Last Updated: Monday, June 4, 2012, 17:34
www.24taas.com, बीड बीड जिल्ह्यातील स्त्री भ्रूणहत्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन राज्य सरकारने आता कडक पाऊल उचलण्यास सुरुवात केलीय. यानुसार बीड जिल्ह्यातील खासगी सोनोग्राफी सेंटर्स बंद करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव आहे.
८ जूनला इंडियन मेडिकल कौन्सिल, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल आणि राज्य सरकार यांच्यात बैठक होणार आहे. या बैठकीत हा निर्णय होणाराय. तसंच स्त्री भ्रूणहत्येप्रकरणी 49 डॉक्टरांची नोंदणीही रद्द करण्याचा प्रस्ताव मेडिकल कौन्सिलकडं प्रस्ताव पाठवण्यात आला असून त्यावरही या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. नोंदणी रद्द करण्यात येणा-या डॉक्टरांमध्ये परळीतल्या डॉ. सुदाम मुंडेंच्या नावाचाही समावेश आहे.
बीड जिल्ह्यातील खासगी सोनोग्राफी सेंटर बंद करण्यात येणार असल्यानं आता फक्त सरकारी रुग्णालयांमध्येच सोनोग्राफी करावी लागणार आहे. सोनोग्राफीसाठी रुग्णाला पाठवताना प्रसुतीतज्ज्ञानं याविषयीची माहिती आरोग्य विभागाला देणं गरजेचं आहे. तसंच यापूर्वी ज्या रुग्णालयांतील सोनोग्राफी मशीन सील करण्यात आलेत. त्या रुग्णालयांसमोर मोठे बोर्ड लावण्यात येणारेत.
First Published: Monday, June 4, 2012, 17:34