अजितदादा की मुंडे, केजमध्ये कोण ठरणार तरबेज? - Marathi News 24taas.com

अजितदादा की मुंडे, केजमध्ये कोण ठरणार तरबेज?

लक्ष्मीकांत रुईकर, www.24taas.com, बीड
 
अजितदादा विरूद्ध गोपीनाथ मुंडे यांच्यातला सत्तासंघर्ष पुन्हा एकदा महाराष्ट्राला पहायला मिळणार आहे. निमित्त आहे ते बीड जिल्ह्यातल्या केज विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीचं. उद्या केज मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. माजी मंत्री विमल मुंदडा यांच्या निधनानं रिक्त झालेल्या जागेवर कुणाची सरशी होते हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
 
बीड जिल्ह्यातल्या केज विधानसभा मतदारसंघात सध्या जोरदार सत्तासंघर्ष सुरू आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि भाजप नेते गोपीनाथ मुंडे पुन्हा एकदा या निवडणुकीच्या निमित्तानं आमनेसामने आलेत. खडकवासल्याची पुनरावृत्ती करण्यासाठी मुंडेंनी आपली सगळी ताकद पणाला लावली आहे. तर केजचा गड कायम राखण्यासाठी राष्ट्रवादीनंही मंत्र्यांची फौज मैदानात उतरवली आहे. इथं राष्ट्रवादीतर्फे पृथ्वीराज साठे तर भाजपातर्फे संगीता ठोंबरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 1990 पासून विमल मुंदडा याचा या मतदार संघात दबदबा राहिलाय. सुरूवातीला भाजपमधून आमदार झालेल्या विमल मुंदडांनी 1999 मध्ये राष्ट्रवादी प्रवेश केला आणि तेंव्हापासून इथं राष्ट्रवादीचं प्राबल्य आहे. अनुसुचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात 3 लाख 30 हजार मतदार आहेत. मतांचं गणित पाहिल्यास आतापर्यंत इथे कायम चर्मकारी समाजच प्रभावी राहिलाय. केज, आंबोजोगाई आणि बीड तालुक्याचा काही भाग या मतदार संघात येतो.
 
राष्ट्रवादीच्या ताब्यातला केजचा गड खेचून आणण्यासाठी खासदार गोपीनाथ मुंडे, आमदार पंकजा पालवे, आमदार पाशा पटेल, इथं तळ ठोकून आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडून पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर, आ. सुरेश धस, राज्यमंत्री प्रकाश सोळंकी, आ. धनंजय मुंडे यांनीही कंबर कसलीय. आता उद्याच्या मतदानानंतर केजचा गड भाजपच्या हाती जातो की राष्ट्रवादी मुंडेंचा प्रयत्न हाणून पाडतात हे पाहणं महत्वाचं ठरेल.
 

First Published: Monday, June 11, 2012, 08:20


comments powered by Disqus