शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान हतबल, school problem in Education Minister`s district Parbhani

शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान झाल्यात हतबल

शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान झाल्यात हतबल
www.24taas.com, झी मीडिया, परभणी

शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांच्या परभणी जिल्ह्यात शाळांची दूरवस्था झालीय. अधिका-यांच्या कामचुकारपणामुळं खुद्द राज्यमंत्री हतबल झाल्यात. त्यामुळं दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना मिळणार का असा सवाल उपस्थित करण्यात येतोय.

मोडकळीस आलेली इमारत. तुटलेले दरवाजे. ही अवस्था आहे परभणीतल्या एरंडेश्वर इथं असणा-या जिल्हा परिषद शाळेची. ही अवस्था पाहून या इमारतीला शाळा म्हणावं का असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. कारण या शाळेत मूलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे.

विद्यार्थ्यांना बसायला बेंच नाही. शिक्षणाचा दर्जाही खालावलेला. विशेष म्हणजे शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान परभणी जिल्ह्याच्या असूनही शाळेची ही दूरवस्था. या विषयी प्रस्ताव आल्यास मदत करु असं पठडीतलं उत्तर त्या देतायत. शिवाय अधिकारीच प्रस्ताव पाठवण्यास दिरंगाई करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.

या विषयी मुख्य कार्यकारी अधिका-यांना भेटण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या कार्यालयात कुणीही उपस्थित नव्हतं... सातत्यानं पाठपुरावा करुनही जिल्हा परिषदेच्या अधिका-यांनी यावर उत्तर देणं टाळलं. शाळेच्या दूरवस्थेला राष्ट्रवादीचं गटातटाचं राजकारण कारणीभूत असल्याचं शिक्षण राज्यमंत्री सांगतायत.

शाळेची दूरवस्था माहिती असूनही दिरंगाई करणा-या अधिका-यांवर कारवाई का करत नाही असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होतोय. गटातटाच्या राजकारणात विद्यार्थ्यांचं नुकसान का याचं उत्तर शिक्षण राज्यमंत्री देतील का, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.





इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, January 21, 2014, 08:00


comments powered by Disqus