Last Updated: Thursday, September 27, 2012, 23:49
www.24taas.com, मुंबई पवार आणि ठाकरे या दोन नावाभोवती महाराष्ट्राचं राजकारण फिरतय. कधी राज ठाकरे चर्चेत असतात तर कधी अजित पवार... मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यामुळे अजित पवारांकडं सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलंय. त्याचवेळी अजित पवार हे राज ठाकरेंच्या मार्गावर तर नाहीत ना? अशी शंका व्यक्त केली गेली. पण घडतंय काही वेगळचं... २५ सप्टेंबर २०१२... हा दिवस मुंबईपासून दिल्लीपर्यंतचं राजकारणी कधीच विसरु शकणार नाही. कारण महाराष्ट्राच्या राजकारणावर मजबूत पकड असलेल्या काका-पुतण्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. काकाविरुद्ध पुतण्या असा संघर्ष तर सुरु झाला नाही ना? अशा शंका राजकीय जाणकारांच्या मनात आली होता. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या मंत्री पदाचा अचानकपणे राजीनामा दिला होता.
१९ मार्च २००६... शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे राज ठाकरे आपल्या काकांच्या पावलावर पाऊल टाकत राजकीय मैदानात उतरले होते. पण, यावेळी त्यांनी थेट काकांनाच आव्हान दिलं होतं. महाराष्ट्राच्या राजकारणावर नजर टाकल्यास राज्याचं राजकारण या दोन दिग्गज काका-पुतण्यांच्या भोवताली फिरत असल्याचं लक्षात येईल. काका शरद पवारांच्या पावलावर पाऊल टाकत अजित पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश केला आणि पुढे राज्याच्या राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली. पण शरद पवारांपेक्षा अजित पवारांच्या कामाची पद्धत वेगळी आहे. शरद पवार हे मवाळ आणि मुरब्बी राजकारणी आहेत तर अजित पवार हे सडेतोड भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच राज ठाकरेही आक्रमक असून राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यानंतर आपलं राजकीय नेतृत्व सिद्ध केलं आहे.
पवार आणि ठाकरे... अजित पवार आणि राज ठाकरे यां दोघांचा सुरुवातीचा राजकीय प्रवास जवळपास सारखाच आहे. दोघांनाही आपल्या काकांकडून राजकारणाचं बाळकडू मिळालं पण पुढे राज ठाकरेंनी वेगळा मार्ग निवडला तर अजित पवार अद्यापही आपल्या काकांसोबत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या या दोन नेत्यांचा राजकीय प्रवास कसा झाला, टाकुयात एक नजर... बारामती मतदार संघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या शरद पवारांनी महाराष्ट्राची सीमा ओलांडत दिल्लीच्या राजकारणात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. हा तो काळा होता जेव्हा शरद
पवार दिल्लीच्या राजकारणात सक्रीय झाले होते आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील त्यांची पकड कमजोर होणार तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जाऊ लागली होती. पण त्यावरही पवारांनी उपाय शोधून ठेवला होता. ज्या पद्धतीने शरद पवार राजकारणाची एक एक पायरी वर चढत गेले होते त्याच मार्गाने त्यांचे पुतणे अजित पवारही महाराष्ट्राच्या राजकारणात मार्गक्रमाण करत होते. शरद पवारांनी सहकार क्षेत्राच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारणावर पकड मजबूत केली. त्याच पद्धतीने त्यांचे पुतणे अजित पवारांनीही काकांच्या पावलावर पाऊल टाकत राजकारणात प्रवेश केला. पुढे अजित पवारांनी सुरेश कलमाडींना धक्का देत पुणे महानगरपालिकेवर सत्ता मिळवली. या माध्यमातून त्यांनी पुणे शहराच्या राजकारणावर पकड मिळवली होती. शरद पवारांच्या बारामती लोकसभा मतदार संघातून अजित पवारांनी खासदारकीची निवडणूक जिंकली होती. पुढे शरद पवारांसाठी तो मतदारसंघ त्यांनी सोडला. आजच्या घडीला महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवारांच्या नावाला मोठं महत्त्व आहे. त्यांच्या एका राजीनाम्यामुळे राज्याच्या राजकारणात जणू वादळ आलंय.
महाराष्ट्राच्या राजकारणात पवार कुटुंबाप्रमाणेच ठाकरे कुटुंबालाही मोठं महत्त्व आहे. अजित पवारांप्रमाणेच राज ठाकरेंनाही आपले काका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून राजकारणाचं बाळकडू घेतलंय. त्यामुळेच त्यांच्या भाषण शैलीपासून ते रोखठोक स्वभावापर्यंत सगळ्यात बाळासाहेबांचं प्रतिबिंब त्यांच्या कार्यकर्त्यांना दिसतं. काकांप्रमाणेच राज ठाकरेही व्यंगचित्रकार असले तरी त्यांचा पिंड राजकारणाचा आहे. १९९०च्या दशकात राज ठाकरेंनी विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून युवकांना शिवसेनेकडं आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. पुढे १९९७ मध्ये त्यांनी शिव उद्योग सेनेची स्थापना केली. राज ठाकरे आणि अजित पवार यांची राजकीय कारकीर्द बघितल्यास दोघांच अंतिम ध्येय एकच असल्याचं राजकीय जानकारांना वाटतंय. २००६ मध्ये शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करत राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळ मार्ग चोखाळला. पण अजित पवारांनी मात्र अशा शक्यतांचं नेहमीच खंडण केलं आहे. अजित पवारांनी नेहमीच शरद पवारांचा शब्द अंतिम मानला आहे.
