www.24taas.com, झी मीडिया, यवतमाळ – वाशिम राज्याला दोन मुख्यमंत्री देणा-या यवतमाळ जिल्ह्यात प्रारंभीपासून काँग्रेसचे वर्चस्व राहिले असले, तरी बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार यवतमाळ वाशिम या लोकसभा मतदारसंघातील परिस्थिती बदलली.
यवतमाळ वाशिम हा मतदारसंघ 2009 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर निर्माण झाला. तत्पूर्वी यवतमाळ व वाशिम हे दोन वेगळे मतदारसंघ होते. यवतमाळ मतदारसंघावर सुरूवातीपासूनच काँग्रेसचं वर्चस्व राहिलं.
काँग्रेसच्या या बालेकिल्यात अंतर्गत गटबाजीमुळे 1996, 2004 आणि 2009 च्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला पराभवाचा धक्का पचवावा लागला होता. देवराव पाटील आणि त्यांचे पुत्र उत्तमराव पाटील यांनी तब्बल 8 टर्म या मतदारसंघातून खासदारकी भूषवली.
1996 च्या निवडणुकीत ज्यावेळी काँग्रेसने उत्तमराव पाटील यांची उमेदवारी कापून गुलाम नबी आझाद यांना निवडणुकीत उतरविले त्यावेळी गटबाजी उफाळली. परिणामतः पहिल्यांदा काँग्रेसचा उमेदवार येथून पराभूत झाला. भाजपचे राजाभाऊ ठाकरे गुलाम नबी यांना पराभूत करून विजयी झाले.
2004च्या निवडणुकीत भाजपच्या हरिभाऊ राठोड यांनी उत्तमरावांना पराभूत केले. तर 2009च्या निवडणुकीपूर्वी लोकसभेतील अणुऊर्जेच्या चर्चेत हरिभाऊंनी भाजपचा पक्षादेश झुगारून काँग्रेसला मतदान केले. काँग्रेसनेही उपकाराची परतफेड म्हणून भाजपमधून हकालपट्टी झालेल्या हरिभाऊ राठोड यांना उमेदवारी दिली आणि पुन्हा उत्तमराव पाटील यांची उमेदवारी कापली.
तेव्हा देखील गटबाजीचा फटका काँग्रेसला बसला आणि शिवसेनेच्या भावना गवळी विजयी झाल्या. 2004च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे 3 व सेनेचे 2 आमदार यवतमाळ जिल्ह्यात होते. मात्र 2009च्या निवडणुकीत भाजपचा सफाया झाला. शिवसेनेचे दारव्हा येथील आमदार संजय राठोड हेच आता विरोधक म्हणून एकाकी झुंज देत आहेत.
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या 6 जागा आहेत. यांपैकी SCसाठी राखीव असलेल्या वाशिममधून भाजपचे लखन मलिक आमदार आहेत. तर वाशिम जिल्ह्यातीलच कारंजाचे आमदार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश डहाके कारभार सांभाळतात.
STसाठी राखीव असलेल्या राळेगा विधानसभा जागेवर काँग्रेसचे प्रा. वसंत पुरके निवडून आलेत. यवतमाळ विधानसभेचे आमदार निलेश देशमुख-पारवेकर यांचं अपघाती निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी नंदिनी पारवेकर आमदार म्हणून निवडून आल्या. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रसवर शिवसेनेच्या संजय राठोड यांच्या रूपाने भगवा फडकतोय. तर पुसद विधानसभेत राष्ट्रवादीचे मनोहर नाईक आमदार म्हणून निवडून आलेत.
गेल्या 5 वर्षात मतदारसंघात शक्ती वाढलीय ती राष्ट्रवादी काँग्रेसची. विधानपरिषद निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे निकटवर्तीय कंत्राटदार संदीप बाजोरिया यांना उमेदवारी देऊन निवडून आणले. ते काँग्रेससाठी मोठी डोकेदुखी ठरू लागलेत.
काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि माजी खासदार उत्तमराव पाटील असे दोन गट निर्माण झाले. पुसद मतदारसंघ मनोहर नाईक यांचा गढ असला, तरी जिल्ह्यात इतरत्र राष्ट्रवादीचे अस्तित्व नव्हते. परंतु संदीप बाजोरिया यांनी सर्वप्रथम काँग्रेसला खिंडार पाडून सहावेळा खासदार राहिलेले उत्तमराव पाटील यांना राष्ट्रवादीत आणले.
उत्तमराव यांच्या येण्याने जिल्हा बँक राष्ट्रवादीच्या ताब्यात आली. जिल्हा परिषदेतही 21 सदस्य निवडून आल्याने राष्ट्रवादीने शिवसेना-भाजपशी हातमिळवणी करत, काँग्रेसला बाहेर ठेवले. नगर परिषद आणि पंचायत समित्याही राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्या. मात्र उत्तमरावांच्या निधनानंतर सेनेची ताकद वाढली. आणि पहिल्यांदाच सेनेचे 12 सदस्य जिल्हा परिषदेत निवडून आले.
प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी काँग्रेसला एकसंघ ठेवले आहे. माणिकराव यांचे नाव सध्या लोकसभा उमेदवार म्हणून आघाडीवर असले तरी युथ काँग्रेसचा अध्यक्ष असलेला त्यांचा पुत्र राहुल ठाकरे देखील तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे. माजी खासदार हरिभाऊ राठोड मात्र आपल्यालाच काँग्रेसची उमेदवारी मिळेल असे ठासून सांगत आहे.
जिल्हा काँग्रेस हरीभाऊंना फारसे महत्व देत नसली तरी जनसंपर्क आणि बंजारा समाजाच्या ताकतीवर ते प्रबळ उमेदवार ठरू शकतात. शिवसेनेमध्ये लोकसभा उमेदवारीसाठी कोणाचाही दावा नाही. परंतु विद्यमान खासदार भावना गवळी यांना उमेदवारी द्यायची नसल्यास माणिकराव ठाकरेंना पराभूत करणारे दारव्ह्याचे आमदार संजय राठोड हे संभाव्य उमेदवार असू शकतात.
यवतमाळ मतदारसंघातील समस्या
यवतमाळ-वाशिम मतदारसंघाचे खासदार असलेल्या भावना गवळी यांनी मतदारसंघात पायाला भिंगरी लावून प्रश्न सोडवत असल्याचं सांगितलं तरी, प्रत्यक्ष मतदारसंघातील स्थिती मात्र उलट आहे. 500 हेक्टर क्षेत्रावर यवतमाळमध्ये एमआयडीसी वसलेलं असलं तरी 21 हेक्टर क्षेत्रच विकसित करण्यात आलं आहे.
सरकारच्या उदासीन धोरणामुळे त्यातील अनेक मोठे उद्योगदेखील बंद पडले. या सर्वांचा परिणाम म्हणून मतदारसंघात रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत. कामाच्या शोधात मतदारसंघातील सुशिक्षित युवक-युवतींना इतर शहरांमध्ये भटकंती करावी लागते. यवतमाळ जिल्हा हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा कापूस उत्पादक जिल्हा आहे.
यवतमाळच्या कळंब येथे ज्या गृत्समद ऋषींनी कापसाचा शोध लावला, त्याच मतदारसंघातील कापूस उत्पादक शेतक-यांची अवस्था सध्या बिकट झालीय. या परिसरात मोठ्या प्रमाणावर कापूस उत्पादन केलं जातं. मात्र या कापसावर प्रक्रिया करणारा एकही मोठा उद्योग या परिसरात नाही. कॉटन सेझचा प्रस्तावदेखील रखडलेला आहे.
दळणवळणाच्या दृष्टीने वर्धा-यवतमाळ-नांदेड हा रेल्वे मार्ग मंजूर झाला असला, तरी त्याचे काम अतिशय संथ गतीने सुरु आहे. खासदार भावना गवळी याच मुद्द्याला प्रमुख बनवून निवडणूक लढल्या आणि जिंकल्या. मात्र रेल्वे मार्गाचे काम त्यांना प्रगतीपथावर आणता आले नाही.
