'रिंगण'.. विठठ्लाचा गजर... 'इंटरनेटवर' - Marathi News 24taas.com

'रिंगण'.. विठठ्लाचा गजर... 'इंटरनेटवर'

www.24taas.com, मुंबई
 
‘रिंगण’ या पहिल्या आषाढी अंकाची इंटरनेट आवृत्ती www.ringan.in चे प्रकाशन नांदेड येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात सोमवारी होत आहे. संतपरपरेची सामाजिक सांस्कृतिक मांडणी करणा-या या वार्षिकाचा हा संत नामदेव विशेषांक या निमित्ताने इंटरनेटवर जाणार आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंत अमर हबीब यांच्या हस्ते हे प्रकाशन होत आहे. मराठी आणि पंजाबी संस्कृतीच्या समन्वयाचा पाया रचणा-या नामदेवांच्या पुण्यतिथीनिमित्त मराठी- पंजाबी समन्वयाचे केंद्र असणा-या नांदेडमध्ये हा सोहळा होत असल्याने याचे आगळेच महत्त्व आहे.
 
१६ जुलै २०१२ रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता मिनी सह्याद्री शासकीय विश्रामगृहाच्या सुसज्ज सभागृहात होणा-या या कार्यक्रमात नांदेड येथील प्रतिभा निकेतन महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य प्रा. हरमहेंद्र सिंग नामदेवांच्या शीख धर्म आणि संस्कृतीवरील प्रभावाविषयी विवेचन करतील. तर नामदेवांचे कार्य आणि ‘रिंगण’ आषाढी अंक याविषयी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ तिवारी आणि प्रा. डॉ. जगदीश कदम प्रकाश टाकतील. ‘रिंगण’चे संपादक सचिन परब वेबसाईट निर्मितीमागची आपली भूमिका सांगतील. तर कार्यक्रमाचे निवेदन व्यंकटेश चौधरी करतील.
 
३० जून २०१२ रोजी म्हणजे या आषाढी एकादशीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते ‘रिंगण’ या आषाढी अंकाचे प्रकाशन पंढरपूर येथील श्रीविठ्ठलमंदिरात झाले. पंजाब, राजस्थान, गुजरात, दिल्ली येथे जाऊन संत नामदेवांच्या कार्याच्या पाऊलखुणा मांडण्याचा प्रयत्न या अंकात झाला आहे. तसेच भालचंद्र नेमाडे, भारतकुमार राऊत, सदानंद मोरे, अशोक कामत, नि. ना. रेळेकर, माधवी आमडेकर ( प्राचार्य, खालसा कॉलेज, लंडन) अशा अनेक मान्यवरांचे नामदेवांविषयीचे चिंतन या अंकात आले आहे.
 
‘रिंगण’च्या पाच हजार अंकाच्या आवृत्तीची धडाक्यात विक्री सुरू आहे. त्यामुळे छोटी शहरे तसेच महाराष्ट्राबाहेरील मराठी माणसांपर्यंत ‘रिंगण’ पोहोचणे कठीण दिसत आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून याचे कायमस्वरूपी संदर्भ म्हणून जतन करण्यासाठी रिंगणच्या वेबसाईटची निर्मिती करण्यात आल्याचे ‘रिंगण’चे संपादक सचिन परब यांनी सांगितले.
 
संपर्कः सचिन परब ९९८७०३६८०५
वितरण व्यवस्थाः मनोविकास प्रकाशनः ०२०-६५२६२९५०
 
 
 
 
 
 

First Published: Sunday, July 15, 2012, 00:01


comments powered by Disqus