www.24taas.com, झी मीडिया, मुंबईगांधी घराण्यातील राहुल आणि वरूण या चुलत बंधूंमध्ये `भाईचारा` निर्माण होतोय. तर ठाकरे घराण्यातील उद्धव आणि राज यांच्यात मात्र जोरदार `भाऊबंदकी` रंगलीय. चुलतबंधूंमध्ये सुरू असलेल्या महाभारताचा लेटेस्ट एपिसोड.
पांडव विरूद्ध कौरव हा चुलत बंधूंमधील वाद अगदी महाभारत काळापासून चालत आलाय. तो अगदी देशातील सर्वात पॉवरफुल समजल्या जाणा-या गांधी घराण्यापर्यंत. मात्र प्रचारसभेत बोलताना वरूण गांधींनी चक्क राहुल गांधींच्या अमेठीतील कामाचं कौतुक केलं. ते देखील नरेंद्र मोदी गुजरातच्या विकासाचे ढोल बडवत असताना. त्यामुळं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
राहुल गांधींनीही वरूण गांधींच्या या कौतुकाला लगेचच पोचपावती दिली. माझी केलेली स्तुती योग्यच आहे, असे राहुल यांनी म्हटलेय. उत्तरेत गांधी घराण्याच्या युवराजांमध्ये हा भाईचारा निर्माण होत असताना, महाराष्ट्रात मात्र जोरदार कलगीतुरा रंगलाय... ठाकरे घराण्यातील उद्धव आणि राज हे चुलतबंधू एकमेकांची औकात काढतायत.
राज ठाकरेंनी आव्हान दिल्यानंतर उद्धवनाही जोर चढला. ज्यांनी बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला, त्याच्याबद्दल काय बोलायचं, असा मार्मिक घाव उद्धव ठाकरेंनी घातला. उद्धव ठाकरेंचा हा घाव राजच्या चांगलाच वर्मी लागला. त्यांनी मग ठाकरे घराण्यातील कुटुंब कलह अगदी चव्हाट्यावर आणले. `मातोश्री`वर घडलेल्या खासगी गोष्टी त्यांनी जगजाहीर केल्या.
उद्धवसाठी हॉ़स्पिटलमध्ये थांबलो, बाळासाहेबांना अखेरपर्यंत सूप पाठवलं, तेव्हा नव्हता का खंजीर खुपसला?, डोंबिवलीच्या सभेत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल डोंबिवलीतील जाहीर सभेत ठाकरे घराण्यातील कुटुंब कलह चव्हाट्यावर आणला. मी बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला, असं उद्धव ठाकरे म्हणतात. मग उद्धव ठाकरे लीलावती हॉस्पिटलमध्ये एडमिट असताना, मला का फोन केला? असा सवाल राज ठाकरेंनी केला.
बाळासाहेब ठाकरे कोमात जाईपर्यंत मी पाठवलेलं चिकन सूप पित होते. मी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला असता, तर त्यांनी मी पाठवलेलं सूप घेतलं असतं का, असंही त्यांनी विचारलं. उद्धव ठाकरेंनी त्यांच्यापुरता या विषयाला पूर्णविराम दिला असला तरी मी दिलेला नाही. हा सवाल जबाब २१ तारखेपर्यंत सुरू राहील, असंही राज यांनी स्पष्ट केलं.
गांधी बंधूंमध्ये वाढणारा गोडवा आणि ठाकरे बंधूंमध्ये वाढणारी कटुता, या दोन्ही घटनांमध्ये फटका बसतोय तो भाजपला. चुलतबंधूंच्या या नातेसंबंधांमुळं भाजपची गणितं बिघडण्याची चिन्हं आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, April 3, 2014, 08:54