www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी देश-विदेशांतील नेत्यांना आमंत्रण धाडली गेली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या शपथविधी सोहळ्यासाठी पाठवण्यात आलेलं भाजपचं निमंत्रण पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी स्वीकारलंय.
नरेंद्र मोदी यांचा शपथविधी 26 मे रोजी आयोजित करण्यात आलाय. या सोहळ्यासाठी नवाज शरीफ नवी दिल्लीमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. याबद्दल पाकिस्तानकडून औपचारिक घोषणा होणं अजून बाकी आहे.
भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताच्या पंतप्रधानांच्या शपथग्रहण सोहळ्यासाठी ‘सार्क’ देशांतील नेत्यांना आमंत्रित करण्यात आलंय. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ, श्रीलंकेचे राष्ट्रापती महिंदा राजपक्षे, बांग्लादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना, अफगानिस्तानचे राष्ट्रपती हामिद करजई, भूटानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे, नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला आणि मालदीवचे राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन अब्दुल गय्यूम यांना परदेश सचिवांमार्फत निमंत्रण पाठवण्यात आलंय.
26 मे रोजी नरेंद्र मोदी आपल्या नव्या कॅबिनेटसह पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. शपथ ग्रहण सोहळ्याचं आयोजन राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात करण्यात आलंय. या सोहळ्यासाठी तीन हजार जणांना आमंत्रण धाडण्यात आलंय.
लोकसभा निवडणुकीतल्या विजयानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी नरेंद्र मोदींना शुभेच्छा देत पाकिस्तानाला भेट देण्याचं आमंत्रण दिलं होतं.
‘सार्क’ देशांमध्ये भारताशिवाय पाकिस्तान, बांग्लादेश, भूटान, नेपाळ, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि मालदीव या देशांचा समावेश आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, May 22, 2014, 12:44