Last Updated: Tuesday, July 10, 2012, 15:19
www.24taas.com, औरंगाबाद औरंगाबादेत प्रशासनाच्या कारवाईच्या निषेधार्थ सोनोग्राफी सेंटर्सने बेमुदत बंद पुकारलाय.
बेकायदेशीर लिंगनिदान आणि स्त्री भ्रूणहत्येविरोधात प्रशासन करत असलेली कारवाई अन्यायकारक असल्याचं कारण देत औरंगाबाद शहरातील स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र संघटनेने शहरात सोनोग्राफी आणि गर्भपात करणार नाही अशी भूमिका घेतलीय. या बंद दरम्यान केवळ गंभीर रुग्णांची तपासणी होणार आहे. प्रशासनाच्या कारवाईत सर्वच डॉक्टर्सना एकसमान वागणूक दिली जात आहे. फक्त कागदपत्रांच्या त्रुटीवरुन दवाखाने सील करणं अन्यायकारक असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
गर्भलिंगनिदान करणाऱ्यांना आणि कागदोपत्री त्रुटी असणाऱ्या डॉक्टरांना वेगवेगळी शिक्षा असावी, अशी डॉक्टरांची मागणी आहे. तसंच गर्भपात आणि सोनोग्राफी सेंटर चालकांनी कोणकोणती कागदपत्रं ठेवावीत, कोणत्या नोंदी ठेवाव्यात याची लेखी यादी जिल्हा समिती आणि राज्य समितीने द्यावी, अशी मागणीही संघटनेतर्फे करण्यात आली आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आपल्या भूमिकेवर ठाम राहणार असल्याचं संघटनेकडून स्पष्ट करण्यात आलंय.
First Published: Tuesday, July 10, 2012, 15:19