर आहे.
एकेकाळचे पवारांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे दत्ता मेघे सध्या वर्ध्याचे खासदार आहेत... वर्धा मतदारसंघावर तसा पूर्वापार काँग्रेसचा पगडा होता... मात्र १९९१ला कम्युनिस्ट पक्षानं पहिल्यांदा इथं काँग्रेसला धक्का दिला होता.
१९५१ मध्ये वर्ध्याचे पहिले खासदार म्हणून काँग्रेसचे नारायण अग्रवाल निवडून आले होते. त्यानंतर १९५७, १९६२ आणि १९६७ मध्ये कमलनयन बजाज लोकसभेवर विजयी झाले. १९७१मध्ये काँग्रेसचे जगजीवनराम कदम तर १९७७मध्ये संतोषराव गोडे वर्ध्याचे खासदार होते... एकेकाळचे काँग्रेसचे मातब्बर नेते वसंत साठे यांनी १९८०, १९८४ आणि १९८९ असे सलग तीनवेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं...
मात्र काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात १९९१ मध्ये अनपेक्षितपणे कम्युनिस्ट पक्षाचे रामचंद्र घंगारे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत साठे यांचा पराभव केला. १९९६ मध्ये भारतीय जनता पार्टीचे विजय मुडे यांनी इथून बाजी मारली. मात्र १९९८ला दत्ता मेघेंनी काँग्रेसला पुन्हा एकदा हा किल्ला काबीज करून दिला. परंतु शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर मेघे आपल्या नेत्यासोबत राष्ट्रवादीत गेले.
१९९९मध्ये काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा प्रभा राव यांनी इथून काँग्रेसचा हात कायम ठेवला. २००४मध्ये भारतीय जनता पार्टीचे कमळ पुन्हा एकदा या मतदारसंघात फुललं. सुरेश वाघमारे यांनी भाजपला हा मतदारसंघ जिंकून दिला. २००९मध्ये पुन्हा काँग्रेसवासी झालेल्या दत्ताभाऊंनी वर्ध्यातून निवडणूक जिंकली.
वर्धा लोकसभा मतदारसंघात वर्धा, हिंगणघाट, देवळी, आर्वी हे वर्धा जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघ येतात. तर अमरावती जिल्ह्यातील मोर्शी आणि धामणगाव रेल्वे या विधानसभा मतदारसंघांचा पुनर्रचनेनंतर वर्ध्यामध्ये समावेश करण्यात आला आहे..
गेल्या सहा लोकसभा निवडणुकांमध्ये प्रत्येकवेळी इथल्या मतदारांनी नव्या खासदाराला पसंती दिलीय. दत्ताभाऊंनी यावेळेस आपण निवडणूक नसल्याचं सुतोवाच केलं आणि आपल्या मुलाला उमेदवारी मिळवून दिलीय. त्यामुळे पुन्हा एक नवा खासदार वर्धाकरांना मिळणार, असं सध्या तरी दिसतंय.
भारतातील सर्वात मोठ्या औद्यागिक घराण्यांपैकी बजाज घराण्याचे संबंध या मतदारसंघाशी जुळलेले आहेत. कमलनयन बजाज सलग तीनवेळा या मतदारससंघातून निवडून आलेत.
अशा या मतदारसंघाचे सध्याचे खासदार दत्ता मेघे यांची पुन्हा ओळख करून घेऊया... > नाव - दत्ता राघोबाजी मेघे
> जन्म - 11 नोव्हेंबर 1936
> वय - 77
> शिक्षण - बीए
पूर्व विदर्भातील सर्वात ताकदवर काँग्रेस नेता म्हणून दत्ता मेघे यांची ओळख.... ११ नोव्हेबर १९३६ला वर्धा जिल्ह्यातील पवनारमध्ये सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले दत्ता मेघे यांचं बालपण अतिशय गरीबीत गेलं. मात्र आता विदर्भातील शिक्षणस्रमाट म्हणून त्यांनी आपली एक वेगळी ओळखही निर्माण केलीय..
१९७८ला प्रथम ते विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आले. १९७८ ते १९८० दरम्यान ते अन्न व नागरी पुरवठा तसेच गृहनिर्माण खात्याचे राज्यमंत्री होते. १९८४ ते १९८६ दरम्यान विधान परिषदेत ते विरोधी पक्षनेते होते. १९९१मध्ये वन आणि उर्जा मंत्रीपदही त्यांनी भूषवलं. १९९१मध्ये पहिल्यांदा ते खासदार म्हणून नागपूरमधून लोकसभेवर विजयी झाले.
१९९६मध्ये त्यांनी रामटेक लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. तर १९९८ आणि २००९मध्येही ते वर्ध्यांतून लोकसभेवर पोहचले... दांडगा जनसंपर्क असलेले दत्ताभाऊ मतदारांची नाडी अचूक ओळखतात. त्यामुळे परिस्थितीनुसार मतदारसंघ बदलताना मुरब्बी राजकारणी असल्याचा परिचय त्यांनी दिला.
२००९च्या निवडणुकीत मेघेंनी भाजपच्या सुरेश वाघमारेंचा ९५ हजार ९१८ मतांनी पराभव केला. या निवडणुकीत बसपाच्या बिपिन कंगाले यांनीही १,लाख ३१ हजार ६४३ मते घेतली होती. दरम्यान यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचं खा. दत्ता मेघेंनी स्पष्ट केलं असलं तरी पुत्र सागर मेघे यांचं घोडं त्यांनी पुढं दामटलंच आहे.
