Last Updated: Thursday, May 17, 2012, 21:58
www.24taas.com, औरंगाबाद एरव्ही मराठीचा घोषा लावणारी शिवसेनेचं मराठीप्रेम कीती बेगडी आहे, याचा नमुनाच औरंगाबादेत पहावयास मिळतोय. गेल्या 15 वर्षांपासून औरंगाबाद महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे, मात्र औरंगाबादेत सगळीकडेच दुकानावर इंग्रजी पाट्या दिसतात. पाट्या मराठीत असाव्या असा राज्य शासनाचा नियम आहे मात्र महापालिकेला आणि शिवसेनेला याचा विसर पडलेला दिसतोय.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानंतर 1995 मध्ये युतीची सत्ता असताना राज्यात मराठी पाट्या लावण्याचा कायदा करण्यात आला. परंतू, शिवसेनेची सत्ता असलेल्या औरंगाबाद महानगरपालिकेच्या हद्दीत मराठीची पाटी कोरीच आहे. महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांच्या मोटारी असोत वा महापालिकेच्या इमारती... सगळीकडे दिसतील त्या इंग्रजी पाट्या... यांनाच जर मराठीचं वावडं असेल तर दुकानांवरील इंग्रजी पाट्यांवर कारवाईची अपेक्षा करणं चुकीचं आहे, हा प्रकार महापौरांच्या लक्षात आणून दिल्यानंतर नेहमीप्रमाणे त्यांनी कारवाईची थातूरमातूर भाषा केली. तर मराठीचे दुसरा ‘तारणहार’ असलेल्या मनसेनं एकदम झोपेतून जाग आल्याप्रमाणं यावर आता आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय.
व्यावसायिकांना पाट्या मराठीत असाव्यात अशा स्वरूपाचा कायदा आहे. याबाबत माहितीच नाही. त्यामुळं बाजारपेठेत फेरफटका मारल्यानंतर अपवाद वगळता सगळीकडं इंग्रजी पाट्याच दिसतात. मराठी पाट्यांबाबत पालिका प्रशसनाकडं विचारणा केली असता उत्तर देण्यास कुणीही धजावलं नाही. राजकारण करण्यासाठी मराठीचा मुद्दा नेहमीच आळीपाळीनं शिवसेना आणि मनसे वापरत असते. परंतू कायदा अंमलबजावणीची वेळ आली की या पक्षांचे मराठीवरील कसं बेगडी आहे, हे यावरून दिसून येतंय
First Published: Thursday, May 17, 2012, 21:58