www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली आरजेडीचे संस्थापक सदस्य आणि लालू प्रसाद यादव यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे रामकृपाल यादव यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलाय. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह आणि इतर ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
पाटलीपुत्र मतदारसंघातून रामकृपाल यादव यांना तिकीट नाकारण्यात आलं होतं. लालूंची मुलगी मिसा भारती या मतदारसंघातून लढणार आहे. लालूंवर नाराज होत रामकृपाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय.
यावेळी रामकृपाल यांनी नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांची तोंडभरुन स्तुती केली. चहावाल्याला पंतप्रधान बनवण्यासाठी दूध विक्रेत्याचा मुलगा पुढे आला आहे, असं रामकृपाल म्हणाले.
याशिवाय रामकृपाल यांनी लालूप्रसादांवरही निशाणा साधला.“राजदमध्ये कुटुंब हेच सर्वस्व आहे. मी गेल्या ३५ वर्षांपासून पक्षात एका कार्यकर्त्याप्रमाणे काम केलं. मात्र तिथे सध्या जीव घुटमळत होता. एका कुटुंबासाठी काम केल्याने सामाजिक कार्य पुढे जाऊ शकत नाही” असं रामकृपाल म्हणाले.
तर रामकृपाल यादव यांना विचारधारेचा विसर पडलाय, असा टोला लालूप्रसाद यादव यांनी लगावलाय.
आता रामकृपाल यादव यांना भाजपकडून पाटलीपुत्र मतदारसंघातून तिकीट मिळण्याची शक्यता आहे. ही सीट योगगुरू रामदेवबाबा यांनी आपल्या एका सहकाऱ्यासाठीही मागितलीय, असंही सांगण्यात येतंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, March 12, 2014, 16:28