एकेकाळी शरद पवारांच्या खास मर्जीतले असलेले दत्ता मेघे गेल्या पाच दशकांपासून राजकारणात आहेत. राजकारणाचे रंग त्यांना चांगलेच अवगत आहेत. त्यामुळे त्यांनी आता पुत्रासाठी फिल्डिंग लावलीय... दत्ताभाऊंप्रमाणे सागर मेघेंवरही वर्ध्याची जनता पसंतीची मोहर उमटवणार की नाही, हे येणारा काळच ठरवेल..
खा.दत्ता मेघेंचं रिपोर्ट कार्डपास:
> हिंगणघाट-33 रेल्वेंना थांबा
> जननी आधार योजनेसाठी पाठपुरावा
> मतदारसंघात रूग्णवाहिका दिल्या
> शेतक-यांसाठी फिरती प्रयोगशाळा
> ग्रामसडक योजनेत रस्ते बांधकाम
नापास
> रेल्वे स्थानकांचा विकास नाही
> नवीन रूग्णालयाची उभारणी नाही
> बेरोजगारांची समस्या
> औद्योगिक प्रकल्प आणले नाहीत
> शेतकरी आत्महत्या
वर्धा लोकसभा मतदारसंघाची सद्य राजकिय स्थिती गेल्या दोन दशकात वर्धा मतदारसंघातील मतदारांनी विविध पक्षांना साथ दिलीय. प्रत्येकवेळी नवीन खासदार निवडून देण्याची प्रथाच जणू वर्धाकरांनी पाडलीय. या लोकसभा मतदारसंघात यावेळीही काँग्रेस विरूद्ध भाजप अशी काट्याची टक्कर होईल अशी चिन्हे आहेत.
वर्ध्यातील सहा विधानसभा क्षेत्रांमध्ये देवळीत रणजीत कांबळे आणि धामणगाव रेल्वेत रविंद्र जगताप हे दोन काँग्रेसचे आमदार आहे. वर्ध्यात अपक्ष म्हणून निवडून आलेले राष्ट्रवादीचे बंडखोर सुरेश देशमुख आमदार आहेत. हिंगणघाटमध्ये शिवसेनेच्या अशोक शिंदेंचा वरचष्मा आहे. तर आर्वीत दादाराव केचे भाजपचे आमदार आहेत... मोर्शीत अपक्ष आमदार डॉ. अनिल बोंडे निवडून आलेत.
दत्ता मेघे पुन्हा निवडणूक लढवणार नसले तरी आपला पुत्र सागर मेघे याला उमेदवारी मिळवून दिलीय. काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्ष प्रभा राव यांचे भाचे रणजीत कांबळे आणि राव यांची कन्या चारुलता टोकस मेघेंना शह देण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यामुळे काँग्रेसला पुढील निवडणुकीत या गटबाजीचा फटका बसू शकतो.
लोकसभा निवडणूक २०१४साठी वर्धा मतदारसंघातून काँग्रेसकडून सागर मेघे, भाजपकडून रामदास तडस आणि `आप`कडून मोहम्मद अलिम पटेल अशी तिरंगी लढत आहे.
काय आहे वर्धा मतदारसंघाच्या समस्याकाँग्रेसला एकाहून एक दिग्गज नेते देणाऱ्या वर्धा मतदारसंघाची अवस्था मात्र बिकट आहे. इथला सामान्य नागरिक मुलभूत पायाभूत सुविधांपासून वंचित आहे. रस्त्यांची चाळण झालीय, तर साधा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजून सुटलेला नाही.
या ठिकाणी रोजगार आणि विकास कामांचा मोठा अभाव आहे. वर्धा जिल्ह्यातील वर्धा, हिंगणघाट आणि पुलगाव ही तीन मोठी शहरे. मात्र कुठेही विकास नाही की नियोजन नाही. वर्ध्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाची अवस्था तर विचारूच नका. रुग्णालयात सुविधा नाहीत. सगळीकडे कचरा साचलेला आढळतो. या रुग्णालयाच्या इमारतीचे काम रखडून पडलंय.
वर्धा जिल्हा हा दारू बंदी जिल्हा आहे. पण नावालाच... कागदावर... याठिकाणी मोठ्या प्रमाणात दारू विक्री केली जाते. प्रशासकीय यंत्रणा ढिम्म असल्यानं अनेक सरकारी योंजनाचा लाभ नागरिकांपर्यंत पोहचतच नाही. वर्ध्याच्या रेल्वे स्थानकावरून रोज हजारो प्रवासी प्रवास करतात. मात्र स्थानकाच्या विकासाबाबत बोंबच आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावेंची कर्मभूमी असलेल्या वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम आणि पवनार आश्रमात देश विदेशातून पर्यटक येतात. मात्र त्यांच्यासाठी पुरेशा सुविधा याठिकाणी नाहीत. हिंगणघाटचा विचार केला असता नागपूर हैद्राबाद मार्गावरील ते मोठे गाव आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग आहे, जिल्ह्यातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती याठिकाणी आहे. पण खासदार महोदयांचे त्याकडे लक्ष नाही.
वर्धा जिल्ह्यातही अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. शेतकऱ्यांच्या या संतापाचा फटका निवडणुकीत विद्यमान खासदारांना आणि काँग्रेसला बसू शकतो.
पाहा व्हिडिओ •
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. •
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, April 4, 2014, 11:56