झी सारेगमप : अभिनेते प्रशांत दामलेंची बाजी - Marathi News 24taas.com

झी सारेगमप : अभिनेते प्रशांत दामलेंची बाजी

www.24taas.com, मुंबई
 
 
झी मराठीच्या सारेगम अंतिम सोहळा सुरांची आतषबाजी अधिकच रंगत गेला. कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहचली होती. अंतिम विजेत्याचे नाव घोषित होणार असल्याने स्पर्धकांच्या चेहऱ्यांवर भीती दिसत होती. प्रशांत दामले यांचे नाव उच्चारताच  त्यांचे अभिनंदन करण्यास मंचावरील सर्व कलाकार पुढे सरसावले आणि एकच जल्लोष केला.
 
 
 
मुंबईतील नरिमन पॉइंटच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात झालेल्या या सोहळ्याचा  प्रारंभ अमृता सुभाष यांनी 'बहु असोत सुंदर संपन्न की महा' या गाण्याने केला. त्यांनी रात्री अर्ध्या रात्री, मैं चली आणि वाट बघतोय रिक्षावाला ही गाणी सादर केली. महाअंतिम फेरीतही त्यांनी सुरांची आतषबाजी केली आणि त्यात रसिक न्हाऊन निघाले. परीक्षक अवधूत गुप्ते आणि वंदना गुप्ते यांच्याबरोबरच रसिक प्रेक्षकांची दाद मिळवण्यासाठी या गायकांनी एकाहून एक सरस गाणी पेश केली.
 
 
तीन महिन्यांपासून संगीत क्षेत्रात चर्चेर्त असलेल्या झी मराठीवरील सारेगमपच्या तारांकित पर्वात अभिनेते प्रशांत दामले यांनी बाजी मारली आहे. रविवारी संध्याकाळी ज्येष्ठ गायक हरिहरन यांच्या हस्ते त्यांना विजेतेपदाचे मानचिन्ह आणि पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी वैभव मांगले यांनी माझ्या मराठी मातीचा, घन आज बरसे, जब से तेरे नैना ही गाणी गायली. अजय पूरकर यांनी स्वराज्य तोरण, नमक इश्क का, मी हाय कोली ही गाणी सादर केली. तर केतकी थत्ते यांनी मराठी असे अमुची मायबोली, का कळेना, राजसा जवळी जरा बसा ही गाणी गायली. विजेते ठरलेल्या प्रशांत दामले यांनी जय जय महाराष्ट्र, गारवा, इना मिना डिका, तुझी चाल तुरूतुरू, मैं अगर कहू ही गाणी सादर केली.
 
 
सारेगमपच्या या पर्वाचे विजेतेपद ही माझी चौथीची स्कॉलरशीप पास झाल्याची पावती आहे. अजून मोठी मजल बाकी आहे, अशा शब्दांत प्रशांत दामले यांनी भावना व्यक्त केल्या. तर, याच पर्वात आमच्या गाण्याचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला, इथवर प्रवास केला हे आमच्यासाठी विजेतेपदाएवढेच महत्त्वाचे आहे, अशी प्रतिक्रिया अमृता सुभाष, वैभव मांगले, अजय पूरकर आणि केतकी थत्ते यांनी व्यक्त केली.

First Published: Monday, April 30, 2012, 14:32


comments powered by Disqus