२५ सप्टेंबरला जेव्हा अजित पवारांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला तेव्हा अनेक तर्कवितर्क लावले गेले. पवार विरुद्ध पवार सत्ता संघर्ष सुरु झाल्याची चर्चा झडू लागली. अजित पवारांनी बंड तर केलं नाही ना? अशी शंका उपस्थित केली गेली. कारण अजित पवार राजीनामा देणार असल्याचं त्यांच्या पक्षातील एकाही नेत्याला माहित नव्हतं. अजित पवारांच्या या खेळीमुळे भल्याभल्यांचा अंदाज चुकला होता. अजित पवार असो की राज ठाकरे या दोन्ही पुतण्यांभोवती महाराष्ट्राचं राजकारण फिरत असल्याचं चित्र आहे.
साम्य आणि फरक... शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानतर राज ठाकरेंनी नवनिर्माण सेनेची स्थापना केली. तसेच निवडणुकीच्या रिंगणात यशही मिळवलं. अजित पवारांनी मात्र शरद पवारांच्या मार्ग अवलंबत उपमुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली. अजित पवार आणि राज ठाकरे यांच्यात कोणतं साम्य आहे आणि कोणता फरक आहे त्यावर एक नजर...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे जेव्हा जेव्हा सार्वजनिक ठिकाणी बोलतात तेव्हा तेव्हा प्रसिद्धी माध्यमातून त्यांना मोठी प्रसिद्धी मिळते. मराठीचा मुद्दा असो की परप्रांतियांचा राज ठाकरेंच्या आक्रमक भूमिकेमुळे त्यांना मराठी जनतेकडून मोठ समर्थन मिळालं आहे. आपल्या आक्रमक भूमीकेमुळेच राज ठाकरेंच्या नवनिर्माण सेनेला निवडणूकीच्या आखाड्यात यश मिळवता आलंय. सुरुवातीच्या काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे म्हणून त्यांची ओळख असली तरी आजच्या घडीला त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळ स्थान निर्माण केलं आहे. राज ठाकरे आणि अजित पवार यांच्यात तुलना केल्यास राज ठाकरेंप्रमाणे अजित पवारांकडं धारदार भाषणशैली नाही. त्यामागचं कारण म्हणजे अजित पवार हे शरद पवारांच्या तालमीत तयार झाले आहेत. नुसतं बोलण्यापेक्षा प्रत्यक्षात काम करण्यावर त्यांचा भर असतो. सत्ता कशी राखायची याची त्यांना चांगलीच जाण आहे. पक्ष आणि कार्यकर्त्यांची बांधणी कशी करायची याचं शिक्षण त्यांनी शरद पवारांकडूनच घेतलं आहे. ज्या मार्गाने शरद पवारांनी राजकारणात पकड मजबूत केली तोच मार्ग अजित पवारांनी अवलंबला आहे. सहकारी साखर कारखाण्यांच्या माध्यमातून त्यांनी सहकार क्षेत्रावर दबदबा निर्माण केला आहे. आज शरद पवाराप्रमाणेच अजित पवारांच्या शब्दाला सहकारक्षेत्रात वजन आहे. पण जेव्हा सुप्रिया सुळे यांनी राजकारणात प्रवेश केला तेव्हा सत्तासंघर्ष होणार अशी शंका व्यक्त केली होती. मात्र, ती केवळ शंकाच ठरली. सुप्रिया सुळेंनी दिल्लीच्या राजकारणात रस घेतला. तसेच अजित पवारांशी कोणतेही मतभेद नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पण असाच प्रसंग जेव्हा शिवसेनेत आला तेव्हा काही वेगळचं घडलं. राज ठाकरेंनी बडव्यांना दोष देत शिवसेनेशी फारकत घेतली. राष्ट्रवादीत अशी परिस्थिती निर्माण तर होणार नाही ना? अशी शंका जेव्हा जेव्हा पेच निर्माण होतो तेव्हा तेव्हा व्यक्त केली जाते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तडफदार नेते म्हणून अजित पवार महाराष्ट्राला परिचित आहेत. उपमुख्यमंत्रीपदाची संधी आली तेव्हा त्यांची आक्रमकता त्यांच्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना पहायला मिळाली. अजित पवारांनी वेगळी वाट निवडल्यास पक्षाला मोठं नुकसान होईल याची शरद पवारांना कल्पना आहे. त्यामुळेच वादापासून ते दूर आहेत.
