७० वर्षीय वृद्धाचा अस्वलाशी सामना... दोघांचाही मृत्यू!, 70 years old death & beer fight

७० वर्षीय वृद्धाचा अस्वलाशी सामना... दोघांचाही मृत्यू!

७० वर्षीय वृद्धाचा अस्वलाशी सामना... दोघांचाही मृत्यू!
www.24taas.com, बुलडाणा

अस्वलाशी झालेल्या सामन्यात एका ७० वर्षीय वृद्धाचा आणि अस्वलाचाही मृत्यू झाल्याची घटना बुलडाण्यात घडलीय. ज्ञानगंगा अभयारण्यात ही घटना घडलीय.

चरण्यासाठी म्हणून निघालेली गाय तीन दिवस झाले तरी परत आली नाही, म्हणून वरवंडचे रहिवाशी असलेले ज्ञानदेव शेळके ७० वर्षीय गृहस्थ तिच्या शोधासाठी बाहेर पडले. शोध घेता घेता ते ज्ञानगंगा अभयारण्यात पोहचले. त्यावेळी त्यांच्यावर एका अस्वलाने हल्ला केला. यावेळी शेळके यांनी त्यांच्याकडे असलेल्या कुऱ्हाडीने या अस्वलाचा सामना केला. अस्वलाच्या हल्ल्यात शेळके गंभीर जखमी झाले तसंच त्यांच्या हातातील कुऱ्हाडीचा वार अस्वलावर झाला. या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला.

दोन दिवस उलटल्यानंतरही शेळके परत न आल्याने जंगलामध्ये त्यांचा शोध सुरु झाला आणि त्यावेळी ही त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. सदर जंगल हे अभयारण्य असल्यानं वन्यजीव विभागाच्या अखत्यारीत येतं. तर विभागाचे कार्यालय हे अकोला येथे असल्याने जंगलामध्ये कोणीही मुक्त संचार करत असतो त्यावर कुणाचाही अंकुश नाही. त्यामुळे वन्यजीव विभागाचे कार्यालय बुलढाण्यात होणं गरजेचं आहे, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जातेय.

First Published: Friday, March 1, 2013, 14:09


comments powered by Disqus