Last Updated: Wednesday, December 21, 2011, 09:23
झी २४ तास वेब टीम, बीड 
राजकारणात वाद काही नवे नाहीत, मात्र आता यात एकाच कुटूंबातील राजकिय नेत्यांमध्ये हे वाद होत आहे. आणि दिवसेंदिवस हे वाद वाढतच चालले आहेत. ठाकरे काका-पुतण्यातील वादानंतर आता आणखी एक असाच वाद समोर येऊ लागला आहे. भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधात त्यांच्याच पुतण्याने म्हणजेच धनंजय मुंडे यांनी बंड पुकारलं आहे.
बीड जिल्ह्यातल्या परळी नगराध्यक्षपदावरुन गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे आमनेसामने उभे ठाकले आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्या समर्थकाच्या उमेदवारीला धनंजय मुंडे यांच्या समर्थकानी आव्हान दिल आहे. त्यामुळं परळीत काका-पुतण्याचा संघर्ष पेटला आहे.यापुर्वी दोघांमध्ये वाद असल्याचं वारंवार सांगितलं जात होतं. मात्र आता हा वाद थेट चव्हाट्यावर आला.
परळी नगरपालिकेत भाजपचे १६ तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे १५ नगरसेवक निवडून आलेत. तर एक अपक्ष उमेदवार निवडून आला. आणि हाच अपक्ष उमेदवार धनंजय मुंडे गटाचा आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. धनंजय मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंना थेट आव्हान देत धनंजय मुंडे गटाचे दिपक देशमुख यांनी अर्ज दाखल केला आहे. भाजपच्या उमेदवाराविरुद्ध आपला उमेदवार उभा करून धनजय मुंडे यांनी राष्ट्रवादीशी घरोबा करण्याचं निश्चित केल्याचं आता बोललं जातं आहे. जावयाच्या बंडाळी नंतर आता पुतण्याने बंडाचे शस्त्र उगारल्याने मुंडे मात्र चांगलेच अडचणीत येऊ शकतात.
First Published: Wednesday, December 21, 2011, 09:23