२ मुलं मराठी शाळेत, मनसे काय करणार? - Marathi News 24taas.com

२ मुलं मराठी शाळेत, मनसे काय करणार?

www.24taas.com, विशाल करोळे, औरंगाबाद
 
इंग्रजी शिक्षणाची ओढ वाढल्याचा थेट परिणाम मराठी शाळांवर होतो आहे. विद्यार्थी कमी असल्याचं कारण देत काही ठिकाणी मराठी तुकड्या बंदही केल्या जातात. मात्र औरंगाबादेत केवळ दोनच विद्यार्थ्यासाठी मराठी वर्गाची तुकडी सुरू आहे. त्यामुळे मराठी भाषेचा आग्रह धरणारा मनसे पक्ष मराठी शाळेबाबत काय करणार? असा प्रश्न तिथले स्थानिक विचारत आहे.
 
महाराष्ट्र पब्लिक स्कूलमध्ये शिकणारे दोन विद्यार्थी... श्रुती आणि योगेश. वर्गात फक्त दोघंच शिकतात. त्यामुळे इतर मुलं कुठं गेली असा प्रश्न पडणं साहजिक आहे? मात्र खरंच या वर्गात दोघेच शिक्षणाची बाराखडी गिरवतात. कारण ते मराठी माध्यमात शिकतात. स्पर्धेच्या या युगात आपल्या पाल्यानं टिकाव धरावा म्हणून  इंग्रजी माध्यमात टाकण्याचे प्रमाण सध्या मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. त्यामुळे  मराठीच्या वर्गाला फक्त दोनच मुलं मिळाली आहेत.
 
विद्यार्थी संख्या वाढली नाही तरी हा वर्ग सुरुच राहणार असल्याचा विश्वास संस्थाचालकांनी व्यक्त केला आहे. आत्तापर्यंत अनेक शाळांनी मराठी शाळांच्या तुकड्या विद्यार्थ्यां अभावी बंद केल्या. मात्र माय मराठीच्या संवर्धनासाठी पालकांनी विद्यार्थ्यांना मराठी माध्यमात टाकणं आणि त्याचबरोबर या शाळेनं मराठी माध्यमाची तुकडी सुरू ठेवणं निश्चितपणे स्तुत्यच म्हणावं लागेल.
 
 

First Published: Friday, June 29, 2012, 20:51


comments powered by Disqus