Last Updated: Wednesday, July 11, 2012, 13:08
www.24taas.com, उस्मानाबाद पुराणकाळापासून आपल्याकडे यज्ञ परंपरा आहे. अजूनही ठिकठिकाणी होम हवन, यज्ञयाग होत असतात. शांतीपाठ केले जातात. वडगाव सिद्धेश्वर येथेही असाच एक विश्वशांतीसाठी यज्ञ करण्यात आला. मात्र या यज्ञाचं वैशिष्ट्य म्हणजे हा यज्ञ तृतीयपंथी समाजाने केला. इतकंच नव्हे तर या यज्ञाचं पौरोहित्यही किन्नरांनीच केलं.
विश्वशांती आणि मानव कल्याणाप्रित्यर्थ तृतीय पंथीय सिद्धेश्वर मंदिर वडगावजवळील आश्रमात दि. १० जुलै रोजी दु. १२.३० वा. यज्ञ करण्यात आला. मानवता धर्म संस्थेच्या अधिपत्याखाली हा यज्ञ झाला. यापूर्वीही देशभरात अशा प्रकारचे यज्ञ करण्यात आले आहेत. हा दहावा यज्ञ होता. यापूर्वी अशा प्रकारच्या यज्ञाचे आयोजन २७ जून रोजी शहाड येथे करण्यात आले होते.
या यज्ञामध्ये शंभरहून अधिक तृतीयपंथी आणि इतर नागरिक सहभागी झाले होते. जगभरात शांतता नांदावी, माणसांमध्ये शुद्ध विचारांची निर्मिती व्हावी, याचबरोबर तृतीय पंथीय, वेश्या यांचा उद्धार व्हावा या हेतूने हा यज्ञ आयोजित केला होता. यज्ञाचे पौरोहित्यही किन्नरांनीच केले. या यज्ञासाठी राज्यभरातून किन्नर उपस्थित होते. यज्ञाचे यजमानपद मुंबईच्या मुजरा नानी या तृतीयपंथी भूषवले.
First Published: Wednesday, July 11, 2012, 13:08