Last Updated: Friday, May 18, 2012, 12:49
www.24taas.com, जळगाव जळगावमध्ये ऐन दुष्काळी परिस्थितीत शेतक-यांची थट्टा चालवल्याचा प्रकार समोर आला आहे. कृषीपंपांच्या विजेच्या मोटारी त्याच आणि विजेचा वापरही नगन्यच असतांना शेतक-यांना अव्वाच्या सव्वा बिलं आली आहेत.
कृषी पंपांचं वीजबिल तीन ऐवजी पाच तर पाच ऐवजी दहा हॉर्सपॉवरचं पाठवण्यात आल्यानं शेतक-यांच्या पायाखलची जमीनच सरकलीय. राज्यातील शेतक-यांकडून सरकार एकप्रकारे खंडणी वसूल करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.
एकीकडे पुरेसा पाऊस नाही, विहिरींची पाण्याची पातळी खोल गेलीय. तर दुसरीकडे लोडशेडिंगमुळे वीजपुरवठा नाही. त्यामुळे शेती करावी कशी असा यक्षप्रश्न शेतक-यांना पडलाय. अशातच शेतक-यांना अव्वाच्या सव्वा वीजबिलं पाठवून सरकारनं त्यांची नाडवणूक सुरू केलीय. कृषीपंपांचं वीजबिलं चक्क तीनच्या जागी पाच तर पाचच्या जागी दहा हॉर्सपॉवरची पाठविण्यात आल्याने जादा पैसे मोजावे लागणार आहेत. हा सर्व व्यवहार पैशासाठी आहे का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
First Published: Friday, May 18, 2012, 12:49