अपघाती पुल, ढिम्म प्रशासन - Marathi News 24taas.com

अपघाती पुल, ढिम्म प्रशासन

महेश पोतदार, www.24taas.com, उस्मानाबाद
 
खाजगी प्रवासी बस पुलावरून दरीत कोसळल्यामुळं नळदुर्गजवळ झालेल्या भीषण अपघातात २९ जणांचा मृत्यू झाला होता. या अरुंद पुलावर याअगोदर अनेकदा अपघात होऊनही प्रशासनाला जाग आलेली नाही.
 
उस्मानाबाद जिल्ह्यातून जाणा-या पुणे–हैद्राबाद हायवेवरील नळदुर्गजवळच्या याच अरुंद पुलावरून खाजगी बस दरीत कोसळून २९ प्रवाशांना जीव गमवावा लागला होता. तर 16 जण जखमी झाले होते. बसचा प्रचंड वेग आणि संरक्षक कठडे नसलेला अरुंद पूलच कर्दनकाळ ठरल्याचं समोर येतय. हा पूल अरुंद तर आहेच शिवाय पुलाला साधे संरक्षक कठडेही नाहीत. दोन-चार दगड एकावर-एक रचून, त्यांना चुना फासून, कठड्यांचा देखावा निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न महामार्ग विशेष प्रकल्प कार्यालयानं केलाय.
 
यापूर्वीही अनेकवेळा या पुलावर अपघात होऊन अनेकांचे मृत्यू झालेत. परंतू प्रशासनानं यानंतर कोणतीही काळजी घेतली नसल्याचं समोर आलंय.या भीषण अपघातानंतर मात्र प्रशासनाकडून नेहमीप्रमाणे कारणांचा शोध आणि चौकशा सुरु झाल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळं २९ जणांना आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळं प्रवाश्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा गुन्हा बसच्या ड्रायव्हर सोबतच बांधकाम विभागातील संबंधित अभियंत्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी होतेय.
 
 

First Published: Monday, June 18, 2012, 23:28


comments powered by Disqus