राजकारणातला करिष्मा शरद पवारांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू महाराष्ट्र तर शिवसेनाप्रमुखांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू मुंबई. शरद पवार हसत हसत मातोश्रीवर जाऊन येतात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडते. पण या दोन दिग्गज नेत्यांचा राजकीय प्रवास कसा झाला, ते आता आपण पहाणार आहोत...
दोन परिवार... या दोन कुटूंबाशिवाय महाराष्टाचं राजकारण अपूर्ण आहे. या दोन कुटुंबांनी महाराष्ट्राचं राजकारण व्य़ापून टाकलं आहे. पण या दोन्ही परिवारांची राजकारण करण्याची पद्धत मात्र वेगळी आहे. शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखले जातात. सत्तेच्या सारीपाटावर शरद पवारांची नेहमीच सरशी झाली आहे. कधी कुणासोबत आघाडी करावी याची त्यांना पक्की जाण आहे. काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर पवारांनी अवघ्या दहा वर्षानंतर त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत १९७८ साली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. पण १९८० च्या दशकात महाराष्ट्रात शिवसेनेची वाढत होती त्यावेळी पवारांनी काँग्रेसचा पंजा बळकट केला. पुढे पवारांनी काँग्रेसमध्ये आपलं स्थान बळकट केलं आणि त्यामुळेच १९९०च्या दशकात पंतप्रधानपदासाठी पवारांच्या नावाची चर्चे सुरु झाली. पण, पवार दिल्लीत असले तरी महाराष्ट्राच्या राजकारणावरची त्यांची पक़ड सुटली नाही. १९९० च्या दरम्यान शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. यादरम्यान शिवसेनेनं मुंबईसह महाराष्ट्रात आपली पाळंमुळं घट्ट केली होती. राज्यभर शिवसेनेची वाढ होत होती. १९९९ मध्ये काँग्रेसमध्ये मर्यादा येत असल्याचं लक्षात आल्यावर शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. पण शिवसेनेच्या बाबतीत काही वेगळ घडलं. शिवसेना सत्तेतून पायउतार झाल्यानंतर त्यांना पुन्हा सत्ता मिळवता आली नाही. पण शिवसेनाप्रमुखांचा करिष्मा मात्र कायम आहे. शिवसेनेच संख्याबळ वाढतंय, पण पुन्हा सत्ताकाही मिळवता आली नाही. महाराष्ट्रात पवार आणि ठाकरे या दोन कुटुंबांच वैशिष्ठ म्हणजे त्यांच्याकडं संख्याबळ कमी असतानाही त्यांनी राष्ट्रीय पक्षांना आपल्या समोर गुडघे टेकवण्यास भाग पाडलं आहे. महाराष्ट्रातील हे दोन दिग्गज नेते जेव्हा केव्हा एकमेंकाना भेटतात तेंव्हा महाराष्ट्राच्या राजकारण तर्क-वितर्कांना उधाण येतं आणि दिल्लीश्वरांच्या कपाळावर आठ्य़ा पडतात.

गोपीनाथ मुंडे – धनंजय मुंडे शरद पवार, बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखचं आणखी एक बडं नाव म्हणजे भाजप नेते गोपीनाथ मुंडे. गोपीनाथ मुंडे यांनीही आपला वारसदार म्हणून धनजंय मुंडे याना राजकारणात आणलं खरं पण आजघडीचा त्यांचा पुतण्याचं त्यांचा सर्वात मोठा विरोधक ठरलाय. गोपीनाथ मुंडे… महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठं नावं. शरद पवारांसारख्या नेत्याला जेरीस आणून त्यांनी राज्यात शिवसेना-भाजपची सत्ता आणली होती. आज भाजपातील ज्येष्ठ नेते म्हणून त्यांना मान असला तरी कौटुंबिक पातळीवर त्यांना संघर्ष करावा लागलाय. त्यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनीच त्यांना आव्हान दिलंय. खरं तर धनंजय मुंडे यांनी आपले काका गोपीनाथ मुंडे यांच्याकडूनच राजकारणाचं बाळकडू मिळालं. पण राजकारणापुढं नातं खुजं ठरलं आणि गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात संघर्ष झडला. त्याला कारणीभूत ठरली होती परळी नगरपरिषदेची निवडणूक... त्याचं बिज विधानपरिषदेच्या निवडणूकीत पेरली गेली होती. गोपीनाथ मुंडे यांनी विधानसभेची जागा आपली मुलगी पंकजा मुंडे पालवे यांच्यासाठी जाहीर केली. त्यावेळीच धनंजय मुंडे नाराज असल्याचं बोललं जात होतं. पण त्यांना विधान परिषदेत पाठविण्यात आलं. त्यामुळे तो वाद शांत झाला. पण पुढे परळी नगराध्यक्षपदाच्या निवडीवरुन हा वाद उफाळून आला आणि या काका पुतण्यामधला संघर्ष जगजाहीर झाला.
First Published: Thursday, September 27, 2012, 23:45