Last Updated: Tuesday, January 10, 2012, 08:54
www.24taas.com, मुंबई प्रसिध्द संगीतकार ए. आर. रेहमानबरोबर जर्मन ऑर्केस्ट्रा कार्यक्रम करणार आहे. त्यामुळे रेहमानच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. जर्मनी फिल्म बेबल्सबर्ग ऑर्केस्ट्रा रेहमानला मानवंदना देणार आहे आणि तिही त्याच्याच गाण्यांनी.
भारतीय चित्रपटसृष्टीबरोबर बेबल्सबर्ग स्टुडिओचेही यंदा शंभरावे वर्ष सुरू होत आहे. तर भारत आणि जर्मनी यांच्यातील स्नेहपूर्ण संबंधालाही ६० वर्षे पूर्ण झाली आहेत. या दोन्हींचे औचित्य साधून "जर्मनी अँड इंडिया२०२२-२०१२-इन्फिनिट ऑपॉर्च्युनिटीज' हा कार्यक्रम आखण्यात आला आहे.
बेबल्सबर्ग ऑर्केस्ट्रा ए. आर. रेहमानबरोबर भारताची 'टूर' करणार आहे. त्यामध्ये हा जर्मन ऑर्केस्ट्रा रेहमानची प्रसिद्ध गाणी सादर करणार आहे. त्यामध्ये रेहमानचा 'रोजा' ते 'रोबोट' असा संगीतमय चित्रपटप्रवास रसिकांसमोर उलगडेल. 'क्लासिक इनकॅंटेशन्स' नावाचा हा कार्यक्रम २० ते २९ जानेवारी दरम्यान होणार आहे.

बॉलीवूडचा ध्वज ऑस्करमध्ये फडकवणारा ए. आर. रेहमान याला पुन्हा जागतिक मान मिळत आहे. बॉलीवूडमधून सुरुवात करून ऑस्करपर्यंत धडक मारणाऱ्या रेहमानचे चाहते भारताप्रमाणेच जगभरात आहेत. त्याच्या संगीताने प्रभावित होऊन बेबल्सबर्ग ऑर्केस्ट्रा आता 'क्लासिक इनकॅंटेशन्स' सादर करणार आहे. 'मी या संधीमुळे खूपच उत्साहित आहे. मला खात्री आहे, की भारतीय संगीतप्रेमींना या कार्यक्रमातून नवीन अनुभव मिळेल. अधिकाधिक तरुण ऑर्केस्ट्रा या प्रकाराकडे आकर्षित होतील, असे रेहमान सांगतो.
First Published: Tuesday, January 10, 2012, 08:54