Last Updated: Monday, June 18, 2012, 14:47
www.24taas.com, गौताळागौताळा अभयारण्याचे सगळे निकष धाब्यावर बसवत रविवारी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत काँग्रेसचा युवा सन्मान सोहळा साजरा करण्यात आला...
या मेळाव्यासाठी पुरणवाडीच्या वन खात्याच्या विश्रामगृहात खास मेजवानीचेही आयोजन करण्यात आले होते.. ज्या वन खात्याच्या अधिका-यांना नियम तोडणा-यांवर कारवाई करण्यासाठी नेमण्यात आले होते, तेच अधिकारी या मेळाव्याला आलेल्या पाहुण्यांच्या खातिरदारीत गुंतले होते..
कायद्यानुसार अभयारण्यात अशाप्रकारे सार्वजनिक कार्यक्रम घेता येत नाहीत. मात्र वनमंत्र्यांच्या मुलाचा कार्यक्रम असल्याने फक्त मेळाव्याचीच नाही तर मांसाहारी जेवण तयार करण्याची सुद्धा परवानगी देण्यात आली होती.. धक्कादायकपणे अभयारण्यात पुरणवाडीच्या विश्रामगृह परिसरात चुली पेटवण्यात आल्या होत्या, तर लाऊडस्पीकरवर सुद्धा मोठ्या आवाजात गाणी लावण्यात आली होती..
एकाच वेळी शंभरपेक्षा जास्त वाहने या अभयारण्यात नेण्यात आली होती.. अशा पद्धतीने वाहने अभयारण्यात नेणेही गुन्हाच आहे.. राज्याच्या वन खात्याच्या मंत्र्यांचा मुलगाच अभयारण्याचे नियम तोडत होता. त्यामुळे वन खात्याच्या अधिका-यांना तो मेळावा पाहत राहण्याशिवाय पर्याय नव्हता.
First Published: Monday, June 18, 2012, 14:47