(मराठी भाषा दिन विशेष) रक्त मराठी, फक्त मराठी - Marathi News 24taas.com

(मराठी भाषा दिन विशेष) रक्त मराठी, फक्त मराठी

www.24taas.com, मुंबई
 
कुसुमाग्रजांचा जन्मदिवस 'मराठी भाषा दिवस' म्हणून  उत्साहात आज साजरा होत आहे. या निमित्तानं विविध कार्यक्रमांच राज्यभरात आयोजन करण्यात आलं आहे. कुसुमाग्रजांचे हे जन्मशताब्दी वर्ष असल्यानं 'रक्त मराठी, फक्त मराठी' हा विशेष कार्यक्रम सादर केला जाणार आहे.
 

ज्ञानपीठ विजेते ज्येष्ठ मराठी साहित्यक वि.वा.शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मायबोली मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. कवितेमध्ये रमताना कुसुमाग्रजांनी कथा, कादंबरी, नाटक, ललित वाड्मयातही मुक्त विहार करणारे,शब्दांनो मागु त्या ही ओळ सार्थ करणारे शब्दयोगी विष्णू वामन शिरवाडकर.. वयाच्या १७ व्या वर्षापासून ‘बालबोधमेवा’ या मासिकातून कविता आणि ललित साहित्य लिहायला सुरुवात केली. १९४२ मध्ये प्रसिद्ध  झालेला विशाखा हा त्यांचा काव्य संग्रह साहित्यातला ठेवा आहे. क्रांतीचा जयजयकार, वेडात मराठे वीर दौडले सात, आगगाडी आणि जमीन , अहि-नकुल, पृथ्वीचं प्रेमगीत या कविताही आजही तितक्यात लोकप्रिय आहेत. ‘प्रेम कर भिल्लासारखं बाणावर खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहचलेलं’ असं लिहणारी त्यांची लेखणी...
 
‘नटसम्राट’ या महान नाट्यकृतीसाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. तर १९८८ मध्ये ज्ञानपीठ पुरस्कारानं त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव करण्यात आला. साहित्यातलं सर्वोच्च पुरस्कार मिळवणारे ते दुसरे मराठी साहित्यिक. इतरही अनेक मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले.  सामाजिक अन्याय,विषमता यावर तात्यासाहेबांनी लेखणीतून प्रहार केले. केवळ लिखाण करून ते थांबले नाही तर चळवळींमध्येत्यांनी सहभाग दिला. त्यामुळं एका अर्थानं सामाजिक चळवळींचे ते प्रणेते होते.
 
जागतिक मराठी परिषदेच्यावतीनं कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.

First Published: Monday, February 27, 2012, 08:49


comments powered by Disqus