सावकारी प्रतिबंधक कायद्याचं राज्यात `वसंत` उद्घाटन, Savkari Prevention Act case registered in mahara

सावकारी प्रतिबंधक कायद्याचं राज्यात `वसंत` उद्घाटन...

सावकारी प्रतिबंधक कायद्याचं राज्यात `वसंत` उद्घाटन...

www.24taas.com, झी मीडिया, नांदेड

नांदेड जिल्ह्याच्या लोहा-कंधार लालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना व्याजावर पैसे देऊन त्यांची शेकडो एकर शेती हडप करणाऱ्या एका सावकाराला आणि त्याच्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. नव्यानेच अस्तित्वात आलेल्या सावकारी प्रतिबंधक कायद्यानुसार राज्यात दाखल झालेला हा पहिलाच गुन्हा आहे. 

नांदेड जिल्ह्याच्या कंधारमधील वसंत सावकार... या सावकाराने कंधार-लोहा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी हडप केल्या. बेकायदेशीरपणे व्याजाने पैसे देण्याचा धंदा करत या सावकारने लोहा-कंधार तालुक्यातील २९ शेतकऱ्यांची सुमारे २०० एकर शेती हडप केली. पोलीस तपासातून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. पोलिसांनी वसंत सावकारासह चौघांना अटक केलीय. नव्यानेच संमत झालेल्या सावकारी प्रतिबंधक कायद्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली. राज्यातला हा पहिलाच गुन्हा आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक विठ्ठलराव जाधव आणि पोलीस उपाधीक्षक अशोक वीरकर यांनी दिलीय.
 

वसंत सावकार हा सुरूवातीला व्याजाने दिलेल्या पैशांच्या बदल्यात शेती गहाण ठेवत होता. नंतर शेतकऱ्यांना फसवून ते शेती आपल्या नावावर करून घेत होता. कंधार तालुक्यातील किरोडा, निळा अशा अनेक गावातील शेतकऱ्यांना या सावकाराने अशा प्रकारे फसवलं. व्याजाने पैसे घेतल्याचं इतरांना कळल्यास ते कमीपणाचं वाटत असल्यानं अनेक शेतकरी गुपचूप होते आणि याचाच फायदा सावकारने उचलला. पण काही शेतकरी मुद्दलचे पैसे घेऊन सावकाराकडे गेले. त्यावेळी त्याने टाळाटाळ सुरू केली. हा प्रकार अनेक शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी एकत्रित येऊन त्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. पण, पोलिसांनी दखल न घेतल्यानं शेतकऱ्यांनी मुंबईत जाऊन थेट गृहमंत्री आर. आर. पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.

नवीन सावकारी प्रतिबंधक कायद्यानुसार सहाय्यक निबंधकांनी दिलेल्या तक्रारीवर लोहा पोलिसांनी बेकायदेशीर व्याजा धंदा करणाऱ्या वसंत भागवत पापीनवार आणि त्याच्या १२ साथीदारांवर गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणी पोलिसांनी वसंत सावकारासह चौघांना अटकही केलीय.




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, January 22, 2014, 13:22


comments powered by Disqus