मकरंद साठें यांना गंगाधर गाडगीळ पुरस्कार - Marathi News 24taas.com

मकरंद साठें यांना गंगाधर गाडगीळ पुरस्कार

झी २४ तास वेब टीम, मुंबई
मराठी साहित्यातील प्रसिद्ध लेखक मकरंद साठे यांना गंगाधर गाडगीळ पुरस्काराने आज गौरवण्यात आलं. मराठी साहित्यातील नाविन्यपूर्ण लेखन करणार्‍या नवोदित लेखकांना हा पुरस्कार देण्यात येतो.  मुलुंड येथील महाराष्ट्र सेवा संघाच्या सु.ल. गद्रे सभागृहात हा सोहळा पार पडला. या सोहळ्यात ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या हस्ते मकरंद साठे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पॉप्युलर प्रकाशनाचे रामदास भटकळ, पुरस्कार निवड समितीचे सदस्य प्रा. हरिश्‍चंद्र थोरातदेखील उपस्थित होते.
 
गाडगीळांसारख्या साहित्यिकाच्या नावाचा पुरस्कार मिळणे हे मी माझे भाग्य समजतो अशा शब्दांत मनात आलेल्या भावना साठे यांनी उपस्थितांसमोर मांडल्या. तर जब्बार पटेल यांचं आपल्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान असल्याचंही साठे यांनी आवर्जून सांगितलं.  साहित्यिक असण्याबरोबरच साठे हे  खरंतर उत्तम आर्किटेक्टसुद्धा  आहेत. यावेळी सोहळ्याच्या प्रसंगी साठे यांच्या 'सूर्य पाहिलेला माणूस' या नाटकातील काही प्रवेशसुद्धा वाचून दाखवण्यात आले.
 
नेहमीच्या वाटेऐवजी काहीतरी वेगळे सांगण्याची ऊर्जा लेखकात निर्माण झाली की ते सांगणं लेखकाला भाग असतं. या वेगळ्या लेखनाबाबत मग वाचकच काय ते ठरवतील. पण, ते लोकांसाठीच असतं. त्यामुळे साहित्य हे कधीही स्वांत सुखाय असू शकत नाही, असंही मकरंद साठे या प्रसंगी केले.

First Published: Friday, November 18, 2011, 13:05


comments powered by Disqus