विदर्भात आत्महत्या करणा-या शेतक-यांचं सर्वाधिक प्रमाण हे यवतमाळमध्येच होतं. मात्र गेल्या दोन वर्षांत पंकप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या पॅकेजेसमुळे शेतक-यांच्या आत्महत्यांत घट झाल्याचं निदर्शनास आलं आहे.
आदिवासी बहुल या मतदारसंघात आदिवासी आश्रमशाळा, विद्यार्थ्यांची बिकट परिस्थिती असून त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. शिक्षणाच्या दृष्टीने विचार केल्यास यवतमाळमध्ये वैद्यकीय महाविद्यालय आहे, परंतु आवश्यक सुविधा नाहीत.
कृषी, तंत्रशिक्षण व व्यावसायिक अभ्यासक्रम असलेली महाविद्यालयं नाहीत. आणि जी आहेत तेथे अनेक असुविधा, शिक्षकांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांना पुणे-मुंबईकडे जावे लागते. विद्यालयांना देखील स्वतःची अशी इमारत नाही. तसंच जिल्हा परिषदेच्या शाळा जीर्ण स्थितीत असून, समस्यांनी वेढलेल्या असल्याने शिक्षणाचा दर्जा खालावलेला आहे.
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात आरोग्य व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला असून रुग्णांची प्रचंड हेळसांड होते. प्राथमिक आरोग्य केंद्र देखील दैनावस्थेत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना जिल्हा रूग्णालयात धाव घ्यावी लागते. मात्र तेथेही पुरेशा सोयी नाहीत. सोनोग्राफी, रक्तपेशी तपासणी, सिटी स्कॅन उपकरणे बंद पडली असून नर्सेस व डॉक्टरांची कमतरता असल्याने रूग्णांचा जीव सतत टांगणीला लागलेला असतो.
जिल्ह्यातील रस्त्यांची चाळणी झालेली असून नागपूर तुळजापूर राज्य मार्ग उखडलेल्या स्थितीत आहे. अरुणावती, इसापूर, बेंबळा, पूस सारखे सिंचनाचे मोठे प्रकल्प जिल्ह्यात झालेत, मात्र शेतक-यांना त्याचा अपेक्षित लाभ होताना दिसत नाही.
प्रकल्पांचे कालवे-पाट यांची अवस्था खराब असल्याने शेतीपर्यंत पाणी पोहचतच नाही. जिल्ह्यात पाउस भरपूर पडतो पण पाणी सिंचनाचा प्रकल्प नाही म्हणून दरवर्षी पिण्याच्या पाण्याचा भीषण प्रश्न उद्भवतो. मात्र खासदार गवळी हे सर्व आरोप फेटाळून लावतात.
गवळी यांनी अनेक कार्यात पुढाकार घेतला हे मान्य केलं, तरी मतदारसंघाचा अपेक्षित विकास झालेला दिसत नाही. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे, पण तस्करांनी केलेल्या बेसुमार जंगलतोडीमुळे जंगलांचे वाळवंट झाले. शहरातील अरुंद रस्ते, पार्किंगची नसलेली सोय आणि अस्वच्छता यामुळे शहरालाही बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे.
शिवसेनेच्या भावना गवळी या मतदारसंघातून लोकसभेवर विजयी झाल्या. नव्याने तयार झालेल्या या मतदारसंघात 2014 च्या लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू झालीय.
खासदार भावना गवळी यांची ओळख
नाव - भावना पुंडलिकराव गवळी
जन्म - 23 मे 1973
वय - 40 वर्षे
शिक्षण - बी. ए. (मराठी)
अवघ्या 25 वर्ष वयात खासदार
शिवसेनेच्या भावना गवळी या यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. गवळी यांनी 1999मध्ये जेव्हा पहिली लोकसभा निवडणूक लढवली तेव्हा त्या अवघ्या 25 वर्षांच्या होत्या आणि पहिल्या निवडणुकीतच विजयी माळ त्यांच्या गळ्यात पडली.
