www.24taas.com, झी मीडिया, अंजनडोह, जालनानिवडणुकांच्या हंगामात वारेमाप आश्वासनं द्यायची आणि निवडून आलं की, मतदारांकडं ढुंकूनही पाहायचं नाही, ही कला राजकारण्यांना चांगलीच अवगत आहे. मात्र त्यावर औरंगाबादच्या अंजनडोहच्या गावक-यांनी भन्नाट शक्कल शोधून काढलीय. केवळ तोंडी आश्वासनं नको, तर आश्वासनं पाळणार असं बॉण्ड पेपरवर लिहून दिल्यावरच या गावचे लोक आता मतदान करणार आहेत.
अंजनडोहच्या गावक-यांची लगबग सुरूय ती एका पेपरवर सही करण्यासाठी... हा कुठला सरकारी योजनेचा कागद नाही, तर हे आहे या गावक-यांचे लोकसभा उमेदवाराला पत्र.. अंजनडोहच्या गावक-यांनी यंदा अनोखा संकल्प केलाय. गावाच्या विकासकामांची हमी देणा-या, आणि केवळ तोंडी हमी नाही तर ती स्टँम्प पेपरवर लिहून सही करणा-या उमेदवारालाच मतदान करण्याचं त्यांनी ठरवलंय. त्यासाठी गावक-यांनी एका स्टँम्प पेपरवर आपल्या अटी आणि गावात कोणत्या सुविधा हव्यात, ते या पेपरवर स्पष्टपणं लिहिलंय. गावक-यांनी या निवेदनावर सह्या केल्यात आणि जो उमेदवार या अटी वाचून स्टँम्प पेपरवर सही करेल त्यालाच मत देण्याचा गावक-यांचा संकल्प आहे.
ही वेळ या गावक-यांवर आणलीय ती इथल्याच उमेदवारांनी आणि खासदारांनी... हे गाव सध्या खासदार रावसाहेब दानवे यांच्या जालना मतदारसंघात येतं. 2009 पूर्वी हे गाव शिवसेना खासदार चंद्रकांत खैरै यांच्या औरंगाबाद मतदारसंघात येत होतं. मात्र कुठल्याही खासदारानं या गावात कधी चक्करच मारली नाही. गावातील वृद्ध सांगतात की, त्यांनी त्यांच्या अख्ख्या हयातीत खासदार काळा की गोरा, ते बघितलंच नाही..
औरंगाबाद जिल्ह्यातील अंजनडोह तसं एक छोटसं गाव.. गावची लोकसंख्या जेमतेम 2500... अगदी दूरून पाहिलं तर एखादया पाड्यासारखचं दिसणारं गाव.. गावात येणा-या रोडची दुर्दशा पाहिली तर गावात येण्याची कुणाची हिंमत होणार नाही. निवडणुका आल्या की फक्त घोषणा ऐकायला य़ेतात आणि निवडणुका गेल्या की घोषणाही हवेत विरतात, असं गावकरी सांगतात.. मग मतदान करायचं तरी कशासाठी? असा प्रश्न गावातील वृद्धांना पडलाय..
खरं तर गावक-यांनी यंदा मतदानावरच बहिष्कार घालण्याचा निर्णय़ घेतला होता. मात्र गावातील तरुणांना हा हमीपत्राचा मार्ग सुचला.. तसं तर गावात उमेदवार कधी येतचं नाहीत. दुस-या किंवा तिस-या फळीचे राजकीय कार्यकर्तेच प्रचाराला येताच. यावर्षी मात्र उमेदवाराला गावात यावं लागेल आणि मतांसाठी स्टँम्प पेपरवर सही करावी लागेल. आपल्या हक्कांसाठी जागृत झालेल्या अंजनडोहच्या गावक-यांनी राजकारण्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलंय, पण भूलथापांना बळी पडणा-या राज्यातील मतदारांचीही `दिमाग की बत्ती` पेटवलीय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.पाहा व्हिडिओ
First Published: Saturday, March 29, 2014, 10:22