सोलापूरचा पाणीप्रश्न पेटणार - Marathi News 24taas.com

सोलापूरचा पाणीप्रश्न पेटणार

Tag:  
www.24taas.com, उस्मानाबाद
 
पाण्याच्या प्रश्नावरुन उस्मानाबाद विरुद्ध सोलापूर असा वाद रंगण्याची चिन्ह आहेत.  सीना कोळेगाव प्रकल्पाचं पाणी सोलापूरला द्यायला उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सर्वपक्षीय नेत्यांनी विरोध केला आहे.
 
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सीना कोळेगाव धरणाचं पाणी सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्याला देण्याच्या मुख्यमंत्र्या निर्णयाचे तीव्र पडसाद उस्मानाबाद जिल्ह्यात उमटत आहेत. परंडा तालुक्यातल्या सर्वपक्षीय नेत्यांनी प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन या निर्णयाचा विरोध केला. मुख्यमंत्र्या विरोधात घोषणाबाजी करून निर्णयाच्या आदेशाची प्रतही जाळली.  या आंदोलनामध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातले शेतकरीही सहभागी झाले होते. कोणत्याही परिस्थितीत सीना कोळेगावचं पाणी सोलापूरला देणार नाही अशा  इशारा यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी दिला.
 
सीना–कोळेगावचं पाणी सोलापूरला देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी जो आदेश दिला आहे, त्यामध्ये विचित्र आणि अव्यवहार्य अटी  आहेत. सोलापूर जिल्ह्यात सीना नदीवर असणा-या २१ बंधा-यात साठलेलं पाणी अगोदर खाली सोडावं लागणार आहे. नदीकाठी असणा-या,१५० किलोमीटर अंतरावरील शेतक-याचं वीज कनेक्शन तोडून टाकावं लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच सीना–कोळेगावचं पाणी सोडण्यात यावं असं आदेशात म्हटलंय. मात्र वीज कनेक्शन तोडायला सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा , माढा, मोहोळ तालुक्यातल्या शेतक-यांचा मोठा विरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळंच सीना कोळेगावच्या पाण्याचा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

First Published: Saturday, May 19, 2012, 13:55


comments powered by Disqus