खासदारकीची हॅटट्रीक
देशाच्या राजकारणात सर्वसाधारण खासदारांचे वयोमान 50 वर्ष असताना, 25 व्या वर्षी संसदेत प्रवेश मिळवत भावना गवळींनी एकप्रकारे विक्रमच केला. 13व्या लोकसभेत सर्वात कमी वयाची खासदार म्हणून भावना गवळींच्या नावाची नोंद झाली. 1999 नंतर 2004 आणि 2009मध्ये लोकसभा निवडणूक जिंकत त्यांनी खासदारकीची हॅटट्रीक साजरी केली.
2009च्या लोकसभा निवडणुकीत भावना गवळी यांनी एकुण 3 लाख 84 हजार 443 मते पडली. तर काँग्रेसचे पराभूत उमेदवार हरीसिंग राठोड यांच्या पारड्यात एकूण 3 लाख 27 हजार 492 मते पडली. भावना गवळी यांनी तब्बल 56 हजार 951 मताधिक्याने विजय मिळवला होता.
खासदार भावना गवळी यांची मालमत्ता
खासदार भावना गवळी यांची एकूण मालमत्ता ही 3 कोटी 3 लाख 99 हजार 471 रूपये आहे. त्यापैकी 2 कोटी 64 लाख 20 हजार रूपयांची स्थावर मालमत्ता असून, 39 लाख 79 हजार 471 रूपयांच्या जंगम मालमत्तेची नोंद गवळी यांच्या नावे आहे. तसंच 24 लाख 30 हजार 911 रूपयांचं कर्जही भावना गवळी यांनी घेतलं आहे.
भावना गवळी यांचे वडील माजी खासदार
मतदारसंघातील खासदार भावना गवळी यांचे पुंडलिकराव गवळी हे वडील. पुंडलिकराव गवळी 1996 मध्ये लोकसभा निवडणुकीत वाशीम लोकसभा मतदार संघातून विजयी झाले होते. पण तेव्हा केंद्रातील एनडीए सरकार अतिशय अल्पकाळ टिकल्याने त्यांना जास्त दिवस खासदार राहता आले नाही. त्यांच्या मृत्यूनंतर शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी भावना गवळी यांना उमेदवारी दिली होती.
1999 मध्ये जेव्हा पहिल्यांदा भावना गवळी वाशीम लोकसभा निवडणूक लढल्या, तेव्हा त्यांनी काँग्रेसचे अनंतराव देशमुख यांचा पराभव केला होता. 2004 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर नाईक या यवतमाळ जिल्ह्यातील नाईक घराण्याच्या एका दिग्गज नेत्याला हरवत दुस-यांदा विजय साजरा केला.
मूळच्या वाशिम जिल्ह्यातील रिसोडच्या रहिवाशी असलेल्या भावना गवळी यांचा शिवसेनेच्या पदाधिका-यांशी चांगला समन्वय आहे. शिवसेनेव्यतिरिक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांशी देखील त्यांचे चांगले संबंध आहेत.
शिवाय आधी वाशिम आणि आता वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघातील जातीचे राजकारण नेहमीच त्यांच्या बाजूने आणि त्यांच्या सोयीचे राहिले आहे. प्रामुख्याने ग्रामीण मतदारसंघ असल्याने इतर मुद्द्यांपेक्षा जातीचे राजकारण येथे नेहमीच प्रभावी राहिले आहे. हीच बाब यापुढंही त्यांच्या पथ्यावर पडणार का, हे पाहायचेय
यवतमाळ – वाशिम मतदारसंघातील उमेदवार
1)काँग्रेस / राष्ट्रवादी – शिवाजीराव मोघे (काँग्रेस)
2)महायुती – भावना गवळी (शिवसेना)
3)आप – नरेश राठोड
4)मनसे –राजन राजे पाटील
5)अपक्ष – प्रशांत सुर्वे
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, April 4, 2014, 17:55